गोव्याच्या आठवणी

गोव्यातील वातावरण आणि हवा आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणते. गोवन फूड तर कमालीचं असतं. मांसाहार खाणाऱ्यांची मज्जाच मज्जा असते.
Ashok Patki
Ashok PatkiSakal
Updated on
Summary

गोव्यातील वातावरण आणि हवा आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणते. गोवन फूड तर कमालीचं असतं. मांसाहार खाणाऱ्यांची मज्जाच मज्जा असते.

गोव्यातील वातावरण आणि हवा आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणते. गोवन फूड तर कमालीचं असतं. मांसाहार खाणाऱ्यांची मज्जाच मज्जा असते. तेथील कोकणी भाषेत आपलेपणा आहे, गोडवा आहे. माझे कुलदैवत शांतादुर्गा असल्यामुळे दोन-तीन महिन्यांतून एकदा तरी गोव्याला जातो. मंगेशी, शांतादुर्गा, महालक्ष्मी देवी यांच्या मंदिरात जातो. देवींचे दर्शन घेतल्यामुळे मन प्रसन्न होतं. मनाला उभारी येते.

गोव्याचे रामकृष्ण नाईक यांचे मित्र राजन तालक यांची ओळख झाली. तालक हे मोठे बांधकाम व्यावसायिक. त्यांचे गोव्यात मोठे प्रोजेक्ट सुरू होते. नाईक साहेब मला म्हणाले, ‘‘अशोक, तू मडगावला एक बंगला घेऊन टाक.’’ मी म्हटलं, ‘‘किती पैसे?’’ मग विचारविनिमय करून मी एक बंगला घेऊन टाकला. तेथे एकदा सुट्टीत गेलो असता तालक मला भेटायला आले आणि मला म्हणाले, ‘‘मी एक चित्रपट काढतो आहे. संगीत तुम्ही द्याल ना?’’ मी विचारले, ‘‘नाव काय?’’ त्यांनी मला नाव सांगितले. तो चित्रपट कोकणी भाषेत होता. त्यानंतर आम्ही आठ ते दहा चित्रपट कोकणी भाषेत केले आणि मराठीतही. त्यांच्याच ‘अंतर्नाद’ या कोकणी भाषेतील चित्रपटाला मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

गोव्याचेच दुसरे आमचे एक मित्र दीप कारापूरकर. त्यांना कोकणी गाण्यांचा अल्बम काढायचा होता. मी, शंकर महादेवन, शान, हरिहरन, वैशाली सामंत यांच्याशी बोलून अल्मब काढला. दीप यांच्याबरोबर कोकणी भाषेतील पन्नास गाणी केली आहेत. त्यात शंकर महादेवन, शान, साधना सरगम, हरिहरन, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, बेला सुलाखे, महालक्ष्मी अय्यर अशा मोठमोठ्या गायकांनी गाणी गायली आहेत. तेही आमच्या बजेटनुसार. याला खरे प्रेम म्हणतात. सगळ्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे.

मागील वर्षी मी गोव्याला गेलो होतो. पंचमीला शांतादुर्गा देवीचे दर्शन घेतलं. नंतर सरळ मडगावला माझ्या नानू टेल या आवडीच्या हॉटेलात राहायला गेलो. दीपला फोन केला की, मी गोव्यात दोन दिवस राहायला आलो आहे. यावर दीप लगेच म्हणाला, ‘‘संध्याकाळी आपण जेवायला एकत्र जाऊ या. त्याआधी आपण हुबळीला दामोदरांचं भलं मोठं देऊळ आहे, ते पाहायला जाऊ या आणि जेवून आपण घरी येऊ या.’’ मग चार वाजता दीप आणि दोन-तीन मित्रांसोबत मी देऊळ पाहायला गेलो. भव्यदिव्य असं ते देऊळ होतं. मला तेथील पुजारी भेटले आणि मला म्हणाले, ‘‘अशोकजी, तुमच्या गाण्यांवर आम्ही सारे फिदा आहोत. आमच्या दामोदरावरही एक भक्तिगीत करा.’’ यावर मी लगेच ‘हो’ म्हटलं.

यावर दीप लगेच म्हणाला, ‘‘अशोकजी, खरंच विचार करा. यावर होणारा सगळा खर्च मी करीन.’’ मी लगेच मुंबईला आलो. चारेक दिवसांत माझी डमी शब्दांसकट चाल तयार झाली होती. ती चाल मी दीपला पाठवली. त्याला आणि सर्व कुटुंबीयांना ती चाल प्रचंड आवडली. कवी राजय पवार यांनी मग त्या चालीवर कोकणी गीत लिहिलं, विषय होता ‘दामोदर’. ‘दामोदर’ म्हणजे कृष्णाचा एक अवतार असे म्हणतात. तर त्या हिशोबाने त्यांनी गाणं लिहिलं. यानंतर १५ दिवसांनी मी गोव्याला गेलो. तिथे दीपने स्टुडिओ बुक केला होताच. सिद्धार्थ चोडणकर आणि गौतमी हेदे हे सिंगर्सही त्याने निवडले होते.

सिद्धार्थ आणि गौतमीने ते गाणे इतके जीव ओतून गायले की ज्यांनी ज्यांनी गाणे ऐकले त्यांना ते खूप आवडले. तीन-चार महिन्यांत या गाण्याने गोव्यात धुमाकूळ घातला. मुंबईचा माझा मित्र अरेंजर समीर म्हात्रे याने या गाण्याचा ट्रॅक इतका सॉलिड बनवला होता की त्याला तोड नाही. साधारणपणे चित्रपटसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक, गीतकार आणि संगीतकार असा एक ग्रुप तयार होतो. तालकच्या बाबतीत सिनेमा बनवताना तस्संच व्हायचं. दीपचा अल्बम बनवताना दीपची माणसे असायची. म्हणजे शंकर महादेवन, शान वगैरे. त्यातच नेहमीची माणसं दिसली की आपलंदेखील बळ वाढतं. काम करताना मजा येते आणि उत्साहदेखील वाढतो. कोरोना काळात तालकने चित्रपट करणं बंद केलं होतं.

मागील आठवड्यातच तालकने त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मला तसेच सुकन्या मोने, ऋषिकेश रानडे, महालक्ष्मी अय्यर व सत्यजित प्रभू या सगळ्यांना विमानाची तिकिटे पाठविली. मी त्याला विचारले असता तो म्हणाला, ‘‘गेटटुगेदर करायचे आहे.’’ मग काय... आम्ही दोन दिवस गोव्यात गेलो. तेथून निघताना तालक मला म्हणाला, ‘‘अशोकजी, एप्रिल महिन्यात सिनेमा काढणार आहे. मला छान विषय मिळाला आहे. गाण्यालासुद्धा या चित्रपटात चांगला वाव आहे. अशोक पत्की स्टाईलची गाणी करायची आहेत.’’ मी म्हटलं, ‘ओके’! त्यातच त्याने मला सुचवले की तुम्ही आठ दिवस येथेच या. तुम्हाला हार्मोनियम देतो आणि एक खोली देतो. तुम्ही तेथे बसून गाणी तयार करा. मला त्याची ही कल्पना आवडली. आता मला गोव्यात जावे लागणार आहे आणि गोवा म्हटलं की कोणताही कलाकार एका पायावर तयार होतो.

कारण येथील निसर्गसौंदर्य सगळ्यांना भुरळ घालणारं आहे. येथील बीचेस, चर्च, रस्ते, देऊळ तसेच एकाच पद्धतीचे बंगले पाहून मन भरून येतं. मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो. तेथील वातावरण आणि हवा आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणते. गोवन्स फूड तर कमालीचं असतं. मांसाहार खाणाऱ्यांची मज्जाच मज्जा असते. तेथील कोकणी भाषेत आपलेपणा आहे. गोडवा आहे. माझे कुलदैवत शांतादुर्गा असल्यामुळे दोन-तीन महिन्यांतून एकदा तरी गोव्याला जातो. मंगेशी, शांतादुर्गा, महालक्ष्मी देवी यांच्या मंदिरात जातो. देवींचे दर्शन घेतल्यामुळे मन प्रसन्न होतं. मनाला उभारी येते. कुमार सर ज्योतिषी आणि पेंडसे भटजी या दोघांकडे प्रसादाचे जेवण मिळतं. त्या जेवणाला तोडच नाही. गोव्याहून आला की माणूस तरतरीत होतो, असं म्हणतात ते काही खोटं नाही. सन १९८२ मध्ये माझे लग्न झालं तेव्हा कुलदैवतेला दर्शनाला विमानाने गेलो होतो. तेव्हा विमानाचे तिकीट ८० रुपये होतं. आता सगळं बदललं आहे. या सगळ्या आठवणी माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्यातच मी गोव्याचा असल्यामुळे मला त्याचा अभिमान आहे.

(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.