एक दिवस अनंत महादेवन घरी आले. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले. चित्रपटाची कथा भावुक असल्याने त्यांना माझंच संगीत हवं होतं.
एक दिवस अनंत महादेवन घरी आले. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले. चित्रपटाची कथा भावुक असल्याने त्यांना माझंच संगीत हवं होतं. जीवनाच्या प्रत्येक वळणावरचं दुःख, मानापमान, आयुष्यातील रितेपण अन् एकाकीपणा यांची जाणीव संगीतामधून करून देताना कस लागला होता. आम्ही केलेली गाणी रेकॉर्डिंग स्टुडिओत ऐकताच सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले आणि सिंधुताईही खूश झाल्या...
एक दिवस सकाळी गणेश जगताप नावाच्या मित्राचा फोन आला. सचिन खानोलकर म्हणून एका नवीन निर्मात्यांना तुमची भेट हवी आहे. कधी भेटू शकता, असं त्याने विचारले. मी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांना भेटायला बोलावलं. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सचिन, त्यांची पत्नी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक अनंत महादेवन माझ्या घरी आले. सुरुवातीच्या काही गप्पा झाल्यानंतर लक्षात आलं, की सचिन आणि त्यांची बायको बिंदिया खानोलकर हे दोघे निर्माते अनाथांची माय असलेल्या ‘पद्मश्री’ सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहेत आणि त्याचं दिग्दर्शन अनंत महादेवन करणार आहेत. चित्रपटाचं नाव आहे, ‘मी सिंधुताई सपकाळ.’
प्राथमिक ओळख आणि बोलणं झाल्यावर अनंत महादेवन यांनी माझ्या हातात एक कार्ड ठेवलं. त्या कार्डवर एक बाई आपल्या बाळाला हातात घेऊन रेल्वेरुळावर बसल्याचं चित्र होतं. कार्डवर अनेक नावं होती. त्यात एके ठिकाणी ‘संगीत अशोक पत्की’ असंही छापलं होतं. ते पाहून मी चमकलोच. सचिनजींना मी विचारलं, ‘आपलं चित्रपटाच्या बाबतीत काहीच बोलणं झालं नव्हतं. मग त्याच्या आधीच तुम्ही माझं नाव कसं छापलं?’ ते म्हणाले, ‘हा चित्रपट तुम्हीच करणार आहात. आम्ही दुसरीकडे कुठेही जाणार नाही. चित्रपटाचा विषयच असा आहे की एक भावुक कथा आहे आणि त्याला तुमचं संगीत मिळालं की मग बघायलाच नको... सोने पे सुहागा.’
साहजिकच मग चित्रपटाचा विषय आणि कथेबाबत उत्सुकता होती. त्याबाबत मी विचारणा केली. त्यावर सचिन खानोलकर म्हणाले, ‘सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आम्ही चित्रपट बनवत आहोत. एक प्रकारे तो बायोपिक आहे...’ बायोपिक प्रकाराबद्दल मला काही जास्त माहिती नाही; पण थोडंफार नाव ऐकलेलं आहे. पेपरात वाचलेलं आहे; पण जास्त काही माहिती नाही, असं मी तेव्हा त्यांना सांगितलं. त्यावर अनंत महादेवन म्हणाले, की आयुष्य काय असतं? जगणं कशाला म्हणतात? हे सांगणाऱ्या आणि शिकवणूक देणाऱ्या अनाथांची माय अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर चित्रपट करायचा, असं ठरवून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत...’
चित्रपटाचा आशय आणि विषयाबद्दल बोलणं झाल्यावर महादेवन मला म्हणाले, ‘लतादीदी चाहिए गाने के लिये.’ ते ऐकताच मी त्यांना म्हटलं, ‘अहो तुम्हाला जर लतादीदीच हव्या असतील तर चित्रपटाचं संगीत हृदयनाथ मंगेशकर यांना द्या. तुम्हाला उत्तम चाली मिळतील. त्यांच्या संगीताने नक्कीच कथेला वाव मिळेल आणि घरचंच काम असल्यामुळे लतादीदी मदतही करतील. रेकॉर्डिंग सहजरीत्या होईल.’ त्यावर महादेवन म्हणाले, ‘नाही अशोकजी. म्युझिक तो आपही करेंगे... आप का नाम भी छापा है देखो’ असं म्हणून त्यांनी मला परत ते कार्ड दाखवलं.
अखेर चित्रपटाचं संगीत मीच करणार, हे ठरलं. त्यानंतर गीते कुणाची आणि गायक कोण, हे ठरवायचं होतं. माझ्या हातात सचिन खानोलकर यांनी सुरेश भट यांची ‘एल्गार’ आणि ‘रंग माझा वेगळा’ ही दोन पुस्तके ठेवली. त्या गझलांच्या पुस्तकात काही ठिकाणी खुणा केलेल्या होत्या. सिंधुताईंच्या कामाला हातभार लावणारे बाबासाहेब नावाचे गृहस्थ होते. त्यांची दोन गाणी घ्यायचं नक्की झालं. त्यानंतर गायकाचा शोध सुरू झाला. मी त्यांना एकच नाव सांगितलं, देवकी पंडित. देवकी छान आणि मनापासून गाते, असंही म्हटलं. हळूहळू चर्चेतून दोन नावं पक्की झाली. एक देवकी पंडित आणि दुसरं सुरेश वाडकर. त्यानंतर आमची बैठक संपली. पुढील बैठकीला सिंधुताई येणार, असं सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे त्या आल्याही. माझी आणि त्यांची ओळख झाली.
सिंधुताई मधेच मराठी, तर कधी हिंदीमध्ये बोलत. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून सिंधुताईंच्या आवाजात कणखरपणा आला होता... तो मला पहिल्या भेटीतच जाणवला. सुरेश भट, कुसुमाग्रज यांच्या कितीतरी कविता त्यांना तोंडपाठ होत्या. आजवर अनेक चरित्रपट आले; परंतु हयात असणाऱ्या व्यक्तीवर चित्रपट येण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. गाण्याच्या रेकॉर्डिंगला सिंधुताई स्वतः स्टुडिओत आल्या होत्या. आपल्या चित्रपटातील गाणी त्याच त्याच पठडीतील नसावीत. त्यामध्ये नावीन्य असावं, असं मला अनंत महादेवन यांनी आधीच सुचवलं होतं. माझ्याही मनात तेच होतं. मी तसं त्यांना सांगितलंही.
कारण गंभीर प्रकृतीच्या गाण्यांना तालवाद्यं वगैरेंची आवश्यकता नसते. जेवढी शांतता असेल तेवढं ते गाणं अंगावर येतं. जीवनाच्या प्रत्येक क्षणावर उभं असलेलं दुःख, मानापमान, आयुष्यातील रितेपण अन् एकाकीपणा यांची जाणीव संगीतामधून करून घ्यायची म्हणजे त्याकरिता ठराविकच वाद्यं हवीत. सुरेश भट यांचे शब्दच इतके प्रभावी आहेत, की ते नुसते गुणगुणले तरी ती गाणी अंगावर येणारी आहेत. कशी ही बोलकी झाली घरे ओसाड गावाची... सुने रस्तेच हे गाती पुन्हा गीते उठावाची... असे गाण्यातील भाव मलाही निःशब्द करीत होते. माझ्या आवडीचं दुसरं गाणं ‘इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते... मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...’
चार दिवसांनी सचिन, त्यांची पत्नी आणि अनंत महादेवन यांना गाणी ऐकण्यासाठी मी स्टुडिओत बोलावलं. गाण्याच्या रेकॉर्डिंगला ‘सारेगमप’ कार्यक्रमाचे पंचवीसेक स्पर्धक आले होते. ते गाणे पाहण्यासाठी आले होते; पण ते ऐकताच सगळ्यांना अश्रू अनावर झाले. ऐकणाऱ्यांचे डोळे पाणावले होते. सगळीकडे शांतता पसरलेली होती. चित्रपटाची गाणी हृदयस्पर्शी झाली होती. रेकॉर्डिंगच्या वेळी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होतं. जो तो खाली मान घालून डोळे पुसून पुन्हा कामाला लागत असे. चित्रपटाच्या शीर्षकाच्या मागे ऐकू येणारे सुरेश वाडकर यांनी गायलेलं आणि प्रवीण दवणे यांनी लिहिलेलं गाणं ‘हे भास्करा क्षितीजावरी या उजळावयाला दाही दिशा’ काळीज पिळवटून टाकत होतं. त्या गाण्यासाठी सुरेश वाडकर यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. लंडनमध्ये झालेल्या मिफ्टा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून मला पुरस्कार मिळाला. सुरेश वाडकर यांना मिळालेल्या पुरस्काराचं श्रेय माझ्या रचनेला दिलं गेलं; परंतु ते यश सगळ्याचं होतं.
मुख्य म्हणजे, आम्ही तीन-चार गाणी केली ती सिधुताईंना अतिशय आवडली होती आणि त्या खूश होत्या, यातच सगळं काही मला मिळालं...
(लेखक प्रसिद्ध संगीतकार आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.