कभी खुशी से, खुशी की तरफ नही देखा...?

मला वाटतं, आयुष्यात यशस्वी होण्यापेक्षा आनंदी होणं जास्त महत्त्वाचं आहे. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. ही गोष्ट पटकन लक्षात येत नाही.
Happy Life
Happy LifeSakal
Updated on
Summary

मला वाटतं, आयुष्यात यशस्वी होण्यापेक्षा आनंदी होणं जास्त महत्त्वाचं आहे. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. ही गोष्ट पटकन लक्षात येत नाही.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

मला वाटतं, आयुष्यात यशस्वी होण्यापेक्षा आनंदी होणं जास्त महत्त्वाचं आहे. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. ही गोष्ट पटकन लक्षात येत नाही. आपल्याला सगळ्यांनाच आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं; पण ‘सक्‍सेसफुल’ होण्यापेक्षा ‘हॅपी’ होणं जास्त महत्त्वाचं आहे.

आपण कुणालाही विचारलं तर ती व्यक्ती लगेच सांगेल, ‘‘मला आयुष्यात यश पाहिजे.’’ आणि आयुष्यात यश मिळणं आवश्‍यकही असतं. तुम्ही आयुष्यात काहीतरी ध्येय ठेवा, पुढे जा, स्वतःचं ‘बेस्ट व्हर्जन’ बना. तुमचं जे सर्वोत्तम ‘पोटॅन्शिअल’ असेल तिथवर तुम्ही पोहोचायलाच हवं... यशस्वी व्हायला हवं.

पण या सगळ्याचा फायदा काय? तुम्हाला यशस्वी कशासाठी व्हायचं असतं? यशामुळे तुम्हाला नाव मिळेल, पैसा मिळेल... आपण त्याही पुढे जाऊ या... नाव व पैसा मिळाल्यावर पुढे काय? तर त्यातून तुम्हाला आनंद लाभेल, खुशी मिळेल. नाव मिळालं, की लोकांचं प्रेम मिळेल. पैसा मिळाला, की तुमच्यासमोर आणखी पर्याय खुले होतील... तुम्ही उत्तमोत्तम गोष्टी विकत घेऊ शकाल, आयुष्य आणखी आरामदायी बनवू शकाल, घर-गाडी या गोष्टी विकत घेऊ शकाल, पैशांची बचत करून आर्थिक बाजू भक्कम करू शकाल, ज्यायोगे काही काळाने नोकरी करायची नाही म्हटलं तरी ते तुम्हाला शक्य होईल. अशा प्रकारे आपल्याला अधिकाधिक आनंदी, सुखी होण्यासाठी, खुशी मिळवण्यासाठी यशस्वी व्हायचं असतं; पण प्रत्यक्षात असं होतं, की यशाच्या मागे धावताना, आपल्याला ते यश कशासाठी हवं आहे याचाच आपल्याला विसर पडतो. आपण हे सगळं सुखी होण्यासाठी करत असतो; पण बरेचदा त्यामुळे आपण सुखी होतच नाही.

माझ्या बाबतीत असं घडलं आहे. मुळात, मी ज्या क्षेत्रात यशस्वी झालोय, त्या क्षेत्रात मी कधी पाऊल ठेवीन असं मला वाटलंसुद्धा नव्हतं. मला ज्या क्षेत्राची कुठली पार्श्‍वभूमी नव्हती, कसलं प्रशिक्षण नव्हतं, त्या क्षेत्रात मी यशस्वी झालो.

भारतात लेखक म्हणून इतकं यश, इतकं नाव दुसऱ्या कुणाला मिळालं असेल, असं मला वाटत नाही. निदान माझ्या पाहण्यात तरी नाही.

मला जेव्हा लेखक म्हणून यश लाभलं, तेव्हा मला ‘हां... हे यश आहे तेच सबकुछ!’ असं वाटलं होतं, त्यामुळे मी आनंदी झालो, मला खुशी लाभली; पण जितकं वाटलं होतं तितकी खुशी मात्र मिळाली नाही. हे मी माझ्याच बाबतीत नाही, तर इतर बऱ्याच जणांच्या बाबतीत पाहिलं आहे. माझे काही बॅचमेट्‌स आहेत. कुणी आयआयटीतले, कुणी आयआयएममधले - त्यांचं सगळ्यांचं आपापल्या आयुष्यात छान चाललंय. कुणी मध्यम स्तरावर आहेत, कुणी भलतंच पुढं गेलेत... पण एकूण प्रत्येकजण आपापल्या उद्योगात व्यवस्थित आहे. या सगळ्यांची - खास करून जे आयुष्यात खूप यशस्वी झाले आहेत त्यांची - मी एक गोष्ट पाहिली आहे, की ते खूष आहेत; पण म्हणावं तितकं खूष नाहीयेत. ‘हा... कट रही है... ठीक है... चल रहा है’ अशी त्यांची अवस्था आहे. हे सगळेजण इतक्‍या मोठमोठ्या पदांवर आहेत, कुणी सीईओ बनणार आहे; पण त्यांच्या आयुष्यात ताणतणाव आहेत, कुटुंबात ताणतणाव आहेत, कुणाचं जोडीदाराशी पटत नाही, आपण कुणावर विश्‍वास ठेवावा हे त्यांना कळत नाही, कुणाला नीट झोप लागत नाही, कुणाची तब्येत बिघडतेय, कुणी लठ्ठ होत चालला आहे... कारणं काहीही असतील, पण हे लोक आयुष्य ‘एन्जॉय’ करत नाहीयेत आणि ते खूष नाहीयेत.

माझ्या बाबतीत सांगायचं तर, मला वाटायचं की, ज्या दिवशी माझा सिनेमा थिएटरमध्ये लागेल आणि ‘हिट’ होईल त्या दिवशी काय होईल!! प्रत्यक्षात, जेव्हा माझा सिनेमा आला, तेव्हा मला आनंद झाला, नक्कीच झाला. इट्‌स अ हाय! पण तितका नाही झाला. ठीक आहे... मी तोच आहे. घरात भेंडीची भाजी आणि पोळीच खातोय. आता फार काहीतरी भव्यदिव्य घडतंय असं मला वाटत नव्हतं.

मग माझ्या लक्षात आलं, की ‘सक्‍सेस’ आणि ‘हॅपीनेस’ यांचा परस्परसंबंध आहे. यशासोबत खुशी येते, पण एका विशिष्ट टप्प्यानंतर या दोन्ही गोष्टी अलगही होतात. फक्त यशस्वी झालं की, आपण सुखी होतोच असं नाही. त्या जोडीने आणखीही काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं, ज्यायोगे तुम्ही सुखी होऊ शकता. तुम्हाला जर असं वाटत असेल की, आपण आणखी यशस्वी झालो की आणखी सुखी होऊ, तर असं होईलच असं नाही. समजा, तुम्ही यशस्वी असूनही नाखूष असाल, तर आपण आणखी यश मिळवलं की सुखी होऊ, असा समज बाळगू नका. असं अजिबात घडत नाही.

माझ्या बाबतीत सांगायचं, तर मी स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःची काळजी घेणं पूर्ण बंद केलं होतं. मी यश मिळवण्याच्या मागे इतका वेड्यासारखा लागलो होतो, की मला बॉलिवूड, बेस्ट-सेलर लिस्ट्‌स, लिट फेस्ट्‌स, टीव्ही ॲपिअरन्सेस... हेच सगळं महत्त्वाचं वाटत होतं... बस्‌ यहीं करना है.... चेतन भगत छा गया... अजून... आणखी... अजून...

पण आतमध्ये मात्र मी खूष नव्हतो. कारण मी नीट झोपू शकत नव्हतो. मला माझं वजन आटोक्‍यात ठेवता येत नव्हतं. मी लठ्ठ झालो होतो. मला फार पटकन्‌ थकवा येत होता... कारण माझ्या दिनक्रमात मित्रांसाठी वेळ नव्हता. मला मनापासून ज्या गोष्टी कराव्याशा वाटत होत्या, त्या मी करत नव्हतो, कारण त्यातून तितका पैसा मिळणार नव्हता.

पैसा.. पैसा... पैसा... यश... कीर्ती... आणखी काही... मी या सगळ्याच्या मागे धावत होतो. माझं ‘पॅशन’ होतं लेखन, तेच मी करिअर म्हणून निवडलं, त्यातून मला पैसे मिळू लागले... आणि मी पैशांच्या मागे धावू लागलो. या सगळ्याच्या मागे धावताना मी माझ्या ‘पॅशन’ला काही वेगळंच वळण दिलं. मी माझ्या ‘पॅशन’च्या इतर गोष्टींकडे लक्ष देत नव्हतो, फिटनसकडे लक्ष देत नव्हतो. मी मित्रांसाठी वेळ देत नव्हतो. संध्याकाळी चार लोक घरी यावेत... गप्पा-टप्पा व्हाव्यात... चार गोष्टी आपण बोलाव्यात, चार गोष्टी त्यांच्या ऐकाव्यात, हे घडत नव्हतं. मग मी खूष कसा असेन?

आणि खरंच.. मी खूष नव्हतोच. मग एक दिवस माझ्या मनात आलं, की हे काय चाललंय? आपल्याला किती यश मिळवलं की ते भरपूर वाटणार आहे... हाऊ मच सक्‍सेस इज टू मच सक्‍सेस? माझी दहा पुस्तकं बेस्ट-सेलर आहेत. ही संख्या पंधरावर गेली तर?

मग मी म्हणेन, माझी पंधरा पुस्तके बेस्ट-सेलर आहेत. ही संख्या गाठण्यासाठी, म्हणजे आणखी पाच पुस्तकं लिहिण्यासाठी मला दहा वर्षं लागतील. या दहा वर्षांत मी दहा बेस्टसेलरची संख्या पंधरावर न्यावी, का मला ज्यामुळे आनंद मिळतो अशा गोष्टी कराव्यात?

तुमच्यापैकी बरेचजण आत्ता करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असतील, त्यामुळे तुम्ही आत्ता या गोष्टीचा फार विचार करू नका. आधी तुम्ही यशस्वी तर व्हा. पण, या वाटचालीदरम्यान यश आणि आनंद यांचा मेळ घालायला विसरू नका. आयुष्यात यशाखेरीज आणखीही काही गोष्टी आवश्‍यक असतात, ज्या आपल्याला आनंद देतात. आयुष्यात यशाचं स्थान जेवणातल्या मिठासारखं असतं. जसं जेवणात मीठ नसेल, तर आपल्याला पदार्थांची चव लागणार नाही, तसंच आयुष्यात यश मिळालं नाही, तर आयुष्याची मजा घेता येणार नाही, त्यामुळे यश गरजेचंच आहे. पण, जसं जेवणात मीठ जास्त प्रमाणात घातलं, तर पदार्थ खारट होतील, पदार्थांची चव बिघडेल, तसंच आयुष्यात जर फक्त यशाच्याच मागे धावत राहिलं तर तसं होईल. आयुष्यात यश महत्त्वाचं असलं, तरी ती एकच बाब महत्त्वाचा घटक नाही.

आता मी माझ्या आनंदाला यशापेक्षा जास्त महत्त्व द्यायचं ठरवलं आहे. मी माझ्यात हा बदल केला आहे. मी स्वतः असे प्रयोग करत असतो. मी फक्त तुम्हाला उपदेश करतोय असं नाही. मी स्वतःसुद्धा शिकत असतो.

माझ्यासाठी माझी झोप, माझं आरोग्य, माझे नातेबंध, माझी शारीरिक-मानसिक-भावनिक स्थिती सर्वांत महत्त्वाची आहे. त्यासोबत यशही मिळालं तर ‘चार चाँद’ लागतील; पण यश भरभरून मिळतंय, मात्र या गोष्टींपैकी काहीही मिळणार नसेल, तर मी आनंदी होऊ शकत नाही, त्यामुळे मी माझ्या प्राधान्याचा विषय ठरवला आहे. तुम्ही याबाबतीत काय विचार करता? यश व आनंद यांचा समतोल कसा साधला जावा असं तुम्हाला वाटतं? जरूर सांगा. टेक केअर.

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.