छत्रपती संभाजीनगर म्हणजे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळची लेणी, पितळखोरा लेणी, घटोत्कच लेणी, विद्यापीठाच्या मागं असलेली लेणी अशा अनेक महत्त्वाच्या लेणी या जिल्ह्यात आहेत. देवगिरी किल्ल्यासोबतच अंतूर, वेताळवाडी, भांगसी माता, जंजाळा ऊर्फ वैशागड यांसारखे किल्लेही आहेत. खुद्द छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू उभ्या आहेत. भडकल दरवाजा, दिल्ली दरवाजा, मक्का दरवाजा अशाप्रकारचे तब्बल १३ दरवाजे आजही आपल्याला पाहावयास मिळतात. मलिक अंबरच्या काळात निर्माण झालेली पाणचक्की अजूनही उत्तम प्रकारे कार्यरत आहे.