आज मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही आयुष्यात ‘पेन ॲव्हॉयडन्स’ म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर त्रास टाळणे हे तत्त्व ठेवून जगू नका. आयुष्यात कुठले कष्ट- दुःख- त्रास नकोत अशी धारणा ठेवू नका.
- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat
नमस्कार मित्रांनो!
आज मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही आयुष्यात ‘पेन ॲव्हॉयडन्स’ म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर त्रास टाळणे हे तत्त्व ठेवून जगू नका. आयुष्यात कुठले कष्ट- दुःख- त्रास नकोत अशी धारणा ठेवू नका. मी यशस्वी व अयशस्वी अशा दोन्ही लोकांचा अभ्यास करतो. यशस्वी लोक आयुष्यात इतक्या उंचीवर कसे पोहोचले हे जाणून घेण्यासाठी त्यांचा अभ्यास करणं उपयुक्त ठरतं, पण मी आयुष्यात यशस्वी होऊ न शकलेल्या लोकांचाही अभ्यास करतो. त्यात असं लक्षात येतं, की जवळजवळ ८० ते ९० टक्के लोक आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाहीत. तुम्हाला जर उरलेल्या २० टक्क्यांमध्ये यायचं असेल, तर तुम्हाला या लेखाचा नक्की उपयोग होईल.
माझ्या या अभ्यासात असं लक्षात येतं की, ‘पेन ॲव्हॉयडन्स’ हा बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा मंत्रच असतो. त्यांना असं वाटत असतं, की आयुष्यात सुखी व्हायचंय ना, म्हणजे आयुष्यात दुःख- क्लेष- कष्ट असता कामा नयेत आणि हे अगदी ‘लॉजिकल’ आहे- मला सुख हवे आहे, म्हणजे मला दुःख नकोय. या लोकांच्या दृष्टीने आयुष्य म्हणजे जणू रस्ता असतो आणि जिथं जिथं दुःखाचे ‘सिग्नल’ लागतील, तिथून हे लोक वळण घेतात... ते कधी या बाजूला वळतात, तर कधी त्या बाजूला वळतात. म्हणजे आयुष्यात दुःख आलंच नाही, तर मग काय... सुखच सुख!
पण प्रत्यक्षात असं घडत नाही. ही चुकीची विचारसरणी आहे. बरेच जण अशा प्रकारे विचार करतात, ते आयुष्यात यशस्वी होत नाहीत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत दुःख... त्रास... कष्ट नको असतात. तुम्ही अशाप्रकारे जगत असाल, तर तुमचं आयुष्य ‘मिडिऑकर’ म्हणजे सामान्य प्रकारचं राहील, त्यात फारसं दुःख- कष्ट नसतील, पण आयुष्यात फार काही खास असं केलंही नाही अशी भावना असेल.
याचं कारण म्हणजे आपण दुःख- कष्ट या गोष्टी भयंकर वाईट मानतो. पण कुठल्या तरी ‘पेन’मधून पार व्हावं लागणं हे यशस्वी आयुष्याचं रहस्य असतं. जगातील कोणत्याही यशस्वी माणसाला- मग तो क्रीडा, वैद्यकशास्त्र, फिल्म्स, विज्ञान, बिझनेस, लेखन अशा कोणत्याही क्षेत्रातील असो... कुठल्या तरी त्रासातून पार व्हावं लागलेलंच असतं. त्यांना त्यांची इच्छा नसलेल्या, त्यांच्या मनात नसलेल्या अनेक गोष्टी कराव्या लागलेल्या असतात... आणि त्यातून काहीतरी चांगलं घडलेलं असतं, त्यांना आनंद लाभलेला असतो.
लोकांना आयुष्यात दुःख-कष्ट अजिबात नको असतात, त्यामुळेच त्यांना काही गोष्टी अवघड वाटतात. उदाहरणार्थ- अभ्यास. अभ्यास करायचा म्हटलं, की त्यासाठी बौद्धिक परिश्रम घ्यावे लागतात. मोठमोठी पुस्तके घेऊन तासनतास ‘मेंटल एनर्जी’ व ‘फोकस’ देणं ही काही साधंसुधं काम नसतं! हे ‘पेन''चंच एक रूप असतं.
तुम्ही दररोज जिममध्ये एक तास व्यायाम केलात, तर तुम्हाला तुमच्या बाबतीत चमत्कार घडताना दिसतील. खरंच! पण त्या तासाभरात तुम्हाला खूप कष्ट पडतील. पुशअप्स काढा, वजनं उचला, ट्रेड-मिलवर धावा, तेसुद्धा दररोज... असलं काय काय करायची कुणाची इच्छा असते! ते कुणालाच नको असतं. त्यामुळे तुम्हाला, ‘नकोच जायला... अरे, क्या रखा है इसमें,’ असं वाटू लागतं.
मग ‘पेन'' कशात नसतं?
इन्स्टाग्रामवर रील्स स्क्रोल करण्याला अगदी कमीत कमी कष्ट लागतात. आता तर या साऱ्याचं तंत्रज्ञान इतकं वेगानं प्रगत होत चाललं आहे, की आता तुम्हाला रील्स पुढे ढकलावीसुद्धा लागत नाहीत, ती माळ आपोआप पुढे जात राहते! आणि तुम्ही ‘जिंदा लाश'' बनून ती रील्स पाहत असता. बराच वेळ रील्स पाहणाऱ्या माणसाचा चेहरासुद्धा बघण्यासारखा असतो... ढिम्म.. बधिर... एक अल्पवस्त्रांकित तरुणी पोळ्या लाटतीय... ओह... एक कुत्र्याचं पिल्लू दुसऱ्या पिल्लाच्या अंगावर चढलंय... ओह... एका बाळाला फुगे बांधलेत... ओह... ओह... ओह... आज आपण अशा प्रकारेच जगत आहोत. आणि याला काहीही कष्ट लागत नसल्यामुळे आपण ते करत असतो... अभ्यास करण्यापेक्षा, काही काम करण्यापेक्षा, पायी फिरायला अथवा धावायला जाण्यापेक्षा हेच केलं जातं. तुम्ही बराच काळ अशा प्रकारे जगत राहण्याचे काय परिणाम होतील? तुम्ही जिमला जाण्याऐवजी रील्स पाहत राहिलात, अभ्यास करण्याऐवजी ‘ओटीटी’वर रमलात तर काय होईल?
तसं पाहिलं तर, काहीही होणार नाही. तुम्ही खरोखर कष्ट टाळू शकाल, त्रास टाळू शकाल. आयुष्य जर एकाच दिवसाचं असेल, तर ही अगदी उत्तम ‘स्ट्रॅटजी’ ठरेल. एकच दिवस तर जगायचं आहे... दिवसभर चिप्स फस्त केल्या, रसगुल्ले चापले... संध्याकाळपर्यंत आयुष्य संपणारच आहे असा विचार केला, तर काहीही बिघडणार नाही. अशा प्रकारचं आयुष्य तुम्हाला एक दिवस छान वाटेल, आठवडाभर छान वाटेल. ‘वेडपट माणसं आहेत, जिममध्ये जाऊन उगीच घाम गाळताहेत’ असं वाटेल. तुम्ही जिमला गेला नाहीत तरी तुम्हाला तुमच्या शरीरात काही बदल घडल्याचं जाणवणार नाही, तुमची अजून परीक्षा झालेली नसल्यामुळे तिथंही भ्रमाचा भोपळा फुटण्याची भीती नाही... पण हे वर्षभर असंच चालत राहिलं तर काय होईल?
वर्षभरानंतर, जिमला जाणं टाळत आलेल्या माणसाचं वजन १० किलोंनी तरी वाढलेलं असेल. रील्स पाहण्याचा मोह टाळून अभ्यास केलेल्या मुलाला कितीतरी उत्तम मार्क्स मिळालेले असतील, त्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला असेल, चांगली नोकरी मिळालेली असेल, त्याच्यासमोर अधिक चांगल्या संधी असतील... पण तुमच्या बाबतीत यातलं काहीही घडलेलं नसेल.
आता ‘पेन’ कुणाच्या वाट्याला येईल? ‘दर्द'' कुणाला होईल?
तुम्ही हा ‘दर्द’ फक्त पुढे ढकलत आलेले असता, तुम्ही तो नष्ट करू शकत नाही. तुम्ही तो तुमच्या आयुष्यातून हटवू शकत नाही. तुम्ही जर दुःख- कष्ट- त्रास पुढे ढकलत राहिलात, तर त्या एका टप्प्यावर व्याजासह समोर उभ्या राहतील. तुम्ही जर आज कष्ट घ्यायची तयारी ठेवलीत आणि सुख-मजा या गोष्टी थोड्या पुढे ढकलल्यात, तर पुढे त्याही तुमच्यासमोर व्याजासह वाढून येतील!
मी नेहमी म्हणतो, सुखात दुःख असतं आणि दुःखात सुख. हे मी या लेखाच्या सुरवातीलाच म्हटलं असतं, तर तुम्ही म्हणाला असतात, ‘ये आ गया बाबाजी...’ पण भारतीय आध्यात्मिक गुरू जे सांगतात ते अगदी बरोबर आहे- सुखात दुःख असतं आणि दुःखात सुख असतं. एका अर्थाने ही सगळी माया आहे. पण जर तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर तुम्ही याचा विचार करा. जो माणूस गुलाबजाम चापत राहील, त्याला एक दिवस मधुमेह होईल... आणि त्याचं सुख दुःखात परिवर्तित होईल. जो माणूस आरोग्यदायी आहार (तो आवडत नसला तरी) घेत असेल, त्या माणसाची तब्येत उत्तम होईल, त्याला आजार गाठणार नाहीत, तो माणूस सुखी होईल. लक्षात घ्या, तुम्ही ‘पेन'' टाळू शकत नाही. पण ८० ते ९० टक्के लोक अशा प्रकारे जगतात. त्यांच्यात क्षमता असते, ते कणी मंद किंवा मूर्ख नसतात, पण त्यांना आयुष्य अशा प्रकारे जगावंसं वाटत असतं.
तुम्ही संध्याकाळी ऑफिसमधून दमूनभागून घरी येता... तुम्हाला बॉसच्या शिव्या ऐकाव्या लागलेल्या असतात... काही जणांच्या बाबतीत गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंडशी वाद सुरू असतात... अशा वेळी ‘छोडो यार!'' असं म्हणत चिप्स खाव्यात, टीव्हीपुढं बसावं असं वाटतं. ठीक आहे, ही एक ‘स्ट्रॅटजी’ आहे. बाटली उघडली... बिअर ढोसली... ओके... दोन तास तुम्हाला छान वाटेल. पण हेही वर्षभर करत राहिलात तर? त्याऐवजी तुम्ही ‘‘आज दिवस फार वाईट गेलाय, चला, ३०-४० मिनिटे धावून येऊ या,’’ असा विचार केलात तर? असं केल्यावर काय घडतं पाहा.
तुम्ही ‘पेन’ का टाळता? ते पुढं का ढकलता? एका अर्थाने हे कर्ज माथ्यावर घेण्यासारखंच आहे, जे एक दिवस तुम्हाला व्याजासह भागवावं लागणार आहे. तुम्ही जेव्हा ड्रिंक घेता, तेव्हा तुम्हाला त्या वेळी छान वाटतं, पण नंतर तुम्हाला ‘स्टुपिड’ असल्यासारखं वाटतं. अशा वेळी तुम्ही सुख उसनं घेता, तुम्ही ते निर्माण करत नाही. हे ‘पेन’ म्हणजे कुठली शारीरिक वेदना नव्हे, हे आहे ‘पेन ऑफ एफर्ट.’ तुम्ही ते टाळत राहिलात तर तुम्ही यशस्वी होणार नाही आणि ते दुःख कधी ना कधी तुमच्यासमोर येऊन उभे राहीलच. त्यामुळे तुम्ही स्वतःलाच विचारा, मी कुठलं दुःख- कष्ट सोसायला तयार आहे? म्हणतात ना, विदाऊट पेन, देअर इज नो गेन...
तुम्ही ‘पेन'' फक्त पुढे ढकलू सकता, ते कायमचं टाळू शकत नाही, लक्षात ठेवा. टेक केअर!
(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)
(अनुवाद : सुप्रिया वकील)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.