कमबॅक मॉम
मला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. पहिला मुलगा झाला. मुलाचा जन्म झाला तेव्हा माझी घरची परिस्थितीही म्हणावी तेवढी चांगली नव्हती. थोड्या प्रमाणात आर्थिक अडचण होती. त्यामुळे मी अगदी एक-दीड महिन्यांतच घराबाहेर पडले. लगेचच नाटक, मालिकांमध्ये काम करण्यास सुरवात केली. माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. मी स्वतःला फार नशीबवान मानते, की आई झाल्यानंतरही माझ्या क्षेत्रात काम करताना मला घरच्यांचा फार पाठिंबा मिळाला. कुटुंबाची जबाबदारी, चित्रीकरणाच्या वेळा सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरतच. पण यादरम्यान माझी आई माझ्या पाठी खंबीरपणे उभी राहिली.
मी माझ्या मुलाच्या जन्मानंतर नाटकांचे दौरेही करत होते. तेव्हा जवळपास १५ ते २० दिवसांचा नाटकाचा दौरा असायचा. त्यामुळे मी मुलाला आईजवळच ठेवून जायचे. कारण मुलांना बेबी सीटिंगला ठेवायचं नाही, हे माझं आणि माझ्या नवऱ्याच ठरलेलं होतं. बरेच दिवस नाटकाच्या दौऱ्यानिमित्त मी बाहेरगावी गेली की, मला मुलाची फार आठवण यायची. जीव कासावीसही व्हायचा. कारण शेवटी आईचं मन आहे, पण त्यातूनही मी स्वतःला सावरलं. मला माझ्या मुलाला तेव्हा फारसा वेळही देता आला नाही, याची थोडी खंत वाटते. त्याच्याबरोबर त्याचं बालपण मला जगता आलं नाही. पण त्यानंही कधी माझ्याकडं कोणता हट्ट केला नाही किंवा आई जवळच असली पाहिजे, असा त्याचा आग्रहही नसायचा. मी या कलाक्षेत्रात प्रेग्नंसीनंतर कमबॅक केलं, ते माझ्या आई आणि कुटुंबामुळेच.
प्रेग्नंसीनंतर आईच्या घराशेजारीच, म्हणजे ठाण्यामध्ये घर घेतलं. त्यामुळे मला अधिकच सोईस्कर झालं. माझ्या मुलीच्या जन्मानंतर मात्र मी कलाक्षेत्रामधून पूर्ण एक वर्षाचा ब्रेक घेतला. तिच्याबरोबर मी तिचं बालपण खूप एन्जॉय केलं. तेव्हा माझी आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीही स्थिरावली होती. मुलीच्या वेळी मी आईपणाचा आनंद मनसोक्त उपभोगला. दोन्ही मुलांना सांभाळत असताना माझं कामाकडे कधीच दुर्लक्ष झालं नाही. अभिनयामध्येही मी माझे शंभर टक्के दिलं. परिस्थितीनुसार मुलंही आपल्याला सांभाळून घेतात आणि समजूतदार बनतात. मुलांनी माझ्या प्रत्येक कामात मला पाठिंबा दिला. मला कधीही दोन्ही मुलांमुळे चित्रीकरण अर्धवट सोडून घरी परतावं लागलं नाही किंवा दोघंही लहान असताना मी त्यांना कधीही कोणत्या सेटवरही घेऊन गेले नाही. सेटवर नेण्यापेक्षा आपली मुलं घरी अधिक सुरक्षित असतात, असं मला वाटतं.
कलाकार म्हटल्यावर चित्रीकरणाच्या वेळाही ठरलेल्या नसतात. शिवाय कधीकधी कामाचाही ताण असतो. पण या काळातही मला माझ्या दोन्ही मुलांना वेळ देता आला नाही, तरी त्यांनी मला समजून, सांभाळून घेतलं आहे. आता दोन्ही मुलं मोठी झाली आहेत. मोठा मुलगा मिहीर २१ वर्षांचा आहे, तर जान्हवी १४ वर्षांची आहे. आता मी त्यांना पुरेसा वेळ देते. माझं काम सांभाळत मी कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देण्याकडे लक्ष देते. कुटुंबाबरोबर, मुलांबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण फार मौल्यवान असतो, असं मला वाटतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.