जगप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ, प्रोफेसर एम. एस. स्वामिनाथन यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. देशात आणि जगभरात कृषी आणि संशोधन कार्यात काम करणाऱ्या लोकांना स्वामिनाथन हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहेत. या व्यक्तीने जगभरातील शास्त्रज्ञ, शेतकरी नेते, जागतिक नेते, धोरणकर्ते, मुत्सद्दी लोकांना एकत्र बांधण्याचे काम केले. कृषी क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय असून प्रत्येक घटकांवर त्यांचा प्रभाव दिसतो. प्रोफेसर स्वामिनाथन यांचा येत्या ७ ऑगस्टला वाढदिवस. यानिमित्तानं त्यांच्यापासून मिळालेल्या शिकवणीवर मी प्रकाश टाकणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्याचं भाग्य मला लाभलं. या स्तंभाच्या माध्यमातून माझ्यासह त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींना मिळालेली शिकवण सर्वांपर्यंत पोचवणे हा उद्देश.
विनयशीलता
जागतिक अन्न पुरस्कार ते पद्मविभूषणपर्यंत असंख्य आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय सन्मान मिळालेल्या या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला विनयशीलतेची जोड आहे. कृषी क्षेत्रातील माहितीचे आदानप्रदान होणे ही काळाची गरज असल्याचे ते अतिशय नम्रतेने सांगतात. तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत संशोधकांनी पोहोचणे आवश्यक आहेच, त्याचबरोबर कृषी तज्ज्ञांनी देखील शेतकऱ्यांचे पारंपरिक ज्ञान जाणून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणतात. एकुणात ज्ञानाची देवाणघेवाण दोन्ही बाजूंनी व्हायला हवी, असे त्यांचे मत आहे. धोरणकर्त्यांना केलेल्या अनेक शिफारशी या शेतकऱ्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेतूनच पुढे आल्या आहेत. राष्ट्रीय कृषी आयोग, वाण संरक्षण कायदा आणि शेतकरी हक्क कायद्यामध्ये शेतकरीच केंद्रस्थानी आहे.
शिस्त
शिस्त हा त्यांचा सर्वांत प्रभावी गुण आहे. या गुणांच्या आधारे ते सतत चालणाऱ्या बैठकीच्या माध्यमातून कामाचे व्यवस्थापन आणि नियोजन करतात. बैठक असो, चर्चा असो, कोणाच्या भेटीगाठी असो, ते प्रत्येक गोष्टीचे अतिशय शिस्तबद्धरीत्या योजना आखतात आणि तडीस नेतात. एवढेच नाही तर कमी काळातही कार्यसिद्धीस नेतात. उदा. सकाळी अचानक कृषी क्षेत्रावर परिणाम करणारा एखादा मुद्दा चर्चेला आला तर ते लगेचच पुढाकार घेतात त्याबाबतचे मुद्दे स्वत: तयार करतात. एवढे करूनही त्याबाबतची बैठक अगदी ठरल्या वेळेलाच चर्चा सुरू होईल आणि तेथील तोडग्यावर लगेच कार्यवाही होते.
ऐकून घेणे
एखाद्या मुद्द्याची पार्श्वभूमी आम्हाला सांगत आणि नंतर त्यावर समोरच्याचे म्हणणे अतिशय काळजीपूर्वक ऐकत. बैठकीत, परिषदेत सामील झालेल्या प्रत्येक व्यक्तीला बोलण्यासाठी ते प्रेरित करतात. ते केवळ प्रेरित करत नाही तर वक्त्यांनी मांडलेल्या सूचनांवरही विचार करतात. आपल्या बोलण्याकडे त्यांचे लक्ष असल्याचे पाहूनही वक्ते अधिक उत्साहाने बोलायचे. शेवटी ते आपले मत मांडायचे. या विचारमंथनातून सकारात्मक सल्ला आणि विचार समोर यायचा.
स्पष्टता
प्रोफेसर स्वामिनाथन हे एखादा विषय कितीही सखोल असला तरी त्यावर एक किंवा दोन मिनिटेच आपले विचार संक्षिप्त आणि समर्पक रूपात मांडायचे. अर्थात तो विचार परिणामकारक असतो. त्यांच्या म्हणण्यात कोणतीही क्लिष्टता नाही, किचकटपणा आणि बोजडपणा नाही. आपल्या विचारातून ते नवनवीन कल्पना मांडत. बैठक संपल्यानंतर ते काही वेळातच नव्या योजनांना मूर्त रूप द्यायचे. अनेकदा प्रश्न कितीही जटिल असला तरी त्यांच्या सूचनेने आणि सल्ल्याने मार्ग निघाला आहे.
वेळेचा पुरेपूर उपयोग
प्रोफेसर स्वामिनाथन यांचा वेळ पाळण्याबाबत नेहमीच कटाक्ष असतो. त्यांच्यासमवेत कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा किंवा बैठक असो, अधिकाधिक तीस मिनिटे पुरेशी असतात. बैठक किंवा चर्चा आटोपल्यानंतर तत्काळ त्यांच्या कार्यालयातून आपल्याला ई-मेल येईल. या मेलमध्ये बैठकीचा गोषवारा असेल. अर्थात हे मुद्दे त्यांनी स्वत: तयार केलेले असतात. एखाद्या मुद्द्यावर तज्ज्ञांचे मत मागवायचे असेल तर त्याची तयारी ते अगोदर करायची. गृहपाठानंतरच ते चर्चेला बसायचे. स्वामिनाथन यांची कामाची शैली ही धोरणनिश्चितीसाठी उपयुक्त ठरली आहे.
सामंजस्य आणि दयाळूपणा
प्रोफेसर स्वामिनाथन यांचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व आणि विनम्र स्वभाव सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहे. अर्थात त्याचा प्रत्यय असंख्य मंडळींना आला असेलच. ते भेटण्यास सतत उत्साही असतात. विद्यार्थी असो किंवा केंद्रीय मंत्री असो कोणतीही आडकाठी न आणता ते बिनधास्त भेटतात. सर्वांचे म्हणणे ते खूपच नम्रतेने ऐकून घेतात. एवढेच नाही तर अनोळखी व्यक्ती असली तरी त्यांच्या मताचा ते आदर करतात आणि त्यांची गाऱ्हाणी काळजीपूर्वक ऐकतात. त्या व्यक्तीच्या मनात सार्थकतेची भावना निर्माण होते. समोरच्या व्यक्तीचे विचार ऐकून ते सल्ला देतात. अर्थात त्यांचा सल्ला मोलाचा असतोच. सल्ला देण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी प्रोफेसर स्वत: किंवा त्यांच्या संस्थेकडे उपलब्ध असलेल्या स्रोतांचा उपयोग करतात. ते कधीही चढ्या आवाजात बोलत नाहीत.
प्रतिभावंतांना प्रोत्साहन
स्वामिनाथन हे प्रत्येक व्यक्तींचे विशेष कौशल्य जाणून घेण्याबाबत उत्सुक असतात. त्याच्याशी थेटपणे संवाद साधून आपल्या आशा-अपेक्षा मांडतात. प्रत्येकांतील सर्वोत्तम गोष्ट हेरण्याचा ते प्रयत्न करतात आणि ती जगासमोर मांडतात. विशेष म्हणजे ते व्यक्तीच्या कौशल्याला एखाद्या पदाच्या निकषात बसवत नाहीत. गुणांच्या आधारे सर्वांना आपले मत मांडण्यासाठी प्रेरित करतात.
पाठबळ देणे
बहुतांश वेळी किचकट मुदद्यावरचे समाधान हे त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून आणि संवाद साधण्यातून होते. प्रोफेसर स्वामिनाथन यांनी नेहमीच कठीण मुद्दे निकाली काढले आहेत. धोरणकर्त्यांना त्यांनी समाधानकारक मार्ग दाखवला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे. एखाद्या मुद्यावरून वाद झाला असेल तर सर्वमान्य तोडगा काढण्यास ते मदत करतात. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही असतात.
थेट संवाद
प्रोफेसर स्वामिनाथन यांना बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. आपण लिहलेल्या पत्राला ते स्वत:च उत्तर देतील. मग ईमेल असो किंवा प्रत्यक्ष भेट असतो. एक सेल्फी काढण्याची मागणी असो किंवा सोशल मीडियावरचे मत असो, त्यांना लोकांशी सतत बोलायला खूप आवडते. लोकांशी अधिकाधिक संपर्क राहावा, यासाठी ते प्रयत्नशील असतात.
दूरदृष्टी
प्रोफेसर स्वामिनाथन यांचे विचार, मार्गदर्शन, सूचना यात पदोपदी दूरदृष्टी दिसून येते. याचा आपल्याला अनुभव अनेक वर्षांपासून येत आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान/आयसीटीला जोडण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा तब्बल २५ वर्षापूर्वींचा आहे. आजच्या काळात शेतकऱ्यांकडे तंत्रज्ञानाची असलेली उपलब्धता हे स्वामिनाथन यांच्या दूरदृष्टीचे फळ आहे. शेतकरी आता दळणवळण आणि तंत्रज्ञानाच्या बळावर खूप पुढे गेले असून आणि त्याचा लाभही मिळत आहेत. त्यांना आता मागे पाहण्याची गरज नाही.
प्रोफेसर स्वामिनाथन हे नेहमीच संशोधकांना, विद्यार्थ्यांना, राज्यकर्त्यांना आणि शेतकरी समुदायास प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व राहिले आहे. कृषी क्षेत्रांवर ते प्रचंड काम करतात आणि यासंदर्भात सतत पत्रव्यवहार, संवाद करत असतात. त्यांचे विचार आणि मौलिक सल्ले हे त्यांच्या सहवासात, संपर्कात आलेल्या अनेक पिढ्यांतील व्यक्तींना प्रेरणादायी ठरत आहेत. स्वामिनाथन यांनी स्थापन केलेल्या संशोधन संस्थेच्या एका उपक्रमात सहभागी असताना माझा त्यांच्याशी संवाद झाला. माझी माध्यम संचार, दळणवळण आणि विकास क्षेत्राची पाश्र्वभूमी असताना प्रोफेसर स्वामिनाथन यांच्याकडून मला कृषी क्षेत्राबद्दलच्या संकल्पना, योजनांचे शिक्षण मिळाले. ते शिक्षण अमूल्य होते. हा माझ्यासाठी एकप्रकारचा सन्मानच होता. आपल्या काळातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीकडून शिक्षण मिळणे हे भाग्यच. साधी व्यक्ती म्हणून वावरणारे प्रोफेसर स्वामिनाथन हे सर्व पिढ्यांना प्रेरणादायी आहेत.
(सदराच्या लेखिका कृषिक्षेत्राच्या अभ्यासक आणि रिलायन्स फाउंडेशनमध्ये काम करतात. लेखातली त्यांची मते वैयक्तिक आहेत.)
(अनुवाद : अरविंद रेणापूरकर )
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.