महिलांच्या हक्कांची सनद

भारतातील प्रत्येक राज्यानुसार महिलांचे वेगवेगळे प्रश्‍न आहेत. महिलांचा अभ्यास करताना आम्ही अनेक मैत्रिणी समान मुद्द्यांवर एकत्र आलो.
Women
Womensakal
Updated on

भारतातील प्रत्येक राज्यानुसार महिलांचे वेगवेगळे प्रश्‍न आहेत. महिलांचा अभ्यास करताना आम्ही अनेक मैत्रिणी समान मुद्द्यांवर एकत्र आलो. त्यातून एक कल्पना समोर आली, की एखादे व्यासपीठही स्त्री आधार केंद्राच्या बरोबर अजून व्यापक पद्धतीने करायला हवे. मग गटचर्चांच्या माध्यमातून महिलांचा जाहीरनामा एकत्रित करून मांडायचे ठरले. त्यातून महाराष्ट्रातील महिलांच्या प्रश्‍नांचा जाहीरनामा तयार झाला.

महिलांच्या सत्यशोधक परिषदांमधून बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. भारतामध्ये राज्यानुसारदेखील महिलांचे वेगवेगळे प्रश्‍न आहेत. महाराष्ट्र एक राज्य जरी असले, तरी त्यात वेगवेगळ्या प्रकारचे जिल्हे आहेत. दर बारा मैलांनंतर थोडीशी भाषा बदलते आणि पाण्याची चवही, असे म्हणतात. तसेच महिलांच्या प्रश्‍नांबद्दलही आमच्या लक्षात आले. कोकणात सगळ्या महिलांच्या विषयावर कृतिसत्रे घेतली. तेथील महिलांचे प्रश्‍न समजून घेतले.

तेव्‍हा एक लक्षात आले, की तिथे मुलींची संख्या मुलांएवढी, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर कोकणात शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुली नंतर स्थलांतर करून मुंबईकडे किंवा इतर गावांमध्ये जातात. चाकरमान्यांची संख्या कोकणात जास्त दिसते. त्याचा परिणाम म्हणूनच कोकणची संस्कृती जास्त स्त्रीप्रधान आहे.

स्त्रीप्रधान अशा अर्थाने, की स्त्रिया बोलक्या, आर्थिक व्यवहारही सांभाळणाऱ्या, शेतीविषयक काही कामकाज करणाऱ्या आणि थोड्याशा आक्रमक स्वभावाच्या अन् बोलण्यात गोडवा असलेल्या असतात. कोकणात बहुतेक घरांत साधारण असे वातावरण दिसून येते. बालविवाह, हुंडाबळी इत्यादी काही प्रश्‍न तिथे आम्हाला दिसले. पती चाकरमानी असल्यामुळे गावाकडे पत्नीने कुटुंबाला धरून राहायचे आणि एकतर्फी स्वरूपात सर्व संसार बघायचा, अशी काहीशी विभागणी तिथे दिसून आली.

उत्तर महाराष्ट्रात शेतीचे प्रमाण तेव्हा जास्त होते. आज शेतीच्या बरोबरीने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दोन्हीमध्ये उद्योगांचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचबरोबर व्यसनाधीनता ही बाब समाजाच्या विशेषतः गरीब वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दिसून आली. अर्थात व्यसनाधीनता हा विषय सगळ्याच ठिकाणी मोठा होती. गावागावांमध्ये आम्हाला चित्र दिसले की, रोजगार नाही, कारखाने नाहीत अशी जी गावे आहेत तिथे व्यसनाधीनता जास्त दिसली.

जळगाव भागात विशेषतः खानदेशात हुंड्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसले. समाजाच्या काही घटकांमध्ये हुंडा हा ४० लाख रुपये आणि ४० तोळे सोने असे प्रमाण दिसते. जागा जशी किती बाय कितीची आहे, असे म्हटले जाते तशाच प्रकारे येथे लग्नाची बोली केली जाते, असे दिसून आले.

उत्तर महाराष्ट्राकडून जसे जसे आपण विदर्भाकडे जायला लागतो, तसा फरक जाणवतो. संपूर्ण महाराष्ट्रात शेतीप्रधानता असली, तरीही विदर्भातील जमीन, विदर्भातील परिस्थिती यात फरक आहे. येथे जमिनी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जमिनीची टंचाई नाही. असे असले, तरीही उत्पादनाला बाजारपेठ नसल्यामुळे रोजगारांची मागणी मोठी आहे.

विदर्भात जातीयतेचे स्वरूपही खूप वेगळे दिसते. त्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यापेक्षा वेगळे परिणाम दिसले. विदर्भात किंवा इतरत्रही बाहेरून येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या अलीकडे वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून आम्हाला बऱ्याच ठिकणी मुलींवर नातेवाईक नसणाऱ्या लोकांकडूनही अत्याचार होण्याचे प्रमाण दिसून आले.

पश्‍चिम महाराष्ट्राचा जेव्हा विचार केला आणि पाहिले; तेव्हा तेथे कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराज, ताराराणी साहेब ही एक आगळीवेगळी परंपरा असल्याचे जाणवले. सांगली जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यलढ्यामध्ये चळवळी झाल्या, पत्री सरकार स्थापन झाले. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची अस्मिता, तेजस्वीपणा, आक्रमकता तिथे दिसली.

आपण राज्य करू शकतो, अशी भावना आणि खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण अन् शिक्षणाची आवड असणारा समाज हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त दिसून आला. त्यामुळे आम्ही फलटण, सांगली अशा ठिकाणी ज्या सत्यशोधक महिला परिषदा घेतल्या, त्यात जुन्या चळवळींमध्ये, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या महिला आम्हाला भेटल्या. त्यामधल्या काही जणींनी तर पोटगीच्या प्रश्‍नावर आणि परित्यक्त्यांच्या प्रश्‍नांवर जीवन समर्पित केले होते.

त्या महिलांचा अभ्यास आणि अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळे काम होते. त्यांपैकी पुण्याला कर्वे सोशल इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य डॉ. तारा शास्त्री, मुंबईला टाटा इन्स्टिट्यूटच्या डॉ. मीनाक्षी आपटे तसेच इतर ठिकाणी म्हणजे नगर, संभाजीनगर या ठिकाणी करुणाताई चौधरी, नागपूरला लीला चितळे, उषा मिश्रा, शोभा साखरवाडे, रूपा कुलकर्णी, सीमा साखरे इत्यादी सगळ्या चळवळीतील स्त्रिया भेटल्या. नाशिकला कुसुम पटवर्धन, मृणालिनी खैरनार, धुळ्याला विजयाताई चौक अशी अनेक जणींची ओळख होती; परंतु येथे स्नेह दृढ झाला, संवाद झाला.

जळगाव वासंती दिघे, संभाजीनगरला मंगल खिवसरा अशा अनेक जणींशी मैत्री आधीची होती. समान मुद्द्यांवर एकत्र आलो, कार्यक्रमांमध्ये भेटायला लागलो. त्यातून एक कल्पना समोर आली, की एखादे व्यासपीठही स्त्री आधार केंद्राच्या बरोबर अजून व्यापक रीतीने काम करायला पाहिजे. अशा वेळेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जे काम मुंबई येथून चालते, तेथे काम करणाऱ्या काही सुविद्य मैत्रिणींचा परिचय झाला.

त्यामध्ये डॉ. शरदिनी डहाणूकर, डॉ. विजया पाटील या मला भेटल्या. त्या म्हणाल्या की, नीलम, तू प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करतेस तर शरदराव पवार जे तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यांची अशी इच्छा आहे की, आम्ही तयार केलेले महाराष्ट्रामध्ये महिलांचे जे व्यासपीठ आहे, त्याचे तू काम करावे.

त्या कामाच्या अगोदर नागपूरला महाराष्ट्र महिला व्यासपीठाने एक मोठी परिषद घेतली. त्या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यांमधून सहकार विभाग, त्याचबरोबर ट्रेड युनियन, सामाजिक कार्यकर्त्या अशा अनेक क्षेत्रांमधल्या महिला आल्या होत्या. मी आधी उल्लेख केला होता की गटचर्चांचे माध्यम वापरून या सगळ्या महिलांचा जो जाहीरनामा होता तो एकत्रित करून मांडायचे काम त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महिला परिषदेमध्ये करायचे ठरले होते.

कै. कमलताई विचारे, विमलताई रांगणेकर, वासंती शेवाळे, विद्या बाळ यासुद्धा या कामामध्ये बरोबर होत्या. नागपूरला हा जो कार्यक्रम झाला, त्या महाराष्ट्र महिला व्यासपीठावर स्त्रियांच्या चळवळीची एक सनद आम्ही वाचली. ती सनद तयार झालेल्या परिषदेमधून जवळजवळ अडीच ते तीन हजार महिला महाराष्ट्रभरातून कार्यक्रमाला आल्या होत्या. शरदराव पवार अन् अनेक मंत्री उद्‌घाटन आणि समारोपाला आलेली होती.

समारोपाला त्यांच्यासमोर तो सगळा महिलांच्या प्रश्‍नांची सनद वाचायची जबाबदारी माझ्यावर आली. त्याप्रमाणे ती सनद जाहीर केली. कालांतराने त्या सनदेत बरेचसे मुद्दे घालून नंतर पवार यांनी पहिले महिला धोरण तयार केले; परंतु ती प्रक्रिया १९९० ते १९९४ पर्यंत चाललेली होती. या सगळ्यातून एक स्त्रियांची नवीन चळवळ उभी राहिली.

त्यातून तयार झाला तो हळूहळू महाराष्ट्रातील महिलांचा चालता-बोलता असा प्रश्‍नांचा जाहीरनामा! त्यामुळे चळवळ, चळवळीची कृती आणि महिलांच्या तयार होणाऱ्या निवडणुकीतल्या अपेक्षा या सगळ्याचे एक जैव नाते आहे हे आम्हाला जाणवले आणि म्हणून त्या सगळ्या प्रवासाला मी महिलांच्या हक्काची सनद असेच म्हणू इच्छिते. ती प्रक्रिया आजही अविरत सुरू राहिलेली आहे, असे दिसते.

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.