देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे...

पंच्याहत्तर वर्षांपूर्वी ‘महारोगी सेवा समिती’ स्थापन करताना बाबा आमटे यांना समाज- बहिष्कृत कुष्ठरुग्णांच्या शरीराच्या महारोगापेक्षाही मोठं आव्हान वाटत होतं, ते तथाकथित निरोगी समाजाच्या मनाच्या महारोगाचं.
Baba Amte
Baba Amtesakal
Updated on

पंच्याहत्तर वर्षांपूर्वी ‘महारोगी सेवा समिती’ स्थापन करताना बाबा आमटे यांना समाज- बहिष्कृत कुष्ठरुग्णांच्या शरीराच्या महारोगापेक्षाही मोठं आव्हान वाटत होतं, ते तथाकथित निरोगी समाजाच्या मनाच्या महारोगाचं. या मानसिक महारोगाचं सर्वात मुख्य लक्षण म्हणजे माणुसकी हरवणं. निदान युवकांनी तरी या मानसिक महाव्याधीपासून मुक्त असावं, अशी बाबांची तळमळ होती.

युवकांनी आत्मकेंद्री, वैफल्यग्रस्त, निष्क्रिय, आळशी, व्यसनासक्त, हिंसक, असंवेदनशील आणि श्रम-निंदक होण्यापासून परावृत्त व्हावं; त्यांनी आपले हात उगारण्यासाठी नव्हे, तर उभारण्यासाठी वापरावेत; श्रमाची श्रीमंती त्यांनी अनुभवावी, यासाठी बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ प्रकल्पात १९६७ पासून ‘श्रमसंस्कार छावणी’ आयोजित करण्यास सुरुवात केली.

तीही दर वर्षी १५ ते २२ मे दरम्यान - म्हणजे विदर्भाच्या दाहक उन्हाळ्यात. खडतर आव्हानं स्वीकारण्याची युवकांची तयारी तप्त उन्हं अंगावर घेण्यापासूनच सुरू व्हावी हा हेतू या वेळापत्रकामागं असावा. यंदाच्या सोमनाथ श्रमसंस्कार छावणीचं वैशिष्ट्य आणि नावीन्य म्हणजे या छावणीनं शिबिरार्थींवर श्रमाबरोबरच सृजनाचेही संस्कार केलं.

‘दान नादान बनवते आणि काम घडवते’ या बाबांच्या विचारानुसार कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान आणि स्वावलंबन यांची कवचकुंडलं मिळावीत, यासाठी आनंदवनात तब्बल १४० प्रकारचे कुटिरोद्योग विकसित झाले आहेत. त्यापैकी नमुन्यादाखल सात कुटिरोद्योगांचा सृजनानुभव शिबिरार्थींना २०२४ च्या सोमनाथ श्रमसंस्कार छावणीनं दिला. सतरंजी निर्मिती, मातीकाम, काष्ठशिल्पकला, लोहकला, केळीच्या पानांवरील कारागिरी, पर्यावरणस्नेही विटांची निर्मिती आणि बीज-जतन-संवर्धन.

सुमारे अडीचशे शिबिरार्थींना A to G अशा सात गटांत विभागण्यात आले होते. प्रत्येक गट रोज एकेक कुटिरोद्योग शिकत होता.

सतरंजीनिर्मिती : सतरंजी किंवा दरी बनवताना कामाच्या किती पायऱ्या ओलांडाव्या लागतात हे आम्ही शिकलो. बारीक आणि जाड दोरे, त्यांची चरख्यासारख्या यंत्रावर होणारी प्राथमिक गुंडाळी, ती करताना गुंता होऊ न देण्यासाठी करावी लागणारी मेहनत, मग अनेक दोऱ्यांची बॉबिन नावाच्या कांडीवर आठाच्या आकड्यासारखे वेढे घालत करण्याची मिश्र गुंडाळी, आणि शेवटी मापट्या आणि पंजा यांच्या जुगलबंदीतून जादूसारखी इंच इंच बनत अविरत पुढे पुढे जाणारी सतरंजी उर्फ दरी!

हे सारे करताना माझ्यासारख्या ‘श्रम-गरीब’ शहरी माणसाला होणारी हात दुखणे, बोटे काचणे, पाठीला उसण भरणे यांसारखी दु:खे (ऊर्फ नखरे) त्या दरीकडे बघताना विरत होती. जणू इंडिया आणि भारत यांतील दरी बुजवण्याचेच काम ती सुंदर दरी करत होती. सतरंजीनिर्मितीच्या कुटिरात हातमागही होता.

हातमाग या साधनाच्या नावात जरी फक्त हात असला, तरी हे साधन वापरताना हाताइतकाच, किंबहुना अधिकच पायाचाही वापर करावा लागतो, याचा माग आम्हाला याच कुटिरात लागला. एक मात्र नक्की- हातमाग काय किंवा मापट्या-पंजा जुगलबंदीचे यंत्र काय, यात दोऱ्यांवर भूमितीची नेमकी कोणती जादू होऊन सतरंजी तयार होत जाते, हे कोडे उलगडायला मला पुढचा जन्म घ्यावा लागेल!

मातीकाम : या कुटिरात गर गर फिरणाऱ्या चाकावर मातीच्या गोळ्यात आकार आणि त्याहूनही अवघड म्हणजे पोकळी भरताना माझ्यासारख्या अनेकांची भंबेरी उडत होती. याच कुटिरात मला ग. दि. माडगूळकर यांच्या या ओळी आठवल्या – ‘कुंभारासारखा गुरू नाही रे जगात- वरि घालितो धपाटा, आत आधाराला हात!’ मऊसूत मातीचा स्पर्श अनेक शहरी शिबिरार्थींना कित्येक वर्षांनी लाभत होता. तो तारक स्पर्श अनुभवताना मला माझ्या दिवंगत आईच्या हातांचा एहसास होत होता!

काष्ठशिल्पकला : येथे दोन प्रकारची काष्ठशिल्पे दिसत होती. एक ओळखू येणाऱ्या (प्राणी, पक्षी, मूर्ती वगैरेंच्या) आकारांची आणि दुसरी अनोळखी (abstract), पण नैसर्गिक सौंदर्य दाखवणारी. ‘लाकडांवर आपल्या मनातील कल्पना लादू नका, त्यांना त्यांच्या नैसर्गिक आकारातच खुलू द्या, तसे खुलण्यासाठी त्यांना फक्त थोड्या प्रोत्साहनासारखी treatment द्या’ हे काष्ठशिल्पकलेविषयीचे डॉ.विकास आमटे यांचे तत्त्वज्ञान या नैसर्गिक शिल्पांतून व्यक्त होत होते. विशेष म्हणजे हे तत्त्वज्ञान विकासभाऊंनी माणसे घडवतानासुद्धा आचरले आहे!

लोहकला : वेल्डिंगचे काम समोरून बघताना ते किती अवघड आहे, याकडं आपण शब्दश: डोळेझाक करत असतो. त्यामुळं ते आपल्याला सोपं वाटतं. पण प्रत्यक्ष ते करताना दोन लोखंडी सळया ज्या बिंदूंवर एकमेकांना चिकटवणं अपेक्षित असतं, ते सोडून वेल्डिंग रॉड इतरत्रच चिकटत राहतो आणि आपली (म्हणजे निदान माझी तरी) फटफजिती करतो. अर्थात वेल्डिंग ही लोहकलेच्या कुटिरातील शेवटची पायरी.

त्याआधी दोऱ्याने माप घेऊन योग्य लांबीच्या सळया छिन्नी हातोडीने किंवा यंत्रावर तोडून घेणे, त्यांना शोभिवंत वस्तू बनवण्यासाठी योग्य वळणात वाकवणे, वाकवताना सळईचे वेगवेगळे भाग असमान प्रतलांत जाऊ न देणे, अशा अनेक कसोट्या असतात. हे सगळे करून शेवटी एकदाची वस्तू बनवणे हे तीन पक्षांचे सरकार बनवण्यापेक्षाही अधिक कठीण. पण ‘आनंदवन’चे श्रमवीर हे लीलया करून दाखवत, शिकवत होते.

केळीच्या पानांवरील कारागिरी : ‘केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी, कोमेजली कवळी पानं असुनी निगराणी’ या जुन्या गाण्यापलीकडे केळीच्या सुकलेल्या पानांचा काही उपयोग असू शकतो, हे मला माहीत नव्हते. पण केळीच्या पानांवरील कारागिरीच्या कुटिरात मला हा उपयोग कळला. ‘टाकाऊ ते टिकाऊ आणि (चांगल्या अर्थाने)दिखाऊ’ असा कायाकल्प करणारी कारागिरी येथे शिकवली जात होती.

केळीचे सुकलेले पान तासून, पातळ करून, त्यावर चित्र काढून, ते चित्र त्याच्या सीमेवर (outline वर) नेमके कापून, कागदावर चिकटवून टिकाऊ, दिखाऊ आणि विकाऊसुद्धा कलाकृती तयार करता येतात याचा शोध मला या कुटिरात लागला. या कुटिराच्या भिंतीवर लावलेली स्वामी विवेकानंद आणि बाबा आमटे यांची केळीच्या सालींपासून बनवलेली व्यक्तिचित्रे अगदी फोटोएवढी हुबेहूब होती!

पर्यावरणस्नेही विटांची निर्मिती : भट्टीची आग न पेटवता, प्रदूषण न करता आणि बहुतांश स्थानिक कच्चा माल वापरून कमी खर्चाच्या, पण उच्च दर्जाच्या पर्यावरणस्नेही विटा एका कुटिरात बनवल्या जात होत्या. अर्धा वाटा fly ash, एक वाटा सिमेंट, एक वाटा वाळू आणि आठ वाटे वाळू-युक्त माती यांच्या अर्ध-ओल्या मिश्रणाला एका यंत्रात दाबून ही वीट बनवली जाते. शिवाय त्यात प्लास्टिकच्या अविनाशी भस्मासुराचे तुकडेही टाकता येतात.

यंत्राची मोठी कळ जोर लावून खाली दाबताच ही वीट चॉकलेटच्या वडीसारखी बनून वर येऊन यंत्राबाहेर डोकावते. ही ताजी खमंग वीट बनून अशी अलगद वर आलेली बघण्याचा आनंद अवीट गोडीचा असतो. पण तो मिळवण्यासाठी यंत्राच्या कळीवर प्रचंड ताकदीने दाब द्यावा लागतो. अगदी मोजके बळकट स्नायूंचे शिबिरार्थीच एवढी ताकद लावू शकत होते.

(माझ्यासारखी तर आठ आठ माणसे त्या कळीवर लटकली, तरच कदाचित ती कळ दाबली जाईल हे मी वेळीच ओळखले !) विटा तयार करून, वाळवून, नंतर त्यांच्या भिंती बनवण्याचा आनंदही शिबिरार्थींनी घेतला. अशारीतीने भिंती उभ्या राहीपर्यंत शिबिरार्थींमधील आपापसातील कृत्रिम भेदांच्या भिंती आपोआपच नष्ट झाल्या होत्या!

बीज-जतन-संवर्धन : या विभागाच्या रोपवाटिकेत प्रत्यक्ष रोप उगवण्यापूर्वी काय काय करावे लागते हे आम्ही शिकलो. दूरवरची माती फावड्याने उकरणे, घमेल्यांत भरणे, ‘साथी हाथ बढाना’ म्हणत मानवी साखळी करून ती माती बागेत आणणे, बियांची बाह्य आवरणे काढणे, आतील आवरणाला छिद्र पाडणे आणि मग त्या बिया मातीत पेरणे. ‘नर्सरी विभाग’ या पाटीची अक्षरेसुद्धा या प्रदेशाचे जैववैविध्य दर्शवणाऱ्या अनेकविध बियांपासून बनवली होती.

हा विभाग सांभाळणाऱ्या स्वयंसेविकांचे पर्यावरणशास्त्राचे ज्ञान थक्क करणारे आहे. ते पुस्तकी नसून, मातीतून वर येणाऱ्या रोपट्यासारखे आहे. धानाच्या (म्हणजे भाताच्या) तब्बल ६५ देशी प्रजातींच्या बीजांचे जतन आणि संवर्धन या विभागात करण्यात आले आहे. त्यासाठी संस्थेने सहा एकर जमीन राखून ठेवली आहेच; पण त्याशिवाय आसपासच्या शेतकऱ्यांना त्यांची पेरणी करून बघण्याची विनंतीसुद्धा केली जाते.

शेतकरी मेळावेही होतात. प्रत्येक प्रजातीच्या तांदुळाच्या वाढीचा वेग, एकेका लोंबीतील दाण्यांची संख्या आणि आकार, अतिवृष्टी आणि कीड यांसारख्या संकटांना तोंड देऊन टिकून राहण्याची क्षमता, तांदुळाची चव, त्याची भात/पोहे/खीर वगैरे विभिन्न पदार्थांसाठीची उपयुक्तता आणि त्याचे पोषण मूल्य यांचा तौलनिक अभ्यास केला जातो. देशी वाणांच्या जतनाचे असे प्रयोग जर झाले नाहीत, तर ते लुप्त होतील.

आजवर भारतातील अक्षरशः (किंवा अंकश:) हजारो देशी वाण नष्ट झाले आहेत. जसे प्राणी किंवा पक्षी extinct होतात ना, अगदी तसेच. पण सोमनाथ प्रकल्पातील बीज-जतनाच्या यशस्वी प्रयोगामुळे धानाचे ६५ वाण नामशेष होण्यापासून वाचले आहेत. धानाप्रमाणेच इतरही काही धान्यांचे (उदा. Millets चे ) जतन-संवर्धन येथे केले जाते. तरुण कार्यकर्त्यांची एक नवी कोरी फळी बीज-जतनाचे आणि वृक्ष-संवर्धनाचे काम येथे करत आहे.

या तरुणांचा पाणीदार आशावाद आणि सहृदय सकारात्मकता यांच्या खत-पाण्यावर हा प्रकल्प बहरत आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांमुळे धान्याचे देशी वाण अमर झाले आहेत. केवळ धान्याचे वाणच नव्हेत, तर माती आणि माणसाच्या सेवेचे जे वाण बाबा आमटे यांनी या कार्यकर्त्यांना दिले आहे, ते वाणही अमर झाले आहे.

अडीचशेपैकी सुमारे साठ शिबिरार्थी (आणि काही प्रशिक्षकही) मूकबधिर होते. खरं म्हणजे यांना ‘विशेष बोलके’ म्हणायला हवं इतकं त्यांचे चेहरे भावदर्शी होते. कर्णबधिरांच्या सांकेतिक खुणांच्या भाषेत निरक्षर असलेल्या माझ्यासारख्या ‘बोलघेवड्या’ शिबिरार्थींना ती भाषा शिकवण्याची या कर्णबधिरांची तळमळ; सांकेतिक भाषेतला एखादाच शब्द जरी आम्हा बोलघेवड्यांना समजला, तरी त्यांना होणारा निर्मळ आनंद; प्रत्येक कुटिरोद्योग शिकण्यातली त्यांची एकाग्रता, चिकाटी आणि हातोटी हे सारे काही विस्मयकारक होते. त्यांची निरीक्षणशक्ती, आणि त्यांच्या करकमलांच्या कलात्मक हालचालींची नजाकत पाहून असे वाटत होते की, आम्ही बोलघेवडे जर स्वत:ला नॉर्मल म्हणवून घेत असू; तर या कर्णबधिर मित्रांना सुपर नॉर्मल म्हटले पाहिजे!

विशेष किंवा दिव्यांग विद्यार्थी आणि सर्वसाधारण विद्यार्थी यांचे शिक्षण एकात्म पद्धतीनं व्हावं, असं शैक्षणिक धोरणाचं मार्गदर्शक तत्त्व. पण हे तत्त्वही बहुतेक वेळा अडगळीत टाकले जातं. मात्र २०२४ च्या श्रमसंस्कार छावणीतील एकात्मिक शिक्षणाचा अनुभव हा एक सन्माननीय अपवाद होता.

माझ्यासारख्या बोलघेवड्या आणि तथाकथित नॉर्मल शिबिरार्थींना या छावणीनं एक नवी दृष्टी दिली. आपल्या परिसरातील दिव्यांग व्यक्तींकडं दुर्लक्ष न करता किंवा त्यांच्याकडं त्यांना कळत- नकळत हिणवणाऱ्या दयेनं न बघता कुतूहलानं, मैत्रभावानं आणि आदरानं बघण्याची सजग दृष्टी!

कुटिरोद्योग शिकवणारे काही गुरु

कुष्ठमुक्त, तर काही दिव्यांग होते. ते सर्व जण कमालीच्या संयमानं माझ्या सारख्या ‘ढ’ विद्यार्थ्यांनासुद्धा शिकवत होते. घाई नाही, चिडचीड नाही, आदळआपट नाही, तोंडावर अनावश्यक बडबडीचा फेस नाही की आपण काही विशेष करत आहोत याचा अभिनिवेश नाही! आत्मविश्वास आणि अदबशीरपणा यांचा सुंदर मेळ त्यांच्या शिकवण्यात होता.

प्रत्येक वस्तू बनवताना सृजनाचा, नव-निर्मितीचा निर्व्याज आनंद तर शिबिरार्थींना मिळत होताच, पण एक एक वस्तू बनवण्यासाठी श्रमिकांना किती कष्ट पडतात, केवढी एकाग्रता, चिकाटी राखावी लागते याची जाणीवही होत होती. या छावणीनंतर आम्ही शिबिरार्थी कोणतीही वस्तू जेव्हा हाती घेऊ, तेव्हा ती वस्तू बनवण्यासाठी कामी आलेला कच्चा माल, आयुधे-यंत्रे आणि मुख्य म्हणजे राबणारे श्रमिकांचे हात आणि चालणारी डोकी या सगळयांविषयीचा आदर आमच्या मनात असेल, हे नक्की!

महारोगी सेवा समितीच्या परंपरेनुसार छावणीची व्यवस्था चोख होती. तीन महिने तिची तयारी चालली होती. एवढे विभाग आयुधांसहित उचलून आनंदवनातून सोमनाथला आणणे हे सोपे काम नव्हते. पण ते महारोगी सेवा समितीने घडवून आणले.

अवघ्या एक हजार रुपयांत आठवडाभर राहणे, भोजन, चहा, नाष्ट्याची सोय, दूरच्या रोपवाटिकेत घेऊन जाण्यासाठी मिनिबस, चांगला संदेश देणारा टी शर्ट, बहुविध कौशल्यप्रशिक्षण, बाबा आमटे यांच्या १९८५-८६ मधील पहिल्या ‘भारत जोडो’ अभियानावरील सिद्धार्थ काकदिग्दर्शित आणि फारुख शेखकथित लघुपट, व्याख्याने, खेळ, सामूहिक गाणी, गटवार विविध गुणदर्शन आणि अभिप्रायकथन, रक्तदान शिबिर, स्वरानंदवन वाद्यवृंदाची सुरेल आणि सुरेख मैफिल आणि वृक्षदिंडी एवढा संपन्न अनुभव या छावणीने शिबिरार्थींना दिला.

एकमेकांचे घट्ट मित्र बनलेले शिबिरार्थी मे च्या २२ तारखेला भरल्या डोळ्यांनी (किंवा बाबा आमटे यांच्या शब्दांत सांगायचं तर ‘with tear-washed eyes’) एकमेकांचा निरोप घेत आपापल्या गावी परतले. या छावणीत रोपवाटिका विभागाने वनस्पतींच्या बीजप्रसाराच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या, त्याप्रमाणे आपापल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा पद्धतीने जर त्यांनी आपापल्या परिसरात आनंदवनाच्या विचारांची आणि मुख्य म्हणजे आचारांची बीजे प्रसारित केली, तर सोमनाथच्या या ‘सृजन आणि सुजन संस्कार’ छावणीचा हेतू खऱ्या अर्थाने साध्य होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()