डिझायनर्स मंडळींनी दूरदृष्टीच्या अभावानं सार्वजनिक क्षेत्रात काही अतिशय महत्त्वाचे पूर्वग्रहदूषित निर्णय घेतलेले आहेत. ते अक्षरशः लाजिरवाणे आहेत. लहान बाळांसाठी कपडे म्हणजे मुलांसाठी निळे आणि मुलींसाठी गुलाबी. इथंच पूर्वग्रह आणि भिन्नतेला प्रोत्साहन सुरू होतं. ते मुळापासूनच बंद केलं तर कदाचित "सार्वत्रिक डिझाईन' ही संकल्पना लोकमान्य, लोकप्रिय होईल.
समाजात किती विविधता आहे! दोन व्यक्ती एकसारख्या नसतात. त्यांचे विचार, वातावरण, गरजा भिन्न असतात. निर्णय घेण्याची कुवतही वेगवेगळी असते. लहान-मोठे, काळे-गोरे, उंच-बुटके, बारीक-लठ्ठ, शहाणे-मठ्ठ, धडधाकट-अधू, स्त्री-पुरुष हे सगळे सहज समजतील असे बाह्य फरक आहेत. शिवाय भाषा, शिक्षण, आर्थिक स्थिती, राजकीय विचारसरणी, लैंगिक कल हे वरकरणी न दिसणारे; पण मोठे फरकही असतातच.
जर वस्तू अथवा सेवा जास्तीत जास्त लोकांना रुचतील अशा तऱ्हेनं डिझाईन करण्याचा हेतू असेल, तर त्या नेमक्या कुणाला केंद्रस्थानी ठेवून डिझाईन केल्या जातात? व्यापक प्रमाणावर वापरता येतील, अशाच गोष्टी तयार केल्या जात असणार अशी समजूत जरी स्वाभाविक असली तरी तशी वस्तुस्थिती नाही. कोणताही भेदभाव आड न येता प्रत्येकाला सहज समजतील, उपलब्ध होतील
आणि वापरता येतील अशी उत्पादनं, सेवा डिझाइन केली जातात हे खरं नाहीए. डिझायनर्सनी दूरदृष्टीच्या अभावानं सार्वजनिक क्षेत्रात काही अतिशय महत्त्वाचे पूर्वग्रहदूषित निर्णय घेतलेले आहेत. ते अक्षरशः लाजिरवाणे आहेत. सन 1930 च्या दशकात न्यूयॉर्क शहराची नवरचना योजणारे आर्किटेक्ट रॉबर्ट मोझेस यांनी फ्लायओव्हरखालून जाणाऱ्या रस्त्यांच्या कमानी अगदी कमी उंचीवर ठेवल्या होत्या. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात केवळ खासगी गाड्याच जाऊ शकायच्या. सार्वजनिक वाहतुकीच्या बसेस किंवा ट्रक त्या भागात जाऊ शकत नव्हते. अर्थातच स्वतःच्या गाड्या नसलेले लोक शहराच्या त्या भागात जाऊच शकत नव्हते. यात विशिष्ट वर्णाचे लोक बहुतांशी आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागं असतात याची भर होतीच. याच सुमाराला शहरातल्या बांधकाम व्यावसायिकांसाठी एक नकाशा प्रसिद्ध झाला होता. समानतेवर विश्वास नसल्यामुळे यात कृष्णवर्णीय वस्ती असलेल्या जागा लाल रंगात आणि थोडक्यात म्हणजे टाळण्यासारख्या असल्याची सूचना होती. तसंच बेघर असलेल्यांना सार्वजनिक ठिकाणच्या बाकांवर झोपणं शक्य होऊ नये म्हणून सार्वजनिक जागांसाठी डिझाईन केलेल्या बाकांना विशिष्ट अंतरांवर हॅंडलरेस्ट लावण्यात आली होती. अशा रचनांमुळे गरीब, कृष्णवर्णीय, स्थलांतरित आणि उच्चभ्रू, प्रतिष्ठित यांच्यातली दरी वाढत गेली आणि त्याचे दुष्परिणाम न्यूयॉर्कमध्ये आजही दिसून येतात. वर्ण, वंश, सामाजिक आणि आर्थिक स्थितीतल्या तफावतीमुळे केलेले भेदभाव तर आहेतच. शिवाय, जगातल्या बहुतांशी वस्तू आणि सेवा या सरासरी बुद्धिमत्ता आणि शरीरयष्टी असलेल्या पुरुषांसाठी डिझाईन केल्या जातात. खरेदीचे मोठे निर्णय पुरुषच घेतात या सर्वमान्य (गैर)समजुतीवर आधारित आणि त्यामुळे त्यांना संतुष्ट करतील अशीच वजनं, मापं, रंग आणि आकार रोजच्या वापरातल्या एकूण एक गोष्टींसाठी योजली जातात. मोठमोठी IT ऑफिसेस, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, सिनेमा हॉल्स, मॉल्स यांमध्ये विशिष्ट तापमान कायम राखलं जातं. यातल्या प्रत्येक क्षेत्रात आज 30 ते 40 टक्के महिला कार्यरत आहेत. मात्र, हे तापमान सरासरी (वजन : सुमारे 70 किलो, उंची : सुमारे पाच फूट, सात इंच) अंगकाठीच्या पुरुषांना आरामदायक होईल इतकं कमी असतं. सरासरी उंची कमी असल्यामुळे महिलांच्या शरीरात मसलचा भाग कमी असतो आणि म्हणूनच पुरुषांना योग्य वाटणाऱ्या तापमानात त्यांना जास्त थंडी वाजू शकते. कारण, त्यांना आराम वाटेल असं तापमान बिल्डिंगच्या योजनेत गृहीत धरलेलं नाही. ग्लास, कप, चमचे, पेन यांची पकड आणि आकार, इथपासून ते जिन्याच्या पायऱ्यांची उंची, दाराच्या कडीची उंची, दिवे किंवा इतर विजेच्या उपकरणांची बटणं दाबायला/फिरवायला लागणारा जोर आणि कोन यात कुठंही महिलांच्या अंगकाठीची सरासरी लक्षात घेतली जात नाही. सन 1960 मध्ये गाडीचालकाच्या सुरक्षिततेसाठी सीटबेल्टसारखे नियम लागू झाले तेव्हापासून ते अगदी अलीकडं म्हणजे सन 2011 पर्यंत सीटबेल्टची चाचणी- क्रॅशटेस्ट सरासरी पुरुषाच्या मापाच्या मॅनेक्विनवरच होत होती. त्यामुळे महिला ड्रायव्हर्सना पुरुषांच्या तुलनेत सुमारे 47 टक्के जास्त धोका संभाव्य होता. सन 2011 पासून सीटबेल्टची चाचणी - क्रॅशटेस्ट सरासरी महिलांच्या मापाच्या मॅनेक्विनवरही करणं अनिवार्य झालेलं आहे. महिला आणि पुरुषांचे पाश्चात्य कपडे बरेचसे सारखे असतात; पण तेही महिलांच्या मापांत तयार होतात तेव्हा त्यांच्या वेगळ्या अंगकाठीची विशेष दखल घेतलेली आढळत नाही. "महिलांची पर्स ही तळ नसलेली थैली आहे,' अशी चेष्टा केली जाते. मात्र, त्यांच्या कपड्यांना खिसे नसतात; मग कुठं ठेवणार पैसे, फोन, किल्ल्या? स्त्रियांसाठी डिझाईन केलेली घड्याळं नाजूक आणि पातळ असावीत म्हणून त्यांच्यात बहुतांशी वार आणि तारीख नसायची. यात त्यांना त्या गोष्टीची गरज तरी आहे का, असाही भाव असणारच! याच्या उलट कधीतरी दुसऱ्या टोकाला जाऊन खास महिलांसाठी अशी जाहिरात करून काही गोष्टी बाजारात सादर होतात. दुर्दैवानं त्या वस्तू केवळ वरवर बदललेल्या असतात. पाच-सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत बिक्स फॉर हर (तिच्यासाठी) नावाची पेनं बाजारात आली. बाकी काहीही बदल नसलेल्या, केवळ जांभळ्या आणि गुलाबी रंगांत उपलब्ध असलेल्या या पेनांवर अमेरिकेतल्या विचारवंतानी टीकेचा भडीमार केला, तरीही ती अजून टिकून आहेत. साधी गुलाबी बॉलपॉईंट पेनं "फॉर हर' लिहून असमानतेची दरी वाढवणारी, महिलांच्या पसंतीचा एका फटक्यात अपमान करणारीच निघाली. असाही प्रश्न उपस्थित झाला की बाकी सगळी पेनं केवळ पुरुषांचीच असतात आणि महिलांनी साक्षर, सक्षम होऊन स्वतःचे विचारच मांडू नयेत अशी अपेक्षा आत्तापर्यंत होती काय? एकीकडं प्रगतशील अशा "लेगो' कंपनीनं खास मुलींसाठी नवीन खेळांचे सेट सादर करून, इतकी वर्षं केवळ मुलांवर लक्ष केंद्रित होतं, असं कळत-नकळत जाहीर केलं, तर दुसरीकडं "झारा' या फॅशन ब्रॅंडनं लिंगभेद झुगारून देत स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही शोभून दिसेल अशी कॉमन कपड्यांची मालिका सादर केली आहे. लहान बाळांसाठी कपडे म्हणजे मुलांसाठी निळे आणि मुलींसाठी गुलाबी. इथंच पूर्वग्रह आणि भिन्नतेला प्रोत्साहन सुरू होतं. ते मुळापासूनच बंद केलं तर कदाचित सार्वत्रिक डिझाईन ही संकल्पना लोकमान्य, लोकप्रिय होईल.
(छायाचित्रे: "क्रिएटिव्ह कॉमन्स' तत्वानुसार अथवा निर्मात्याच्या मालकीची)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.