एखादी गुंतागुंतीची यंत्रणा, क्लिष्ट माहिती किंवा जिच्याविषयी मोठ्या प्रमाणावर कुतूहल निर्माण झालं आहे अशी घटना सोप्या पद्धतीनं समजावून सांगायला चित्रांचा उत्तमरीत्या आधार घेतला जातो. भाषेचा अथवा आकलनाचा अडथळा टाळून एखादी संकल्पना किंवा माहिती कमीत कमी वेळात निःसंदिग्धपणे वाचकापर्यंत पोचवायची असेल तर माहितीचित्र हाच उत्तम उपाय आहे. प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या आणि सतत बदलत असलेल्या माहितीचा प्रसार ऍनिमेटेड माहितीचित्रांद्वारेही केला जातो. शास्त्रीय दृष्टिकोन आणि प्रतिभा या दोन्हींचा उपयोग होणारं हे क्षेत्र मोठ्या वाढीच्या टप्प्यावर आहे.
"एक चित्र हजार शब्दांची बरोबरी करू शकतं,' असं म्हणतात. फोनवर उपलब्ध असलेल्या इमोजींची अफाट लोकप्रियता हीच गोष्ट व्यापक प्रमाणात सिद्ध करते. "आनंद झाला' किंवा "मी मजेत आहे' हे टाईप करण्याऐवजी स्मायलीच्या चिन्हावर बोट दाबलं की झालं. अर्थात हे अगदी साधं उदाहरण झालं. या लेखात ग्राफिक डिझाइनअंतर्गत असलेल्या Infographic म्हणजेच "माहितीचित्र डिझाईन' या कौशल्याविषयी जाणून घेऊ या.
एखादी गुंतागुंतीची यंत्रणा, क्लिष्ट माहिती किंवा जिच्याविषयी मोठ्या प्रमाणावर कुतूहल निर्माण झालं आहे अशी घटना सोप्या पद्धतीनं समजावून सांगायलाही चित्रांचा उत्तमरीत्या आधार घेतला जातो. भाषेचा अथवा आकलनाचा अडथळा टाळून एखादी संकल्पना किंवा माहिती कमीत कमी वेळात निःसंदिग्धपणे वाचकापर्यंत पोचवायची असेल तर माहितीचित्र हाच उत्तम उपाय आहे. निवडणुकांचे निकाल, गुन्हे किंवा अपघातांची उकल, पुराची माहिती अशा प्रत्यक्ष दाखवून विशेष आकलन न होणाऱ्या घटना प्रभावशाली पद्धतीनं सादर करण्यासाठी वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्या माहितीचित्रांचा सर्रास वापर करतात.
माहितीचित्र डिझाईन करण्यात प्रत्यक्ष माहितीचं विश्लेषण, शब्दमांडणी, दृश्यकला आणि संख्याशास्त्र यांचा मेळ बरोबरीनं घालावा लागतो. डिझायनर्स शेकडो वर्णनात्मक शब्दांना काट मारून कल्पनाशक्ती वापरून मोजके शब्द आणि चित्र योग्य त्या वाचकाला उमजेल/आवडेल असं मांडण्यावर भर देतात.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण सगळेच इंटरनेटशी निगडित आहोत; त्यामुळं मोबाईल फोन, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, टॅबलेट्स यांच्याद्वारे प्रचंड प्रमाणात वेगवेगळी माहिती सतत गोळा होत असते. त्या माहितीची वर्गवारी करून ती योग्य गटांना योग्य वेळी आणि सहज समजेल अशा प्रकारे पुरवली तर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटं टाळली जाऊ शकतात.
हवामान, रहदारी, पिकं, शैक्षणिक, व्यापारविषयक माहितीवर अनेक महत्त्वाचे सामाजिक आणि राजकीय निर्णय अवलंबून असतात. माहितीचित्रांद्वारे अतिशय कमी वेळात मोठी आणि गंभीर स्वरूपाची माहिती निर्णय घेण्याबाबत मोलाची ठरू शकते. माहितीचित्राद्वारे अवघड संकल्पनाही सोप्या करून समजावून सांगता येतात. माहितीच्या स्वरूपावर चित्राचा प्रकार ठरवला जातो.
1) जर आकडेवारी पुढं ठेवायची असेल तर संख्या ठसठशीत मांडून इतर माहिती अवतीभवती जोडली जाते. 2) बरेच मुद्दे टिपा म्हणून मांडायचे असतील, तर कमी शब्द छोट्या चिन्हांबरोबर गुंफून ते मुद्दे सादर केले जातात. 3) ऐतिहासिक वर्षानुसार घटनांनी अथवा ओळींनी घडणाऱ्या प्रक्रिया दाखवायच्या असतील तर लांबलचक रेषेवर आकडे आणि चिन्ह किंवा फोटोग्राफ्स वापरून क्रमवारी रचली जाते. 4) वंश, अर्थव्यवस्था, राजकीय स्थिती, भौगोलिक परिस्थिती यांवर आधारित माहिती सादर करण्यासाठी नकाशाची मदत घेतली जाते. 5) दोन घटना, व्यक्ती अथवा वस्तूंची तुलनात्मक माहितीचित्रंही बरीच लोकप्रिय आहेत. 6) आजकाल नोकरीच्या अर्जासोबत जो बायोडेटा जोडला जातो तोही माहितीचित्रासारखाच बनवला जातो. यात शैक्षणिक किंवा पूर्वानुभवाची माहिती तर असतेच, शिवाय आवडी, छंद, स्वयंसेवा या गोष्टींचीही माहिती ठळक होते.
सामाजिक परिवर्तनासाठीही माहितीचित्रांचा उपयोग अतिशय प्रभावी ठरू शकतो. काही वर्षांपूर्वी रहदारीची बिकट समस्या सोडवण्यासाठी "सकाळ समूहा'द्वारे "पुणे बस डे' हा उपक्रम राबवला गेला. जर बसचे मार्ग, वेळापत्रक आणि संख्या यांचं योग्य नियोजन झालं आणि नागरिकांनी वैयक्तिक वाहनं न वापरता बसचा उपयोग केला तर रहदारीची समस्या तर सुटेलच, शिवाय इंधनबचतही होईल आणि प्रदूषणही बऱ्याच प्रमाणावर आटोक्यात राहील, ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्षात राबवून सिद्ध करायची, असा उद्देश होता. ही समस्या किती मोठी आहे, ती सोडवली तर कशा प्रकारे सकारात्मक बदल घडतील आणि यात सामान्य नागरिकांकडून काय हातभार लागावा अशी अपेक्षा आहे, हे अतिशय कमी दिवसांत वाचकांपुढं ठेवून त्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करायचं आव्हान आमच्या डिझाईन टीमपुढं होतं. शब्द, आकडेवारी, माहिती आणि रंजन हे सगळे घटक एकत्र करून माहितीचित्रं योजण्यात आली. यामुळे एरवी नीरस वाटू शकेल अशी माहिती अतिशय कल्पकपणे सादर करण्यात यश आलं. पुणे शहरात किती मार्ग आहेत, पहिली बस केव्हा आणि कुठून निघाली, स्वतः ड्रायव्हिंग न करता बसनं जाऊन काय फायदे होतील, सगळ्यांनी वैयक्तिक वाहनं वापरणं कमी केलं तर प्रत्येकाचा किती वेळ वाचेल, लोकप्रिय चित्रपटांत बसचं महत्त्वाचं स्थान, रोजचे प्रदूषणाचे आकडे, इंधनाचा खर्च अशा अनेक विषयांवर सतत 12 दिवस पहिलं पान भरून माहितीचित्रं छापली गेली. माहितीचित्रांचं प्रादेशिक वृत्तपत्राद्वारे एवढ्या मोठ्या प्रमाणात सादरीकरण धाडसीच म्हणावं लागेल. विशेष म्हणजे या उपक्रमाला पुणेकरांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. याच समूहाद्वारे पाण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीही अनेक उपक्रम केले गेलेले आहेत. पाण्यासारख्या संसाधनाचा वापर अतिशय हलगर्जीपणे केला जाताना आपण पाहत असतो. रोजच्या जेवणातल्या पदार्थांमागं किती पाणी वापरलं जातं आणि त्याची किंमत किती असू शकेल याची जाणीव वाचकांना व्हावी, या उद्देशानं समजायला अतिशय सोपं असं थाळीच्याच आकारात केलेलं या विषयावरचं हे पहिलंच माहितीचित्र असावं. याचबरोबर सामान्य माणूस दररोज साधारणपणे किती पाणी वापरतो याच्याही क्रमवारीची पट्टी आमच्या टीमनं डिझाईन केली होती. पाण्याचा अपव्यय कमी करायला या माहितीचित्रांचा परिणाम निश्चितच झाला असावा. प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या आणि सतत बदलत असलेल्या माहितीचा प्रसार ऍनिमेटेड माहितीचित्रांद्वारेही केला जातो. शास्त्रीय दृष्टिकोन आणि प्रतिभा या दोन्हींचा उपयोग होणारं हे क्षेत्र मोठ्या वाढीच्या टप्प्यावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.