अन्य ई-मेल सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत जीमेलला वेगळे काही तरी द्यायचे होते, जेणेकरून स्पर्धेत गुगलला टिकता येईल.
अन्य ई-मेल सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत जीमेलला वेगळे काही तरी द्यायचे होते, जेणेकरून स्पर्धेत गुगलला टिकता येईल. त्यातूनच गुगलप्रमाणे मेलबॉक्समध्ये आलेल्या किंवा पाठवलेल्या शेकडो ई-मेलमधून नेमका हवा असलेला ई-मेल शोधण्याची सुविधा उपलब्ध केली. त्याशिवाय इतरांच्या तुलनेत मोठ्या मेलबॉक्समुळे अनेक ई-मेल साठवण्याची क्षमता वापरकर्त्यांना मिळाली. एवढेच नव्हे, तर जीमेलवरील ई-मेलआयडीच्या मदतीने गुगलच्या सर्व सेवा विनानोंदणी आणि सहजपणे वापरता येत असल्याने वापरकर्त्यांसाठी ते अगदी सोपी गोष्ट झाली.
आपल्याला काही कागदपत्रांची नक्कल प्रत काढायची असेल, तर इंग्रजीमध्ये आपण ‘झेरॉक्स’ काढायची असं म्हणतो; ‘फोटोकॉपी’ काढायची असं म्हणत नाही. खरं म्हणजे ही कृती असते ‘फोटोकॉपी’ची; पण त्यासाठी यंत्र बनवणाऱ्या कंपनीचं नाव आहे ‘झेरॉक्स’. जवळपास त्याच धर्तीवर आपण आता ‘ई-मेल’ म्हणतो तेव्हा आपल्याला अभिप्रेत असतं ‘जीमेल’. गुगलच्या ‘जीमेल’ या ‘ई-मेल’ सुविधेनं जगभरात मिळवलेल्या लोकप्रियतेपुढे सुरुवातीला विलक्षण लोकप्रिय असलेल्या हॉटमेल, याहू मेल, एओएलची सुविधा या इतर सर्व सुविधा पार मागे पडल्या.
वापरायला अत्यंत सोपी असलेली जीमेल सुविधा सगळ्यांना १५ जीबीपर्यंत फुकट आहे. शिवाय आपल्या आधीच्या ई-मेल्समधली माहिती शोधणं, स्पॅम रोखणं, मोठ्या ॲटॅचमेंट्स सहजपणे पाठवणं, अनेक ई-मेल आयडी सहजपणे तयार करणं, गुगल ड्राइव्ह, ऑफिस यांच्यासारख्या गुगलच्या इतर सुविधा जीमेलशी संलग्न असल्यामुळे त्यांचा उपयोग करणं अशा असंख्य गोष्टी गुगलनं साधल्या. तसेच जीमेल इतर कंपन्यांच्या ई-मेल सुविधांपेक्षा तुलनेनं उशिरा आल्याचा फायदा गुगलला झाला. या कंपन्यांच्या ई-मेल सुविधांमधल्या त्रुटी ओळखून सुरुवातीपासूनच त्या जीमेलमध्ये नसतील, याची खबरदारी गुगलला घेता आली. एकूणच जीमेलचा हा प्रवास खूप रंजक आहे; म्हणून त्याचा घेतलेला हा धावता आढावा...
वयाच्या २३ व्या वर्षी पॉल बूहाईट हा गुगलमध्ये नोकरीला लागला. त्या वेळी तो चेहऱ्यावरून अगदी १४-१५ वर्षांचा वाटायचा. २००१ मध्ये बूहाईटनं गुगलसाठी एक ई-मेलची सुविधा पुरवणारं सॉफ्टवेअर लिहायचं ठरवलं. जसं हॉटमेल हे इंटरनेटवर कुणालाही ई-मेल फुकट वापरता येत होते, तसं तंत्रज्ञान आपणही तयार करावं, असं बूहाईटला वाटत होतं. खरं म्हणजे कॉलेजला असतानाच बूहाईटनं अशा प्रकारच्या एका तंत्रज्ञानावर काम सुरू केलं होतं; पण त्यानंतर त्यानं ते पूर्ण न करता अर्धवटच सोडून दिलं होतं. अर्थात त्या काळात हॉटमेल तसेच याहू मेल अशा ई-मेलची सुविधा फुकट पुरवणाऱ्यांसोबत आपला काय टिकाव लागणार, असं सुरुवातीला बूहाईटला वाटलं. त्यामुळे त्यानं या कंपन्यांच्या ई-मेल सुविधांपेक्षा आपली ई-मेल सुविधा वेगळी असली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले.
इतर कंपन्यांची ई-मेल सुविधा वापरायला फार अवघड नसली, तरी आपण कुठल्या तरी दूरवरच्या ई-मेल सर्व्हरला जोडले गेलो आहोत, अशी भावना ही ई-मेल सुविधा वापरणाऱ्या लोकांच्या मनात यायची. याचं कारण म्हणजे आपण जसं आपल्याच संगणकावर असलेलं मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल किंवा ॲडोबे ॲक्रोबॅट असं सॉफ्टवेअर वापरताना त्यात सहजता असते, तशी सहजता या ई-मेलच्या सुविधांमध्ये नसायची. आपण तयार करत असलेल्या ई-मेलमध्ये मात्र हे दोष नसले पाहिजेत. म्हणजेच आपली ई-मेलची सुविधा कुठल्या तरी लांबच्या सर्व्हरवर नसून त्यासाठीचं सॉफ्टवेअर आपल्याच संगणकावर चालतं आहे, असं लोकांना वाटलं पाहिजे; असा बूहाईटचा प्रयत्न होता.
याशिवाय इतर ई-मेलच्या सुविधांमध्ये असलेला आणखी एक दोष बूहाईटला आपल्या इमेलच्या सुविधेतून काढून टाकायचा होता. तो दोष म्हणजे ई-मेलची सुविधा वापरणाऱ्याला किती मोठा मेलबॉक्स द्यायचा या संदर्भातला होता. याहू तसंच हॉटमेल यांच्यासारख्या कंपन्या दोन-चार मेगाबाईट्स क्षमतेचे मेलबॉक्सेस लोकांना वापरू द्यायच्या; पण त्यामुळे लोकांची प्रचंड गैरसोय व्हायची. थोडेफार ईमेल्स आले, की त्यांचा मेलबॉक्स लगेच भरूनच जाई. मग जुने ई-मेल्स डिलिट करत बसायची कटकट करावी लागे. हे सगळं बूहाईटला टाळायचं होतं. गुगलनं लोकांना फुकट ई-मेलची सुविधा कशाला पुरवायची, असा प्रश्न गुगलमधल्याच काही जणांनी उपस्थित केला.
गुगलचा खरा व्यवसाय सर्च इंजिनचा असताना या नसत्या भानगडीमध्ये गुगलनं पडू नये, असं बूहाईटच्या अनेक सहकाऱ्यांनी म्हटलं; पण गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांचा मात्र बूहाईटला पाठिंबा होता. यामागे एक कारण होतं. माहितीच्या शोधासाठी जसं आपलं सर्च इंजिन लोकप्रिय झालं, तसंच ई-मेलच्या बाबतीतही आपल्याला करता येईल, असं त्यांचं मत होतं. कारण गुगलमुळे इंटरनेटवरील माहिती शोधणं खूप सोपं झालं असलं, तरी आपणच काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या ई-मेलमधून काहीतरी शोधणं किंवा इतरांकडून आलेल्या ई-मेलमधलं काहीतरी हुडकणं, हे सगळं काम म्हणजे त्या काळात एक मोठं दिव्यच असे. जुन्या ई-मेल्समधून माहिती शोधून काढायचं काम प्रचंड कटकटीचं होतं. हे सगळं बदलून गुगलनं जे सर्च इंजिनच्या बाबतीत केलं, तेच ई-मेलच्या बाबतीत करणंही शक्य आहे, असं पेज आणि ब्रिन यांचं मत होतं.
सुरुवातीपासूनच आपण तयार करत असलेल्या ई-मेलच्या सुविधेतून गुगलला उत्पन्न मिळालं पाहिजे, असा बूहाईटचा हेतू होता. त्यासाठी गुगलनं इतर ठिकाणी केलं होतं, त्याप्रमाणेच आपल्या या ई-मेलच्या सुविधेमध्येही जाहिराती पेरणं भाग होतं. आता ‘जीमेल’ असं नाव जवळपास नक्की झालेल्या या सुविधेमध्ये जाहिराती पेरण्याविषयी गुगलमध्ये वेगवेगळी मतं होती. काही जणांनी ई-मेल्समध्ये जाहिराती पेरणं, हे अत्यंत धोकादायक असल्याचं मत व्यक्त केलं. कारण अशानं जीमेलची सुविधा वापरणाऱ्या लोकांना आपले ई-मेल्स वाचून गुगल त्यानुसार जाहिरातीसुद्धा दाखवते, याची प्रचंड चीड येईल, असं मत काही जणांनी व्यक्त केलं. परंतु पेज आणि ब्रिन यांचा मात्र बूहाईटला असलेला पाठिंबा कायम राहिला.बूहाईटनं जीमेलमध्ये पुरवलेली आणखी एक महत्त्वाची सोय ‘ऑटोकम्प्लिट’ ही होती. त्याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे आपण ज्याला ई-मेल पाठवायचा असेल, त्याचं नाव टाईप करायला सुरुवात करताच आधीच्या माहितीच्या आधारे गुगल त्या माणसाचा ई-मेल आयडी आपोआपच येत असे. आता ही सोय अगदी सगळीकडे सहजपणे दिसत असली, तरी त्या काळात ती पहिल्यांदा उपलब्ध करून द्यायचं श्रेय बूहाईटला दिलं पाहिजे.
अर्थात गुगलनं लोकांची खासगी माहिती गोळा करण्याविषयीचा हा पहिलाच प्रसंग नव्हता. गुगलचं सर्च इंजिन वापरून लोक वेगवेगळ्या प्रकारची माहिती शोधायचे तेव्हा त्यातून लोकांविषयी माहितीचे प्रचंड साठे गुगलकडे तयार व्हायचे. या सगळ्या माहितीचा गैरवापर गुगल कशावरून करणार नाही, असा प्रश्न पूर्वीपासूनच टीकाकार विचारायचे. उदा. एखाद्या माणसानं ‘आजार’ अशा विषयाचा सर्च केला, तर ही माहिती त्या माणसाला आरोग्य विमा देणाऱ्या कंपनीला कळवली जाईल का? किंवा एखाद्या माणसानं ‘दिवाळखोरी’ या शब्दावर सर्च केलं तर तो माणूस खरंच दिवाळखोरीच्या मार्गावर आहे असं समजायचं का? याशिवाय एखाद्या माणसानं कोणकोणती माहिती सर्च केली, यावरून त्या माणसाचं आरोग्य, त्याची आर्थिक स्थिती, त्याच्या आवडीनिवडी, त्याचे वेगवेगळे छंद किंवा इतर उद्योग यासंबंधीची प्रचंड प्रमाणातली माहितीच गुगलकडे गोळा व्हायची. त्यामुळे त्या माणसाची एक ‘प्रोफाईल’ बनवणं गुगलला शक्य होतं. त्याचा गैरवापर करून त्या माणसाला ठराविक जाहिराती दाखवणं, त्या माणसाची खासगी माहिती इतर कंपन्यांना विकणं असल्या गोष्टी गुगल करू शकेल असं म्हटलं जायचं. त्याला आता जी-मेलमधल्या जाहिरातींनी ऊतच आला. आता परिस्थिती जरा सुधारली आहे. जगभरात अनेक ठिकाणी गुगलनं लोकांच्या खासगी माहितीवर आक्रमण केलं असल्याचे खटले दाखल होत असले, तरी निदान याविषयी जागरूकता तरी निर्माण झाली आहे.
(लेखक माहिती-तंत्रज्ञान विषयातील जाणकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.