त्याग, बलिदान, सेवा, परोपकार इत्यादी पुस्तकी शब्द असून, व्यवहारात त्यांना स्थान नाही, असा सार्वत्रिक समज
त्याग, बलिदान, सेवा, परोपकार इत्यादी पुस्तकी शब्द असून, व्यवहारात त्यांना स्थान नाही, असा सार्वत्रिक समज असतो. त्याला वास्तवाचा भक्कम आधारही आहे. पण ‘सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं’ या वचनाप्रमाणे कधी कधी या पुस्तकी शब्दांनादेखील वास्तवाची जोड मिळते. आपल्या आजूबाजूला अशा घटना घडूनही आपल्याला त्यांची माहिती नसते, कारण छोट्या छोट्या स्वार्थी भावनांनी जखडून ठेवलेलं आपलं किरटं जग. आपल्याला ठाऊक असते माकडीण आणि तिच्या पिलाची गोष्ट. त्यापलीकडेही काही गोष्टी असतात, ज्यांतून त्यागाचं, बलिदानाचं दर्शन घडत जातं. ‘बसेरा’मधल्या बलराज, शारदा आणि पूर्णिमा यांच्या गोष्टीत घडलं तसं...
जुन्या पिढीतल्या लेखिका लीला फणसळकर यांच्या कथेवर आधारित व रमेश तलवार दिग्दर्शित ‘बसेरा’ (१९८१) या चित्रपटाची गोष्ट अतर्क्य वाटू शकेल, मात्र अशक्यप्राय नाही. बलराज कोहली (शशी कपूर) आणि पूर्णिमा अर्थात निमा (रेखा) या सुखवस्तू आणि मध्यमवयीन जोडप्याची ही कहाणी. पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत आलिशान बंगल्यात राहणाऱ्या या जोडप्याला दोन मुलगे असतात. मोठा मुलगा सागर (राज किरण) याचं पुण्याच्याच मेडिकल कॉलेजात शिकणाऱ्या सरिता (पूनम धिल्लन) या दिल्लीच्या मुलीशी प्रेम जमलेलं आहे. दिल्लीची रहिवासी असलेली सरिता सुंदर, सुशील आणि नव्या घराचं हित जपणारी असते. त्या दोघांच्या लग्नाला दोघांच्याही घरून संमती मिळालेली आहे. बलराजचा धाकटा मुलगा शाळेत जाणारा आहे. असं हे सारं छान चाललेलं असताना एकदा बलराजला रुग्णालयातून निरोप येतो, ‘ती’ अत्यवस्थ असल्याचा. ‘ती’ म्हणजे शारदा; आणि हा निरोप मनोरुग्णालयातून आलेला असतो.
खरंतर शारदा (राखी) ही अन्य कुणी नसून बलराजची पहिली पत्नी व निमाची सख्खी मोठी बहीण असते आणि सागर हा निमाचा नव्हे, शारदाचा मुलगा असतो. एकेकाळी शारदा आणि बलराज यांचा संसार सुखाने चाललेला असतो. शारदाची लहान बहीण निमा ही सुस्वरूप आणि लाघवी असल्याने बलराज व शारदा या दोघांनाही तिचा लळा लागलेला असतो. शारदाचा तर तिच्यावर विलक्षण जीव असतो. काही काळानंतर ते दोघं निमाचं लग्न थाटामाटात करून देतात. दुर्दैवाने लग्नानंतर काही तासांतच निमाच्या नवऱ्याचा आकस्मिक मृत्यू होतो. निमावर तर आभाळ कोसळतंच; पण शारदा त्या धक्क्याने जिन्यावरून कोसळते. मेंदूला मार बसल्याने ती आपली स्मृती गमावून बसते. तिला मनोरुग्णालयात दाखल करावं लागतं. तब्बल चौदा वर्षं शारदा या अवस्थेत तिथं उपचार घेत असते.
शारदा इस्पितळात असताना निमा बलराजकडे रहात असते. आपलं वैधव्याचं दुःख विसरून ती छोट्या सागरचा आईप्रमाणे सांभाळ करू लागते. शारदाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता दिसत नसल्याने अखेर सात वर्षांनी, आपल्या सासऱ्याच्या सूचनेवरून बलराज निमाशी लग्न करतो. निमालाही एक मुलगा होतो. काळ पुढे सरकत राहतो. कर्तव्य म्हणून बलराज अधूनमधून शारदाच्या प्रकृतीची चौकशी करत असतो; आणि आज अचानक इस्पितळातून शारदा अत्यवस्थ असल्याचा निरोप येतो, त्यामुळे बलराज तातडीने तिथे जातो. एका मनोरुग्ण महिलेने शारदाच्या डोक्यात आघात केल्याने ती बेशुद्धावस्थेत गेलेली असते. सात दिवसांनी शारदा शुद्धीवर येते ती चक्क हरवलेली स्मृती घेऊन! तिला आता पूर्वीचं सगळं लख्ख आठवत असतं. डॉक्टरांच्या दृष्टीने हा एक चमत्कारच असतो. मात्र, शारदाला लगेच घरी न पाठवता ती पूर्णतः बरी झाल्यानंतरच पाठवावं, असं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं मत असतं. मधल्या चौदा वर्षांच्या काळात बलराजच्या कुटुंबात जे काही बदल घडले, त्याविषयी शारदा पूर्णतः अंधारात असते. या बदलांची शारदाला हळूहळू कल्पना देऊ या, अन्यथा तिला पुन्हा मानसिक धक्का बसून त्याचा वेगळा परिणाम होऊ शकेल, असा धोक्याचा इशारा डॉक्टर देतात. बलराजला ते पटतं. घरातली परिस्थिती शारदा इस्पितळात जाण्याआधी होती तशीच राहील हे पाहण्याची जबाबदारी त्याच्यावर येते.
शारदा घरी येईल तेव्हा आपल्याला पुन्हा चौदा वर्षांपूर्वीच्या अवस्थेत म्हणजे विधवेच्या अवतारात वावरावं लागणार, या कल्पनेने निमा हादरते. बरं, हे ‘वेशांतर’ थोड्या काळापुरतं असेल की कायमचं, हेही तिला माहीत नसतं. बरी झालेली शारदा एके दिवशी कुणालाही न सांगता इस्पितळातून घरी निघून जाते. ती जागेवर नसल्याचं पाहून डॉक्टर बलराजला फोन करून ती कोणत्याही क्षणी घरी येऊ शकेल याची कल्पना देऊन ठेवतात. घरी एकच तारांबळ उडते. निमा आपले नि बलराजचे लग्नानंतरचे फोटो दडवून ठेवते, मंगळसूत्र कपाटात ठेवून ‘विधवेचा’ वेश परिधान करते. शारदा घरी पोहोचते. निमाला पूर्वीच्या वेशात पाहून ‘तू अजून लग्न केलं नाहीस का?’ असं विचारते. बलराज आणि सागर हेही घरी पोहोचतात. निमाचा सात वर्षांचा मुलगा बब्बू शारदाच्या नजरेला येऊ नये म्हणून त्याला सरिताच्या होस्टेलवर ठेवलं जातं. सगळे जण वरकरणी आनंदात; पण आतून एका दडपणाखाली शारदाचं स्वागत करतात, तिला हवं-नको ते पाहतात. शारदा हळूहळू घरात रुळते. आपल्या लग्नाची कोणतीही खूण तिच्या नजरेला पडू नये, याची खबरदारी निमा आणि बलराज घेत असतात. मात्र, या प्रयत्नात दोघांनाही एका विचित्र तणावाखाली वावरावं लागत असतं.
हे नाटक फार काळ टिकत नाही. सरिताच्या होस्टेलवर ठेवलेला निमाचा मुलगा आईच्या आठवणीने तिथून पळ काढून घरी येतो आणि सारंच गुपित उघड होतं. आपल्या गैरहजेरीत निमा आणि बलराज यांनी लग्न केलंय आणि आपल्यासमोर उभा असलेला मुलगा त्या दोघांचा आहे, हे कळून चुकताच शारदा सुन्न होते. बलराज आणि निमा यांच्या लग्नाचा निर्णय एका अपरिहार्य परिस्थितीत, तोही छोट्या सागरच्या हितासाठी घेण्यात आला, हे शारदाला पटवून देण्याचा प्रयत्न सारेजण करतात. शारदाला ते मान्य करण्यावाचून पर्याय नसतो. केवळ हे तिघंच नव्हे, तर संपूर्ण कुटुंब एका कोंडीत सापडतं. दोघींपैकी कुणातरी एकीला आत्महत्या करायला लावून हा पेच सोडवता आला असता, मात्र या कोंडीतून सर्वांची सुटका शारदामुळेच होते. तिला पुन्हा वेडाचे झटके येऊन ती ‘व्हायोलंट’ होते. साऱ्या वस्तूंची तोडफोड करून घर डोक्यावर घेते. समोर दिसेल तो माणूस आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न करतोय, असं समजून ती त्याच्यावर हल्ला करू पाहते. अखेर तिला पुन्हा मनोरुग्णालयात धाडलं जातं. बहुधा कायमचं.
खरी गोम अशी की, शारदा अगदी ठणठणीत असते. आपल्याला पुन्हा वेडाचे झटके येत असल्याचं तिने केवळ ढोंग केलेलं असतं. आपण व निमा दोघी या घरात फार काळ एकत्र राहू शकणार नाही, कुणा तरी एकीचं आयुष्य खडतर होणार, हे उमगल्यानंतर तिने विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला असतो. तिच्या या निर्णयामागचं गुपित केवळ दोघांनाच माहीत होतं. वैद्यक शाखेची विद्यार्थिनी असलेली सरिता आणि शारदावर उपचार करणारे डॉक्टर. आपल्या त्यागामागची भूमिका त्यांना नीट पटवून देण्यात ती यशस्वी होते. धाकट्या बहिणीचा संसार मोडू नये यासाठी स्वतःचंच घरटं ती मोडून टाकते. कधीकाळी ‘जहाँ पे सवेरा हो, बसेरा वहीं है’ हे गीत तिच्या ओठी खेळत असे. आता तिने त्यात बदल केलेला असतो, ‘जहाँ पे बसेरा हो, सवेरा वहीं है...’
ना मिट्टी ना गारा, ना सोना सजाना
जहाँ प्यार देखो, वहीं घर बनाना
ये दिल की इमारत बनती है दिल से
दिलासों को छू के, उम्मीदों से मिल के
जहाँ पे बसेरा हो, सवेरा वहीं है!
यश चोप्रा यांच्या तालमीत तयार झालेल्या रमेश तलवार या गुणी दिग्दर्शकाने ही गोष्ट प्रभावीपणे पडद्यावर आणली होती. अर्थात पटकथा, संवाद आणि गीतं लिहिणाऱ्या गुलजार यांचाही महत्त्वाचा वाटा होता. स्वतः दिग्दर्शक नसलेल्या अनेक चित्रपटांसाठी गुलजार यांनी पटकथा व संवाद लेखन केलं, त्यातलाच हा एक. गुलजार आणि संगीतकार आर. डी. बर्मन यांची एकत्रित कामगिरी याही चित्रपटात जमून आली होती. राखीवर चित्रित झालेल्या शीर्षक गीताबरोबरच लताने गायलेलं नि रेखावर चित्रित झालेलं ‘जाने कैसे बीतेंगी ये बरसातें... मांगे हुए दिन है, मांगी हुई रातें’ हे गाणंही तेवढंच अर्थपूर्ण होतं.
अभिनयात राखी आणि रेखा या दोघींचा सामना तोडीस तोड होता. प्रेक्षकांची सहानुभूती शारदा झालेल्या राखीच्या वाट्याला जात असली तरी रेखाने साकारलेली निमादेखील गुंतागुंतीची होती. ‘चोप्रा स्कूल’च्या प्रभावामुळे असेल; पण घराचा भव्यदिव्य सेट, रात्रीच्या वेळीसुद्धा नायिकांनी परिधान केलेल्या भारी साड्या, सर्वत्र लख्ख प्रकाश... यांसारख्या गोष्टी दिग्दर्शकाला टाळता आल्या नव्हत्या. चित्रपटाच्या शेवटी शारदाने केलेला त्याग वास्तवात शक्य आहे का, असा प्रश्न पडू शकतो. शिवाय तिचं ‘वेडेपणाचं’ सोंग सरिता आणि डॉक्टर हे नजरेआड करतात हेही अशक्यप्राय वाटतं. पण कुणी सांगावं, तसं घडत असेलही. वर म्हटल्याप्रमाणे कधीकधी सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. असो.
जाता जाता : हीच कथा ऐंशीच्या दशकात एखाद्या दाक्षिणात्य दिग्दर्शकाने जितेंद्र, जयाप्रदा आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रित केली असती तर काय घडलं असतं, हा विचार उगीचच मनात येऊन गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.