लोकशाहीचा फार्स करून हुकूमशाहीचा अवलंब केला तर आर्थिक विकासाची स्वप्नपेरणी वाचवू शकतेच असं नाही, हा बांगलादेशातल्या अस्वस्थ वर्तमानाचा धडा आहे. लोकांना गृहीत धरणं आणि विरोधकांना सरसकट देशविरोधी ठरवणं यातून कायम सत्ता टिकवता येत नाही.
या वाटचालीत अपरिहार्य असलेला उद्रेक सत्तेची सिंहासनं उलथवून टाकतो हे, बांगलादेशात एकेकाळी ‘आयर्न लेडी’ म्हणून गौरवल्या गेलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांना ज्या रीतीनं तोंड चुकवत देश सोडावा लागला, त्यातून दिसतं. बांगलादेशात हसीना यांची अशी गत करण्यात तिथल्या संतप्त तरुणांचा वाटा निर्विवाद आहे, तसाच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर स्वार होत, हसीना यांनी दडपलेल्या सर्व शक्ती उट्टे काढत होत्या, हेही वास्तव आहे.