रंगखुणा

Ashwini deshpande writes about colors
Ashwini deshpande writes about colors
Updated on

शहरातली मंडळी लाल, पिवळा/केशरी, हिरवा हे तीन रंग जवळपास रोजच पाहत असतात आणि हे रंग झगझगीतपणे दिसण्याचं ठिकाण म्हणजे शहरातले मोठमोठे चौक व तिथली ट्रॅफिक सिग्नलची यंत्रणा. प्रत्येक रंग त्याच्या गुणवैशिष्ट्यांनी आपल्याशी संवाद साधत असतो. आपल्याला काही संदेश देत असतो. लाल-हिरवा-केशरी या रंगांचीही अशीच काही वैशिष्ट्यं आहेत. या वैशिष्ट्यांमुळंच जगभरातल्या सिग्नलयंत्रणेसाठी त्यांची निवड करण्यात आली. 

रंग आणि रंगसंगती हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. निसर्गही आपल्याला रंगांद्वारे महत्त्वाचे संदेश देत असतो. फुलांमधले परागकण आपल्या रंगाद्वारे पक्ष्यांना किंवा फुलपाखरांना आकर्षित करतात. पुनर्निर्मिती होण्यात या परागकणांचा सहभाग असतो. ज्या प्राण्यांपासून किंवा वृक्षांपासून सावध राहायला हवं, त्यांच्यावर निसर्गानं उपजतच धोक्‍याच्या खुणा पसरलेल्या असतात. ऋतुबदलाची चिन्हं निसर्गात ठळकपणे दिसतात. फळ पिकलंय की कच्चंच आहे, हेसुद्धा बहुतेक वेळा रंगामुळंच समजू शकतं. 

आपल्या रोजच्या आयुष्यात आपण एक अतिशय महत्त्वाचा निर्णय रंगांवर अवलंबून ठेवलेला आहे. वाहन चालवताना थांबायचं की पुढं जात राहायचं, हे आपण ट्रॅफिक सिग्नलच्या रंगानुसार ठरवतो. (निदान तशी अपेक्षा आहे!) 
लाल म्हणजे ‘थांबा’, हिरवा म्हणजे ‘जात राहा’ आणि पिवळा म्हणजे ‘वाहनाचा वेग कमी करा’ असे अर्थ जगभर प्रचलित आहेत; पण हे रंग लाल, पिवळा आणि हिरवा असेच का? गुलाबी, जांभळा, बदामी का नाहीत? तर याचं उत्तर जेवढं वैज्ञानिक आहे, तेवढंच ऐतिहासिकही. अगदी पूर्वी जेव्हा वाहतुकीची फारशी वर्दळ कुठंच नसायची, तेव्हा सिग्नलचीही आवश्‍यकताच नव्हती. मात्र, जेव्हा स्टीम इंजिनद्वारे ओढल्या जाणाऱ्या रेल्वेगाड्या अस्तित्वात आल्या, तेव्हा एकाच रुळावरून जाणाऱ्या दोन गाड्यांची टक्कर होऊ नये किंवा रूळ ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना अपघात होऊ नये म्हणून रेल्वेच्या पुढं घोडेस्वारांना पाठवण्यात यायचं. ही १८३० च्या दशकातली गोष्ट. धुक्‍यामुळं किंवा पावसामुळं घोडेस्वार आणि त्यांनी केलेले हातांचे इशारे स्पष्ट न दिसल्यामुळं इंग्लंडमध्ये वारंवार अपघात होऊ लागले, तेव्हा त्याच घोडेस्वारांना लाल रंगाचे झेंडे घेऊन पाठवण्यास सुरुवात झाली. लालच झेंडे का? निळे किंवा पांढरे का नाही? दूरवरून स्पष्ट दिसावं म्हणून गॅसलाईट वापरण्याची पद्धत याच सुमाराला सुरू झाली. गॅसलाईटची ज्योत रात्री आणि त्याचंच प्रतीक असलेला लाल झेंडा दिवसा सिग्नल म्हणून वापरला गेला. 

वरकरणी जरी हे निमित्त दिसत असलं, तरी गेल्या वेळच्या लेखात म्हटल्यानुसार, लाल रंगाची वेव्हलेंथ सगळ्यात
जास्त प्रखर असते. त्यामुळं लाल दिवा प्रतिकूल वातावरणातही लांबवर दिसतो आणि आपलं काम चोख बजावतो. याच वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिग्नल डिझायनर्सनी रेल्वे थांबवण्यासाठी लाल दिव्याची योजना १८५० च्या दशकात केली आणि पुढं तसा कायदाही इंग्लंडमध्ये करण्यात आला. पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या वेव्हलेंथची प्रखरता लाल रंगाच्या खालोखाल असते; पण मोठ्या अंतरावरून पाहणी केली तर लाल आणि हिरव्या रंगात स्पष्ट तफावत दिसू शकते. याच कारणांनी थोडेफार प्रयोग करून हिरव्या रंगाचं स्थान Go किंवा ‘जात राहा’ या संदेशासाठी नक्की करण्यात आलं. जे सिग्नल रेल्वेसाठी लागू पडले, तेच पुढं रहदारीच्या रस्त्यांवरही प्रचलित होऊ लागले. सन १९०० ते १९१५ यादरम्यान इंग्लंड आणि अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे ट्रॅफिक सिग्नल लावले गेले. ते पोलिसांद्वारे हातानं ओढून चालवले जायचे. जेव्हा एका व्यक्तीला चार चार रस्त्यांवरचे सिग्नल काबूत ठेवणं अवघड व्हायला लागलं, तेव्हा Stop आणि Go यांशिवाय तिसऱ्या संदेशाची गरज भासली व ती म्हणजे ‘वेग कमी करा’ आणि तेव्हाच, म्हणजे १९२० मध्ये तिसऱ्या, पिवळ्या रंगाचा उपयोग ट्रॅफिक सिग्नलअंतर्गत सुरू झाला. 

या रंगांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यापासून लाल = धोका, पिवळा/केशरी = सावधान, हिरवा = सुरक्षित हे अर्थ सुमारे एका शतकाहून अधिक काळ प्रचलित आहेत. जगात कुठंही गेलं तरी हे अर्थ पक्के. या जागतिक अर्थबोधाशिवाय दुसरी गरज होती ती म्हणजे इतर अनेक संदेश सार्वजनिकरीत्या स्पष्टपणे प्रसारित करणं. उदाहरणार्थ : ‘काळजीपूर्वक चाला’, ‘खड्डे आहेत’,
‘दुरुस्ती चालू आहे’, ‘रंग ओला आहे’, ‘रस्ता निसरडा आहे’, ‘क्रॉसिंग आहे’, ‘पुढे शाळा आहे’, ‘रुग्णालय आहे’,
‘ज्वालाग्राही पदार्थ आहेत’ इत्यादी. या संदेशांना ‘धोक्‍याची सूचना’ जरी म्हणता आलं नाही, तरी ‘सावधान’ करणं हा त्यांचा उद्देश होता. यासाठी सहज लक्ष वेधणारा लाल रंग वापरणं हा तर सोपा निर्णय होता; पण या सूचना शब्दांद्वारे अथवा चित्रांद्वारे देणं गरजेचं होतं. लाल रंगावर काळा रंग पुरेसा कॉन्ट्रास्ट देत नाही आणि पांढराही रंग तितकासा प्रभावी होत नाही. विशेषतः काही अंतरावरून पाहिल्यास लाल रंगावर पांढरे शब्द अथवा चित्र परिणामकारक होत नाहीत, असं जेव्हा सिद्ध झालं, तेव्हा रंगशास्त्रातल्या एका वेगळ्या तत्त्वाकडं लक्ष दिलं गेलं. 

परस्परविरोधी रंग एकमेकांसोबत वापरले, तर मानवी दृष्टीला ते सहज जाणवतात, मोठ्या कॉन्ट्रास्टवर रंगवलेल्या खुणा किंवा शब्द लांबूनही स्पष्टपणे वाचता येतात. प्रखर वेव्हलेंथ आणि परस्परविरोधी रंगांच्या मदतीनं हे संदेश दाखवायचे, तर पिवळा आणि त्यावर सर्वोत्तम कॉन्ट्रास्ट निर्माण करण्यासाठी काळा अशा दोन रंगांची निवड झाली. प्रकाश परावर्तित करणाऱ्या रंगामुळं पिवळ्या-काळ्या पाट्या बऱ्याच अंतरावरून अगदी कमी उजेडातही स्पष्ट दिसू शकतात. याच तत्त्वानुसार वाहतूकमार्गातले संदेश, क्रॉसिंगच्या पट्ट्या, रस्तेविभाजक, हाय वेवर वाहनं सरळ रेषेत जावीत म्हणून रंगवलेले पट्टे अशा अनेक सूचनांसाठी पिवळा रंग कायम झाला. लहान मुलांची ने-आण करणारी शाळेची बसही पिवळ्याच रंगाची असते. रंगांपाठोपाठ आकलन होणारी दुसरी गोष्ट म्हणजे आकार. जसजसं औद्योगिकीकरण झालं आणि जगभर यंत्रनिर्मिती सुरू झाली, तसतशी या संदेशांची आणि चिन्हांची गरज वाढत गेली. त्यामुळं रंगांसोबत काही सोपे आकारही प्रमाणित होत गेले. रंग, आकार, शब्द आणि चित्र या साधनांचा प्रमाणबद्ध वापर करून सगळे महत्त्वाचे संदेश जगात थोड्याफार फरकानं एकसारखेच दिसतात. संस्कृती, हवामान, भाषा, साक्षरता असे अनेक फरक पार करून या खुणा स्पष्ट संदेश पोचवण्याच्या कसोटीवर खऱ्या ठरतात. यात योजनाबद्ध रंगसंगतीचा आणि खुणांचा सुसंगत वापर यामुळंच यश आलेलं दिसतं.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.