"विशिष्ट आवाज' ही ओळख असलेली पितळी घंटा, राजस्थानी मोजडी, वेगवेगळ्या कलाकुसरीनं नटलेले, हातात धरून वारा घेण्याचे पंखे याही काही वस्तू आयकॉनिक डिझाईनच्या श्रेणीत बसतात. आठवणींना थोडा उजाळा दिला तर या प्रकारच्या अनेक पारंपरिक आणि परिपूर्ण वस्तू आठवतील, आढळून येतील.
"आमच्या मनातही पुष्कळ नवनवीन कल्पना येतात; पण आम्हाला ड्रॉईंग करता येत नाही, त्यामुळे आम्ही डिझाईन करू शकत नाही,' अशा प्रकारची खंत व्यक्त करणाऱ्या अनेक व्यक्ती मला सतत भेटत असतात. खरंतर कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता यांची देणगी थोड्याफार प्रमाणात प्रत्येकालाच मिळालेली असते. लहानपणी त्या कल्पना मनमुक्तपणे प्रकट करता येऊ शकत असल्यामुळे लहान मुलं स्वप्नांच्या गावात जाऊन अनेक जादूई अनुभव घेऊन येतात! कल्पना दडपून-दाबून ठेवण्याचा प्रकार लहानपणी नसतो. चित्रांतले रंग हे हुबेहूबच असले पाहिजेत असं दडपण लहान मुलांवर नसतं आणि शब्द किंवा उच्चारही निर्दोषच असायला हवेत, अशी धास्तीही त्यांना नसते. मनात आलेली कल्पना ही चित्र, हावभाव, शब्द, आवाज, रंग, आकार यांद्वारे व्यक्त करता आली की झालं. त्यासाठी सुबक चित्रकला आलीच पाहिजे, असं अजिबात नसतं लहानपणी.
मात्र, मोठेपणी नाना शंका, संकोच, टीकेची भीती असे वेगवेगळे भाव मनात निर्माण होतात; त्यामुळे उपजत असलेली प्रतिभा झाकोळते आणि कल्पना व्यक्त करण्याबाबतचा आत्मविश्वास नाहीसा व्हायला लागतो. प्रगत देशांतही जाणीवपूर्वक, प्रशिक्षण घेऊन केलेलं डिझाईन जेमतेम दोन शतकांपासून अस्तित्वात आहे. विकसनशील देशांत हा उद्योग औपचारिकपणे सुरू होऊन केवळ पन्नास-साठ वर्षं झालेली आहेत; पण त्यापूर्वी डिझाईन ही क्रिया होत नव्हती का? होत होती तर! हजारो शतकांपूर्वी गुहांमध्ये आणि जंगलांत राहणारी माणसंही कल्पनाशक्ती लढवून रोजच्या
आयुष्यातल्या समस्या सोडवायचीच. त्या वेळी धारदार दगड आणि झाडाची फांदी मिळून तयार झालेला हातोडा किंवा कुऱ्हाड यांचे अवशेष आजही सापडतात, तसंच गुहांच्या भिंतींवर त्या काळातल्या जीवनशैलीची कल्पना येऊ शकेल अशी पटचित्र सापडलेली आहेत. ते उत्कृष्ट कारागिरीचे आणि चित्रकलेचे नमुने जरी नसले, तरी त्या काळचा संदर्भ समजून घेण्यासाठी ती अतिशय प्रभावी उदाहरणं आहेत असं म्हणता येईल. प्रत्येक संस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी त्या संस्कृतीची काही ठळक वैशिष्ट्यं घडत गेली. यात भाषा, रूढी, सामाजिक आणि कौटुंबिक रचना, वास्तुकला, पेहेराव याचबरोबर काही लक्षणीय वस्तू प्रत्येक संस्कृतीशी निगडित होत गेल्या. या वस्तू गरजेप्रमाणे, त्या त्या वेळी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानानुसार, कसबानुसार बदलत गेल्या, त्यांत सुधारणा करण्यात आल्या. मानवी उत्क्रांतीच्या साक्षीदार असलेल्या यातल्या काही वस्तू काळाच्या कसोटीवर उतरल्या आणि शेकडो वर्षं उलटली तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या आजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. या वस्तू कुण्या एका व्यक्तीनं डिझाईन केलेल्या नाहीत. कुणीतरी मूळ कल्पना प्रत्यक्षात आणली असणार; पण पिढ्यान्पिढ्या त्याची सुधारित आवृत्ती घडत राहिली आणि शेवटी एक असा क्षण आला की ती वस्तू त्या आकारात आणि रचनेत परिपूर्ण झाली. वरवरची कलाकुसर जरी बदलत राहिली, तरी मूळ कल्पना आणि रचना अढळ राहिली. त्या वस्तूला चिरंतन दर्जा प्राप्त झाला. अशी परिपूर्ण डिझाईन्स नेहमीच पाहण्यात येत असल्यामुळे त्यांची विशेष चर्चा केली जात नाही; पण या प्रत्येक वस्तूच्या डिझाईनमागे जो तपशील, ज्या कथा दडलेल्या आहेत त्यांचा जरासा मागोवा घेऊ या...
***
लोटा हे चिरंतन असं आयकॉनिक डिझाइनचं महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. तांब्याच्या किंवा पितळेच्या धातूचं, खाली गोलाकार, मध्ये निमुळती मान आणि वर उमलत गेलेला काठ अशी रचना असलेलं हे भांडं प्लास्टिकच्या आक्रमणापूर्वी प्रत्येक घरात रोजच्या वापरात असायचं. पाणी वाढायला, प्यायला, ओतायला, धान्य मापायला, उपसायला, पूजेचा नारळ ठेवायला, लग्नात उतरंड मांडायला...लोट्याचे उपयोग सांगायचे तर एक मोठीच यादी तयार होईल. तळहाताच्या खोबणीत सोईस्करपणे धरता येणारा, अगदी कमी प्रयासांनी तिरका करून मनगटाच्या स्वाभाविक हालचाली करून वापरता येणारा लोटा दिसायलाही अतिशय सुबक आणि घाटदार असतो. धान्य किंवा पाणी आत ओतताना येणाऱ्या आवाजावरून तो कितपत भरला आहे हे सहज समजू शकतं. आपल्याला सामान्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात किती असामान्य आहेत ते कधी कधी बाहेरच्या व्यक्ती आपल्याला दाखवून देतात! लोट्याच्या बाबतीत असंच काहीसं घडलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन 1957-58 मध्ये भारतीय औद्योगिकीकरणाला उत्तेजन देण्यासाठी सुप्रसिद्ध अमेरिकी डिझायनर्स चार्ल्स आणि रे इम्स यांचा सल्ला मागितला होता. वर्षभर प्रवास आणि निरीक्षण केल्यानंतर त्यांनी "इंडिया रिपोर्ट' सादर केला होता. त्यात इतर अनेक निरीक्षणं आणि सूचनांबरोबर "लोटा' या वस्तूचा "उपयुक्त' आणि "सुंदर' म्हणून विशेष उल्लेख त्यांनी केला होता. त्या रिपोर्टनुसार, पुढं अहमदाबाद इथं "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन' (NID) ही संस्था सुरू करण्यात आली. तिथं लोटा आणि अशाच इतर लक्षणीय भारतीय वस्तू आणि हस्तकला यांचा अभ्यास हा शिक्षणाचा अपरिहार्य भागच बनलेला आहे.
विणकामाच्या साह्यानं साधी लाकडी चौकट वापरून बनवलेली बाज किंवा खाट हेही एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. साधी, आसपास मिळणारी साधनं आणि साहित्य वापरून तयार होणारी खाट ही लाकडाच्या आणि विणकामाच्या प्रकारातल्या विविधतेमुळे भारताच्या प्रत्येक प्रांतात स्वतःचा वेगळेपणा बाळगून आहे; पण मूळ रचना आणि कल्पना एकच. चालताना होणाऱ्या थोड्याशा आवाजामुळे शेतात फिरणारे साप-विंचू दूर घालवणारी, रुबाबदार दिसणारी कोल्हापुरी चप्पलही आयकॉनिक डिझाईनमध्ये समाविष्ट होते. टिकाऊ आणि फॅशनेबल अशा दोन्ही निकषांत बसणारी कोल्हापुरी चप्पल परदेशातही लोकप्रिय झालेली आहे. जमिनीवर मांडी घालून अतिशय आरामात लेखन-वाचन करता येईल अशा अतिशय सोईस्कर उंचीच्या डेस्कचा उगम भारतातच झाला होता. आजच्या लॅपटॉपच्या काळात या पद्धतीचं डेस्क पुन्हा वापरात आणता येईल का याचा जरूर विचार व्हायला हवा. "विशिष्ट आवाज' ही ओळख असलेली पितळी घंटा, राजस्थानी मोजडी, वेगवेगळ्या कलाकुसरीनं नटलेले, हातात धरून वारा घेण्याचे पंखे याही वस्तू आयकॉनिक डिझाईनच्या श्रेणीत बसतात. आठवणींना थोडा उजाळा दिला तर या प्रकारच्या अनेक पारंपरिक आणि परिपूर्ण वस्तू आठवतील, आढळून येतील.
अशा वस्तूंची व्यापक स्वरूपाची यादी करू या का?
(पंख्याचं छायाचित्र ः जतीन दास यांच्या संग्रहातील. इतर छायाचित्रे: क्रिएटिव्ह कॉमन्स तत्त्वानुसार अथवा निर्मात्याच्या मालकीची)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.