फुलराणी, औदुंबर, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या एकाहून एक सरस कविता लिहिणाऱ्या बालकवींच्या (Balkavi) कवितांतील सर्वोत्तम कविता म्हणजे अरुण हीच होय. अरुण केवळ रसिकमान्यच नव्हे, तर बहुतेक समीक्षकांच्या कसोटीस उतरलेली, गोविंदाग्रजादि प्रतिभावंत कवींना आवडलेली, अनुकरण करण्यास भाग पाडणारी कविता होय. बालकवींच्या ‘अरुण’चे इतर अनेक कवींनी केलेले ओबडधोबड अनुकरण पाहून केशवकुमारांना ‘अरुणा’ हे विडंबन करण्याची स्फूर्ती मिळाली. अशी ही कविजनमान्य अरुण आज आपण पाहणार आहोत. (Balakavis best poem Arun Saptarang marathi article on poetry by Dr Neeraj dev Nashik News)
अरुण ही आठ भाग नि ९८ ओळींत विस्तारलेली कविता आहे. कवितेच्या आरंभी कवी सांगतो, की ‘पूर्व समुद्रावर सोनेरी रम्य छटा पसरली आहे किंवा मूठभर पण आकाश व्यापणारा गुलाल आकाशात उधळला आहे. त्यामुळे पूर्वदिशा मधू, मृदुल हसते आहे नि साऱ्या दिशा हर्षाने डोलू लागल्यात. क्षितिजाच्या कडा उज्ज्वल प्रकाशाने अशा काही उजळून निघाल्यात, की जणू काही सृष्टीरूपी सतीने आपल्या गळ्यात अनुपम दागिनेच घातलेसे वाटावे. ढग ते बहुधा सोनेरी किंबहुना रक्तवर्णाने किंवा पिवळे धमक रंगाने रंगले आहेत किंवा सोन्याची गंगाच वाहताना वाटते. कोणी शुद्ध कर्पूररस अंगाला लावल्याप्रमाणे वाटते.’
अशी सलामी झाडत तो गातो
अरुण चितारी नभःपटाला रंगवितो काय,
प्रतिभापूरित करी जगाला कीं हा कविराय?
किंवा असे असावे, की चित्रकार अरुण नभःपटाला रंगवीत बसलाय किंवा हा कविराय जगाला प्रतिभेचे स्फुरण पुरवीत असावा किंवा असेही असेल, की पहाटरूपी नवयुवती दारात येऊन रंगबेरंगी रांगोळ्या आपल्या राजस हातांनी रेखाटत आहे किंवा दिवसयामिनी परस्परांचे चुंबन घेतात.
अनुरागाच्या छटा तयांच्या खुलल्या गगनांत!रसिका! काय सुंदर ही कल्पना रात्र संपून दिवस उगवतोय. पण कवीला वाटते, की रात्ररूपी प्रेयसी नि दिवसरूपी प्रियकर परस्परांचे चुंबन घेताहेत अन् त्यांच्या अनुरागाच्या गुलाबी छटा आकाशात पसरल्यात. पुढे कवीला असेही वाटते, की ‘स्वर्गीच्या अप्सरा गगन मंडलात शेवटची मंगलगीते, तर गात नसाव्यात, किंबहुना रात्री आकाशात चमचमणाऱ्या तारकारूपी मोत्यांच्या माळा अरुणोदयाच्या लख्ख प्रकाशात हरपून गेल्याने, ‘आपली मोत्यांची माळच चोरीला गेल्याच्या’ रागाने रुसल्याने नभरूपी सुंदरीच्या गाली लाली आली असावी.’ तितक्यात कविप्रतिभेला वाटते, ‘अथवा रात्रीची निराशा लोपून उषेसोबत आशेची लाली आली असावी किंवा आपण विजयी झालो, हे कळवाया प्रीतीची ध्वजा फडकत असावी, असेही असू शकते की स्वर्गातील दिव्यांचे भांडार फुटून स्वर्गच खाली येत असावा किंवा श्रीराम पुष्पक विमानातून खाली उतरताहेत नि सोन्याची द्वारकापुरीच सर्वत्र लखलखते आहे, असे वाटते.’
रसिका! कवीला येथे आठवण येते, ती पुष्पकाची व मथुरेतील पलायनानंतर सोन्याने उभारलेल्या कृष्णाच्या द्वारकेची. त्याची कारणे दोन्ही ठिकाणी तृप्त विजय आहेत, तेच कवीला चितारायचेत म्हणून तो ही प्रतीके निवडतो. कवितेत इथवर कवींची प्रतिभा अरुणाच्या दर्शनाने स्तिमित होऊन बावरलेली दिसते. त्यामुळेच हे असे असावे किंवा तसे असावे, अशा जरतारी प्रतिमा चितारीत कवी वेगवेगळ्या उत्प्रेक्षा व रुपकांची उधळण करताना दिसतो.
पहिल्या तीन भागांत विस्मयचकित होऊन सृष्टीदेवतेचे सौंदर्य न्याहाळणाऱ्या कवीला आता ती सृष्टी सजीवतेने व्यवहार करताना दिसू लागते. तो सांगतो, ‘लगबगीने दिशा एकमेकींशी संवाद साधू लागल्यात, की आपल्याला कोणीतरी तेजाने न्हाऊ घालतय, तू तेजोमय दिसतेस अन् मी ही तेजोमय झालेय, आपला विरहकाळ संपला. तितक्यात त्यांना वाटते, की दिशा या गवळणी असून, सूर्य हा कृष्ण आहे. तो पूर्वेसोबत गोफ खेळत आहे. येथे कवी सूर्याला कृष्णाची उपमा देतो. कारण कृष्ण म्हणजे जो सहजपणे आकर्षित करतो तो होय. अरुण ही तसाच आहे, सर्व दिशांचे लक्ष अरुणासोबत गोफ खेळणाऱ्या पूर्वेकडे आहे. तितक्यात अरुणरुपी कृष्ण पूर्वरुपी गोपीच्या गालाला हलकेच स्पर्शतो त्यामुळे ती लाजते. याचे मनोहारी वर्णन करताना कवी लिहितो,
विनयवती ती पूर्वदिशा मग अधोवदन झाली,
तो प्रेमाची अद्भुत लहरी वसुधेवर आली!
किती सुंदर कल्पना, पूर्व दिशेने विनयाने मान खाली केली अन् त्याबरोबर तिच्या प्रेमलहरी वसुधेवर आल्या. त्या प्रेमलहरींना पाहून मस्तक नमवावे हे आम्हाला, ब्रह्मांडाला, देवांनाही ठाऊक आहे. पण त्या लहरींनी ही भूदेवी वेडावून गेली, असे कवी सांगतो. भूदेवी वेडावण्याचे कारण इतरांना जरी त्या प्रकाशलहरी वाटत असल्या तरी तिला त्या प्रेमलहरी वाटतात. त्यामुळेच पृथ्वीरुपी प्रौढा मुग्धपणाचा भाव बाजूला सारत अरुणाकडे टकमक पाहू लागली. कवी म्हणतो, प्रेम न मोजी क्षुद्र लौकीकाला । त्यामुळेच ही वसुधा अरुणाच्या प्रेमात बावरी झाली. मला वाटते ह्याच कल्पनेचा अधिक ठळक विस्तार कुसुमाग्रजांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’मध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
रसिका! आता पावेतो विस्मयचकित होऊन पाहणारी प्रेक्षकाची भूमिका सोडत कवी कवितेचा सक्रिय भाग बनत चाललाय म्हणूनच वेडावलेल्या पृथ्वीला सहाय्य करायला तो कवितेला पाचारण करतो-
कविते ! तिजला साह्य तूंच हो, तूंही पण वेडी !
परंतु वेडाविण सुटतिल का हृदयाचीं कोंडी?पण त्याच्या लक्षात येते, की या वेड्या वसुधेसारखीच कवितापण वेडीच आहे. अर्थात, हृद्याची कोडी वेडाशिवाय सुटणारच नाहीत. तेच तर जाणते, की प्रेमाची फेड प्रेमानेच करायची असते. बघा नं, तो सूर्यसुद्धा पंचमहाभूतांना, साऱ्या सृष्टीला प्रकाशरुपी प्रेमाने नटवतोय आणि गिरीपर्वतांना आज्ञापित कवी म्हणतो, ‘वरुन येणारा हा प्रेमाचा लोंढा भव्य पर्वतांनो स्वत;वर झेलून घ्या, तुमच्या शिखरावर घ्या. त्याने तुम्हाला सरदारी डौल येईल व मी स्फूर्तियुक्त वाणीचा अभिषेक करीत तुम्हाला, असे गौरविल की सगळे जग तुम्हाला पाहात बसेल.’
सुवासिनींना, वनदेवींना तो डोलायला सांगतो. वनमालेला तिचा हिरवा शेला हलवायला सांगतो, पक्ष्यांना माळा करायला सांगतो आणि वायूला गाणी गायला सांगतो. तरी त्याचे मन भरत नाही म्हणून तो सरळ कोकीळ नि भारद्वाजाकडे जात आज्ञापितो, की
ऊठ कोकिळा ! भारद्वाजा ! ऊठ गडे; आतां,
मंगल गानीं टाकी मोहुनि जगताच्या चित्ता !
रसिका ! कित्ती मंजुळ, मोहक नि लडीवाळपणा आहे यात! कवीचा हा लडीवाळपणा पाहून कोकिळा, भारद्वाज मंगलगाणी गाऊ लागतात न लागतात, तोच कवी त्याच हक्काने सरितेलाही तिचे कलकलगीत त्यात मिसळायला लावतो. या अखंड गायनाने कुरणे जिवंत होऊन हर्षभरित झाली. सर्व सृष्टीच दिव्यतेने भरून गेली. जणू काही दिव्यत्वाचे पाटच अरुणाने वसुंधरेच्या हृदयात ओतले. त्यामुळे स्वर्भूमीचे मंगलमय ऐक्य झाले, असे कवीला वाटते. ही मंगलमयता कवी मनाला मोहून टाकते अन् त्यातून हे गीत सहजपणे निर्माण झाले, असे सांगत कवी विश्राम घेतो. या काव्यात निर्मळ माधुर्य ओतप्रोत भरले आहे. त्यामुळेच शतकाहून ही अधिक वर्षांपूर्वी जन्मलेले हे गीत आजही मनाला मोहवित राहते, प्रफुल्लित करते.
-----------e�
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.