हो गया है तुझ को तो प्यार सजना...

स्वप्नातला राजकुमार बघायचंही किंवा जे समवयीन, समकालीन भेटतील त्यांच्यात त्याला शोधायचंही एक वय असतं पौगंडावस्थेतलं.
best peace of ddlj Ho Gaya Hai Tujhko song by lata mangeshkar and udit narayan
best peace of ddlj Ho Gaya Hai Tujhko song by lata mangeshkar and udit narayanSakal
Updated on

- डॉ. कैलास कमोद

हो गया है तुझ को तो प्यार सजना

लाख कर ले तू इन्कार सजना....

स्वप्नातला राजकुमार बघायचंही किंवा जे समवयीन, समकालीन भेटतील त्यांच्यात त्याला शोधायचंही एक वय असतं पौगंडावस्थेतलं. मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात त्याची अस्पष्ट छबी घर करून बसते. असं घडू लागतं की सतरा-अठरा वर्षांच्या आयुष्यात प्रथमच कुणी तरी एक न भेटलेला, न पाहिलेला अनोळखी मनात रुंजी घालू लागतो.

डोळ्यांच्या खिडकीसमोरून एखादी पुसटशी आकृती हलकेच लहरत जावी तसा. हृदयाचा दरवाजा अधूनमधून कुणी तरी ठोठावू लागतो. तलम रेशमाचा स्पर्श व्हावा तसा त्याचा श्वास गालांना स्पर्शून जातो. केसांवरून हात फिरवून तो निघून जातो अन् मग त्याच्या हातांचा सुगंध केसांमधून दरवळत राहतो...

मनातल्या ‘त्या’ छबीसारखा हुबेहूब ठरेल असा तो अस्तित्वात तरी असेल का? की ‘तो’ म्हणजे माझी स्वत:चीच निव्वळ भ्रामक कल्पना आहे? अस्तित्वात असला तरी तो नेमका कुठं असेल? असला तरी माझी-त्याची कधी गाठ पडेल का? गाठ पडली तरी तो नुसताच स्वप्नात येऊन छेडतो...एकदा कधीतरी समोर तर यावं त्यानं...

लंडनमध्ये राहणारी काहीशी कविमनाची, मनमोकळी, अल्लड आणि ‘हे असं’ स्वप्न पाहणारी भारतीय तरुणी सिमरन मैत्रिणींसह निघाली आहे युरोपच्या महिनाभराच्या सहलीला. प्रवासाच्या सुरुवातीला ट्रेनमध्ये मैत्रिणींशी चुकामूक होऊन तिला भेटला राज. फक्त ट्रेनमध्येच भेटला असं नव्हे तर, पुढं सहलीतसुद्धा योगायोगानं अधूनमधून भेटतच राहिला.

राज हा जात्याच खट्याळ, खोडकर, बडबड्या तरीही सहृदय, निर्मळ मनाचा तरुण आहे. तो लंडनस्थित भारतीय असून युरोपच्या सहलीला आला आहे. सिमरनची फिरकी घेण्याची एकही संधी तो सोडत नाही, तसंच अडचणींच्या प्रसंगी तिला मनापासून मदत करण्याचं औदार्यही त्याच्याकडं आहे. ‘अजून कुण्या तरुणीवर प्रेम करावंसं मला वाटलेलं नाही,’ असं तो बोलता बोलता सांगतो.

‘ती कशी असावी...’असं सिमरन विचारते तेव्हा तो सांगतो:

‘ढगांमधून मला आता ती पुसटशी दिसत असते; पण हे ढगांचं मळभ केव्हा बाजूला होईल अन् ती मला स्पष्ट दिसेल कुणास ठाऊक.’ दोघांच्याही स्वप्नातल्या काही कल्पना आहेत. खरं तर या स्वप्नातल्या कल्पनेप्रमाणे एकमेकांशी मिळते-जुळते दोघंही आहेत; पण त्यांच्या लक्षात ही बाब येत नाहीय.

सिमरनचा विवाह तिच्या वडिलांनी भारतातल्या एका मित्राच्या मुलाशी आधीच निश्चित केलेला आहे. सिमरननं असं सांगताच तो क्षणभर गप्प होतो; पण फक्त क्षणभरच. सहल संपते. लंडनला पोहोचल्यावर रेल्वेस्टेशनवर एकमेकांचा निरोप घेताना ती अचानक त्याला विचारते : ‘तू तर मला तुझा पत्तासुद्धा दिला नाहीस. माझ्या लग्नाचं निमंत्रण मी तुला कशी पाठवणार?

तू येशील ना माझ्या लग्नाला?’ यावर तो ठामपणे उत्तरतो : ‘नाही’. आणि, तिच्याकडं बघत बघत निघून जातो. ती मात्र मागं वळून पाहत नाही. तो गेल्यावर मात्र थोड्या वेळानं ती मागं वळून बघत थांबून राहते; कारण, तिला जाणवू लागतं की, आपल्याला काही तरी चुकल्याचुकल्यासारखं होतंय...सारखी चुटपुट तिला लागून राहते. आपल्या स्वप्नातला राजकुमार हाच तर होता...आणि, बॅकग्राऊंडला तिच्याच स्वरात गाणं येऊ लागतं...

न जाने मेरे दिल को ये क्या हो गया

अभी तो यही था, अभी खो गया

तिच्यापाठोपाठ त्याच्याही आवाजात तसेच शब्द गीतातून परावर्तित होतात आणि तो लाल रंगाच्या गाडीतून एकांतातल्या रस्त्यावरून दूर निघालेला दिसतो. तो दूर जात असला तरी त्याचंही मन तिच्याकडंच ओढलं जात आहे. आता दोघांच्या मनातला कल्पनेचा खेळ सुरू होतो. ती त्याची गाडी अडवत रस्त्यातच उभी राहून त्याला हसत हसत सांगते : ‘सख्या, तू कितीही नाकारलंस तरी तू प्रेमात पडला आहेस हेच खरंय.’

हो गया है तुझ को तो प्यार सजना

लाख कर ले तू इन्कार सजना

दिलदार सजना, है ये प्यार सजना

असं सांगत सांगत ती त्याला वाकुल्या दाखवत गाडीपासून लांब जाऊ लागते, तसं तो ड्रायव्हर-सीटवरून उठून तिच्याकडं पाहत राहतो. लगेच दृश्य बदलतं. आता बॅग हातात धरून ती रस्त्यानं घराकडं पायीच निघाली आहे.

तो अचानक तिचा हात धरतो अन् तिला सांगतो : ‘हो गया है तुझ को तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना...’ तिला जिथं तिथं तो दिसू लागतो. कधी एस्कलेटरवरून पाठलाग करताना, कधी तिच्या समोरून जात सॅक्सोफोन वाजवताना, तर कधी लोकल मेट्रोमध्ये उभा असलेला...रस्त्यावरच गाडी थांबवून तो मनातली खंत तिला सांगतो :

देखा न तू ने, मूड के भी पीछे

कुछ देर तो मैं रुका था

तीसुद्धा खरं तेच सांगत खुलासा करते : ‘तुला थांबवावंसं असं मनापासून जेव्हा जाणवलं तोपर्यंत तू बराच दूर गेलेला होतास...’

जब दिल ने तुझ को रोकना चाहा

दूर तू जा चुका था

हुआ क्या न जाना ये दिल क्यूँ दीवाना

आता त्यालाही थांबावंसं वाटतंय आणि तो धावत्या काळालाच विनंती करतो : ‘कालचक्रा, तू जरा उलटं वळण घे.’

तीसुद्धा तशीच काहीशी विनवणी करते.

ऐ वक्त रुक जा, थम जा, ठहर जा

वापस ज़रा दौड पीछे

मैं छोड आई, खुद को जहाँ पे

वो रह गया मोड पीछे

कहाँ मैं

कहाँ तू

ये कैसा है जादू

कल्पनेतलं असं गाणं गातगातच ती घरी पोहोचते तेव्हा पुन्हा तिच्या तोंडून हेच उद्गार बाहेर पडतात : ‘ न जाने मेरे दिल को क्या हो गया... अभी तो यहीं था, कहीं खो गया’.

गीतकार आनंद बक्षी यांनी त्या दोघांच्या एक, एक - दोन,दोन वाक्यांच्या संवादातून गाणं फुलवत नेलं अहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी मनाचा खेळ जसा वर्णन केला आहे :

मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात

आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायात

तसाच मनाचा हा खेळ बक्षी यांनी शब्दांचं अवडंबर न माजवता सरळ-सोप्या भाषेत लिहिला आहे. तरुण पिढीला भावेल अशी आधुनिक चाल देऊन, आधुनिक वाद्यांचा वापर करत संगीतकार जतीन-ललित या दोन पंडितबंधूंनी गाणं चांगलं सजवलं आहे. प्रील्यूडला पार्श्वभूमीवर कोरसचा अस्पष्ट आवाज येतो, त्यातून त्या दोघांचंही हे मनोगत आहे हे आपल्या लक्षात येतं. इंटरल्यूडला एके ठिकाणी राज इंटरल्यूडला मेंडोलिनवर ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या गाण्याची धून छेडतो. ही धून म्हणजे या संपूर्ण चित्रपटाचं थीमसाँग आहे.

पुढं येणाऱ्या गाण्याची धून आधीच कधीतरी पार्श्वसंगीतात वापरण्याची जी पद्धत या चित्रपटात घेण्यात आली आहे, ती राज कपूर यांच्या सिनेमांचे संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या संगीताचं स्मरण करून देते. अर्थात् ती कानांना भावतेच.

लता मंगेशकर यांच्या स्वरातला मुलायमपणा वाढत्या वयात कमी झाल्यासारखा वाटला तरी गाण्यावर त्याचा कोणताही परिणाम न होता सुरांच्या आरोह-अवरोहांचा खेळ आणि प्रील्यूड आणि इंटरल्यूड यांचे आलाप यांतून त्यांची गाण्यावरची हुकमत लक्षात येते. उदित नारायणचा पहाडी स्वर आणखी रंगत आणतो. ‘हो गयाऽऽ’ असे त्याचे दीर्घ उच्चार फार आकर्षक आहेत. हे संवादसदृश गाणं दोघांनीही आपापल्या ताकदीनं मस्त गायिलं आहे.

राजच्या भूमिकेतल्या शाहरुख खानचा सळसळता उत्साह, त्याचा खट्याळपणा, त्याचं ते विशिष्ट हास्य, त्याचे विस्कटलेले कपडे, विविधरंगी विविध पोशाख, कपाळावर पुढं आलेले केस अशी एकूणच सगळी अदाकारी केवळ या गाण्यातच नव्हे तर, संपूर्ण सिनेमातच लक्ष वेधून घेते.

याआधी ‘बाजीगर’, ‘डर’ यांसारख्या सिनेमांमधून अँटिहीरो साकारणाऱ्या या अभिनेत्यानं प्रथमच रोमँटिक हिरोसुद्धा तितक्याच सामर्थ्यानं सरसपणे साकारला आहे. काजोलची सिमरनही तितकीच सामर्थ्यवान. विशेषत: तिच्या बोलक्या डोळ्यांतून अनेक प्रसंग तिनं जिवंत केले आहेत.

कमाल केली आहे ती दिग्दर्शकानं. स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर गाणं साकारलं जातं. मागच्या बाजूला दूरवर आल्प्स पर्वताची हिमशिखरं...हिरव्या हिरव्या पसरलेल्या लॅानच्या मधून जाणारे निर्मनुष्य रस्ते...रस्त्यावर एखादीच लाल रंगाची कार असं नेत्रसुखद चित्रीकरण मजा आणतं. दिग्दर्शकानं गाण्यातले छोटे प्रसंग वेगवेगळ्या अँगलनं सादर केले आहेत.

रेल्वे स्टेशनमध्ये, रस्त्यावर, घरात, धावत्या गाडीत अशा विविध ठिकाणी गाणं आपल्याला दिसतं. राज एकदा सॅक्सोफोन वाजवतो, तर एकदा मेंडोलिन वाजवतो. एकदा कारमध्ये, एकदा लंडनच्या उघड्या बसमध्ये, तर एकदा सायकलवर दिसतो.

कल्पनेतली सिमरन राजसाठी गाणं गाते तेव्हा तिच्या अंगावरचे पोशाख सतत बदलते आहेत; पण खऱ्या राजच्या अंगात तोच पोशाख असतो, जो तिला स्टेशनवर सोडताना त्याच्या अंगावर होता तोच. कल्पनेतला राज सिमरनसाठी गातो तेव्हा त्याच्या अंगावरचे कपडे सतत बदलते असतात, तर सिमरनच्या अंगावर तेच कपडे असतात, जे त्याला स्टेशनवर सोडताना होते तेच.

दिग्दर्शनातल्या अशा सूक्ष्म बारकाव्यालासुद्धा दाद दिली पाहिजे. त्याला स्टेशनवर सोडताना सिमरन मागं वळून पाहत नाही; पण घरी पोहोचल्यावर सामान दारातून आत घेताना, तो तिला हात हलवत बाय करताना दिसतो तेव्हा तीही हात वर उचलून हलकेच हलवते.

या छोट्याशा प्रसंगातून त्यांच्या प्रेमाचं अद्वैत घट्ट बांधलं गेल्याचं जाणवतं. शाहरुखनं हात हलवत केलेला ‘तो बाय’ आज चाळिशी-पन्नाशीत असलेल्या त्या काळातल्या तरुणींच्या मनात अजूनही खोलवर रुतून बसलेला आहे.

‘यशराज फिल्म्स’च्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे’ या १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातून यश चोपडा यांचे पुत्र आदित्य चोपडा यांनी दिग्दर्शनक्षेत्रात अतिशय यशस्वी पदार्पण केलं. चित्रपटातली इतर गाणीसुद्धा फार श्रवणीय होती. ‘मदर इंडिया’, ‘मुघल-ए-आझम’, ‘संगम’, ‘गाईड’, ‘शोले’ यांच्याप्रमाणेच हा रोमॅंटिक चित्रपटही सिनेइतिहासातला माईलस्टोन ठरला.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com