चारशे वर्षांनंतर प्रथमच सूर्यमालेतील मोठे असे गुरू व शनी ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ आलेले डिसेंबर महिन्यात पाहावयास मिळेल. येत्या २१ तारखेला गुरू व शनीची दुर्मीळ युती होत असून, यापूर्वी १६ जुलै १६२३ रोजी देखणी युती घडली होती. साधारणपणे दर २१ वर्षांनी गुरू शनीजवळ येऊन त्यांची युती होते. मात्र, बऱ्याच वेळा त्यांच्यातील अंतर एक अंशापेक्षा जास्त असते. या वेळी मात्र या दोन ग्रहांमधील अंतर फक्त ०.१ अंश (चंद्राच्या व्यासाच्या एकपंचमांश) एवढे कमी असेल. या प्रकारची युती ४०० वर्षांपूर्वी म्हणजे मार्च १२२६ मध्ये झाली होती.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गेले काही महिने गुरू व शनी एकमेकांजवळ येत असून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर एकमेकांपासून १ अंशांपेक्षा कमी अंतरावर दिसतील. यावेळी सोनेरी रंगाच्या तेजस्वी गुरूजवळ त्याच्यापेक्षा बारापट मंद तेजाचा पिवळसर शनी दिसेल. डिसेंबर २१ मधील त्यांच्यामधील अंतर अवघे ०.१ अंश एवढे होत असल्याने नुसत्या डोळ्याने ते दोन ग्रह नसून एकच तेजस्वी ग्रह असल्यासारखे वाटेल. दुर्बिणीमधून पाहिल्यास ते दोन ग्रह असल्याचे दिसेल. हे ग्रह एकमेकांलगत दिसत असले तरी प्रत्यक्षात गुरू ८८ कोटी किलोमीटर व शनी १६१ कोटी किलोमीटर अंतरावर आहे. यावेळची युती पाहता नाही आली तर १५ मार्च २०८० रोजीची वाट पहावी लागेल व त्यानंतर २४००मध्ये या प्रकारची युती पाहता येईल.
ग्रह :
बुध : पहाटे पूर्व क्षितिजालगत बुध दिसत असून तो सूर्याकडे सरकत आहे. महिन्याच्या प्रारंभी सकाळी सहा वाजता उगवणारा बुध हळूहळू उशिरा उगवत जाऊन संधी प्रकाशात दिसेनासा होईल. त्याची सूर्याबरोबर युती २० तारखेला होईल व त्यानंतर म्हणजे जानेवारीमध्ये तो पश्चिम क्षितिजावर सायंकाळी दिसू लागेल.
शुक्र : दक्षिणपूर्व क्षितिजावर, सूर्योदयापूर्वी सुमारे दोन तास शुक्र उगवताना दिसेल. तो हळूहळू क्षितिजावर उंच चढतानाच संधीप्रकाश वाढून दिसेनासा होईल. डिसेंबर महिन्यात शुक्र सूर्याकडे सरकत असल्याने उशिरा उशिरा उगवत जाईल. या महिन्यात शुक्र तुळेकडून वृश्चिकेत जाईल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वृश्चिकेच्या ज्येष्ठा या तांबूस ताऱ्याजवळ शुक्र दिसेल. यावेळी शुक्र तेजस्वी म्हणजे उणे ३.८ तेजस्वितेचा तर ज्येष्ठा त्यापेक्षा मंद म्हणजे ५.२ तेजस्वितेची असेल.
मंगळ : अंधार पडताच डोक्यावर दिसणाऱ्या मीन राशीतील नारिंगी रंगाचा ठिपका हा मंगळाचा आहे. या महिन्यात तो रात्री अडीच तीन वाजेपर्यंत दिसू शकेल. ऑक्टोबर महिन्यात मंगळाची प्रतियुती झाली होती. त्यानंतर आता मंगळ पृथ्वीपासून दूर जात असल्याने काहीसा मंद दिसू लागला आहे. तसेच त्याचे १४ विकलांचे बिंब छोटे होत १० विकलांएवढे दिसू लागेल.
गुरू-शनी : सूर्यास्तानंतर दक्षिण पश्चिम क्षितिजावर सूर्यमालेतील दोन मोठे ग्रह एकमेकांजवळ दिसतील. गेल्या काही महिन्यापासून गुरू व शनी एकमेकांकडे सरकताना दिसत आहे. गुरू तेजस्वी व सोनेरी रंगाचा तर शनी काहीसा मंद व पिवळसर रंगाचा दिसत आहे. धनू राशीच्या काठावरचा गुरू हळूहळू शनीकडे सरकत असून डिसेंबरच्या २१ तारखेला ते एकमेकालगत दिसतील. त्यांच्यामधील अंतर अवघे ०.१ अंश होत असल्याने नुसत्या डोळ्याने ते दोन ग्रहाऐवजी एकच ग्रह असल्यासारखे दिसेल. हे ग्रह शेजारी दिसत असले तरी प्रत्यक्षात गुरू आपल्या जवळ व शनी त्यापेक्षा दुप्पट अंतरावर असेल. गुरू शनीची या प्रकारची युती यापूर्वी जुलै १६२३मध्ये दिसली होती.
युरेनस-नेपच्यून : फक्त दुर्बिणीतून दिसू शकणारे हे दोन ग्रह सायंकाळी दक्षिण आकाशात दिसतील. युरेनस मेष राशीतील अल्फा ताऱ्याजवळ तर नेपच्यून कुंभ राशीतील फाय ताऱ्याजवळ दिसेल.
उल्का वर्षाव : ‘जेमीनीडस’ नावाचा उल्कावर्षाव १३/१४ डिसेंबरच्या पहाटे मोठ्या प्रमाणात दिसतो. यावेळी मिथुन राशीच्या कश (कॅस्टर) ताऱ्याजवळून सर्वत्र उल्का फेकल्याचे दिसेल. या वर्षी चंद्रप्रकाशाचा त्रास नसल्याने १४ डिसेंबरला पहाटे अंधाऱ्या ठिकाणाहून ताशी ५०-१०० उल्का पडल्याचे दिसेल. ध्रुवमत्स्यातील बीटा ताऱ्या जवळून फेकल्या जाणाऱ्या ‘उर्सीडस’च्या उल्का २१/२२ डिसेंबर रोजी दिसतील.
चंद्र-सूर्य : कार्तिक अमावस्या १४ डिसेंबर रोजी तर मार्गशीर्ष पौर्णिमा ३० तारखेला होईल. चंद्र पृथ्वीजवळ १३ तारखेला तर पृथ्वीपासून दूर २५ तारखेला पोचेल. सूर्य दक्षिणत्तम स्थानावर (अविष्टंभ) २१ तारखेला पोचेल. आता यानंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागून आपल्याकडे दिवस मोठे व रात्री लहान होऊ लागतील. यावर्षीचे शेवटचे ग्रहण १४ डिसेंबर रोजी होईल. हे खग्रास सूर्यग्रहण असून पॅसिफिक समुद्र, दक्षिण अमेरिका व अटलांटिकमध्ये दिसेल. चिली व अर्जेंटिनामध्ये २ मिनीट १० सेकंदभर सूर्य चंद्राआड लपून खग्रास ग्रहण दिसेल.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.