‘पूछकटी’ ऊर्फ ‘बांडी’

‘कॅटरिना’ ऊर्फ ‘पूछकटी’ ऊर्फ ‘बांडी’ वाघीण गाईडबरोबरच पर्यटकांचेही आकर्षण होती. सदैव दक्ष असलेली ‘बांडी’ वाघीण आपल्या पिल्लांची अतिशय ममतेने काळजी घ्यायची.
catrina bandi tiger
catrina bandi tigersakal
Updated on

- संजय करकरे

‘कॅटरिना’ ऊर्फ ‘पूछकटी’ ऊर्फ ‘बांडी’ वाघीण गाईडबरोबरच पर्यटकांचेही आकर्षण होती. सदैव दक्ष असलेली ‘बांडी’ वाघीण आपल्या पिल्लांची अतिशय ममतेने काळजी घ्यायची. तिची पिल्लेही इतकी आज्ञाधारक होती की, त्यांची साधी झलकही पर्यटकांना कधी पाहायला मिळत नसे. शेपूट तुटलेल्या ‘बांडी’ वाघिणीच्या पिल्लांचे पहिले दर्शन मलाच झाले... तिने आपली शेपटी गमावली होती. शेपटीची जखम अधिकच चिघळल्याने व्याघ्र प्रकल्पाने युद्धपातळीवर तिचा तपास केला; पण ती सापडली नाही. ऑगस्टच्या सुमारास मात्र अचानक दर्शन देऊन सर्वांना सुखद धक्का दिला...

गेल्या भागात मी सुप्रसिद्ध वाघीण ‘माया’ हिची आई ‘लीला’ची गोष्ट सांगितली होती. आजच्या भागात मी ‘लीला’ची आई म्हणजेच ‘माया’ची आजी ‘कॅटरिना’ ऊर्फ ‘पूछकटी’ ऊर्फ ‘बांडी’ वाघिणीबद्दल बोलणार आहे. मला स्पष्ट आठवतो तो दिवस... ५ जून २००७ रोजी सकाळी पावणेसहा वाजता मी मोहर्लीहून जंगलात प्रवेश केला. उन्हाळा असल्याने जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी वाघांचे दर्शन कमी-अधिक प्रमाणात होत होते.

मोहर्लीच्या तेलिया तलावाच्या काठाने फिरून आमची गाडी ताडोबाच्या मुख्य डांबरी रस्त्याला लागली. खातोडा येण्याच्या अगोदरच दूरवरून एक वाघ रस्ता पार करून जाताना दिसला. त्या वेळेस खासगी गाड्यांना जंगलात प्रवेश असल्याने आणि साडेपाच वाजताच पार्क सुरू झाल्याने बहुतांश गाड्या ताडोबाच्या दिशेने निघून गेल्या होत्या. त्यामुळे केवळ आमच्याच गाडीला दूरवरून रस्ता पार करणाऱ्या या वाघाने दर्शन दिले होते.

मात्र, त्याने काही समाधान झाले नाही. सगळ्यांचे लक्ष पांढरपवनीमध्ये दिसणाऱ्या वाघिणीकडे आणि तिच्या पिल्लांकडे लागले होते. कधी आपण तिथे पोहोचतो आणि कधी आपल्याला ही वाघीण दर्शन देते, असे झाले होते. साधारण साडेसहाच्या सुमारास आमची गाडी पांढरपवनी परिसरातील बोडी नंबर दोनजवळ येऊन थांबली. मात्र, तिथे गाड्यांची मोठी गर्दी झाली होती. सर्व जण व्यवस्थित गाड्या लावून वाघिणीची जणू वाटच बघत होते.

त्या वेळेस या तलावाच्या समोरच्याच बाजूला म्हणजेच नवेगाव रस्त्याने काहीसे पुढे जाऊन उजवीकडे वळणाऱ्या बामनगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरही गाड्या घेऊन जाता येत होते. त्यामुळे तलावाच्या समोरच्या बाजूलाही तेथील लोखंडी मचाणाच्या जवळ अनेक गाड्या उभ्या होत्या. आम्हीही जागा बघून गाडी लावली. पावणेसातच्या सुमारास तलावाच्या मागच्या बाजूने एकापाठोपाठ चितळांचे कॉल यायला लागले.

वाघिणीचे आगमन होत असल्याची जणू ती वर्दीच होती. तलावाच्या भिंतीवर, गवतातून वाघीण आल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. ती वाघीण त्या बंधाऱ्यावर काही क्षण थांबली. डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या गाड्यांकडे नजर टाकत ती हळूहळू पाण्याकडे खाली आली. साधारण पाच-सात मिनिटे तिथे थांबल्यावर ती त्या उथळ पाण्यातूनच समोरच्या बाजूला आली. या बोडीच्या मध्यभागी एक बेट तयार झाले होते.

त्या बेटावर चांगलेच उंच गवत आणि झाडांची गर्दी झाली होती. ती वाघीण पाण्यातून बाहेर येऊन त्या बेटाच्या जवळ आली. तिने बेटाकडे बघून काहीतरी सूचना, आवाज केल्याचे लक्षात आले. बेटावरील गवतात लपलेली दोन पिल्ले कमालीच्या वेगाने आणि उत्सुकतेपोटी आपल्या आईजवळ धावत आली. इतक्या वेळापासून डोळ्यात हे सारे दृश्य साठवण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांच्या तोंडून अनेक चित्कार त्यावेळेस बाहेर पडले.

सारे वातावरण थरारून गेले. मग या वाघिणीने पाण्याच्या कडेला बस्तान मांडले. साधारण साडेचार-पाच महिन्यांची असणारी ही दोन्ही पिल्ले मग तिला अंग घासत, दूध पिऊ लागली. या वेळेस या दक्ष आईने अतिशय ममतेने त्यांना चाटायला सुरुवात केली. पुढचा अर्धा तास हे सारे सुरू होते. काही वेळाने मग ती आई उठली आणि या बेटावरील गवतात नाहीशी झाली. सर्व गाईडना माहीत झाले होते की, ही वाघीण या बेटावर तिच्या पिल्लांसह आहे.

संध्याकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास मग ही वाघीण या बेटावरून बाहेर पडे. ही वाघीण बेटावरून बाहेर पडून पुन्हा पाण्यातून जात व बंधाऱ्यावर चढून समोरच्या बाजूला असलेल्या जंगलात निघून जाई. दूरवरून चितळांचे  कॉल कानावर येत. या पिल्लांना ती या बेटावरील गवतात लपवून ठेवत असे. ती पिल्लेही इतकी आज्ञाधारक होती की, त्यांची लहानशी शेपूट अथवा साधी झलकही पर्यटकांना होत नसे.

५ जूनच्या त्या दिवशी ताडोबात साधारण दोनशेच्या वर गाड्यांनी दिवसभरात प्रवेश केल्याचे मला आठवते. त्यातील निम्म्याहून अधिक गाड्यांनी या वाघिणीचे दर्शन घेतले असावे. ‘बांडी’ वाघिणीचा हा जलवा त्यावेळी असा सुरू होता. या शेपूट तुटलेल्या वाघिणीच्या पिल्लांचे पहिले दर्शन मलाच झाले होते, हाही मोठा रोमांचक प्रसंग आहे.

फेब्रुवारीमध्ये मिरज येथील डॉक्टर विजय तुळजापूरकर ताडोबात माझ्यासोबत आले होते. आम्ही जंगलात फिरत असताना १४ फेब्रुवारी रोजी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ला सकाळच्या फेरीला बाहेर पडलो. पांढरपवनी आणि अन्य परिसर बघून आम्ही नवेगावच्या रस्त्यावरून निघालो होतो. सोबत तुलसी गाईड होता. नवेगावचा रस्ता सरळ असल्याने दूरवरूनही रस्त्यावर असणारे प्राणी पटकन लक्षात येतात.

सकाळी आठ-सव्वाआठच्या सुमारास रस्त्यावरून कुठला तरी प्राणी चालत येत असल्याचे लक्षात आले. गाडी थोडी पुढे गेल्यानंतर नीट बघत असतानाच तो वाघ असल्याचे जाणवले. दुर्बिण डोळ्याला लावून बघत असतानाच त्या वाघाच्या मागे दोन लहान पिल्ले चालत असल्याचे दिसून आले. ती वाघीण किंचित तिरपी झाल्याबरोबर तिला शेपटी नसल्याचे लक्षात आले.

तीन महिन्यांहून लहान आकाराची ती पिल्ले आईच्या मागे दुडदुडत येत होती. गाडीला बघून ‘बांडी’ वाघीण थांबून, अंदाज घेऊन रस्ता पार करून फाशीलागा फायर लाईनच्या दिशेने आत निघून गेली. ‘बांडी’ला पिल्ले झाल्याची बातमी मोठी होती. आम्ही ताडोबाच्या कॅन्टीनमध्ये परत आल्यानंतर आमच्याजवळ असलेली मिठाई तेथील गाईड आणि पर्यटकांना देऊन ही आनंदाची वार्ता सर्वांना सांगितली.

वायरलेस करून ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. शेषराव पाटील यांनाही ही बातमी दिली. या वाघिणीबद्दल फारसा तपशील उपलब्ध नाही. ती कोणाची मुलगी होती, कोणापासून झाली ही माहिती नाही. ही वाघीण काळा आंबा, भानुसखिंडी, पांढरपवनी परिसराला धरून होती. त्यावेळेस प्रसिद्ध असलेल्या या वाघिणीने तिची शेपटी कशी गमावली, याबाबत एक माहिती तेव्हा समजली होती.

या वाघिणीच्या शेपटीला जखम झाल्याचे पर्यटकांच्या लक्षात आले. ही माहिती व्याघ्र प्रकल्पाला दिल्यानंतर या वाघिणीवर  उपचार करण्यासाठी त्यांनी डॉक्टरांची नेमणूक केली; पण या वाघिणीचा पत्ता लागला नाही. काही काळानंतर शेपटीची जखम अधिकच चिघळल्याचे व तिने ती गमावल्याचे लक्षात आल्यावर व्याघ्र प्रकल्पाने युद्धपातळीवर तिचा तपास करण्यासाठी आणि तिची प्रकृती समजून घेण्यासाठी खास मोहीम राबवली.

त्या वेळेस क्षेत्र संचालक पाटील यांनी दोन ते तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून ६० ते ७० जणांना या वाघिणीच्या क्षेत्रात नेमले. त्या वेळेस अनेक जण पाणवठ्याच्या जवळ मचाण करून, त्यावर दिवस-रात्र बसून या वाघिणीला बघण्यासाठी तसेच शेपटीची जखम अधिक गंभीर होत नाही ना याचा तपास करण्यासाठी गुंतून होते; पण जसे माणसांचा आणि वन कर्मचाऱ्यांचा वावर जंगलात वाढला तसे या वाघिणीने आपले क्षेत्र बदलून या सर्व कर्मचाऱ्यांना गुंगारा दिला.

त्या वेळेस आताच्या काळासारखा कॅमेरा ट्रॅपचा वापर होत नसल्याने, प्रत्यक्ष या वाघिणीला बघूनच तिचा मागोवा घेण्याचा प्रयत्न झाला. अनेक दिवस ही मोहीम सुरू राहिली. मात्र, पाऊस सुरू होईपर्यंत तिचा तपास लागला नाही. या वाघिणीचे काही बरे-वाईट झाले, असाच समज त्या वेळेस झाला होता.

ऑगस्टच्या सुमारास ताडोबात असताना क्षेत्र संचालक पाटील तेथे आले होते. काम झाल्यानंतर आम्ही त्यांच्या गाडीतून जंगलात दुपारी फिरायला बाहेर पडलो. त्या वेळेस पांढरपवनीकडून वाघाई रोडने जात असताना अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला फायर लाईनवर एका वाघाने दर्शन दिले. चांगला पाऊस झाल्यामुळे जंगल हिरवेगर्द होते व भरपूर गवत फायर लाईनवरही होते.

अचानक या वाघाने आडवे होऊन रस्त्यावर प्रवेश करताच ती ‘बांडी’ वाघीण असल्याचे लक्षात आले. गाडीतील आम्ही सर्व जण थरारून गेलो. अनेक दिवस बेपत्ता असणाऱ्या या वाघिणीने असे अचानक दर्शन देऊन सर्वांना सुखद धक्का दिला होता. या वाघिणीला त्या काळात अनेक वेळा बघितले. एकदा तर बोडी नंबर दोनच्या मागच्या बाजूला आम्ही थांबलो असताना अचानक ही वाघीण गवतातून वेगाने बाहेर येऊन चितळांच्या कळपावर धावून गेली.

चितळांच्या कळपाची मोठी दाणादाण उडाली. अतिशय मोठ्याने अलार्म कॉल करत चितळांचा तो कळप उड्या मारत दूरवर निघून गेला. ‘बांडी’ची शिकार फसली, असे आम्ही समजत असतानाच अचानक तिने गवतातून बाहेर प्रवेश केला. या वेळेस तिच्या तोंडात चितळाचे एक लहान पिल्लू तडफडताना मी अतिशय जवळून बघितले. ती इतक्या पटकन त्या गवतातून बाहेर आली की कॅमेऱ्याचा फोकस करून ते अद्‍भुत दृश्य टिपण्यासाठीचा माझा प्रयत्न असफल झाला.

शाळेतील विद्यार्थ्यांचा एक कॅम्प ताडोबात सुरू असताना विद्यार्थ्यांना घेऊन सायंकाळच्या फेरीत मी काळाआंबा रोडने जात असतानाच रस्त्यावर ओल्या मातीत वाघांच्या पावलांचे ठसे स्पष्टपणे उमटलेले दिसले. आम्ही खाली बघून अंदाज घेत पुढे जात असतानाच रस्त्याच्या मधोमध ही सुप्रसिद्ध वाघीण आपल्या दोन्ही पिल्लांना घेऊन समोरच्या बाजूला आरामात निघाली होती. गाडीच्या खिडकीबाहेर डोकावत मी तिचे फोटो काढले.

२००७ ते २००९ पर्यंत या वाघिणीचा वावर ताडोबाच्या या सर्वात सुंदर अशा जंगलात होता. त्यानंतर पिल्ले मोठी झाल्यानंतर ही वाघीण पुन्हा दिसेनासी झाली. पुढे अनेक दिवस या वाघिणीच्या दर्शनाच्या इकडून तिकडून बातम्या येत राहिल्या; पण कोणतीही मोठी अपडेट मिळाली नाही. या वाघिणीने हा काळ तिच्या बिनधास्त आणि बोल्ड वागण्यामुळे गाजवून टाकला होता. तिच्याच पावलावर पाऊल ठेवून ‘लीला’ वाघीण आणि तिची मुलगी ‘माया’ ताडोबाच्या या भूभागावर बिनधास्त जगल्या.

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com