कामावर जाण्यासाठी मला टॅक्सी लागायची. त्यासाठी रोज चारशे-पाचशे रुपये मोजावे लागायचे.
कामावर जाण्यासाठी मला टॅक्सी लागायची. त्यासाठी रोज चारशे-पाचशे रुपये मोजावे लागायचे. अनेक मित्रांनी गाडी विकत घेण्याचे सुचवले; पण मी त्यांना माझ्या अडचणी सांगून टाळले. मात्र एक दिवस आई म्हणाली, ‘अरे अशोक, सेकंड हॅण्ड तरी गाडी घे. आज तुला गाडी चालवता येत नाही, हे खरे असले, तरी दिवाळी आता येत आहे. एखादे वाहन आपल्या घरी असावे.’ तिची इच्छा मनावर घेतली आणि पहिली गाडी घरात कशी आली, त्या प्रवासाची ही गोष्ट...
मी कामाला जाताना माझा सिंथेसायझर, रिऱ्दम बॉक्स वगैरे सामान माझ्या नेहमीच्या टॅक्सीने घेऊन जायचो. टॅक्सी ड्रायव्हर ठरलेला होता. सकाळी सात वाजता तो यायचा. त्याच्या टॅक्सीमध्ये सामान टाकून आठ वाजता आम्ही स्टुडिओत पोहोचायचो. मग रेकॉर्डिंग सुरू व्हायचे. रोजचे माझे टॅक्सीला चारशे ते पाचशे रुपये खर्च व्हायचे. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळी नेहमीच सांगायची की, ‘अशोक, आता तू गाडी घे. तुझे खूप पैसे वाचू शकतात.’ मी म्हणायचो की, ‘मला गाडी चालवता येत नाही. त्यामुळे ड्रायव्हर ठेवावा लागणार. पेट्रोल लागणार. गाडी धुण्यासाठी माणूस ठेवावा लागणार. एवढा खर्च झाला तर पैशाची बचत कशी होणार?’ माझ्या आईला ही बाब समजली. ती म्हणाली, ‘अरे अशोक, सेकंड हॅण्ड तरी गाडी घे. आज तुला चालवता येत नाही, हे खरे असले, तरी दिवाळी आता येत आहे. एखादे वाहन आपल्या घरी असावे.’
मी खूप विचार केला आणि सेकंड हॅण्ड गाडीचा व्यवसाय करणाऱ्या माझ्या नेपथ्यकार मित्राला भेटलो. त्याला गाडी घ्यायची आहे, असे सांगितले. तो म्हणाला, की ‘माझ्याकडे एक उत्तम सेकंड हॅण्ड गाडी आहे. किंमत आहे फक्त सतरा हजार रुपये. दिवाळी येतेय घेऊन टाक.’ मी म्हणालो, की ‘कधी येऊ गाडी बघायला.’ तो म्हणाला, ‘उद्याच ये. नंतर चारेक दिवस मी नाटकाच्या दौऱ्यावर आहे.’
दुसऱ्या दिवशी मी गाडी चालवता येणाऱ्या एका मित्राबरोबर त्या नेपथ्यकार मित्राकडे गेलो. त्याच्या अंगणात एक ऑफ व्हाईट रंगाची कोरी करकरीत फियाट कार उभी दिसली. मनातल्या मनात म्हणालो, ‘ही गाडी असली तर काय मजा येईल!’’ आणि काय गंमत, माझ्या त्या मित्राने त्याच्या घरात पाऊल टाकताच, ‘अंगणात एक गाडी उभी आहे. तुला ती कशी वाटली? तीच गाडी द्यायची आहे,’ असे सांगितले. लगेच मी त्याला म्हणालो, ‘गाडी उत्तम आहे; परंतु किंमत किती आहे?’’ तो म्हणाला, ‘‘तुला सांगितले ना सतरा हजार.’ खरे तर ती गाडी मला पाहता क्षणीच आवडली होती. परंतु माझ्याकडे अवघे पंधरा हजार रुपये होते. त्याला म्हणालो, ‘काही कमी करता येतील का?’ तो म्हणाला, ‘नाही. सतरा हजार म्हणजे सतरा हजारच. एक रुपयादेखील कमी करता येणार नाही.’ मनातल्या मनात विचार करू लागलो की, तो माझा मित्रच आहे. आता त्याला पंधरा हजार देऊन टाकू आणि उरलेले दोन हजार रुपये लक्ष्मीपूजनापर्यंत काम आले, तर देऊन टाकता येतील.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी तो मित्र गाडी घेऊन माझ्या घरी आला. गाडी पाहताच घरातील सगळ्यांना आनंद झाला. गाडीची सगळ्यांनी पूजा वगैरे केली. मी त्या मित्राला पंधरा हजार रुपये दिले आणि दोन हजार आठेक दिवसांत देतो, असे म्हणालो. तो म्हणाला, ‘अजिबात चालणार नाही. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि पैसे उधार ठेवत नाही.’ त्याचे हे बोलणे ऐकताच घरातील सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडले. सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. माझ्या हातातील चाव्या घेऊन तो मित्र म्हणाला, ‘मी जातो आणि तुझी दोन हजार रुपयांची सोय झाली की ये व गाडी घेऊन जा.’ दरवाजापर्यंत आलेली गाडी आणि तीदेखील दिवाळीच्या दिवसात, केवळ दोन हजार रुपये नाहीत म्हणून परत गेली.
आम्ही सारेच दुखावले गेलो होतो; परंतु मी आशा सोडली नव्हती. आठवडाभरात दोन हजार रुपयांची व्यवस्था झाली. पुन्हा माझ्या गाडी चालविणाऱ्या मित्राला घेऊन गेलो आणि गाडी घेऊन आलो.
आता गाडी आली; पण ड्रायव्हर मिळत नव्हता. काही जण आले; पण ते अव्वाच्या सव्वा पगार मागणारे होते. त्यामुळे गाडी असली, तरी माझा प्रवास टॅक्सीनेच सुरू होता. काही दिवसांनी माझे वेस्टर्न आऊटडोअरला रेकॉर्डिंग होते. माझे मित्र कोंगो वाजविणारा फारूक, हमीद... वगैरेना सांगितले की, ‘‘आता माझी गाडी आहे. आपण गाडीनेच जाऊया... फारूकने गाडी चालवली आणि आम्ही स्टुडिओत पोहोचलो. संध्याकाळी चारच्या सुमारास काम संपले. आम्ही सगळे निघालो. पेडर रोडवरून हाजी अलीपर्यंत आलो. रस्ता सगळा मोकळाच होता. फारूकने गाडी बाजूला घेतली आणि मला म्हणाला, ‘अशोक, आता तू ड्रायव्हरच्या सीटवर बस.’ मी म्हणालो, ‘अरे मला काहीही माहिती नाही आणि गाडी कशी चालवू?’ तो म्हणाला, ‘मी बाजूला बसणार आहे. घाबरू नको. डेअरिंग कर.’ त्याने मला काही साधकबाधक माहिती दिली. मी हळूहळू गाडी चालवायला लागलो. थोड्याच वेळात गाडी लोटस सिनेमाजवळ पोहोचली. तेवढ्यात डावीकडून एका गल्लीतून दुसरी गाडी आली. ती गाडी आपल्यावर आदळणार, असे मला वाटले. मी धडाधड पाय मारले आणि काय... गाडी जागच्या जागी थांबली; परंतु मागून एक डबल डेकर बस आमच्या गाडीवर आदळली आणि मागील बाजू चेपली गेली. आम्हा सगळ्यांना थोडीफार दुखापत झाली. मी घाबरलो. आता पोलिस येतील व चौकशीचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीने गारठून गेलो. लगेच फारूकला माझ्या जागी बसायला सांगितले. तो ड्रायव्हर सिटवर बसला. त्याने लगेच गाडी सुरूही केली. गाडीच्या पुढील भागास काहीही झालेले नव्हते. केवळ मागील भाग चेपला गेला होता.
आम्ही पहिल्या माळ्यावर राहायचो. किचनमधून समोरच गाडी पार्क केलेली दिसायची. गाडी उलटी उभी केली तर गाडीची मागील बाजू चेपली गेली आहे ते आईला दिसणार नाही; तरीही मी रात्रभर बेचैन होतो. सकाळी गाडी धुणारा आला. चावी घेऊन गेला आणि परत आला. आईला म्हणाला, ‘मम्मी, गाडीने अॅक्सिडेंट किया है.’’ त्याचे ते बोलणे ऐकून सगळ्यांच्या छातीत धस्स झाले. मग आईला मला सगळी हकिकत सांगावी लागली. आईने कुणाला फारसे लागले नाही ना... वगैरे विचारपूस केली. मग मी एक ड्रायव्हर ठेवला. तो मला गाडी शिकवायला लागला. हळूहळू गाडी चालवणे मला जमू लागले; परंतु माझ्याकडे लायसन्स नव्हते. मी शशांक लालचंदला भेटलो. शशांक हा फियाट कंपनीचे मालक लालचंद हिराचंद यांचा मुलगा. मी शशांकला सांगितले, की ‘मला गाडी चालविण्याचे लायसन्स हवे आहे. त्याने एक ओळख सांगितली. त्यानुसार त्या व्यक्तीला भेटलो. ट्रायल दिली तेव्हा ती व्यक्ती मला म्हणाली, की ‘‘अहो तुमची गाणी गोड असतात आणि तुम्ही गाडीही अत्यंत गोडीने आणि आवडीने चालविता.’ मला लगेच लायसन्स मिळाले.
माझी गाडी केव्हाही बघितली की चकाचक दिसायची. काहीही बिघडले तर मी लगेच काम करून घ्यायचो. त्यानंतर मी दुसरी गाडी शोरूममधून घेतली. ही बातमी सरोदवादक झरीन दारूवाला हिला समजली. ती माझ्याकडे सरोदवादक म्हणून होती. त्यामुळे तिने मला सांगितले की, ‘तुझी गाडी विकणार असशील तर कुणाला सांगू नकोस. मी घेईन तुझी गाडी.’ तिने माझी ती गाडी विकत घेतली. माझी पहिली गाडी फियाट कार एका चांगल्या व्यक्तीच्या हातात गेल्याचे मला समाधान मिळाले. मी २००० पर्यंत गाडी चालवत होतो. २००० मध्ये माझी बायपास झाली आणि मी गाडी चालवणे बंद केले.
(लेखक प्रसिद्ध संगीतकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.