भांडवलाचं नियोजन व आयोजन

उद्योगासाठी लागणाऱ्या खेळत्या भांडवलाचं (कच्चा व पक्का माल, ग्राहकांना द्यावयाची उधारी, रोकड इ.) नियोजन हे खूप काळजीपूर्वक करावं लागतं...
business need Capital Planning and management team
business need Capital Planning and management team
Updated on

- डॉ. गिरीश जाखोटिया

उद्योगासाठी लागणाऱ्या खेळत्या भांडवलाचं (कच्चा व पक्का माल, ग्राहकांना द्यावयाची उधारी, रोकड इ.) नियोजन हे खूप काळजीपूर्वक करावं लागतं, कारण उद्योगाच्या वाढत्या गरजेनुसार व बाजारातील तेजी-मंदीनुसार खेळतं भांडवलही बदलत राहतं.

याचे दोन भाग करावेत - किमान लागणारं व गरजेनुसार अधिकचं लागणारं. यापैकी किमान रकमेच्या ५० टक्के हिश्शात स्वतःचं बिनव्याजी भांडवल गुंतवावं. राहिलेला ५० टक्के भाग व गरजेनुसार अधिक लागणारा भाग, यात कर्जाऊ भांडवल गुंतवावं. अर्थात इथे पुन्हा वर सांगितलेला परतफेडीचा फॉर्म्युला लागू होतो.

जर उद्योग हे ‘शरीर’ असेल, तर भांडवल हे त्यातील ‘रक्ताभिसरण’ असतं. जसा रक्तदाब हा जास्त किंवा कमी असून चालत नाही, तसंच भांडवलही जास्त अथवा अपुरं असता कामा नये. उद्योजकीय वाहनाला चालविण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे ‘भांडवल’ होय.

उद्योगासाठी लागणाऱ्या दीर्घ मुदतीच्या मालमत्तेत (इमारत, यंत्रं, वाहनं, फर्निचर इ.) दीर्घ मुदतीचं भांडवल गुंतवावं लागतं. साधारणपणे यापैकी १/३ भांडवल स्वतःचं व २/३ भांडवल कर्जाऊ असू शकतं. अर्थात, कर्ज व त्यावरील व्याज देण्याइतपत आपण ‘रोकड नफा’ कमवायला हवा. इथे फॉर्म्युला असा की, आयकर देऊन झाल्यानंतरचा वार्षिक रोकड नफा हा ‘वार्षिक कर्जाचा हप्ता व वार्षिक व्याज’ या एकूण रकमेच्या दुप्पट असावा.

(या फॉर्म्युलाचं बँकिंग क्षेत्रातील प्रचलित नाव आहे, ‘डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो’) उदाहरणार्थ - कर्जाचा हप्ता व व्याज हे शंभर रुपये असेल, तर रोकड नफा हा २०० रुपये असावा. म्हणजे ही फेड केल्यानंतर राहिलेल्या शंभर रुपयांपैकी ५० रुपये पुन्हा उद्योगात गुंतवावेत व अन्य ५० रुपये हे उद्योगातून लाभांश म्हणून मालकाने काढून घ्यावेत. या लाभांशातून त्याने आपली खासगी गुंतवणूक उभी करावी, जी भविष्यात उद्योगाच्याच वाढीसाठी उपयोगी पडू शकेल.

बहुतेक उद्योजक हे पुरवठादारांकडून अधिकाधिक बिनव्याजी उधारी घेत खेळत्या भांडवलातील स्वतःची व कर्जाऊ गुंतवणूक कमी करतात. बरेच उद्योजक आपल्या उधारीची वसुली काही बँकांना सोपवतात व स्वतः फक्त विक्रीकडे लक्ष देतात.

काही मक्तेदारी कंपन्या आपल्या डीलर्सकडून बिनव्याजी ॲडव्हान्स घेतात व खेळतं भांडवल म्हणून वापरतात. एकाच मोठ्या ग्रुपमध्ये असणाऱ्या दोन कंपन्या एकमेकांना सिझननुसार आपल्याकडील अतिरिक्त खेळतं भांडवल उधारीने देतात.

स्वस्त भांडवल मिळविण्याचे अनेक नवे व जुने मार्ग आहेत. साधारणपणे नामांकित कंपनीचं ‘लिस्टिंग’ (नोंदणीकरण) हे एखाद्या स्टॉक मार्केटवर झालेलं असतंच. अशी कंपनी स्वतःचं व्हॅल्युएशन उत्तम असल्याने आपला दहा रुपयांचा शेअर हा पाचशे रुपयांना सामान्य गुंतवणूकदारांना विकते.

यातील चारशे नव्वद रुपयांचा ‘शेअर प्रीमियम’ ही कंपनी गुंतवणूकदारांना लाभांश न देता वापरू शकते. अशा सुदृढ कंपनीला कमी व्याजाने बँकांची कर्जं व सामान्य गुंतवणूकदारांच्या ठेवी मिळू शकतात. यास्तव उद्योगाचं व्हॅल्युएशन सातत्याने वाढवत रहायला हवं, जे उद्योजकीय कामगिरीनेच साध्य होतं.

चेन्नईमधील एका आदरणीय परिवारातील उद्योजकाने आपल्या समाजातील पाच हजार कुटुंबांना त्यांच्या ‘मुदत ठेवी’ मागितल्या. त्याने या कुटुंबांना बँकेपेक्षा एक टक्का व्याज जास्त, म्हणजे ८ टक्के दिलं. हा बँकेचं कर्ज १० टक्क्यांनी घ्यायचा. याचे दोन टक्के वाचले. कुठलंही वेगळं तारण याला द्यावं लागलं नाही. म्हणजे ठेवीदारांचा व याचाही फायदा झाला.

बऱ्याच व्यापारी समाजांमध्ये असे ‘सामुदायिक कर्जा’चे (क्लाऊड फंडिंग) पारंपरिक व्यवहार गेली शेकडो वर्षं सुरू आहेत. याच पद्धतीने नामांकित कंपन्या आपल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या ठेवी स्वीकारतात. काही अजस्र कंपन्या स्वतःच्या नावावर आंतरराष्ट्रीय बाजारातून अगदी स्वस्त कर्ज उचलतात व आपल्या छोट्या पुरवठादारांमध्ये आणि वितरकांमध्ये एक-दोन टक्के जास्तीचे घेऊन या कर्जाचं पुनर्वाटप करतात. अर्थात, याचा अंतिम फायदा या मोठ्या कंपनीला होतोच.

काही कंपन्या नव्या भागधारकांना ‘मतदानाचा अधिकार नसलेले’ शेअर्स देतात. या शेअर्सवरील लाभांशाचा दर हा नेहमीच्या दरापेक्षा अधिक असतो. काही कंपन्या गुंतवणूकदारांच्या ठेवींचं रूपांतर शेअर्समध्ये सुयोग्य भावाने करतात.

यामुळे कंपनीला ठेवींची परतफेड करावी लागत नाही. गुंतवणूकदारांनाही बाजारभावापेक्षा कमी दराने हे शेअर्स मिळतात व त्यांचा ‘भांडवली फायदा’ होतो. आंतरराष्ट्रीय कंपन्या जपानी बँकांकडून अत्यल्प व्याजदराने कर्जं घेऊ शकत असल्याने त्यांचा उद्योजकीय विस्तारही झपाट्याने होतो.

थोडक्यात असं की, तुम्ही कोणत्या दराने भांडवल घेता व कोणत्या दराने ते उद्योगात गुंतवता यावर भांडवलाचं संपूर्ण नियोजन व आयोजन अवलंबून असतं. इथे आपण म्हणू शकतो की, कर्जाऊ भांडवल हे स्वतःच्या भांडवलापेक्षा स्वस्त असतं. याचं कारण असं की, कर्जावर आपण दहा टक्के व्याज देतो; परंतु स्वतःच्या भांडवलावर आपल्याला २० टक्के परतावा हवा असतो.

यास्तव उद्योगाच्या दूरगामी वाढीसाठी स्वतःच्या भांडवलाचं टप्प्याटप्प्याने रेशनिंग करणं गरजेचं असतं. आपली कंपनी सुदृढ असल्यास आपल्या २५ रुपये इतक्या स्वतःच्या भांडवलाच्या गुंतवणुकीसोबत बँका ७५ रुपये कर्ज द्यायला तयार असतात. बरीच दशकं तमिळनाडूमधील बरेच उद्योग समूह कर्ज घेत नसत, यामुळे त्यांची वाढ जेमतेमच झाली. तेथील तरुण उद्योजकांची आजची पिढी मात्र योग्य कर्जाचं महत्त्व जाणून आहे.

थोड्या धोकादायक किंवा अनिश्चित प्रदेशांत (उदाहरणार्थ - अफगाणिस्तान), अथवा प्रचंड वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानात किंवा वेगाने बदलणाऱ्या ग्राहकांच्या सवयीत हुशार उद्योगपती सुरुवातीला स्वतःची कमीतकमी भांडवली गुंतवणूक करतात. इमारत, यंत्रं, वाहनं, जमीन इ. दूरगामी मालमत्ता (इन्फ्रास्ट्रक्चर) ते भाड्याने (लीजवर) घेतात.

उद्योग नीटपणे स्थिरस्थावर झाल्यानंतर व वाढीची शाश्वती पटल्यावर हे उद्योगपती मालमत्ता खरेदी करू लागतात. छोट्या उद्योजकांनीसुद्धा पुरेसा कॅश फ्लो मिळण्याची खात्री होईपर्यंत मोठं किंवा महागडं कर्ज घेऊ नये. शक्यतो सर्व नफा हा काही वर्षं उद्योगात गुंतवावा. काटकसर करीत स्वतःसाठी कमी पगार घ्यावा व होणारी बचत उद्योगाकडे वळवावी.

कमी भाडेतत्त्वावर घेतलेली मालमत्ता शक्यतो वापरावी. म्हणजे दुर्दैवाने जम न बसल्यास कमीतकमी नुकसान सोसत बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध असायला हवा. अर्थात, याचा अर्थ असा नव्हे की, आपली महत्त्वाकांक्षा सोडून द्यावी. इथेच भांडवलाच्या वापरासाठीचा स्ट्रॅटेजिक प्लॅन खूप उपयोगी पडतो.

भांडवलाचा उपयोग हा नीटपणे होतो आहे की नाही, हे सातत्याने पहावं लागतं. यासाठी हा उपयोग किती क्षमतेने करायला हवा, याचे मापदंड (बेंचमार्क्स) आपणास माहीत असायला हवेत. इथे दोन परिमाणं महत्त्वाची ठरतात - गुंतवलेल्या भांडवलावरचा परतावा आणि अशा गुंतवणुकीचं रोटेशन.

रिपेअर्स व मेंटेनन्स, लॉजिस्टिक, संशोधन व विकास, खरेदी इ. फंक्शनल विभागांमध्ये केलेली गुंतवणूक ही काळजीपूर्वक तपासली पाहिजे. यासाठी या फंक्शनल विभागांना ‘स्वतंत्र उद्योग’ समजून त्यांचा परतावा मोजला पाहिजे.

(यासंबंधीची चर्चा आपण स्वतंत्रपणे करणार आहोत.) उद्योगात भांडवलाचा एक रुपयासुद्धा अनुत्पादक राहता कामा नये. यासाठी भरपूर रोकड नफा कमावणाऱ्या कंपन्या एकतर उद्योग वाढवून किंवा नवा उद्योग सुरू करून अशा अधिकच्या नफ्याची गुंतवणूक वेळोवेळी करतात. अशी शक्यता जेव्हा नसते, तेव्हा हा वाढीव नफा स्वतःच्या खासगी गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये नीटपणे गुंतवून भावी उद्योजकीय गरजांसाठी स्वतःचं भांडवल उभं केलं जातं.

भांडवलाचं नियोजन व आयोजन हे जेवढं दूरगामी व व्यूहात्मक असतं, ते तेवढंच रोजचं प्रक्रियात्मकही (ऑपरेशनल) असतं. मित्रांनो, पुढील भागात आपण पाहूयात ‘चौफेर उद्योजकीय कामगिरीसाठीचं अकाउंटिंग’.

(लेखक हे व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. देशात व परदेशांत त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.