हिमालय पर्वतरांग नितांत सुंदर हिमशिखरांनी नटलेली आहे. यात नेपाळ व तिबेटला वेगळी करणारी जी शिखरं आहेत, त्यात जगातील काही सर्वोच्च शिखरांचा समावेश होतो. एव्हरेस्टच्या एका बाजूला नेपाळ तर दुसऱ्या बाजूला तिबेट आहे. याच पर्वतरांगेमध्ये एव्हरेस्टपासून अवघ्या १९ किलोमीटरवर वसलेले आहेत माउंट मकालू. ८ हजार ४८५ मीटर उंच, पिरॅमिडसारखं दिसणारं शिखर. उंचीनुसार एव्हरेस्ट, के २, कांचनजुंगा व ल्होत्से या चार शिखरानंतर येणारं पाचवं उंच शिखर.