जाऊ देवाचिया गावा।

पावसाळ्याची चाहूल देऊन ज्येष्ठ महिना निरोपाच्या तयारीत आहे. आषाढाचा पहिला दिवस भारतीय साहित्य परंपरेत महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो.
Ashadhi Wari
Ashadhi Warisakal
Updated on

- भागवत महाराज साळुंके, आळंदी, saptrang@esakal.com

पावसाळ्याची चाहूल देऊन ज्येष्ठ महिना निरोपाच्या तयारीत आहे. आषाढाचा पहिला दिवस भारतीय साहित्य परंपरेत महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. ढगांची गर्दी आकाशात दाटलेली. त्यांचा गडगडाट सुरू झाला, की आभाळातली म्हातारी जात्यावर दळण दळू लागली असा युक्तिवाद आजीने नातवंडांना पटवून द्यावा. कुठूनतरी सैरभैर वारा यावा अन् तितक्याच त्वरेने जावा. पक्षी जीवनात मयूराचे नृत्य विशेष.

नाचण्याची कला आणि पिसारा असला तरी, 'घनगर्जना सरिसा मयूर वोवांडे आकाशा' या ज्ञानेशोक्तीनुरूप वातावरण प्रस्तुत झाल्याने, जणू त्या काळ्याभोर ढगानेच ''फुलव पिसारा'' नाच म्हटल्यागत त्या पक्षिराजाने ठेका धरावा. टपोऱ्या थेंबांचा सडा पडावा आणि उन्हाळाभर तप्त झालेली धरणीमाय शांत व्हावी. त्या पहिल्या पावसाचा गंध चौफेर दरवळावा... !

प्रेमी युगुलासाठी प्रतिभासंपन्न कालिदासाच्या रसिकदृष्टीत या वातावरणाचं महत्त्व काही आगळंवेगळं आहे. कालिदासाची ‘मेघदूत’ ही एक साहित्यकृती वाचल्यावर आपल्याला याची कल्पना येते.

महाराष्ट्राच्या लोकजीवनात आषाढ महिन्याचं एक आगळेवेगळे महत्त्व आहे. मऱ्हाटी जनांचं आराध्य दैवत तथा वारकऱ्यांचा प्राणप्रिय असणाऱ्या विठोबाच्या महावारीसाठी संतांच्या पालख्यांसमवेत मजल-दरमजल वारकरी पंढरीच्या दिशेनं वाटचाल करतात. वारकरी आपल्या प्रियतम पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुरले आहेत. आर्ततेने गात आहेत, ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस!’ जगभरातील दखलपात्र अशा मोजक्या उत्सवांपैकी महाराष्ट्रातील ही पंढरीची वारी.

भौतिक सुविधांनी जणू स्वर्गाशी होड करणाऱ्या पाश्चिमात्यांनाही या वारीनं चांगलंच वेड लावलंय. दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवरील खात्रीशीर उतारा तुम्हाला इथं सापडतो. समाजशास्त्राने सांगितलेल्या मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा. आवश्यकतेच्या पुढे आकर्षणाच्या टप्प्यावर या तिन्हींचे उपयोजन आपण करू तर असमाधानाचे अनेक क्षण वाट्याला येतात. आपल्या ऐपतीचा विचार करून, इतर कुणाशीही स्पर्धा न ठेवता यांची अंमलबजावणी करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.

'निर्वाहापुरते अन्न आच्छादन ।

आश्रमाशी स्थान गोपी गुहा ।।'

ही तुकोबांच्या अभंगाची ओळ आपल्याला हेच शिकवते. या सिद्धांताचं प्रात्यक्षिक म्हणजे वारी. अत्यंत आपुलकीने दात्याने वाढलेल्या अन्नाच्या घासा-घासात जणू ब्रह्मरसाची चव चाखल्याचा अनुभव येतो. वर्षाऋतूचा काळ असल्याने कपडे कर्दमल्याचा प्रसंग कितीदाही आला, तरी वारीच्या वाटेवर त्यामुळे चिडचिड झाली असं चुकूनही होत नाही.

मिळेल तशा उंच अथवा सखोल जागेवर यथाशक्य सानुकूल स्थिती निर्माण करून, दररोज निवारा उभारावा. आपल्या लौकिक मोठेपणाला सहजपणे विसरून सुखाने भूमीवर पहुडून ताऱ्यांकडं पाहत राष्ट्रसंत तुकोडोजी महाराजांच्या शब्दात म्हणावं - राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥

मूल्यसंस्कारांचं एक व्यापक शिबिर म्हणजे वारी. स्वावलंबनाचा प्रभावी वस्तुपाठ तिथं घडतो. घरी जेवणाचं ताट इंचभरही न उचलणारा, आपल्या अंथरुणाची आवराआवर इतरांकडून अपेक्षित असणारा माणूस वारीत स्वतःच भांडं स्वतः धुतो. आपले कपडे स्वहस्ते धुणारा माणूस केवळ त्या वस्त्राचे डाग घालवत नाही तर, आपल्या पुरुषी अहंकाराचाही मळ झटकतो. 'पाणी जपून वापरा' असं पदोपदी सर्व ऋतूंत हल्ली सांगावं लागतं. तेव्हा अर्धा बादली पाण्यातही आंघोळ कशी होते, हे वारी शिकवते.

वडीलधाऱ्यांचा दुराग्रह आणि तरुणाईचा अहंकार यामुळं आज कुटुंबव्यवस्था व पर्यायानं समाजव्यवस्था अस्थिर झाल्याचं दिसून येतं. जुन्या व नव्या पिढ्यांमध्ये आवश्यक असणारा संवाद अगदी सहजपणे पंढरीच्या वाटेवर घडतो. अगदी शिशु अवस्थेत असलेल्या नेणत्यापासून शतायुषी जाणत्यांपर्यंचा सहभाग वारीत असतो.

समानतेवर पुष्कळ व्याख्यानं दिली जातात. अनेक जण त्यावर लेखण्या पाजळतात. वास्तविक त्याची अंमलबजावणी तितकीशी दिसत नाही. समानतेचा पुरस्कार अगदी आवेशाने मांडून, हजारो श्रोत्यांच्या टाळ्या स्वीकारून परतीच्या प्रवासात हॉटेलात जेवणाला थांबलेल्या महाशयांना त्यांचा चालक आपल्या शेजारी बसलेला चालत नाही.

त्याला वेगळ्या टेबलावर पाठवलं जातं अशी वस्तुस्थिती आहे. शहरी-ग्रामीण, साक्षर-निरक्षर, गरीब-श्रीमंत अशा कोणत्याही द्वंद्वाचा विचार वारीतील पंगतीत नसतो. ''एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबरी'' ही आमच्या संतांची शिकवण आहे. ती कटाक्षाने पाळली जाते.

समानतेसोबतच परस्परांचा सन्मानही अत्यंत आदराने वारीत राखला जातो. पाण्यासाठी टॅंकर व सामान वाहण्यासाठी वारीत अनेक ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर अशी वाहने आवश्यक असतात. वारकऱ्यांच्या सेवेसाठी अल्पदरात अथवा मोफतही ते सौजन्य अनेक मंडळी दाखवतात. प्रतिवर्षी वारीला वाहन पाठविणाऱ्या एका उद्योजकाने सांगितले, की वारीची आठवण मला येण्यापूर्वी अथवा वारकऱ्यांचा निरोप यायच्याही आधी आमच्या चालकांनाच वारीला गाडी नेण्याची घाई अधिक असते.

कुतूहलापोटी त्यांनी संबंधित चालकाला याचे कारण विचारले असता त्याने उत्तर दिले, 'शेठ ! हरघटका तुमचा धाक अन् रस्त्यावर इतर वाहनांच्या चालकांशी संघर्ष व चौकात ट्राफिकवाल्याच्या शिव्या... यांपासून सुटका असते. कुणीही आरे कारे करत नाही. आवाज द्यायचा झाला तरी तिथे माणसं आम्हाला "माउली" म्हणतात!' असाच दैनंदिन तणावापासून मुक्तीचा अनुभव बंदोबस्तात असणारे पोलिस बांधवही व्यक्त करतात.

महाराष्ट्रीय तरुणाईला खुणावणाऱ्या अनेक घटकांपैकी एक विधायक बाब म्हणजे वारी. हे आपल्यातील कलागुणांना वाव देणारं एक खुलं व्यासपीठ आहे. पालखी पुढे सुरेख रांगोळी काढणाऱ्या भगिनी व एकूणच वाटचालीत विशेषतः रिंगणात अनेक महत्त्वपूर्ण क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे अनेक बंधू गेल्या काही वर्षांपासून दिसतात.

आपल्या गुणांच्या अभिव्यक्तीसाठी तरुणांनी जसं वारीला गांभीर्याने घेतलेलं दिसतंय तोच विचार शासनदरबारीही आहे. अनेकविध शासकीय योजना तथा समाजकल्याण विभागाच्या वतीने जनजागृतीचेही मंच वारीत उभारले जाताहेत.

निवडणूक, आंदोलन अशा एखाद्या मुद्द्यावर गर्दी जमविण्यासाठी संबंधितांना काय काय उपद्व्याप करावे लागतात देव जाणे! वारीच्या वाटेवर मात्र कोणत्याही निमंत्रणाशिवाय, आग्रहाशिवाय लक्षावधी लोक जमा होतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. याचे कारण म्हणजे ज्या संतांच्या पालख्यांसमवेत आपण जातो त्या संतांचा पुण्यप्रवाह.

ती आध्यात्मिक प्रेरणा इतकी बळ देते, की एरवी तीस पावलेही न चालणारा मनुष्य तीस किलोमीटर सहजगत्या पार करतो. 'गात जा गा, गात जा गा | प्रेम मागा विठ्ठला ||' ही प्रणाली असल्यामुळे विठुरायाच्या नामस्मरणात लोक चालतात. त्या नामाचे सामर्थ्य कोणत्याही वेदना जाणवू देत नाही.

स्वातंत्र्यलढ्यात आपल्या वीरांच्या पाठीवर ब्रिटिशांचे दंडुके पडत होते, तथापि 'वंदे मातरम्', 'भारत माता की जय...' हा जयघोष त्या प्रतिकाराचं सामर्थ्य होते. तद्वत पायी चालण्याची कोणतीही पीडा शरीराला जाणवत नाही कारण तुकाराम महाराज सांगतात - चालिले न वाटे | गाऊनिया जाता वाटे || याचा प्रत्यय श्रद्धाळू भाविकासह बुद्धिवादी मंडळींनाही येतोय. म्हणून तर पुण्यातून माउली सासवडच्या दिशेने मार्गस्थ होताना रेसकोर्सपर्यंत निरोपाला आलेल्या प्रत्येक पुणेकराचे डोळे पाणावतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळीही सोहळ्यात 'आयटी दिंडी' या नावाने सहभागी होतात.

सुदैवाने आपण मनुष्य जन्माला आलो आहोत. महाराष्ट्रीय संतपरंपरेमुळे ही वारी आपल्याला मिळाली आहे. ''पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा'' या उक्तिनुरूप पावन होण्यासाठी आपली पावले पंढरीच्या वाटेने टाकू या. पूर्वजन्म व पुनर्जन्म या आपल्या भारतीय तत्त्वज्ञानातील संकल्पना. आज आपण ज्या देहात व पर्यायाने एखाद्या कुटुंबात व समाजात अस्तित्वात आहे, त्याच्या पूर्वी आपण अनेकविध ठिकाणी फिरत-फिरत इथपर्यंत पोहोचलो.

त्याचं आज आपणास स्मरण नाही, तथापि तशी संतवचने आहेत, त्यावरील दृढ विश्वासाने हे मान्य करण्यात किंतु नसावा. तात्पर्य एवढेच, की या देहातून त्या देहात म्हणजेच एका देशातून दुसर्‍या देशी आपले 'गमन' चालू आहे. आज आपण जिथं आहोत तिथंही आपली बहुतेक भौतिक व क्वचित दैविक, आध्यात्मिक कार्यासाठी धावाधाव चालू आहेच; आणि ज्ञानेश्वरी आपणास यासंबंधी एक विचार देते, की चालण्याचा वेग जर वाढला तर तो चालण्यासाठी नव्हे तर, कुठेतरी विसावण्यासाठी असतो. त्या अनुषंगाने जन्मजन्मांतरातील प्रवासात विश्रांती प्राप्त करून घेण्यासाठी - जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा ॥

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.