नॅशनल गॅलरीची दोनशे वर्षे

ब्रिटनच्या कलादालनाचा खजिना बाळगून असलेल्या नॅशनल गॅलरीला नुकतीच दोनशे वर्षे पूर्ण झाली. युरोप व इंग्लंडच्या इतिहासातील कलासाधनेचे एकूण संचित तिथे पाहायला मिळते.
National Gallery
National Gallerysakal
Updated on

- वैभव वाळुंज

ब्रिटनच्या कलादालनाचा खजिना बाळगून असलेल्या नॅशनल गॅलरीला नुकतीच दोनशे वर्षे पूर्ण झाली. युरोप व इंग्लंडच्या इतिहासातील कलासाधनेचे एकूण संचित तिथे पाहायला मिळते.

कुठल्याही देशाचे राष्ट्रीय स्मारक हे तिथल्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या बरोबरीने तोलले जाते. त्या देशातील कलेचा आणि एकूण इतिहासाचा आवाका तिथे भेट देणाऱ्या पर्यटकांना तिथल्या राष्ट्रीय दालनांमधून व कलाभवनांमधून प्रत्ययाला येतो. इंग्लंडमध्ये ब्रिटनचा राष्ट्रीय इतिहास दाखवणारे म्युझियम असले तरीही ब्रिटनच्या आणि युरोपच्या कलेच्या इतिहासाच्या संदर्भातील एक वेगळे दालन लंडनच्या मध्यवर्ती भागी स्थिरावलेले आहे आणि ते म्हणजे ब्रिटनची नॅशनल गॅलरी!

सुप्रसिद्ध ट्रॅफलगर चौकात महाकाय नेल्सन खांबाच्या आणि चार सिंहांच्या विरुद्ध दिशेने दिसणारी व बाहेर ठेवलेल्या विविध पुतळ्यांनी सजलेली येथील राजबिंडी इमारत म्हणजे कुठलीही राजेशाही वास्तू नसून ती ब्रिटनच्या कलादालनाचा खजिना बाळगून असलेली या देशाची नॅशनल गॅलरी आहे.

युरोपच्या व इंग्लंडच्या इतिहासातील कलासाधनेचे एकूण संचित सर्वसामान्य जनतेला मोफत पुरवणारी ही वास्तू म्हणजे इथल्या सगळ्या चांगल्या-वाईट गोष्टींना सोबत घेऊन जाणारी शिदोरी म्हणता येईल. जरी आता या इमारतीवर प्रामुख्याने पर्यटकांनी कब्जा केलेला असला तरीही अधूनमधून आपल्या कुटुंबासोबत त्या ठिकाणी फेरफटका मारून ‘काय ते सोन्याचे दिवस होते’ अशी हळहळ व्यक्त करणारा खासा इंग्रजी माणूस तुम्हाला येथे हमखास दिसेल. या आठवड्यात नॅशनल गॅलरीला एकूण दोनशे वर्षे पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणच्या जाज्वल्य इतिहासाला राष्ट्रीय पातळीवर उजळा मिळाला.

बहुतेक ठिकाणी बनवण्यात आलेली राष्ट्रीय दालने ही सहसा आधी खासगी मालकीची असत किंवा एखाद्या राजेशाही सत्तेकडून ताबा लोकशाही सत्तेकडे गेल्यानंतर तिथल्या सरकारांनी बदल केलेली असत. दिल्लीतही जुन्या ब्रिटिश सैन्यातील अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी व नंतर नेहरूंचे निवासस्थान बनलेल्या त्रिमूर्ती सदनात आताचे पंतप्रधान संग्रहालय बनवलेले आहे. मात्र नॅशनल गॅलरी त्याला अपवाद आहे.

लंडनमधील एक बडे प्रस्थ असणाऱ्या जॉन ज्युलियस अंगरस्टाईन या महानुभावांकडून काही चित्रे विकत घेतल्यानंतर सरकारने त्याच व्यक्तीच्या घरामध्ये नॅशनल गॅलरीची सुरुवात केली. म्हणूनच आजही इंग्लंडचे राजघराणे हे जगातील दुर्मिळ चित्रांचा सर्वात मोठा साठा असणारे घराणे म्हणून ओळखले जाते. कारण त्यांच्याकडे असणाऱ्या खासगी चित्रांच्या संग्रहाला येथील सरकारने कधीच हात लावला नाही.

त्यांच्याकडे असणाऱ्या दुर्मिळ चित्रांचा साठा अजूनही राजाच्या बकिंगहम पॅलेसमध्ये पडून आहे. म्हणूनच नॅशनल गॅलरीला जुनाट राजेशाही इमारतीचा बाज असला तरी त्यातील एकूण रचना सर्वसामान्य माणसांच्या सोयीची आणि आपुलकीची, तरीही टेट मॉडर्न गॅलरीपेक्षा वेगळी अशी दिसते. नंतरच्या काळात विविध सरकारांनी आपापल्या परीने त्यात वेगवेगळ्या चित्रांची भर टाकली आणि त्यासाठी नवीन इमारतीची रचना करण्यात आली.

त्या ठिकाणी सद्यःस्थितीत जवळपास दोन हजारपेक्षा जास्त चित्रांचा साठा ठेवलेला आहे. इथे सामान्य नागरिकांना इतका मुक्त वावर असल्याने ब्रिटिश लोकशाहीतील कोणत्याही सरकारी गोष्टीवर निर्ममपणे आघात करण्याचे कसब गॅलरीवरही आजमावले गेले. जुन्या चित्रांना उजाळी देण्यासाठी गॅलरीकडून करण्यात येणारी घाई-गडबड आणि त्यातून काही चित्रांना झालेल्या नुकसानाबाबत गेल्या दोनशे वर्षांत नेहमीच नागरिकांनी निराशा व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षीपासून पर्यावरण बदलांच्या संदर्भात लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नारंगी धुराचा किंवा रंगाचा वापर करून दुर्मिळ चित्रांवर रंग उतरणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांच्या टोळीने नॅशनल गॅलरीवरही आपला हात साफ केला होता. लंडनमध्ये राहण्यासाठी असणारी अपुरी जागा ही गॅलरीच्या अघळ-पघळ प्रदर्शनाच्या नेहमीच आड येते आहे, असा इथला कायमचा सूर.

हे सगळे मुद्दे असले तरीही इथे असलेल्या लक्षवेधी आणि तासन् तास पाहत बसावं अशा चित्रांच्या मांदियाळीमुळे ही इमारत जगभरात प्रसिद्ध आहे. वॅन गॉगने काढलेली अजरामर सूर्यफुले असोत, लिओनार्डाने काढलेली बालख्रिस्ताची मंतरून टाकणारी वळणे असोत किंवा टिमिरियाग युद्धनौकेचे ब्रिटिश खाडीतील सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर टर्नरने काढलेले अद्‍भुत विहंगम चित्र, या ठिकाणी आल्यानंतर फक्त मोफत पाहण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या जागेतील खजिनाही एका दिवसात न संपणारा आहे.

भारताला गुलामीकडे नेणाऱ्या काळात अनेक ब्रिटिश चित्रकारांनी भारतात असताना विविध चित्रे काढून कंपनी शैली ही चित्रकलेची नवी पद्धतीच विकसित केली होती व या नोकरशाहीतून उदयाला आलेल्या चित्रांचा साठाही इथे ठेवण्यात आला आहे. हल्लीच्या सिने-दिग्दर्शकांप्रमाणे तत्कालीन चित्रकारही कसे हवे तितकेच वसाहतवादी चित्र आपल्या कलेत उमटवत असत याचा वास्तवदर्शी पुरावा त्यातून मिळतो.

अनेकदा या ठिकाणी कित्येक चोऱ्या होऊ नये व शेजारी खेळणाऱ्या फुटबॉलपासून ते हिटलरी ब्लिट्‍झसारख्या मोठ्या व लहानसहान हल्लेखोरांपर्यंत अनेक आक्रमणे सहन करूनही ही गॅलरी दोनशे वर्षे उभीच आहे. त्यासाठी लागणारा निधी मोठ्या प्रमाणात कमी झाला असला तरी लंडनमधील व जगभरातील कलाप्रेमींच्या देणगीमधून त्याचा खर्च अद्याप चालवला जातो, म्हणूनच जगभरातील कलाप्रेमींची पावले या दिशेला नेहमीच वळतात. आता पुढील वर्षभर या ठिकाणी अनेक रंगारंग कार्यक्रम आणि आकर्षक दुर्मिळ चित्रांचा नजराणा भेट देणाऱ्या पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.