बोलाचीच कढी

आपल्या आजूबाजूला कामधंदा न करता पोकळ गप्पा मारणारे खूप लोक आपण पहात असतो. मराठीत एक म्हण आहे, ‘लोकाची कढी आन् धाऊ धाऊ वाढी’.
Sant Tukaram Maharaj
Sant Tukaram MaharajSakal
Updated on

संत तुकारामांसारखं निरीक्षण फार कमी लोकांचं आहे. त्यांच्या ओळी म्हणजे जीवनावरचं सहज सोपं भाष्य. आजही एखादी गोष्ट सोप्या पद्धतीनं समजून सांगायची असेल, तर तुकारामांच्या ओळींची मदत घ्यावी लागते. त्यांची निरीक्षणशक्ती आणि दूरदृष्टी अफलातून होती. म्हणून त्यांच्या ओळी आजही चपखल वाटतात. मराठीतल्या या थोर कवीच्या ओळींवर आपोआप आपल्यालाही असंख्य गोष्टी सुचू लागतात.

आपल्या आजूबाजूला कामधंदा न करता पोकळ गप्पा मारणारे खूप लोक आपण पहात असतो. मराठीत एक म्हण आहे, ‘लोकाची कढी आन् धाऊ धाऊ वाढी’. शाळेत अभ्यास करणारी मुलं शांत बसलेली दिसतील. कोणत्याही समारंभात काम करणारी माणसं शांतपणे काम करताना दिसतील, त्यांना बोलायला वेळच नसतो; पण जे रिकामे बसलेले असतात, ते मात्र सारखी बडबड करताना दिसतील.

हॉटेलात जेवायला बसलेला माणूस गप्प जेवत असतो; पण दोघांत एक कप चहा पिणारे मात्र जोरजोरात बोलत असतात. फुकट बडबड करणाऱ्या माणसाला तुम्ही थांबवूच शकत नाही. ज्याच्याकडं काही नसतं, तो तोंडाची वाफ दवडीत असतो. असं म्हणतात, ‘ जो उपचार करू शकत नाही, तो दिलासा जास्त देत असतो आणि ज्याचं डोकं जास्त चालत नाही, त्याच्या तोंडाचा पट्टा अव्याहत चालू असतो.’ अशा माणसाजवळ तुम्ही मदत मागून तर बघा... ज्याचं तोंड जास्त चालतं तो नेमका अशाच वेळी गायब असतो.

एका गावातली गोष्ट आहे. तिथं एक तरुण मुलांचा ग्रुप असतो. गावातल्या कुणाला काही अडचण आली, तर पोरं हमखास धावून जाणार. कुणाच्या घरी काही कार्य असलं, कुणाला काही मदत करायची असली, सण- समारंभासाठी वर्गणी गोळा करायची असली, तर ग्रुपमधली पोरं तत्पर असायची. गावातली माणसंही त्या मुलांना मनापासून प्रतिसाद द्यायची, मदत करायची. पण, गावात चंदूशेठ नावाचा एक माणूस होता, तो मात्र कंजूष होता. ‘गप्पा मनसोक्त हाणणार; पण खिशातून छदाम नाही काढणार’ अशा वृत्तीचा. उत्सव झालाच पाहिजे, मदतकार्यही झालं पाहिजे असं तोंडानं म्हणायचा; पण आपल्या खिशातून एक रुपयाही काढायचा नाही. त्याचा स्वभाव सगळ्यांना माहीत होता. म्हणून त्याच्याकडं कुणी पैसेही मागायचं नाही. अशा माणसाच्या नादी लागून आपला वेळ कशाला वाया घालवा, म्हणून लोक दुर्लक्ष करायचे. पण एकदा नदीला पूर आला आणि गाव संकटात आलं. दोन दिवस सतत पाऊस पडत होता. लोकांची उपासमार होत होती. तरुण मुलं चंदूशेठकडं गेली. चंदूशेठलाही आधीपासूनच सर्व परस्थिती माहीत होती. मुलांना बघितल्या क्षणीच चंदूशेठनं सुरुवात केली, ‘आपण अशावेळी मदत नाही करायची तर कधी? ’

पोरांनीही कुणाला काय पाहिजे, कुणाचं काय झालं वगैरे सांगायला सुरुवात केली. सगळ्यांचं ऐकून चंदूशेठनं त्यांच्या दुप्पट गोष्टी सांगायला सुरुवात केली. बोलता बोलता चंदूशेठच्या डोळ्यांत पाणीही आलं. शेठ आतल्या खोलीत गेला. मुलांना वाटलं, चंदूशेठ आता नोटांचं बंडल घेऊन येणार. पण चंदूशेठ आतून रुमाल घेऊन आला, डोळे पुसायला लागला. पोरांना वाटलं, चंदूशेठ बदलला, त्याच्या हृदयाला पाझर फुटला. कितीतरी वेळ चंदूशेठ काही बोलत नव्हता, नुसता डोळे पुसत होता.

ग्रुपमधल्या एकानं चंदूशेठला न राहून विचारलं, ‘शेठ करायची ना मदत लोकांना?" शेठ म्हणाला, "हा काय प्रश्न झाला? मदत तर केलीच पाहिजे. गावाची एवढी वाताहत झाली असताना मी काय हातावर हात बांधून बसून राहीन असं वाटतं का?’ पुन्हा चंदूशेठ बोलायला लागला, दुपटीनं बोलायला लागला. ‘हे तर काहीच नाही, आपल्या लहानपणीही पुरानं कशी वाट लावली होती,’ हे तो रंगवून रंगवून सांगायला लागला. एकजण वैतागून म्हणाला, ‘तुम्ही आत्ता काय करायचं ठरवलंय ते सांगा.’

शेठ बाहेर आला, त्यानं पायात चपला सरकवल्या आणि म्हणाला, ‘काय करायचं म्हणजे? मीसुद्धा तुमच्यासोबत मदत मागत फिरणार. गावासाठी मी एवढंही करू शकत नाही का? चला...!’ एवढ्या संकटातही चंदूशेठनं आपल्या खिशातून एक रुपयाही काढला नाही. बोलणारी माणसं मदत करतील याचा भरवसा नसतोच. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात एकतरी पुढारी रोज मतदारसंघाचा कायापालट करायची भाषा करतो, भाषण देतो. सत्तर वर्षांत कोणत्या मतदारसंघाचा किती कायापालट झाला? हा सगळा ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ यासारखंच नाही का? प्रश्न पडतो, कुणाच्या पोटात काही पडलं का?

इंग्लंडमधली गोष्ट आहे. एक म्हातारा माणूस नेहमीच्या सवयीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. काही अंतर चालून गेल्यावर त्याला रस्त्यात एक दुसरा म्हातारा दिसला, थकला भागलेला; एका झाडाखाली बसलेला. त्याच्या लक्षात आलं, म्हातारा धापा टाकत बसलाय. तो त्या म्हाताऱ्या माणसाकडं गेला. म्हणाला, ''काय झालं?'' तो धापा टाकणारा म्हातारा म्हणाला, "काय सांगू मालक. मी रोज जंगलातून लाकडं तोडून नेतो, त्यानंतर घरी चूल पेटते; पण गेले दोन-तीन दिवस अंगात ताप होता, त्यामुळं घरात पडून होतो. मुलंबाळं उपाशी मरायची वेळ आली म्हणून तसाच उठून आलो. पण कुऱ्हाडीचे दोन घाव घातले आणि धाप लागली. आता कधी लाकडं तोडणार? आणि कधी घराकडं नेणार ?

फिरायला निघालेल्या म्हाताऱ्याला दया आली आणि रागही आला. त्यानं, ‘तुझा मुलगा कुठं आहे,’ असं विचारलं. म्हाताऱ्यानं त्याचा तरुण मुलगा गेल्याच वर्षी वारल्याचं सांगितलं. फिरायला निघालेल्या म्हाताऱ्याला त्याची किव आली आणि त्यानं आपले खिसे तपासले. पण तो रोजच्यासारखा सकाळी फिरायला निघाला होता. इतक्या सकाळी आणि मॉर्निंग वॉकला जाताना पैशांची गरज पडत नाही म्हणून त्यानं आपल्यासोबत पाकीटही घेतलं नव्हतं. त्याला खूप वाईट वाटलं. या बिचाऱ्या आजारी म्हाताऱ्याला मदत केली पाहिजे, असं त्याला मनोमन वाटत होतं.

इतक्यात त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यानं त्या म्हाताऱ्याच्या हातातून कुऱ्हाड घेतली आणि त्याला मोळीभर लाकडं तोडून दिली. पण आधीच धापा टाकत असलेला म्हातारा ती लाकडं नेणार कशी, हा पण प्रश्न होता. फिरायला निघालेल्या म्हाताऱ्यानं एका घोडागाडीला हात दाखवला. त्यानं हात दाखवल्याबरोबर घोडागाडीवाला उतरून खाली आला. त्यानं अदबीनं नमस्कार केला. म्हाताऱ्यानं ती मोळी आणि त्या धापा टाकत असलेल्या म्हाताऱ्याला घरी सोडायला सांगितलं. घोडागाडीवाला आनंदानं तयार झाला. फिरायला निघालेला म्हातारा आपल्या तंद्रीत चालू लागला. तो दूर गेल्याचं बघून धापा टाकणाऱ्या म्हाताऱ्यानं घोडागाडीवाल्याला विचारलं, ‘तुम्ही ओळखता का त्या माणसाला?’ घोडागाडीवाल्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, ‘यांना कोण ओळखत नाही? अहो ते आपल्या इंग्लंडचे पंतप्रधान ग्लँडस्टन.’ धापा टाकणारा म्हातारा देवाला बघावं तसा त्या पाठमोऱ्या पंतप्रधानाला बघत होता.

मदत करावी तर अशी. स्वतः कष्ट घेऊन आणि विसरून पण जावी. अशी मदत करणारे आपल्या देशातच नाही, तर जगातल्या प्रत्येक देशात असतात. त्यांनी एका हातानं दिलेली मदत दुसऱ्या हातालाही कळत नाही. अशी माणसं आहेत तोपर्यंत जग चालू आहे, नाहीतर बाकी तुकोबारायांच्या शब्दांत सांगायचं झाल्यास...

‘बोलाचाच भात बोलाचीच कढी जेवूनिया तृप्त कोण झाला?’

(सदराचे लेखक गीतकार व पटकथालेखक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.