काहीतरी बात आहे...

प्रश्न फक्त सत्तेचा नाही; आपल्याकडं लोक घरी बायकोला पगार आणून दिला तरी उपकार केले असं समजतात. आपल्याकडं बिल भरूनपण मोबाईल लवकर लागत नाही.
Hand
HandSakal
Updated on

संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई यांसारख्या स्त्री-संतांची परंपरा आपल्या मराठी भाषेला आहे. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणणाऱ्या मुक्ताबाईसारख्या समंजस बहिणीची आपली आध्यात्मिक परंपरा. त्याकाळात स्त्री फक्त उंबऱ्याबाहेर पडली नाही, तर तिनं स्वतः घराबाहेर पडून तुकारामांसारखा गुरू शोधला, विठ्ठलाशी भांडण केलं. साक्षात विठ्ठलाला खडे बोल सुनावणारी स्त्री होती या महाराष्ट्रात. आज तिचा आवाज कुठं आहे? घराचा कारभार तिनंच सांभाळायचा हा नियम आहे; पण राज्यकारभार सांभाळायची संधी तिला कधी मिळणार? संत जनाबाईच्या लाडक्या विठोबाचं दर्शन घ्यायला, महापूजा करायला एखादी महिला मुख्यमंत्री कधी जाणार?

प्रश्न फक्त सत्तेचा नाही; आपल्याकडं लोक घरी बायकोला पगार आणून दिला तरी उपकार केले असं समजतात. आपल्याकडं बिल भरूनपण मोबाईल लवकर लागत नाही. पण, भांड्याला भांडं लागायला काहीच वेळ लागत नाही. फुकटात दोन मिनिटांत लागतं. कसं काय? ज्या घरातला पुरुष आळशी, त्या घरात फुटकी कळशी. आदळ आपट होणारच. आता नवरा जर एकाही कामाला हात लावणार नसला, तर बायको चिडचिड करणारच. ती बेड आवरून ठेवणार आणि हा लोळणार, ती रद्दी आवरणार आणि हा पेपर चाळणार, तर कसं चालेल? ज्या घरातला पुरुष दिवसातून एकदा तरी स्वतः चहा करून बायकोला देतो, त्या घरात सहसा शांती नांदत असते. एका शाळेत शिक्षकांनी मुलांना जगातली सात आश्चर्यं लिहून काढायला सांगितलं. खूप मुलांना माहीत नव्हतं, ज्यांना माहीत होतं, त्यांनी लिहून काढलं. आयफेल टॉवर आणि काय काय. ज्यांना माहीत नव्हतं, त्यांनी मनानंच ठोकून दिलं. एकानं लिहिलं, रस्त्यातले खड्डे. दरवर्षी पावसाळ्यात आमची महानगरपालिका सेम साइझचे खड्डे बनवते, हे एक आश्चर्य आहे. एकानं तर हाइट केली. त्यानं लिहिलं, माझे वडील प्रत्येक श्रावणात न चुकता संध्याकाळी सात वाजताच घरी येतात, हे एक आश्चर्य आहे.

पण, शिक्षकांना हे वाचून जेवढा धक्का बसला नाही, तेवढा धक्का एका मुलीनं लिहिलेलं आश्चर्य वाचून बसला. तिनं सात आश्चर्य म्हणजे काय लिहिलं होतं मंडळी? तिनं लिहिलं होतं, मला माझ्या कानानं ऐकू येतं हे पहिलं आश्चर्य. मला माझ्या डोळ्यांनी दिसतं हे दुसरं आश्चर्य. मला फुलांचा वास येतो हे तिसरं आश्चर्य. असं श्वास घेता येतो इथपासून सगळी आश्चर्यं तिच्या यादीत होती. किती छोट्या छोट्या गोष्टी त्या मुलीला महत्त्वाच्या वाटत होत्या. स्त्रिया एवढ्या हळव्या असतात. छोट्या छोट्या गोष्टींतलं महत्त्व त्यांना कळलेलं असतं. कारण, या देशातल्या स्त्रीला खूप लहान वयात जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. गावोगावी आजही हीच परिस्थिती आहे. अपेक्षांचं ओझं मुलांच्या खांद्यावर आणि कामाचं ओझं मुलींच्या खांद्यावर. मुलाला लाखांच्या गोष्टी सांगायच्या आणि मुलीला काटकसर शिकवायची, ही पद्धत आजही आहे. मुलाला परदेशात आणि मुलीला सासरी गेलेलं बघायची स्वप्नं आई-बाप बघत असतील तर कसं होणार?

जग बदलतंय. आपल्याकडंही चांगले बदल होताहेत. बायका नवऱ्याला नावानं हाक मारायला लागल्या, हा एक भारी बदल झाला. नाहीतर आधी काय व्हायचं? एक बाई अहो म्हणायची आणि चार लोक वळून बघायचे, आपल्याला हाक मारली का? आता नावच घेतात बायका, त्यामुळं प्रॉब्लेम नाही. नवऱ्याला नावानं हाक मारायची पद्धत नक्की कधी सुरू झाली आपल्याकडं माहीत नाही; पण इरावती कर्वे त्यातल्या सुरुवातीच्या. पुण्यात चर्चा असायची त्याकाळी. इरावतीबाई स्कूटर चालवतात आणि नवरा मागं बसतो, असं दृश्य बघितल्याचं एकमेकांना सांगणारे लोक. इरावतीबाई नवऱ्याला एकेरी हाक मारतात हा धक्का बसलेले लोक. खूप लोक बायका पायलट असल्या की टेन्शनमध्ये येतात. एखादी गाडी रस्त्यानं नीट चालताना दिसली नाही, की पुरुष हमखास अंदाज लावतात, की बाई गाडी चालवत असणार. बायका अपघात करतात, हा अंदाज ठरलेला; पण आकडेवारी उलट सांगते, ही आताची गोष्ट. एक काळ असा होता, की बायकांना बाहेर फिरायला नेणं ही गोष्ट तर अशक्य वाटणारी; पण त्याकाळात एका माणसानं हे धाडस केलं आणि समाजाला या गोष्टीची सवय लागावी म्हणून त्यानं चक्क वर्तमानपत्रात जाहिरात दिली, अमुक दिवशी मी बायकोला फिरायला घेऊन जाणार आहे म्हणून. अशा कितीतरी गोष्टी आहेत.

बायकांना आधी बसून गायचीसुद्धा परवानगी नव्हती, उभं राहून गावं लागायचं. पुस्तक वाचण्याची परवानगी नव्हती. खूप लोकांनी धाडस केलं, विद्रोह केला आणि बदल घडायला सुरुवात झाली. आता सुदैवानं आपल्याला एवढं धाडस करायची गरज नाही; पण अजूनही आपण पुरुष लोकांना बदलायचंय. फार कष्ट नाही केले तरी चालतील; पण खूप साध्या गोष्टी आपण विसरून जातो. स्वयंपाक चांगला झाला तरी दाद द्यायला विसरून जातो आपण. काही गोष्टी लक्षात ठेवून केल्या पाहिजेत. घरकामात थोडी मदत केली तरी बायकोला अभिमान वाटेल. बाजारातून भाजी घेऊन येणारा नवरा किंवा गिरणीतून दळण घेऊन येणारा नवरा शतक पूर्ण करून आलेल्या विराट कोहलीसारखाच दिसतो बायकांना. बाकी आपण ठरवायचं.

व्हिक्टोरिया राणी आपल्या सगळ्यांना माहीत असते. ती ब्रिटनची राणी झाली. जगातल्या कितीतरी देशांत सत्ता होती तिची; पण अमेरिकेत ती राणी झाल्यावर तिथल्या महिलांनी चर्चा सुरू केली. व्हिक्टोरिया युरोपची राणी होऊ शकते, तर एखादी महिला अमेरिकेची अध्यक्ष का होऊ शकत नाही? चर्चा चुकीची नव्हती; पण लोकांना धक्का बसला. पुरुषी मानसिकतेला ते सहन होणारं नव्हतं. पण आश्चर्य म्हणजे, चक्क व्हिक्टोरिया राणीची प्रतिक्रिया पण फारशी आशावादी नव्हती. ती म्हणाली, ''बायकांनी घरं सांभाळावीत आणि पुरुषांनी राजकारण करावं.'' खुद्द राणी जर असा विचार करत असेल, तर सामान्य माणसांचं काय? पण या मानसिकतेतून हळूहळू का होईना, जग बाहेर येत गेलं. आजही सुधारणा चालू आहेत. अशाच प्रश्नांची चर्चा असलेल्या विषयावर एक नाटक लिहिलं होतं. त्यात मी लिहिलेल्या गाण्याच्या ओळी.

आकाशी एकली चांदणी गात आहे

तीत काही तीत काही

काहीतरी बात आहे...

कुशीत घ्यावे आकाश सारे

अशी दिवानी रात आहे

तीत काही तीत काही काहीतरी बात आहे...

वडाच्या फेऱ्या झाल्या गं कोऱ्या

नशीब नाही बांधून दोऱ्या

आयुष्य हे मंतरलेले

ओलांडून जात आहे...

(सदराचे लेखक गीतकार व लेखक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.