स्वतःच्या कमाईचे स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मीदेखील अशाच घराच्या शोधात होतो.
स्वतःच्या कमाईचे स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मीदेखील अशाच घराच्या शोधात होतो. एका एजंटच्या मदतीने माहीम येथे एक घर मिळाले; पण त्याची किंमत मात्र अपेक्षेपेक्षा आणि माझ्या बजेटपेक्षा अधिक होती; मात्र मित्र-सहकाऱ्यांच्या मदतीने माझे घरांचे स्वप्न पूर्ण झाले. त्याला नाव दिले ‘हॅपी हेवन’, जिथे नांदतो आनंद, आनंद आणि फक्त आनंद...!
माझे लग्न १० जुलै १९८२ रोजी झाले. बाबा, माझा मोठा भाऊ मुकुंद, मी आणि माझी पत्नी असे आमचे चौकोनी कुटुंब होते. मी सकाळी सात-साडेसात वाजता खारचे घर सोडायचो, ते रात्री एक वाजता यायचो. केवळ चार तासांची झोप आणि इतर वेळ काम यामध्ये माझा दिवस संपायचा. माझा बराचसा वेळ माहीम आणि परिसरातील प्रवासात जायचा. त्यामुळे दरवेळी रेकॉर्डिंगला उशीर होत असे; मग माझ्या मनात विचार आला, की आपले घर दादर-माहीम परिसरात असले पाहिजे, परंतु पैशाच्या आकडेमोडीत ते जमेल, असे वाटत नव्हते. माझ्याकडे काही पुंजी होती, त्यामध्ये अंधेरी-जोगेश्वरी-गोरेगाव या भागातच घर घेणे शक्य होते; परंतु पुन्हा माझ्या मनात विचार आला, की माहीमची गर्दी टाळण्यासाठी मी याच परिसरात घर शोधतो आहे आणि मग पुन्हा अंधेरी-जोगेश्वरीचा विचार का करतोय, मग घर घ्यायचा विचार मनातून काढून टाकला.
माझे लग्न होऊन तीन-चार वर्षे झाली होती. खार येथील घर अपुरे पडू लागले होते आणि मुकुंदच्या लग्नाची तयारीही सुरू झाली होती. त्यामुळे आपले स्वतःचे घर असले पाहिजे, असा विचार पुन्हा मनात डोकावू लागला. एके दिवशी सकाळी सातेक वाजता मी घर शोधण्यास घराबाहेर पडणार, तोच फोनची घंटा वाजू लागली.
फोनवर ती व्यक्ती म्हणाली, ‘पत्की साहेब, नमस्कार..! मी इस्टेट एजंट आहे. माझे नाव सुखठणकर. तुम्ही दादर-माहीम परिसरात घर शोधताय असं कळलं. माझ्याकडे एक माहीम चर्चच्या बाजूला वन बेडरूमची जागा आहे. त्याची किंमत जास्त नाही... फक्त सात लाख रुपये.’
मी त्यांना म्हटले, ‘माझे तेवढे बजेट नाही आहे. माझे बजेट दोन ते तीन लाखांपर्यंतच आहे.’
तर ते म्हणाले, ‘येथून जाता जाता बघून जा... फ्लॅट रिकामा आहे आणि चावीदेखील माझ्याकडे आहे, तुम्हाला आवडेल, असे मला वाटते.’
मी त्यांना म्हणालो, ‘मला पंधरा ते वीस मिनिटे लागतील तेथे पोहोचायला. तुम्ही लिव्हिंग रूम येथे उभे राहा...’
मी पंधरा ते वीस मिनिटांत तेथे पोहोचलो. सुखठणकर आणि त्यांचा मुलगा असे दोघेही मला भेटले. मी जागा पाहिली आणि मला ती अतिशय आवडली. एकूणच तेथील वातावरण पाहून मला गोव्यात असल्यासारखे वाटले.
ते म्हणाले, ‘श्री. मराठे यांची ही जागा आहे. त्यांची बदली इस्राईलला झाल्याने त्यांना ही जागा विकायची आहे.’
रविवारी मराठे यांना भेटायचे असे ठरले. ठरल्याप्रमाणे मी माहीमला पोहोचलो. मी तसेच माझी पत्नी, माझी बहीण आणि पत्नीची बहीण असे आम्ही चौघे होतो. सगळ्यांनाच घर आवडले होते; परंतु सात लाख रुपये किंमत ऐकून सगळे गप्प होते, मग मी मराठे यांना म्हणालो, की सात लाख रुपयांमध्ये काही कमी करता येतील का? त्यावर त्यांनी केवळ दहा हजार रुपये कमी केले, मग आता काय करायचे..? आपले बजेट नाही म्हणून निघण्याचा विचार केला; पण निघता निघता श्री. मराठे यांना म्हणालो, की मला एक आठवड्याची मुदत द्या... बघूया काही करता येते का...
दुसरा दिवस सोमवार होता. मी रेकॉर्डिंग स्टुडिओत आलो. पहिल्यांदा सकाळी नाथनजींच्या एका जिंगल्सचे रेकॉर्डिंग होते आणि संध्याकाळी वनराजचे. मी नाथनजींना म्हणालो, ‘मला घर घ्यायचे आहे, पैसे कमी पडत आहेत. तुम्ही एक लाख रुपये देऊ शकता का?’
तर ते म्हणाले, ‘कधी हवे आहेत...’
मी म्हटलं, ‘दोन दिवसांनी चालतील.’
दुपारी वनराजकडे हाच विषय काढला. त्यानेही एक लाख रुपये देण्याचे मान्य केले. आता माझ्याकडे माझे तीन लाख आणि नाथनजींचे एक आणि वनराजचे एक असे मिळून पाच लाख रुपये जमा झाले. आता अजून दोन लाख रुपयांची आवश्यकता होती. आता कुणाकडे मागावेत, असा प्रश्न माझ्या डोक्यात घोळत होता.
मी रेडिओवाणीचे प्रमुख शीलकुमार यांच्याशी बोललो. ते रेडिओवाणीचे प्रमुख होते. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले, ‘आज हा स्टुडिओ तुझ्यामुळेच उभा आहे. तुला पाहिजे ती मदत करणार...’. त्याने मला आणि माझ्या पत्नीला रविवारी जेवायला बोलावले. तो वांद्रे येथे राहायचा. आम्ही जेवायला गेलो. जेवण झाल्यानंतर त्याच्या पत्नीने दोन लाखांचा धनादेश माझ्या पत्नीच्या हातात ठेवला. आता माझे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. या तीन मित्रांच्या मदतीमुळेच ते साकार झाले होते. मी लगेच श्री. मराठे यांना फोन लावला आणि भेटायचे ठरवले. भेटल्यानंतर धनादेशाद्वारे त्यांना पैसे दिले आणि ते घर खरेदी केले. त्याला नाव दिले ‘हॅपी हेवन’, जिथे नांदतो आनंद, आनंद आणि फक्त आनंद. माझ्या पत्नीने ही आनंदाची बातमी आमच्या सगळ्या नातेवाईकांना सांगितली. ते फोनवर मला म्हणाले, ‘अशोक वेडा झाला आहेस का तू, कुठून फेडणार आहेस हे कर्ज..? मी त्यांना सांगितले, की माझ्या पुढील कामातून ते आपापले पैसे वळते करून घेणार आहेत आणि तीन-चार महिन्यांनी सगळ्यांचे पैसे माझ्या कामातून फेडले.
त्यानंतर दिवसामागून दिवस जात होते. लग्न होऊन पाच वर्षे झाली, तरी घरी पाळणा काही हलला नव्हता. त्यामुळे नातेवाईक मंडळींमध्ये कुजबूज सुरू झाली होती. मुळात माझे लग्नच उशिरा झाले होते. वयाच्या चाळिसाव्या वर्षी माझे लग्न झाले होते आणि त्यातच पाच वर्षे मूल नाही म्हणून आम्ही दोघेही चिंतेत होतो. अश्विनी खूप श्रद्धाळू. तिचा देवादिकांवर फार विश्वास. तिला कुणी तरी सांगितले, की माहीमच्या चर्चला दर बुधवारी भेट दिलीस, तर तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
तिने मेरीजवळ गाऱ्हाणे घातले. मला मूल हवंय आणि स्वतःचं घर हवंय. मेरीने तिची ही इच्छा पूर्ण केली. अगोदर जागा मिळाली आणि २२ डिसेंबर १९८७ रोजी आम्हाला मुलगा झाला. आशुतोष त्याचे नाव. त्याच्या आगमनाने आमच्या घरात आनदीआनंद पसरला. साधारण पंधरा वर्षांनी आम्ही घराचे नूतनीकरण करायचे ठरवले. आता नूतनीकरण करायचे म्हटल्यानंतर राहायचे कुठे... आमच्यासमोर मोठा प्रश्न होता. आमची ही बाब आमचे मित्र दामू केंकरे यांना समजली. ते मला म्हणाले, ‘आमचा बंगला मोकळा पडला आहे. बॅग उचल आणि सरळ माझ्या घरी ये..’ आम्ही ठराविक सामान घेऊन तेथे राहायला गेलो. तेथूनच मी माझ्या कामाला जाऊ लागलो. आता आमची माहीमची जागा पुनर्विकासासाठी गेली आहे. त्यामुळे आता मी गोरेगाव येथे राहात आहे.
(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.