कलाकारांचे लाड करणारा, कलाकारांना जपणारा नाट्यनिर्माता म्हणजे सुधीर भट! एके दिवशी मला दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर भेटले.
सुधीर भट खूप मोठा माणूस. कलाकारांवर निरातिशय प्रेम करणारे, त्यांचे लाड पुरविणारे, त्यांच्यावर माया दाखविणारे. त्यांनी निर्मिलेल्या ‘मोरूची मावशी’ या पहिल्या नाटकाला संगीत दिल्यानंतर त्यांची अनेक नाटकं माझ्या संगीत दिग्दर्शनात रंगमंचावर आली. विदेशातही सादर झाली. याच प्रवासात त्यांच्याशी मैत्रीचे सूर जुळले. कलाकारांना नवनवीन जागा दाखविणे, त्यांना विविध ठिकाणी फिरविणे हा जणू त्यांचा छंद होता आणि प्रचंड आवड होती. सुधीर भट खवय्या होतेच, सोबत चांगले कुकही होते. सगळ्यांसाठी जेवण बनवायचे...
कलाकारांचे लाड करणारा, कलाकारांना जपणारा नाट्यनिर्माता म्हणजे सुधीर भट! एके दिवशी मला दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर भेटले. ते बँकेत काम करीत होते. मला भेटल्यानंतर ते म्हणाले, ‘‘अरे एक नवीन निर्माते आलेले आहेत आणि त्यांना आचार्य अत्रे यांची पाच नाटके करायची आहेत. त्यातील ‘मोरूची मावशी’ या नाटकाला संगीत तुला द्यायचे आहे.’ त्याप्रमाणे मी माझे काम आटोपून संध्याकाळी रवींद्र नाट्यमंदिरात पोहोचलो. तेथे रिहर्सल सुरू होती. कलाकारांशी माझी ओळख करून देण्यात आली. विजय चव्हाण, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन आदी कलाकारांशी ओळख झाली. मी म्हणालो, ‘आचार्य अत्रे यांच्या पुस्तकात एक गाणे आहे टांग टिंग टिंगा... हे गाणे कोण म्हणणार आहे?’ माझ्या या प्रश्नाला उत्तर देताना दिलीप म्हणाला, ‘ते गाणे मावशी म्हणणार आहे. मावशीचे ते गाणे आहे आणि मावशीची भूमिका विजय चव्हाण साकारत आहे.’ मी विजयला म्हणालो, ‘‘तू मला हे गाणे गाऊन दाखव. तुझा सूर आणि तुझ्या सुरांची रेंज काय आहे, ते मला कळेल.’ तो म्हणाला, ‘मी गायक वगैरे नाही आणि मला गाता येत नाही.’
मी म्हणालो, ‘मला केवळ तू कसा गातो आहेस, ते पाहायचे आहे. तुझा आवाज कसा आहे ते बघायचे आहे.’ तो म्हणाला, ‘मला छोटी छोटी कोळी गीते गाण्याचा छंद आहे. ती तुम्हाला ऐकवितो’ म्हणत दोन-तीन कोळी गीते ऐकविली. ती गात असताना त्याच्या शरीराची हालचाल उत्तम होत होती. मला खूप छान वाटले.
मी पक्के ठरविले की ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणे असेच करायचे. ते करीत असताना त्याचा ठेका हलकाफुलका ठेवायचा. जेणेकरून प्रेक्षकांनाही ते गाणे आवडेल. त्यानंतर ते गाणे सुपरडुपर हिट झाले. ‘मोरूची मावशी’चे देश-विदेशात दोन हजारांच्या वर प्रयोग झाले. हे नाटक कमालीचे सगळ्यांना आवडले. त्यानंतर सुधीर भट यांनी ‘ब्रह्मचारी’ हे नाटक आणले. त्यामध्ये मला ‘यमुना जळी..’ची चाल बदलण्यास सांगण्यात आले. ती चालही लोकांना प्रचंड आवडली. मग राजा गोसावी यांना घेऊन ‘भ्रमाचा भोपळा’ हे नाटक केले. सुधीर भट यांची ‘सुयोग’ ही नाट्यसंस्था जोरात सुरू होती.
प्रशांत दामलेला घेऊन नाटक करायचे ठरले. प्रशांत दामले ज्या नाटकात असेल त्या नाटकात दोन तरी गाणी असावीत असा लेखकांकडे सुधीर भट यांचा आग्रह असायचा. प्रशांत दामले व कविता लाड यांना घेऊन ‘एका लग्नाची गोष्ट’ हे नाटक काढण्यात आले. या नाटकात चार गाणी होती. ती प्रशांत असा काही गायचा की प्रेक्षकांकडून त्याला वन्स मोअर मिळायचा.
‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं...’, ‘ती परी अस्मानीची...’ ही दोन गाणी प्रेक्षकांना अतिशय आवडायची. आज अनेक वर्षे झाली तरी ती गाणी प्रेक्षकांना कमालीची आवडतात. त्यानंतर ‘एका लग्नाची’ या नाटकाची पुढील आवृत्ती म्हणजे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’. प्रशांतने माझ्याकडे नाटकातील साठ ते सत्तर गाणी गायलेली आहेत. अतिशय सुंदर आणि मनापासून तो गातो. तो स्टेजवर आला की प्रसन्न वाटते. दोन्ही हात उंचावून ‘हाय काय आणि नाय काय’ असे त्याने म्हटले की प्रेक्षक खुश. गाण्याचा बाज त्याच्याकडे फारसा नसला तरी लाईट मूडची गाणी किंवा क्लासिकल गाणी तो एकदम खुलवून गातो. संगीतकार आणि कलाकार अशी आमची दोघांची केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. त्यामुळे आमचे गाणे प्रेक्षक गुणगुणत जातात.
पुढे पुढे सुधीर आपली नाटके परदेशात घेऊन जाऊ लागले. अमेरिका, सिंगापूर, दुबई वगैरे ठिकाणी त्यांच्या नाटकांचे प्रयोग होऊ लागले. बीएमएम नाटक घेऊन जायचे त्यांना वेडच लागले होते. एका वेळी चार किंवा पाच नाटके ते परदेशात घेऊन जाऊ लागले. साधारण तीस ते पस्तीस कलाकारांना घेऊन ते जायचे. दोन ते तीन वेळा मी स्वतः त्यांच्याबरोबर अमेरिका आणि सिंगापूर येथे गेलो आहे. त्यांची परदेश दौऱ्यामध्ये एक खासियत होती. ते हॉटेलमध्ये सगळ्यात शेवटची रूम घ्यायचे. कारण म्हणजे सुधीर चांगले कुक होते आणि ते सगळ्यांसाठी जेवण बनवायचे. रोज नवनवीन पदार्थ त्यांच्या हातचे खायला मिळायचे. सगळा संसार ते त्या रूममध्ये थाटायचे. जेवणासाठी ते चूल वगैरे मांडायचे. त्यामुळे साहजिकच त्या रूममध्ये धूर व्हायचा. तो होऊ नये याकरिता सुधीर शेवटची रूम घ्यायचे. प्रशांत दामले, मोहन जोशी, वंदना गुप्ते, अमृता सुभाष, डॉ. गिरीश ओक, मंगेश कदम, कविता लाड, विक्रम गोखले, विजय केंकरे, सुनील तावडे अशी सगळी मंडळी या दौऱ्यात असायची. त्यामध्ये कधी-कधी मीदेखील असायचो. भरपूर मजा यायची सुधीर यांच्याबरोबर. कलाकारांना नवनवीन जागा दाखविणे, त्यांना विविध ठिकाणी फिरविणे हा जणू त्यांचा छंद होता आणि प्रचंड आवड होती. सुधीर खवय्या होते. आम्हाला त्यांनी डिस्ने लॅण्ड दाखविले, तसेच ब्रॉडवेमध्ये ऑपेरा व्हायचा, तोदेखील त्यांनी आम्हाला दाखविला. त्याचे तिकीट खूप महागडे होते; परंतु हा सगळा खर्च सुधीर आपल्या खिशातून करायचे. माझ्याबाबतीत ते जास्त हळवे होते.
माझ्या संगीतावर ते भलतेच खुश होते. अमेरिकेत आम्ही एकत्र असलो की गाणी म्हणायचो... गाण्याच्या भेंड्या लावायचो. त्यांची एक बस ठरलेली असायची. ज्या दिवशी अमेरिकेतील एअरपोर्टवर सुधीर आणि सगळी टीम उतरायची त्या दिवशी ती बस तेथे असणारच. सुधीर भट खूप मोठा माणूस, कलाकारांवर निरतिशय प्रेम करणारे, त्यांचे लाड पुरविणारे, त्यांच्यावर माया दाखविणारे होते.
(लेखक प्रसिद्ध संगीतकार आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.