माणूस बदलावा अन् निसर्गही बदलावा

आदिवासी भागात संपत्ती आहे. ही देवाची देणगी आहे. डोंगरदऱ्यात पारंपरिक ज्ञान-निसर्ग आहे. देशाकडं जो ठेवा आहे तो जपला पाहिजे.
changes in human will change nature tribal area most beautiful and nature conservative
changes in human will change nature tribal area most beautiful and nature conservativeSakal
Updated on

- राहीबाई पोपेरे

आपल्या देशातील कुठलाही आदिवासी भाग पाहा, तो खजिना आहे. आमच्याकडं तर सह्याद्रीच्या रांगा आहेत. आदिवासी भागात संपत्ती आहे. ही देवाची देणगी आहे. डोंगरदऱ्यात पारंपरिक ज्ञान-निसर्ग आहे. देशाकडं जो ठेवा आहे तो जपला पाहिजे.

आपण बदललो आणि निसर्गही बदलला. त्याचा परिणाम माणसाला भोगावा लागतोय. आधुनिकतेची कास धरायलाच हवी, त्यात दुमत नाही. मात्र, पारंपरिक वारसा आहे तो जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची नाही का?

मी नगर जिल्ह्यातील अकोलेसारख्या आदिवासी दुर्गम भागात जन्माला आले. माझं शिक्षणही झालं नाही. जंगलात, दऱ्याखोऱ्यातील भटकंती. जगण्याची लढाई सतत सुरू. ती आजही थांबली नाही. मीच काय माझा आदिवासी बांधव काबाडकष्टात कधीही मागं पडला नाही.

आम्ही तर जंगलचे राजे. निसर्गाच्या सान्निध्यात राहत असताना फळं, फुलं, प्राणी, पक्षी आमचे मित्रच. आम्हाला कधीही त्यांची भीती वाटली नाही आणि आम्ही सारे मिळूनच निसर्गाचं रक्षण करतो.

गेल्या ७० वर्षांत आदिवासी समाजाचा किती विकास झाला हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मी कधीही नकारात्मक उत्तर देत नाही. प्रगतीचा एक एक टप्पा पुढं सरकत आहोत. आमची लेकरंबाळं शिकत आहेत. ज्ञानी होऊन जंगलाच्या बाहेर पडून भरारी घेत आहेत.

प्रत्येक क्षेत्रात आमचा आदिवासी दिसतो. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आहेत. याचा एक आदिवासी महिला म्हणून मला सार्थ अभिमान आहे. आदिवासी समाजानं परंपरा, संस्कृती आणि निसर्ग जपण्याचं जे काम केलं त्यासाठी सरकारसह सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

आपल्या राज्यात अकोले, मेळघाट, गडचिरोली, पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, तलासरी, तिकडे नंदुरबार असे तालुके आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था तिथं काम करीत असतात. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करत आहेत. त्याचं नेहमीच स्वागत केलं पाहिजे.

मला मोठं करण्यात, म्हणजे देशाला माझी ओळख दिली, गावरान बियाणांची बँक देशापुढं आणली. त्याचं श्रेय बायफ संस्थेला आणि पदाधिकाऱ्यांना जातं. माझ्या हातून जे कार्य घडलं त्याचा फायदा जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला व्हावा, हीच माझी इच्छा आहे.

तसं पाहिलं तर आज शेतकरी अडचणीत आहे. अस्मानी-सुलतानी संकटांशी तो लढतोय. आधुनिक शेतीकडं तो वळला असला, तरी पारंपरिक शेतीतील, विशेषतः बी-बियाणांचा ठेवा त्यानं जपायला हवा.

शेतकऱ्यांना ताठ मानेनं कसं जगता येईल याकडं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. माझ्या वाटेला जो जागेचा तुकडा आला त्यामध्ये मी राबत राहिले. पारंपरिक पद्धतीनं माझ्या कोंभाळणे गावात बियाणांच्या वाणांचं संवर्धन करीत राहिले.

देशी वाणांच्या बियाणांची जपणूक करीत होते. मी शेतीचं जे काम करीत होते त्याची दखल घेत बायफनं मला मदत केली. प्रसिद्धी मिळाली. माझं काम शेतकऱ्यांपुढं ठेवलं. मला पद्मश्री पुरस्कार मिळाला.

तसेच आजपर्यंत अनेक पुरस्कार माझ्या घरात आले. माझं छोटसं घर आता पुरस्कारानं भरलं आहे. त्याचे श्रेय बायफ आणि माझ्या आदिवासी बांधवांना आणि शेतकऱ्यांना आहे. त्यांच्याच ऋणात राहणं मी पसंत करेन.

खरं सांगू का, भारतमातेसमोर मी नेहमीच नतमस्तक होते. या देशातल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत यासाठी भारतमातेला साकडं घालते. पण मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतं. आम्ही बदलल्यामुळं निसर्गही बदलत चालला.

त्याची अवकृपा का होऊ लागली, हवामान का बदलू लागलं, पाऊस कधीही पडू लागला, पाऊस का रुसला याचा आपण विचार करीत नाही. बेसुमार जंगलतोड झाली. वृक्ष लागवड हवी. झाडं लावली पाहिजेत,

ती जगविण्याची जबाबदारी कोणाची, पाण्याची समस्या निर्माण झाली. आपण आजही पावसावरच अवलंबून आहोत. एकीकडं भरपूर पाणी, तर दुसरीकडं दुष्काळ असं चित्र प्रत्येक जिल्ह्यात दिसतंय. म्हणून आपण निसर्गाची शाळा शिकली पाहिजे, असं मला प्रामाणिकपणानं वाटतं.

आपण मातीही जपली पाहिजे. काळ्या मातीचा आनंद घेतला पाहिजे. जुनं ते सोनं म्हणजे गावरान बियाणं शेतकऱ्यांनी नक्कीच जपलं तर काय होतं, त्याचा फायदा दिसून येतो. मी आज मुद्दाम एका गोष्टीकडं लक्ष वेधत आहे,

याबाबत माझ्या मनाला अति दुःखही होत आहे, आज आपण काय खातो आहोत. रासायनिक खतांचा इतका मारा होत आहे की विचार करू नका. सकस पालेभाज्या, अन्नधान्यही मिळत नाही.

आपण मुलांना जे जंकफूड देतो आहोत त्यानं पोरांचं काय होताना दिसतंय. दवाखाने भरलेले दिसतात. विषमुक्त शेती हवी. मी वारंवार सांगते की गावरान बियाणांची बँक हवी. आम्ही पिढ्यानपिढ्या जंगलात राहिलो. पूर्वी कुपोषित बालकं असं चित्र दिसत नव्हतं.

आज आदिवासी भागातच नव्हे तर शहरातही कुपोषित बालकं जन्माला येताना दिसत आहेत. बाळांना काचेच्या पेटीत ठेवण्याची वेळ आली आहे. यावर उपाय म्हणजे प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त भाजी हवी. विषमुक्त भाकरी आणि भातही हवा. त्यासाठीच देशी वाणांची जपणूक करायला हवी. हायब्रीड वाण कमी व्हायला हवे.

आता दुसऱ्या एका गोष्टीकडं लक्ष वेधते ते म्हणजे मोबाइल. आपण मोबाइलच्या किती आहारी गेलो आहोत. माझ्या नातवाकडे मोबाइल नव्हता. तो शाळेत जातो. मी त्याला मोबाइल द्यायला विरोध केला. पण ऑनलाइन परीक्षेसाठी त्याला मोबाइल लागेल हे सांगण्यासाठी शिक्षक मंडळी घरी आली. माझा विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला.

शेवटी शिक्षकांनी वर्गणी करून त्याला मोबाइल दिला. आज तर घरात प्रत्येकाकडे मोबाइल आला. माणसं मोबाइलमुळं एकांडी बनली. संवाद संपत चालला आहे. पूर्वी आम्ही एसटीनं प्रवास करताना अनोळखी प्रवाशांबरोबर बोलायचो.

शेजारी बसलेल्या प्रवाशाला राम राम म्हणायचो. नाव-गाव विचारायचो. जिव्हाळा वाढायचा. आज एसटीत कोणी कोणाशी बोलत नाही. प्रत्येकाचं तोंड मोबाइलमध्ये असतं. पाहुणा असला तरी तो बोलेना. अवघड आहे. मोबाइल ही गरज आहे, पण त्याच्या किती आहारी जायचं, हे ज्याचं त्यानं ठरवावं.

राजकारण्यांपासून मी नेहमीच दूर राहिले. मला पक्ष माहीत नाही. मी माझं कार्य करीत असते. लोक इतकं प्रेम, आपुलकीनं बोलवतात, शुभेच्छा देतात त्यापेक्षा आणखी काय हवं असतं. देशासाठी सीमेवर लढणाऱ्या आणि माझ्या भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानांना मी नेहमीच सलाम करते.

जर भारतमातेनं माझ्याकडं काही मागितलं, तर मी तिला देशी बियाणांचं वाण देईन. राखी बांधेल. राखी कधी तुटली तर वाण जमिनीवर पडेल. ते पुन्हा उगवेल, फुलेल, त्याची फळं देशातील लेकरांना मिळतील. यापेक्षा दुसरा आनंद तरी काय असू शकतो.

शब्दांकन : प्रकाश पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.