संगीत ही दिवसागणिक फुलणारी कला

अनेक संगीतकार छान छान काम करताहेत. केवळ बारा स्वरांच्या साक्षीने संगीत टिकून आहे. पुढच्या पिढीने कोणाचा आदर्श समोर ठेवायचा, असा प्रश्नही आई-वडील विचारत असतात.
Music
Musicsakal
Updated on
Summary

अनेक संगीतकार छान छान काम करताहेत. केवळ बारा स्वरांच्या साक्षीने संगीत टिकून आहे. पुढच्या पिढीने कोणाचा आदर्श समोर ठेवायचा, असा प्रश्नही आई-वडील विचारत असतात.

अनेक संगीतकार छान छान काम करताहेत. केवळ बारा स्वरांच्या साक्षीने संगीत टिकून आहे. पुढच्या पिढीने कोणाचा आदर्श समोर ठेवायचा, असा प्रश्नही आई-वडील विचारत असतात. मला वाटतं संगीत ही दिवसागणिक फुलणारी कला आहे. अनेक नवे संगीतकार काही वेगळं करण्यासाठी धडपडत असतात. त्यात नवे प्रयोग करणाऱ्यांना नेहमीच संधी आणि दाद मिळत असते. कलेच्या क्षेत्रातील हेच नावीन्य कलाकाराला स्वत:ची ओळख देते...

कलाकार म्हणून कुठल्याही कलाकाराला जन्मजातच प्रतिभा लाभलेली असते. केवळ दैवी प्रतिभा आहे म्हणून तुम्ही मोठे कलाकार बनू शकत नाही. त्या प्रतिभेला पेलणाऱ्या पूरक गोष्टी एक कलाकार म्हणून तुम्हाला आत्मसात कराव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे कलेला जपणारं तुमचं सृजनशील मन असावं लागतं; पण तेही संस्कारित हवं. त्याचबरोबर नेहमी विद्यार्थीदशेत असावं, शिकण्याची इच्छा हवी, त्यासाठी लागणारी मेहनत, तळमळ, कष्ट करण्याची तयारी असावी लागते. या क्षेत्रातल्या असंख्य मोहांना दूर सारून कलेला जपलं पाहिजे. माझं आयुष्य, माझं जगणं ताठ मानेनं, सन्मानानं आणि स्वतःच्या जगण्याशी इमान राखणारं असावं लागतं. शेवटी तुमचं काम हीच तुमची ओळख असते, तुमची ताकद असते.

संगीताच्या क्षेत्रातला तुमचा इतका मोठा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातो. तुमची गाणी, तुमच्या चाली, तुमची काम करण्याची पद्धत, तुमची कामाची शैली इत्यादी गोष्टींचा प्रभाव कळत-नकळत तुमच्यावर होत असतो. अनेक वर्षं मी मोठमोठ्या कलाकारांचं काम जवळून पाहिलं आहे. त्यांच्या कामाचा अभ्यास मी सतत करत राहिलो आणि त्यातूनच नवीन सुरावट, नवीन गाणी मी देत राहिलो, नवीन काळाबरोबर चालत राहिलो. साधं-सोपं आणि नवीन गाणं बनवणं कठीण असतं आणि ते गाणं तर त्याहूनही कठीण असतं, असं माझं प्रांजळ मत आहे. माझ्या संगीताच्या बाबतीत मी सतत हाच विचार करत असतो की, गाणं सोपं, साधं आणि मेलोडियस असावं. गाण्याची मागणी ओळखून त्यानुसार आवाजातले चढ-उतार, बारकावे, हरकती, मुरक्या गाणं चागलं करण्यासाठी मदत करत असतात आणि शेवटी ते गाणं गायकाचं होतं. उदाहरणार्थ, तू सप्तसूर माझे, राधा ही बावरी, केतकीच्या बनी किंवा आभाळमाया ही गाणी माझी न राहता सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, सुमन कल्याणपूर आणि देवकीताई यांची झाली. या सर्व गोष्टींचा आनंद संगीतकाराला मिळत असतो. कारण गाणं गाणारा आणि गाणारीच तुमचं गाणं घराघरात पोहोचवत असतात.

पूर्वी प्रत्येक गायकाची स्वतःची अशी एक शैली होती. स्वतःचा असा एक स्वतंत्र आवाज होता. मुकेश म्हटलं की राज कपूर आठवायचे. किशोर म्हटलं की राजेंद्र कुमार आठवायचे. मन्ना डे म्हटलं की मेहमूद यांची आठवण होते. तसेच प्रत्येक कलाकाराची स्वतःची एक वेगळी खासियतही होती. एखाद्या विशिष्ट प्रकारचं गाणं गाण्यासाठी हाच आवाज असावा, असा आग्रहही असायचा; पण लताबाई आणि आशाबाईंच्या बाबतीत असं काही झालं नाही. २० वर्षांच्या हिरोईनपासून ते ४० वर्षांच्या हिरोईनपर्यंत त्यांचा आवाज चालायचा.

एक मात्र होतं, रिहर्सलच्या वेळी गायक सिनेमाची पार्श्वकथा, गाण्याचा मूड, हिरो कोण आहे, असे बरेचसे प्रश्न विचारत असत. आता मात्र तसं काही होत नाही, कारण स्वतःचा आवाज असलेली माणसं फार कमी झालीत आणि ओळखसुद्धा त्यांची जुन्या कलाकारांमुळे होते. हा किशोरसारखा गातो, हा रफीसारखा गातो, असा तो प्रवास असल्यामुळे हा गायक मिळाला नाही, तर दुसरा कोणीतरी, असं हल्लीच्या काळात चाललं आहे. पूर्वी एका एका गाण्यासाठी तीन-तीन दिवस रिहर्सल व्हायची; पण आता गायक निव्वळ चार तासांत गाऊन जातो. जेवढं चुकलं आहे तेवढी लाईन तेवढा शब्द कम्प्युटरवर दुरुस्त केला जातो. आता कॉम्प्युटरची कृपा अशी आहे, की गाणं सुरातही करता येतं. १९६०, ७०, ८० चा काळ म्हणजे सुवर्णकाळ, असे म्हणतात. रियाज आणि गाण्यामागचे कष्ट हे त्याचं मूळ कारण आहे.

संगीत क्षेत्रात संगीतकार छान छान काम करताहेत. केवळ बारा स्वरांच्या साक्षीने संगीत टिकून आहे. पुढच्या पिढीने कोणाचा आदर्श समोर ठेवायचा, असा प्रश्नही आई-वडील विचारत असतात. मला वाटतं, संगीत ही दिवसागणिक फुलणारी कला आहे. आजही नवीन नवीन संगीतकार काही वेगळं करण्यासाठी धडपडत असतात. गाण्याचे मीटर वेगळं असावं, संगीत संयोजनात नवीन वाद्य वाजवावीत, थोडक्यात- बदलत्या काळाचे पडसाद संगीतावरही दिसून येतात. त्याचप्रमाणे नवीन प्रयोग करणाऱ्यांना नेहमीच संधी आणि दाद मिळत असते. ती मिळालीच पाहिजे, असं माझं मत आहे.

काही माणसं अधिकाराच्या बळावर संगीतावर बोलत असतात, नको नको त्या गोष्टींची सूचना देत असतात, एकच गाणं वेगवेगळ्या चालीत दोन-तीन वेळा ऐकवलं, तरी खुश नसतात. अर्थहीन कडवट चेहऱ्याने बसून असतात. ‘आमच्या काळात असं असायचं’ अशी म्हणणारी ही जुनी पिढी आहे. त्याचबरोबर जुनं ते सोनं म्हणून ते गप्प बसतात. माझं तर असं म्हणणं आहे की, कलेच्या क्षेत्रात अंतिम बिंदू कधीच नसतो. आधीच्या पिढीने जे काम करून ठेवलंय, तिथूनच नव्या पिढीने सुरुवात करावी. मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण माझ्या बाबतीत सिनेमा, नाटक, अल्बम, मालिकांची गाणी, जिंगल्स या क्षेत्रात मनसोक्त वावरता आलं. प्रयोगादाखल नवनवीन छान छान गाणी करता आली. ही जनरेशन गॅप मला कधीच जाणवली नाही. एक तर तुम्हाला नवीन नवीन काम करण्याची आवड असावी लागते. मागे वळून पाहताना जुन्या कामाचा आनंद घेता-घेता मला नवीन युगातील संगीतालाही सामोरं जाता आलं, याचं मला समाधान मिळतं. माझ्यातील संगीतकाराला या वेगवेगळ्या कामातून ऊर्जाच मिळत गेली.

नवीन पिढीतील गायक-गायिका, प्रयोगशील संगीतकार, गीतकार, वादक, संगीत संयोजक, प्रोग्रामर मला नेहमीच भेटत असतात, जोपर्यंत काही नवीन उभारण्यासाठी कलेच्या क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्न घेतले जातील, तोपर्यंत संगीताचा प्रवाह पुढे अव्याहत चालू राहणार आहे आणि उद्याचं संगीत आहे तितकंच हृदयस्पर्शी आणि निर्मळ असणार आहे.

जितकी तुम्ही यशाची घाई कराल तितके तुम्ही मागे पडाल, असं मी या पिढीला सांगू इच्छितो. खरं म्हणजे यश मलाही मिळालं, माझी अनेक कामं नावाजली गेली. माझी अनेक गाणी गाजली, कौतुक झालं याचा मला आनंद झाला; पण माझे पाय जमिनीवरच राहिले आणि मला विचाराल तर जसं माणसाचं नशीब असतं, तसं प्रत्येक गाण्याचंही नशीब असतं. एक विधिलिखित घेऊनच प्रत्येक गाणं जन्म घेत असतं. मोठमोठ्या कलाकारांकडून जिथून मिळेल, तसं मी संगीत आत्मसात केलं. त्या बळावरच मी माझं पन्नास वर्षांचं सांगीतिक आयुष्य जगत आहे.

(समाप्त)

(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.