मिस्टर इंडिया चित्रपटात ‘मोगॅम्बो’ ही व्यक्तिरेखा अशा प्रकारे गुंफून टाकली होती, की खलनायकाची ती ओळखच झाली.
- बालाजी विट्टल
मिस्टर इंडिया चित्रपटात ‘मोगॅम्बो’ ही व्यक्तिरेखा अशा प्रकारे गुंफून टाकली होती, की खलनायकाची ती ओळखच झाली. लहान मुलं जेव्हा त्या खलनायकाकडे स्वाक्षरी मागत तेव्हा या व्यक्तिरेखेच्या गाजलेल्या संवादाचाही आग्रह करत. तो उच्चारतानाही ‘खुश’ होणारा मोगॅम्बो अर्थात अमरिश पुरी... हिंदी चित्रपटसृष्टीत अमरिश पुरी यांनी आपल्या अभिनयाने अनेक खलनायक अजरामर केलेत, त्याचा स्मृतिदिन अलीकडेच १२ जानेवारीला होता. त्यानिमित्त या कलावंतांचे स्मरण...
मिस्टर इंडियातील ‘मोगॅम्बो’ कल्पना करता येतील अशा सर्व दुष्ट शक्तींचे एकत्रीकरण होते. यात ड्रग पेडलिंग, बनावट औषधांचे वितरण, अन्नातील भेसळ, चोरीच्या वस्तूंची तस्करी, खंडणी, गुंडगिरी, शस्त्रास्त्रांचा पुरवठा, दहशतवादी कारवाया अशा सर्व गोष्टींचा समावेश होता. तो बढाईखोर होता, स्वतःचा उल्लेख त्रयस्थ व्यक्तीसारखा करायचा, जसे काही त्याच्यात दोन व्यक्ती होत्या. ही भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने काळ्या आणि गुलाबी रंगाची वेशभूषा केली होती आणि त्याच्या जोडीला काळा आणि सोनेरी पिवळा रंग होता. काळा रंग त्याच्या अंगभूत नकारात्मकतेचे आणि पिवळा, गुलाबी भपकेदार रंग त्याच्यातील विक्षिप्तपणाचे प्रतीक होता.
त्यानंतर हे वस्त्र सोनेरी भरतकामाने अलंकृत केले होते. म्हणजे त्याच्यातील वाईटपणाची भव्यता आणि वास्तविकता दिसून येईल. या सर्व पेहरावासह या पात्राने ड्यूकसारखी पांढऱ्या केसांची विग घातली होती. त्याचे कारण असे, की हे पात्र विदेशी वंशाचे होते. लेखक जावेद अख्तर यांनी ती प्रसिद्ध पंचलाईन यात अशाप्रकारे गुंफून टाकली होती, की खलनायकाने ती ओळ उच्चारताच त्याच्यातील खलनायकत्व थोडेसे फिके पडत असे आणि प्रेक्षकांमध्ये हशा पिकत असे. लहान मुलंही या ओळीवर खुश होत असत. मुलं जेव्हा त्याची स्वाक्षरी मागत तेव्हा ‘मोगॅम्बो’च्या संवादाचा आग्रह करत. तो उच्चारताना ‘खुश’ होणारा खलनायक अर्थात अमरिश पुरी... हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने त्यांनी अनेक खलनायक अजरामर केले आहेत. अशा व्यक्तिरेखा अजरामर करण्यापर्यंतचा प्रवास मात्र खडतर होता.
कलेची ओढ
ही १९८७ ची गोष्टी आहे, पण मोगॅम्बोपर्यंत पोहोचण्याआधी अमरिश पुरींनी अनेक दशकांचा खूप दूरचा प्रवास केला होता. अमरिश पुरींचा जन्म जून १९३२ मध्ये पंजाबच्या जलंधर जिल्ह्यातील नौशहर येथे झाला. त्यांचे कुटुंब सिनेमाला सर्वांत जास्त वाईट गोष्टींपैकी एक समजत असत, पण नियती ही नियती असते. होशियारपूरमधील डीएव्ही कॉलेजात असताना तरुण अमरिश त्याच्या वसतिगृहाबाहेर बसून रात्रीच्या वेळेला बासरी वाजवत असे.
डीएव्ही कॉलेजच्या सहृदयी प्राचार्यांनी हे पाहिले आणि अमरिश कॉलेजच्या मनोरंजन गटाचा सदस्य बनला. यामुळे कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण करण्याची त्याला संधी मिळाली. हा मुलगा चांगली रेखाटने काढायचा, फोटोग्राफी छान करायचा आणि दिलीप कुमारसारख्या अभिनेत्याची नक्कलही करायचा. ही तर सुरुवात होती. परिस्थितीने त्याला शिमल्याला नेले आणि तिथे त्याने बीएम कॉलेजात प्रवेश घेतला. त्या ठिकाणी अॅथलेटिक्स आणि ट्रेकिंगमध्ये सहभागी झाल्याने त्याच्या उंचीला साजेसे शरीरसौष्ठव तो कमावू शकला. या साऱ्यात त्याच्या खर्जातल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
अशातच तो हौशी कलाकार संघटनेत सामील झाला. जिथे त्याने गेयटी थिएटर आणि काली बारी हॉलमध्ये सादर झालेल्या नाटकांत सहभाग घेतला. येथे त्याच्या गुणांमुळे तो लक्ष वेधून घेऊन लागला. एका शोमध्ये त्याचे वडील गुपचूप प्रेक्षकांमध्ये येऊन बसले. आता आपली चांगली खरडपट्टी होणार या अपेक्षेनेच अमरिश घरी गेला, पण अगदी अनपेक्षितपणे त्याच्या आईने त्याचे स्वागत केले आणि वडिलांना त्याचे सादरीकरण आवडले हे सांगितले. बाऊजी सिनेमाच्या विरोधात आहेत, पण त्यांना नाटक करण्यात काहीच अडचण नाही, हे या १९ वर्षांच्या या तरुणाला समजले. त्यानंतर १९५३ मध्ये तो मुंबईला जाणार होता. अमरिशचा भाऊ मदन पुरी हे स्वतः एक प्रस्थापित अभिनेते होते. त्यांनी अमरिशची ओळख करून देऊनही एकाही निर्मात्याने त्याला सिनेमासाठी ऑफर दिली नाही.
आकाशवाणी व थिएटरची साथ
अमरिश पुरी यांचा दैवी देणगी म्हणून लाभलेला आवाज या सर्व नकारांच्या लाटांमध्ये जीवनरक्षक ठरला. ऑल इंडिया रेडिओ, मुंबई येथील मुलाखतीत ते पास झाले आणि रेडिओ स्पॉट्स, नभोनाट्य आणि व्यावसायिक स्पॉट्ससाठी काम करायला सुरुवात केली. स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (ईएसआयसी) नोकरीमधून मिळणाऱ्या अत्यल्प वेतनाशिवाय आकाशवाणीतील कामामुळे त्यांचा आवाज श्रोत्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. दूरदर्शनपूर्व काळात आकाशवाणी हे मनोरंजनाचे एकमेव साधन होते. अमरिश पुरी आकाशवाणीवरील ‘हवा महल’ या लोकप्रिय कार्यक्रमात कार्यरत होते, पण काही निवडक भूमिका सोडल्या (ज्या त्यांनी भावाच्या सांगण्यावरून नाकारल्या होत्या) तर त्यांना सिनेमात एकही महत्त्वाची भूमिका ऑफर झाली नव्हती. वर्षे सरली. १९६१ उजाडले, तेव्हा अमरिशने तिशी ओलांडली होती.
पुन्हा एकदा नाटकच त्यांच्या मदतीला आले. ऑक्टोबर १९६१ मध्ये अमरिश यांची ओळख त्यांच्या एका मित्राने अब्राहम अल्काझी यांच्याशी करून दिली. त्यानंतर लगेच अर्थर मिलर यांचे नाटक ‘अ व्ह्यू फ्रॉम द ब्रिज’मधील एडी कार्बोन या मुख्य पात्रासाठी त्यांची निवड झाली. त्यानंतर अमरिश पुरी पंडित सत्यदेव दुबेंच्या संपर्कात आले. त्यांच्या ‘बिच्छू’ (मोलिएरचे स्कॉर्पियन या नाटकाचे हिंदी रूपांतर) या नाटकात त्यांनी नवाबाच्या घरातील नोकराची भूमिका केली. या दोन नाटकांतील त्यांच्या भूमिकांमुळे अल्काझींच्या नाट्यअकादमीत पदविकेसाठी उत्कृष्ट विद्यार्थी हा किताब मिळाला.
पुढे अमरिश पुरींनी सत्यदेव दुबेंच्याच दिग्दर्शनाखाली ‘अंधा युग’ या नाटकात राजा धृतराष्ट्राची भूमिका केली. सतरा मिनिटांच्या एका दृश्यात अमरिशना अंध राजाची भूमिका निभवायची होती, ज्यात त्यांना डोळ्यांची उघडझाप बिलकुलच करायची नव्हती. सभोवती वारे आणि डास असतानासुद्धा ते त्यांनी केले. हाच अनुभव त्यांना काही वर्षांनंतर ‘कुर्बानी’ (१९८०) मध्ये कामी आला. यात त्यांना फिशटँकमध्ये फेकलेल्या मृतदेहाची भूमिका करायची होती. ‘अंधा युग’ला मोठे यश मिळाले. त्यानंतर ययाती, हयवदन (दोन्ही गिरीश कर्नाड लिखित), सखाराम बाईंडर, चूप कोर्ट चालू है! आणि आधे अधुरे या नाटकांनाही प्रचंड यश मिळाले. आधे अधुरेमध्ये त्यांनी चार वेगवेगळी पात्रे साकारली. याचे चार हजार प्रयोग झाले.
रुपेरी पडद्यावर
एमजीएम निर्मित अमेरिकन टीव्ही सीरियल ‘माया अॅडव्हेंचर्स’मध्ये १९६७ मध्ये अमरिश पुरी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर दिसले. १२ दिवसांच्या चित्रीकरणासाठी त्यांना २४०० रुपये मिळाले. दुसरी भूमिका त्यांना देव आनंद यांच्या ‘प्रेम पुजारी’ (१९७०) या सिनेमात मिळाली. या भूमिकेच्या निरर्थकतेमुळे त्यांना याचा पश्चात्ताप झाला. तसेच चित्रीकरणासाठी लंडनला नेण्याचे वचन देऊनही ते पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे अपमानास्पद वागणुकीलाही सामोरे जावे लागले. रेश्मा और शेरा (१९७१) या चित्रपटातील रेहमत खानची भूमिका ही त्यांच्यासाठी सिनेमातील पहिलीच महत्त्वाची संधी होती, पण दिग्दर्शक सुखदेव आणि निर्माता सुनील दत्त यांच्यातील वादामुळे ते बाजूला फेकले गेले.
सुनील दत्त यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी पुरी यांचे अनेक प्रसंग कापले. नशीब त्यांच्या बाजूने नव्हते. त्यानंतर सुखदेव दिग्दर्शित खिलौनेवाला (१९७०) या १८ मिनिटांच्या शॉर्टफिल्ममध्ये अमरिश पुरींनी चार नकारात्मक पात्रे साकारली. त्यानंतर फ्रेंच दिग्दर्शक फ्रान्कोईस व्हिलर्स यांची ‘महाराज रणजीत सिंह’ ही टेलिफिल्म आली. १९७० च्या सुमारास जयपूर येथे याचे चित्रीकरण झाले. त्यानंतर लवकरच संजय खान आणि बबिता अभिनित ‘सोने के हाथ’ या चित्रपटात अमरिश यांनी खलनायक साकारला. तोपर्यंत ते कधीच मुख्य भूमिका साकारू शकणार नाहीत असा पक्का समज निर्माण झाला होता, पण सोने के हाथ आला तसा गेला. शांतता कोर्ट चालू आहे या नाटकाचे रूपांतर करून सत्यदेव दुबेंनी १९७१ मध्ये मराठी चित्रपट बनवला. या चित्रपटाला समीक्षकांचे कौतुक मिळाले, पण यामुळे पुरींच्या सिनेमातील करिअरला काहीच मदत झाली नाही. एवढेच नाही, तर ओ. पी. रल्हान (हलचल- १९७१) आणि चेतन आनंद (हिंदुस्तान की कसम- १९७३) यांच्या चित्रपटांतूनही अमरिश पुरींच्या भूमिका लक्षात राहिल्या नाहीत. केवळ आयएमडीबीच्या यादीत भर टाकण्यासाठीच त्यांचा उपयोग झाला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पुन्हा थिएटरकडे वळवला.
यशाला गवसणी
त्यांच्या थिएटरशी असणाऱ्या संबंधांमुळेच त्यांना सिनेमातील पहिला आशेचा किरण सापडला. नाटककार गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कादू’ (१९७४) या चित्रपटात त्यांनी गावातील खल प्रवृत्तीचा म्होरक्या चंद्रगौडा याची भूमिका साकारली. कादू हा सिनेमा सिल्व्हर पिकॉक जिंकत मैलाचा दगड ठरला. कानडी भाषा येत नसूनही अमरिश पुरी त्या भूमिकेसाठीच जन्माला आले होते, असे वाटत होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर कादू हे माझी सामाजिक परिस्थिती, माझे करिअर आणि माझे जीवन बदलण्याचे कारण ठरले. चंद्रगौडाचे ‘निशांत’मधील (१९७५) जमीनदाराशी बरेच साम्य होते. म्हणूनच श्याम बेनेगल यांनी पुरींना त्या भूमिकेसाठी निवडले असावे. यानंतर मंथन (१९७६) आणि भूमिका (१९७७) या चित्रपटांनाही चांगले यश मिळाले. त्यानंतर अमरिश पुरी गोविंद निहलानी यांच्या आक्रोशमध्येही (१९८०) होते. आतापर्यंत अमरिश पुरींनी सिनेमात एका खेड्यातला किंवा छोट्या शहरातला सत्ता बळकावणारा व्यक्ती म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती.
म्हणजे अमरिश पुरींचा प्रवास आकाशवाणी ते थिएटर, तिथून प्रादेशिक सिनेमा ते हिंदी समांतर सिनेमा असा राहिला. आता फक्त बॉलीवूडचा मुख्य प्रवाहातील सिनेमाच उरला होता. १९८० हे अमरिश यांच्या करिअरमधील महत्त्वाचे वर्ष होते. आक्रोशसह या एका वर्षांत त्यांचे आठ सिनेमे प्रदर्शित झाले. आतापर्यंत पहिल्यांदाच त्यांचे एका वर्षात एवढे सिनेमे प्रदर्शित झाले होते. त्यापैकी एक होता फिरोझ खान यांचा कुर्बानी, ज्यात त्यांनी स्मगलर राका याची भूमिका साकारली होती. ही भूमिका त्यांना वसी खान यांच्यामुळे मिळाली होती. त्यांना थिएटरची पार्श्वभूमी होती आणि त्यांनी पुरींचे काम पाहिले होते. राका केवळ स्मगलरच नव्हता, तर एक आडदांडपणा करणारा गावगुंडदेखील होता, जो अंपग क्लीनरवर दादागिरी करायचा. यात त्यांचा काहीसा विनोदी अंगाने जाणारा अभिनय इतर अभिनेत्यांच्या सोबतीने उठून दिसला. सहायक भूमिकांमध्ये राकाची लोकप्रियता इन्स्पेक्टर अमजद खान (अभिनेता- अमजद खान) याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होती. हे त्यांचे पहिले व्यावसायिक यश होते. अमरिश पुरी यांची सर्व कारकीर्द पाहिली तर त्यांनी परत कधीच मागे वळून पाहिले नाही. कधीच नाही.
(लेखक प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.)
(प्रस्तुत लेखासाठी ‘द अॅक्ट ऑफ लाईफ’ या ज्योती सबरवाल यांनी लिहिलेल्या अमरीश पुरी यांच्या आत्मचरित्राचा आधार घेण्यात आला आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.