पहिल्या स्वयंचलित शेतीचा प्रयोग

भारतातील ग्रामीण जीवन हे शहराच्या तुलनेत मातीशी अधिक नाळ जोडणारे आहे. म्हणूनच कवी आणि लेखक ज्यावेळी मातीच्या वासाबद्दल आणि शेतीच्या कामाबद्दल बोलतात.
Agriculture
AgricultureSakal
Updated on

गेल्या आठवड्यात भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिंपिकमध्ये इतिहास घडवणारे सुवर्णपदक पटकावले. चोप्राची कामगिरी संस्मरणीय ठरली. चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव झाला. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा ‘मेरे देश की धरती, सोना उगले’ हे चित्रपटगीत गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. ‘उपकार’ चित्रपटातील हे गाणे देशभक्तिपर तर आहेच, पण त्याचबरोबर त्यात शेती कामांनाही केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. चित्रपटाचा नायक मनोज कुमार हा शेतात काम करत असतानाच गीत म्हणत असल्याचे त्यात दाखविले आहे.

भारतातील ग्रामीण जीवन हे शहराच्या तुलनेत मातीशी अधिक नाळ जोडणारे आहे. म्हणूनच कवी आणि लेखक ज्यावेळी मातीच्या वासाबद्दल आणि शेतीच्या कामाबद्दल बोलतात, त्यावेळी त्याला एकप्रकारे जिवंतपणा येतो. आपल्याकडे खरोखरच शेतीवर आधारलेले पारंपरिक संगीत आणि कवितेचा समृद्ध वारसा आहे. आयटीसारख्या एखाद्या कंपनीतील नोकरी सोडून, तंत्रज्ञानापासून दूर जात शेती करण्याची उत्सुकता व्यक्त करणारेही अनेक जण आपल्याला भेटतात. कारण एखाद्या मशिनरीप्रमाणे काम करण्याची सवय अंगवळणी पाडणाऱ्या जीवनशैलीचा उबग आलेला असतो. शेती कामातून समाधान आणि आनंद मिळावा या हेतूने गावाकडे जाण्याबाबत ही मंडळी सकारात्मक दिसून येतात. यावरून शहरात राहूनही गावाकडची माती कायम आठवणीत असते.

अर्थात गावाकडे जाण्यामागे हा एक विचार असू शकतो, परंतु दुसरीकडे शेतीकामातही आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. आतापर्यंत आपल्याकडे अनुभव आणि पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर अनेक पिढ्यांनी शेतीतील कामे केली. परंतु अस्मानी संकट, बेभरवशाचे हवामान, हवामान बदलामुळे येणारा महापूर याबरोबरच किटकांचा उपद्रव आणि रोगराईमुळे पारंपरिक शेती पद्धत संकटात सापडली आहे. याचा सर्वाधिक फटका देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसतो. अल्पभूधारक, किरकोळ शेतकऱ्यांना मिळणारा फायदा मर्यादित असतो, त्यामुळेच ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाण्याची शक्यता अधिक असते.

प्रभावी डिजिटल तंत्रज्ञान

शेतीकामात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होत आहे. नव्या रोगाचा आणि किटाणूच्या हल्ल्याची पूर्वसूचना देणे, स्थानिक हवामानावर आधारित पीकस्थितीची माहिती देणे यात तंत्रज्ञानाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. नव्या तंत्रज्ञानामुळे विशेषत: डिजिटल कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे ६० ते २० टक्क्यांपर्यंत नुकसान कमी करता येते. या कारणांमुळे तंत्रज्ञान वापराला प्राधान्य दिले जात आहे. तंत्रज्ञानाने आणि स्वयंचलित उपकरणामुळे शेतीकामात सुलभता आलेली असताना मानवरहित शेतीची संकल्पना ऑस्ट्रेलियात अस्तित्वात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून जगातील पहिली स्वयंचलित शेती करण्याचा प्रयत्न हा तंत्रज्ञानाचा परमोच्च बिंदू ठरू शकतो. ऑस्ट्रेलियात वाग्गा-वाग्गा येथे स्वयंचलित शेती विकसित केली जात आहे. यासाठी चार्ल्स स्टर्ट युनिव्हर्सिटी आणि खाद्य उद्योगातील संशोधकांनी काम केले आहे.

भविष्यात मानवरहित शेतीची संकल्पना प्रत्यक्षात आणणे, हा यामागचा उद्देश आहे. १९०० हेक्टरवर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात धान, गहू, सातूची शेती आहे. याशिवाय द्राक्षाची बाग असून, पशुपालनदेखील केले आहे. या संपूर्ण क्षेत्रावर यंत्रमानवासह संपूर्णपणे स्वयंचलित मशिनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते. यात ट्रॅक्टर, हार्वेस्टर, ड्रोन, पेरणीचे उपकरण आणि रोबोटिक वाहनांची मदत घेतली जाते. या स्वयंचलित उपकरणाच्या मदतीने भू-स्थानिक मापन, रिमोट सेन्सिंग आणि सायबर सुरक्षासह अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांतील माहिती एकत्रित केली जाते. शेतकऱ्याने एका ठिकाणी बसून संगणकाच्या मदतीने शेतकी कामाचे व्यवस्थापन करणे आणि कृषी वाहनांचे संचलन करावे, अशी अपेक्षा करण्यात आली आहे. शेतीतील उपकरणे ही स्वयंचलित असून, ती कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या मशिनचा सहकार्याने कामे पार पाडतात. काही वेळा शेतकरी झोपेच्या वेळी देखील शेतातील यंत्रमानव काम करू शकतो. वास्तविक रात्रीच्या वेळी उपकरणांकडून काम करून घेणे हा प्रयोगाचाच एक भाग आहे.

स्वयंचलित शेती

सध्या विविध पातळीवर उपकरणांचा वापर केला जात असून, तीन वर्षात संपूर्ण शेती स्वयंचलित करण्याचा प्रयत्न असेल. या शेतीला ‘ग्लोबल डिजिटल फार्म’ असे नाव दिले आहे. १९०० हेक्टरवरील शेतीसाठी २० दशलक्ष डॉलर एवढा प्रचंड खर्च होत आहे. भारतीय रुपयात बोलायचे झाल्यास शंभर कोटी रुपये! मनुष्यबळाला पर्याय देण्यासाठी या प्रकल्पात खूप पैसा ओतला जात आहे. परंतु संशोधक आणि गुंतवणूकदार हे सध्याच्या काळात भासणारी मनुष्यबळाची टंचाई पाहता दीर्घ काळासाठी स्वयंचलित शेती अधिक प्रभावी आणि वाजवी राहील, असा कयास बांधत आहेत. ऑस्ट्रेलियात एका तासासाठीची मजुरी १२०० रुपये आहे. ही मजुरी भारताच्या तुलनेत खूपच अधिक आहे. दुसरीकडे जागतिक आर्थिक परिषदेने डिजिटल तंत्रज्ञानामुळे जगभरात ९७ दशलक्ष रोजगारांची निर्मिती होण्याचे भाकीत केले आहे आणि स्वयंचलित शेती हे भाकिताला पूरक ठरू शकते. त्याचवेळी सध्याच्या मनुष्यबळांना कौशल्य प्रशिक्षणाची, सुरक्षेची आणि ज्ञान देण्याची गरज आहे.

स्वयंचलित शेतीबाबत आपण भारतातील स्थितीचा धावता आढावा घेऊ. कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या आधारावर २०२१-२२ या काळात खरीप पिकांच्या उत्पादनाचे आकलन केल्यास धान, तूर, भुईमूग, कापसाचे प्रति हेक्टर परताव्याचे मूल्य हे २० हजार रुपयांपासून २६ हजार रुपयांपर्यत आहे. परंतु धानच्या तुलनेत तूर, भुईमूग आणि कापसात अधिक उत्पन्न मिळत असल्याचे चित्र आहे. जर आपण प्रत्येक हंगामातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाचा फॉर्म्युला भारताला परवडणारा नाही. तसेच भारताचा विचार केल्यास संपूर्ण स्वयंचलित उपकरणांवर आधारित शेती हा पर्याय व्यावहारिक पातळीवर टिकणारा नाही. अर्थात भारतात डिजिटल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जात असताना स्वदेशी रूपाने विकसित कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि डिजिटल माध्यम हे उपयुक्त आणि प्रभावीच नाही तर जागतिक पर्यायांच्या तुलनेत खूपच कमी खर्चिक ठरू शकते. मशिनरीबरोबरच विविध प्रकारच्या सेवा कमी खर्चात कस्टम हायरिंग सेंटरकडून उपलब्ध करून दिल्या जातात. अर्थात यापूर्वीही सेवा दिली जात होती. परंतु अजून रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर झालेला नाही. भारतात डिजिटल तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. परंतु त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे गरजेचे आहे. स्वयंचलित शेती उद्योगासाठी अजून आपण वाट पाहायला हवी आणि ऑस्ट्रेलियातील प्रयोगाचे आकलन करून घ्यायला हवे. या पद्धतीवर होणारा खर्च किती व्यवहार्य हेही तपासून पाहिले पाहिजे. तोपर्यंत सुपीक जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने निर्माण होणारा सुगंध घ्यावा. शेवटी या भावना अमूल्य आहेत.

(सदराच्या लेखिका कृषिक्षेत्राच्या अभ्यासक असून रिलायन्स फाउंडेशनमध्ये त्या काम करतात, लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)

(अनुवाद : अरविंद रेणापूरकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()