वैवाहिक नात्यात प्रत्येकाचे काही प्राॅस्पेक्टिव्ह असतात. म्हणजे कोण चूक कोण बरोबर वगैरे... बायकोने खरं सांगायला हवं होतं. मग त्याने असं करायला हवं होतं... अशा प्रकरणात निसटलेला दुवा कुठला असेल, तर तो म्हणजे माफी. नात्यात अनवधानाने कोणी चूक केली, तर त्याला माफ करण्याचा मोठेपणा तुमच्यात किती आहे? किती मर्यादेपर्यंत तुमच्यात माफ करण्याची ताकद आहे, हेच खरं महत्त्वाचं ठरतं.
क सेक्स आणि रिलेशनशिप कोचच्या माझ्या प्रोफेशनमध्ये प्रत्येक वयोगटातील जोडपं माझ्याकडे येतं. सगळ्यात सीनियर क्लायंट माझ्याकडे आली होती. ती होती ७६ वर्षांची महिला. सर्वांना कुठे ना कुठे आपल्या नात्यातील चमक पुन्हा मिळवायची होती. नातं जुनं होतं जातं, तशी त्याची चमक जाते. मग त्याला पॉलिशिंग करावं लागतं, त्याला घासावं लागतं, त्याला स्वच्छ करावं लागतं... दसरा-दिवाळीला वर्षातून एकदा अख्ख्या घराची आपण साफसफाई करतो, तसंच नात्याचं असतं; पण त्यात एक मुद्दा सुटून जातो, की हे सगळं करत असतानाही काही नाती नाहीच खुलत, नाहीच फुलत. किती काहीही करा काहीच होत नाही.