भैरप्पा एक जिवंत आख्यायिका!

डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड भाषेत लिहिणारे, पण संपूर्ण भारतात गाजलेल्या वाङ्‍मय कलाकृतींचे लेखक.
Bhairappa  living legend Author of literary works
Bhairappa living legend Author of literary workssakal
Updated on
Summary

डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड भाषेत लिहिणारे, पण संपूर्ण भारतात गाजलेल्या वाङ्‍मय कलाकृतींचे लेखक.

डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड भाषेत लिहिणारे, पण संपूर्ण भारतात गाजलेल्या वाङ्‍मय कलाकृतींचे लेखक. मते, दृष्टिकोन याबाबत ते कमालीचे आग्रही, ठाम. मराठीत त्यांची अनेक पुस्तके गाजली.

वंशवृक्ष, पर्व, आवरण अशा कादंबऱ्या वाचकप्रियतेमुळे मराठीत सतत पुन:मुद्रित होत असतात. ‘माझे नाव भैरप्पा’ हे त्यांचे मराठीतले गाजलेले भाषांतरित आत्मचरित्र. भारतीय साहित्यकारणात कायम वादाचा विषय ठरलेले; पण विशेष स्थान असलेले एस. एल. भैरप्पा यांच्याशी साधलेल्या संवादातून ते उलगडत गेले... ते एक जिवंत आख्यायिका आहेत, याचीच प्रचिती आली.

Bhairappa  living legend Author of literary works
IRCTC Ticket booking : आता नुसता तोंडी हुकूम दिला की बुक होणार ट्रेन तिकीट, IRCTCची नवी सेवा

प्रजासत्ताक दिनाला सालाबादाप्रमाणे पद्म पुरस्कार जाहीर झाले अन्‌ सन्मानीय यादीत एस. एल. भैरप्पा झळकले. कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तिथे स्थान मिळालेल्या या प्रतिभावंताचे चाहते कमालीचे खूष झाले.

भैरप्पांना आपण पुरस्कार दिला नाही, याची ज्ञानपीठाच्या निवड समितीला कधी तरी खंत वाटेल, असे उद्गार कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी काढले होतेच. भैरप्पा उजव्या विचारसरणीचे.

भारतीय परंपरेच्या जयघोषापासून हिंदुत्वाच्या मांडणीपर्यंत भैरप्पांची मते स्पष्ट. धर्मनिरपेक्ष विचार चोखाळणाऱ्या साहित्यिकांपेक्षा भैरप्पा पूर्णत: वेगळे. टिपू सुलतान जुलमी होता, धर्माला महत्त्व देणारा इस्लामी शासक होता, या मतापासून औरंगजेबाच्या काळात हिंदूंवर अनन्वित अन्याय झाले, या मतापर्यंत भैरप्पा कायम ठाम.

Bhairappa  living legend Author of literary works
PM Modi News: "नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर नरेंद्र मोदींच्या मित्राच्या मुलाकडून नरेंद्र मोदींचा फोटो भेट"

मोदी राजवटीत पुरस्कारवापसीचा मार्ग पत्करणाऱ्या साहित्यिकांच्या या भूमिकेवर भैरप्पांनी प्रश्न उपस्थित केले. वाचकांच्या उड्या पडणाऱ्या या लेखकावर राजमान्यतेची मोहोर उठली ती विलंबानेच. पद्मश्रीही मिळाली उशिराच.

मोदीराजवटीत प्रसिद्धीपासून अनेक योजने दूर राहणाऱ्या अपरिचित कर्मयोग्यांना मिळणारे पद्मपुरस्कार जसे प्रशंसेचा विषय ठरले आहेत, तसाच उजव्या विचारसरणीकडे समतोल बुद्धीने पाहणाऱ्या भैरप्पांचा पद्मभूषण गौरवही विशेषच भासतो.

भारतभर लोकप्रिय असलेले भैरप्पा बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक आहेत. प्रज्ञा-प्रतिभा यांचा समसमा संगम झालेले, भारतीय संस्कृतीशी नाते सांगणारे, जनमनात रुजलेले साहित्यिक व्यक्तिमत्त्व, थोर लेखक, शिवाय चिंतक.

वयाची नव्वदी ओलांडलेले. भारतभर आजही संचार. कोविडकाळातली सक्तीची संचारबंदी वगळली, तर भारताच्या सर्व प्रांतात, परदेशात सतत प्रवास करणारे. काही महिन्यांपूर्वी मुंबईत आले तेव्हा दोन प्रदीर्घ भेटीत त्यांच्याशी झालेला संवाद तसा ताजाच.

Bhairappa  living legend Author of literary works
Padm Awards 2023 : झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री

पद्मभूषण पुरस्काराबद्दल दूरध्वनीवरून अभिनंदन केले तर म्हणाले, वाचकाने वर्षानुवर्षे साहित्यकृती वाचत राहणे, हेच लेखकाला मिळणारे सर्वोत्तम पारितोषिक. पुरस्कार घोषित झाले, की त्या-त्या वेळी छान वाटते, हेही खरे; पण युगानुयुगे वाचली जाणारी कलाकृती निर्माण करता येणे, हेच लेखकाचे खरे पारितोषिक.

‘बराच उशीर झाला हा सन्मान मिळायला’ या लोकभावनेचा उल्लेख करताच भैरप्पा म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत म्हणून झाला माझा सन्मान. अन्यथा हेही घडले नसतेच.’ इतके स्पष्ट, थेट उत्तर ऐकून धक्का तर बसलाच; पण वर्षभरापूर्वीच्या गप्पांचा पटही डोळ्यासमोर उभा झाला. त्या भेटींमुळेच भैरप्पांशी ओळख झाली होती.

ठाण्याला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला ते आले होते. उमाताई कुळकर्णी त्यांच्या पुस्तकांच्या मराठीतल्या अनुवादक. ठाण्यात मुलाखत त्यांनीच घेतली. उमाताईही भैरप्पांच्या जातकुळीतल्या. तपस्वी.

दोघांचा परस्परसंवाद स्मृतीत जपण्यासारखा; पण मन त्या कार्यक्रमाने भरतेय थोडेच. मग खूप प्रयत्न करून मुंबईतला त्यांचा ठावठिकाणा मिळवला. भेटायला येऊ का, यावर काही उत्तर आलेच नाही. उमा रामाराव यांच्याकडे ते उतरले होते.

Bhairappa  living legend Author of literary works
Notebook in Books: आता पुस्तकांमध्येच लिहिण्याची सोय! विद्यार्थ्यांची होणार वह्यांपासून सुटका

वयामुळे येणारा थकवा वाढत चाललेला. त्यामुळे भेटीची वेळ द्यायला यजमान मागेपुढे पाहत होते; पण भारतीय परंपरेशी घट्ट नाते असलेल्या या सरस्वतीपुत्राशी संवाद साधायची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. मग बेळगावात पत्रकारिता करणारे साहित्य अकादमी पुरस्कारविजेते सरजू बेलागावी यांना लेखक, नाटककार अभिराम भडकमकरांच्या वशिल्याने मध्ये घातले. त्या शिफारशीने भैरप्पा वेळ द्यायला तयार झाले.

कर्नाटक समाजाचे सुंदर मंदिर सायन इस्पितळासमोर बांधले गेलेय. ‘गोकुळम’ असे त्याचे नाव. तिथे पोहोच असा निरोप मिळाला. त्या मंदिरातील मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाला भैरप्पा हजर राहणार होते. तिथेच गप्पा मारू, असे ठरले. भैरप्पा ठरलेल्या वेळेला आले. बाहेर अभ्यागतांसाठी नियमावली होती.

पिशवीत चपला टाकून फडताळात ठेवा अन्‌ मग आत प्रवेश. भैरप्पाही त्या शिस्तीचा आदर करत चपला पिशवीत ठेवून सांस्कृतिक सभागृहाकडे वळले. कुणाचीही मदत त्यांनी नाकारली. आत कुमारवयीन मुलांपासून साठी पार केलेल्या सगळ्यांच्याच नजरा अपार औत्सुक्याने आवडत्या लेखकाची प्रतीक्षा करत होत्या.

भैरप्पांचे कथन मर्मबंधात साठवून घ्यायची ओढ स्पष्ट दिसत होती. भैरप्पाही तितकेच संवादोत्सुक होते. कर्नाटकातला एक तालेवार साहित्यिक आणि फिलॉसॉफर हृद्गत व्यक्त करीत होता. कानात प्राण आणून श्रोतृवृंद ऐकत होता.

कानडीतले ते भाषण १५ मिनिटे चालले असावे. मंदिरातले सभागृह, नाट्यगृह रसिकतेने उभारलेले. संपन्न कानडी संस्कृतीचे प्रतीक. भाषणाला विराम देताच इमारतीतल्या एका कोपऱ्यात भैरप्पांनी सुरू केला शब्द दिल्याप्रमाणे संवाद.

कानडी मंडळींसाठी ऋषीतुल्य आहात आपण, याची प्रचीती आज घेता आली, असे म्हणताच भैरप्पा मंदसे हसले. अवघडलेपणा दूर करत म्हणाले : माझ्यावर कर्नाटकातले वाचक प्रेम करतातच; पण उत्तरेत आणि या महाराष्ट्रातही फार वाचली जातात माझी पुस्तके.

मंद्र या कादंबरीत तर पात्रे मराठी आहेत, महाराष्ट्राबद्दलचे खूप उल्लेख आहेत. (गायक कलाकाराच्या भावभावनांची आंदोलने टिपणाऱ्या या कादंबरीला सरस्वती सन्मान पुरस्कार मिळाला आहे.) खरे तर अवघा भारत एक आहे. प्रथा-परंपरा वेगळ्या असतील; पण आत्मा एक आहे भारताचा!

आपल्याला कानडीत लिहिणारा भारतीय लेखक म्हणतात, याकडे लक्ष वेधताच ते म्हणाले, ‘खरेय ते. मी लिहितो कानडीत. भाषा असते कानडी, पण स्पंदने असतात ती भारताची. मी फिलॉसॉफीचा प्राध्यापक. म्हैसुरात जन्म गेला. त्या शहराने माझ्यावर प्रेम केले. तेथे युनिव्हर्सिटी ग्रँट्‌स कमिशनच्या रिफ्रेशर्स कोर्सअंतर्गत प्राध्यापकांना शिकवण्याचे वर्ग घ्यायचो.

तेव्हा संपूर्ण भारतातून तरुण प्राध्यापक आलेले असायचे. त्यांच्या भावभावना, एखाद्या विषयाला ते देत असलेला प्रतिसाद याची जातकुळी एकच असायची. भारतीय उत्तर-दक्षिण असा भेद करायची गरजच नाही. भारतीयांचे मन सर्वत्र एक आहे. एकसारखे...’

गेली पन्नास-साठ वर्षे मी या एकत्वाचा अनुभव घेतो आहे सांगत, ते म्हणाले, ‘मी फिरतो. खूप फिरतो अजूनही. भारताच्या विविध प्रांतात फिरतो. त्या-त्या प्रांतांचा इतिहास तर डोळ्यासमोर असतोच; पण तिथे होत असलेले वर्तमानातले बदलही मी टिपतो.

खूप बदल होताहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथी झाल्या. भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढले, जनतेने कौल दिला; पण नंतर मुख्यमंत्रिपदावरून वाद झाला. देवेंद्र फडणवीस नाही, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पंडित नेहरूंनी निर्माण केलेली डायनॅस्टिक राजकारणाची प्रथा भारतभर रुजली आहे.

उत्तरेत मुलायमसिंग, त्यांचा मुलगा, लालूप्रसाद अन्‌ त्यांची मुले. दक्षिणेत करुणानिधी आणि त्यांचा परिवार. शिवसेनेतही तेच घडले. (उद्धव ठाकरेंनाही पायउतार व्हावे लागले अन्‌ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्याचे संदर्भ नंतर एका फोनवरच्या संभाषणात आले; पण ते नंतरचे.) मी हे सगळे पाहत असतो. वर्तमानातल्या घडामोडींपासून लेखक अलिप्त राहू शकत नाही. राहू नये, तसे करायची काही गरजही नसते.’’

मग अर्थातच विषय निघाला ‘आवरण’ या त्यांच्या गाजलेल्या पण वादग्रस्त ठरलेल्या कादंबरीचा. कर्मठ हिंदू कुटुंबातील एक सजग बुद्धिमान तरुणी मुस्लिम युवकाच्या प्रेमात पडते. लग्नासाठी सोय म्हणून धर्म बदलते अन्‌ मग आवरणे गळून पडतात, तिचा भ्रमनिरास होतो. धर्मनिरपेक्ष प्राध्यापक मंडळींचे खरे रूप यादरम्यान तिला कळते...

Bhairappa  living legend Author of literary works
पुण्याच्या ११ वर्षीय लेखकाचे पुस्तक ठरतेय Best Selling Crime Novel

हे कादंबरीचे सूत्र. ती जो अभ्यास करत असते त्यातून औरंगजेबाने केलेला इतिहासाचा भाग झालेला छळ समोर येतो, हे या कादंबरीतले समांतर कथानक. भैरप्पांच्या या कादंबरीवरून कर्नाटकात प्रचंड वाद झाला होता. मी जे लिहिलेय ते वाचकांसमोर आहे, एवढे बोलून भैरप्पा त्या विषयावर थांबले. न्यायशास्त्र, वेद, उपनिषद, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञान अशी मुशाफिरी त्यांच्या बोलण्यातून घडत होती. भेट बराच वेळ झाली असल्याने आवरती घ्यावी लागली.

नंतर लगेचच भेटीची वेळ मात्र मिळाली. या भेटीत प्रवासाचे सूत्र पुढे नेत भैरप्पा सांगू लागतात : नवा भारत उभा राहतोय. उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य भारतातले. तेथे प्रगती होतेय. नव्या भारताची प्रतीके उभी राहताहेत. कोणत्याही देशात पूर्वजांच्या पराक्रमाची प्रतीके आवश्यक असतात. ती केवळ भारतात नव्हे, तर जगात सर्वत्र उभारली जातात.

जित आणि जेते यांचे द्वंद्वही बऱ्याच ठिकाणी आढळतेच. आपल्याकडे तर इतिहास ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीने लिहिला; अन्‌ नंतरच्या पिढ्यांना शिकवला गेला. इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक मानले जातेय, ते उगाच नव्हे. राष्ट्रीय पातळीवरच्या एका अभ्यासक्रमविषयक समितीत मी होतो. पहिल्या भेटीत मी जे बोललो त्यानंतर मला पुन्हा तिथे बोलावलेच गेले नाही. असो.

जुन्या प्रतीकात देश अडकलाय का? उत्तर प्रदेशात जातीमुळे अत्याचार होतात अशी ओरड असते कायम, याबद्दल विचारताच ते लगेच उत्तरतात : हिंसेच्या, कायदा हातात घेण्याच्या घटना निंद्य. त्याबद्दल दोषींना शासन झालेच पाहिजे. घटना दुर्दैवी खऱ्या; पण चार-दोन घटना फार मोठ्या करून प्रसारित केल्या जातात.

आता तुमच्या पहिल्या प्रश्नावर येतो. भारतीय समाजाचे म्हणाल तर तो प्रतीकांत अडकलेला नाही, अजिबातच नाही. परंपरेचा सन्मान करतो समाज; पण नव्या युगाची तंत्रस्नेही भाषा इथे आत्मसात केली जात आहे. संस्कृती स्वागतशील आहे भारताची. भारताच्या प्रगतीची कथा आता थांबायची नाही.

खरे तर मला हे बदल, हा प्रवास मोहवतो. मी गावात, शहरात, परदेशात जातो तो भारतीयांची स्पंदने समजून घ्यायला. सिंगापूरचे बघू. तेथे ख्रिश्चन, चिनी आणि हिंदू संस्कृती पाईकांची संख्या जवळपास बरोबरीची. सगळेच एकमेकांसमवेत गुण्यागोविंदाने राहणारे. परस्परांच्या जीवननिष्ठांचा आदर करणारे.

Bhairappa  living legend Author of literary works
Balbharti Books : तुमचं बालपण समृद्ध करणारी बालभारतीची पुस्तकं परत कशी मिळवाल ?

तिथे हिंदू दसरा-दिवाळी ज्या देखणेपणाने साजरे करतात की थक्क व्हायला होते. त्यांची रोषणाई इतकी सुंदर की म्हैसूरला तिथल्या कंत्राटदाराला दसरा रोषणाईसाठी निमंत्रण दिले गेले. तर मला म्हणायचे काय आहे की, ही संस्कृती परंपरेबरोबरच नवतेचाही आदर करते कायम. ती ‘समाना हृदयानि व:’ची द्योतक आहे..

जगात थोर म्हणून गौरवल्या जाणाऱ्या भारतीय संस्कृतीतल्या जातिव्यवस्थेचे काय, असे विचारताच ते उत्तरले, ‘जातिव्यवस्था भारतात जन्माने नाही कर्माने, खरे तर व्यवसायाने ठरत होती. सूक्तांचा अनुवाद खोडसाळपणे केला गेला अन्‌ काही मध्यस्थांमुळे वर्णभेद फोफावले. ते संस्कृतीचा भाग नाहीत, त्याज्यच आहेत.’

१९७०च्या दशकात भैरप्पांनी जातिव्यवस्थेवर भाष्य करणारी कादंबरी लिहिली होती. दातू कादंबरीचे नाव. ओलांडणे असा त्याचा अर्थ. ब्राह्मण कुटुंबातल्या मुलीने ब्राह्मणेतराच्या प्रेमात पडणे हा कादंबरीचा विषय. या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.

नवे काय लिहिता आहात, हा कोणत्याही लेखकाला अपरिहार्यपणे विचारला जाणारा प्रश्न. नव्वदीच्या टप्प्यावर असलेल्या भैरप्पांनाही तो प्रश्न विचारलाच. ते उत्तरले : सध्या काही नाही. उत्तरकांड हे आत्तापर्यंतचे शेवटचे पुस्तक. त्यात मी रामाकडे वेगळ्या नजरेने पाहिलेय. देव न समजता मी पौराणिक व्यक्तिरेखा म्हणून बघतो. तसेच लिहिलेय. त्यानंतर नाही लिहिलेले काही. लिहेन का तेही आजच सांगता येणार नाही.’

या उत्तरानंतर भैरप्पा खुर्चीवरून वयाची कोणतीही खूण नसलेल्या ताठपणे उठले. हळुहळू आतल्या खोलीत जाऊ लागले. एखाद्या वटवृक्षाच्या पारावर बसल्याचा अनुभव होता हा... विचार पटोत न पटो, भैरप्पा एक आख्यायिका आहेत जितीजागती!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.