अपने पे भरोसा है तो ये दाँव लगा ले...

जेव्हा मी स्वतःला ‘यूजलेस’ समजायचो, त्या माझ्या आयुष्यातल्या काळाबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे...मी त्या भावनेतून कसा बाहेर पडलो हेही मी सांगणार आहे.
Life
LifeSakal
Updated on
Summary

जेव्हा मी स्वतःला ‘यूजलेस’ समजायचो, त्या माझ्या आयुष्यातल्या काळाबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे...मी त्या भावनेतून कसा बाहेर पडलो हेही मी सांगणार आहे.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

जेव्हा मी स्वतःला ‘यूजलेस’ समजायचो, त्या माझ्या आयुष्यातल्या काळाबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे...मी त्या भावनेतून कसा बाहेर पडलो हेही मी सांगणार आहे. आपण अगदी ‘व्यर्थ’ आहोत, ‘निठल्ले’ आहोत, अगदी बिनकामाचे आहोत असं मला किती तरी वेळा वाटलं आहे...कधी माझं मलाच असं वाटलं आहे आणि काही वेळा कुण्या नातेवाइकांकडून किंवा आई-वडिलांकडून तसं ऐकावं लागलं आहे.

मला माझ्या आयुष्यातले असे तीन प्रसंग ठळकपणे आठवतात. तुम्हाला सांगतो, आयुष्यात बरेचदा आपण स्वतःचं चुकीचं मूल्यमापन करतो. स्वतःच्या बाबतीत आपलं अतिशय कडक धोरण असतं. असं का असतं कोण जाणे! आपण स्वतःला अतिशय उत्तम प्रकारे ओळखतो असं आपल्याला वाटत असतं. आपल्यापैकी कुणीही परिपूर्ण नसतं, आपल्यात कितीतरी उणिवा असतात. त्या आपल्याला माहीतही असतात; त्यामुळे, आपण काही तितके ‘ग्रेट’ वगैरे नाही, असं आपल्याला वाटत असतं आणि त्याच वेळी आपण इतर लोकांनाही पाहत असतो...त्यांचे छान छान प्रसन्न, हसरे फोटो; विशेषतः सध्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात ते फोटो, सुट्टीत धमाल करतानाचे त्यांचे फोटो...तेव्हा आपल्याला वाटतं की, हां यार, हे लोक कसे आहेत...यांचं सगळं बरोबर आहे, यांचं आयुष्य ‘सॉर्टेड’ आहे, आपण मात्र गाढव आहोत, ‘यूजलेस’ आहोत...त्यांच्या बाबतीत आपल्याला ‘जीवन यांना कळले हो’ असं वाटत असतं.

मात्र, ही चुकीची विचारसरणी आहे; त्यामुळे तुम्ही आणखी खाली खाली...गर्तेत जाता. अशा वेळी मी जर तुम्हाला सांगितलं की, ‘तुम्ही असा विचार करू नका, आपण ‘ग्रेट’ आहोत असं समजा, तर त्याचा उपयोग होणार नाही.’ जर या भावनेनं तुमच्या मनात घर केलं असेल तर ती भावना तुम्हाला मनातून काढून टाकावी लागेल, तो विचार बदलावा लागेल आणि हे फक्त सांगून बदलणार नाही, त्यासाठी तुम्हाला मूलभूत स्तरावर वेगळा विचार करावा लागेल, वेगळी व्यक्ती व्हावं लागेल.

मला आठवतंय, मी सातवीत किंवा आठवीत होतो. त्या वेळी मला केमिस्ट्रीत फारच कमी मार्क मिळाले होते. खरं तर हा विषय माझ्या आवडीचा होता. आमच्या शाळेत या इयत्तेत फार प्रयोग वगैरे करायला मिळायचे नाहीत; पण जे प्रयोग दाखवले जायचे...वेगवेगळ्या पात्रांमध्ये रसायनं मिसळली जात आहेत, त्यातून काहीतरी वेगळ्या रंगाचं द्रावण तयार होतंय...हे सगळं मला अतिशय ‘फॅसिनेटिंग’ वाटायचं. केमिस्ट्रीपेक्षा चांगला विषय असूच शकत नाही अशी माझी समजूत होती. (मी आमच्या घरी स्वयंपाकघरात केमिस्ट्री लॅब उभारण्याचा प्रयत्न केला होता. तिथं माझे प्रयोग सुरू असायचे. त्या नादात एकदा आगसुद्धा लागली होती!).

पण एकदा मात्र मला केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये, कसे कोण जाणे, पण अगदी कमी मार्क पडले. कदाचित मी नीट अभ्यास केला नसेल... काय झालं कोण जाणे; पण तो दिवस भयंकर वाईट गेला होता. त्या वेळी मला इंजिनिअरिंग वगैरे माहीतही नव्हतं. केमिस्ट्री हा विषय माझा आवडता असल्यामुळे मला त्याच विषयात पुढं शिक्षण घ्यायचं होतं. मात्र, त्याच विषयात मला कमी मार्क मिळाल्यामुळे मी इतका निराश झालो होतो की माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत असत (मी त्याबद्दल एक लेखही लिहिलेला आहे - माय स्टुपिड सुसाईड-प्लॅन). त्या वेळी मी ‘सायन्स घ्यायचंच नाही’ असं ठरवलं होतं, आयआयटीची तयारी ही तर फारच दूरची गोष्ट होती...

ही माझी चुकीची विचारसरणी होती; पण मी तो विचार धरून बसलो नाही. मी आणखी अभ्यास करू लागलो. माझं कुठं चुकलं हे शोधू लागलो, संकल्पना समजून घेऊ लागलो. मला बाकीच्या विषयांत चांगले मार्क्‍स मिळत होते, ही गोष्ट मी लक्षात घेतली...अशा प्रकारे मी हे नैराश्‍य झटकून टाकलं.

आणखी एक प्रसंग म्हणजे - मी ‘आयआयएम’मधून ‘एमबीए’ झाल्यावर नोकरीसाठी मुलाखती देत होतो त्या वेळचा.

‘तू फायनान्सवाला आहेस...’, ‘तू मार्केटिंगवाला आहेस,’ अशी अजब विभागणी त्या वेळी होत असे. डिग्री दिली जात असताना ‘फायनान्सचा एमबीए’ किंवा ‘मार्केटिंगचा एमबीए’ असं नव्हतं; पण लोक तसं मानतात. लोक मला ‘मार्केटिंग’वाला समजायचे. (मला वाटतं, मी माझा स्वतःचा ‘ब्रॅंड’ बनवला आहे, त्यामुळे हे बहुधा खरं असावं). मला ‘मार्केटिंग’ आवडतं; पण म्हणून मी ‘फायनान्स’मध्येही काही वाईट नाहीये. मला फायनान्सची नोकरी मिळाली तीही हाँगकाँगमध्ये. मी परदेशात जायला उत्सुक होतो (असंच फिरायला!), म्हणून मी ती नोकरी स्वीकारली. त्यामागं आयुष्यात काहीतरी वेगळं करता येईल, परदेशातल्या नोकरीत काही नवीन शिकता येईल, पैसेही चांगले मिळतील असे विचार होतेच; पण मला वाटू लागलं की, मी ‘फायनान्स’मध्ये ‘यूजलेस’ आहे. ‘फायनान्स’मधले काहीजण ‘इकॉनॉमिक टाइम्स’ वाचायचे, शेअर मार्केटबद्दल बोलायचे, त्या क्षेत्रातल्या पारिभाषिक संज्ञा वापरायचे...मला मात्र ते तितकंसं समजायचं नाही. मी आजही ‘फायनान्स’चा अशा प्रकारे विचार करत नाही. मी आयुष्याचाही तशा प्रकारे विचार करत नाही. गुंतवणूक, कंपन्या वगैरे गोष्टींकडे मी आजही अगदी साध्या-सरळ पद्धतीनं पाहतो. एखादी कंपनी कशा प्रकारे पैसे मिळवते, किती मिळवते, तिचं मूल्यांकन कसं आहे...असं मी अगदी साध्या-सरळ पद्धतीनं पाहतो.

त्यामुळे मला वाटायचं की मी ‘फायनान्स’मध्ये अगदी मागं राहणार. आपण अगदी ‘यूजलेस’ आहोत असं मला वाटत होतं, त्यामुळे मी ती नोकरी नाकारली. मी एवढा घाबरून गेलो होतो की, मला ज्यांनी नोकरी दिली होती, त्यांना मी ‘मला हे जमणार नाही’ म्हणून सांगितलं. हे ऐकून ते सर्दच झाले. ‘अरे, याला झालंय तरी काय...? आपण इतक्‍या उमेदवारांमधून याची निवड केली आहे आणि आता हा असं म्हणतोय...’ असं त्यांना वाटलं होतं.

अखेर, मी ती नोकरी स्वीकारली. तिथं तरून गेलो. मी अकरा वर्षं ‘फायनान्स’मध्ये काम केलं. मी ‘फायनान्स’मधील करिअर सोडलं असलं तरी मी आजही गुंतवणूक करतो. मी ‘फायनान्स’मध्ये ‘यूजलेस’ आहे हा माझा समज चुकीचा होता. मी हा विचार प्रबळ होऊ दिला नाही आणि माझ्या आयुष्याची सूत्रं त्या विचाराच्या हाती दिली नाहीत या गोष्टीचा मला आनंद आहे. मी ते क्षेत्र निवडलं, तिथं चांगली कामगिरी केली आणि चांगले पैसेही मिळवले. बहुधा त्यामुळेच मी ते क्षेत्र सोडून लेखक होऊ शकलो. ‘केवळ पैशासाठी लिहायचं नाही,’ हे सूत्र मी आज अमलात आणू शकतो आणि मी केलेल्या गुंतवणुकीमुळेच मला असं वागणं शक्य झालं आहे. ...सुचलं तर ठीक! मी ‘फायनान्स’चं ज्ञान मिळवलं ते बरं झालं. मी या क्षेत्रात ‘यूजलेस’ नाही. मी या क्षेत्रात जगात सर्वोत्कृष्ट नसेन; पण बऱ्याच लोकांपेक्षा माझी कामगिरी उत्तम आहे.

तिसरं उदाहरण म्हणजे लेखन. मी बॅंकेत नोकरी करत होतो. मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. एमबीए केलं आहे. मला लेखनाचा काडीमात्र अनुभव नव्हता. आपण लेखनाच्या क्षेत्रात ‘यूजलेस’ आहोत, असं कुठं तरी मला वाटायचं. आपल्याला लिहिण्या- वाचण्याची आवड आहे; पण म्हणून आपल्याला पुस्तक लिहिता येईल, लोक ते वाचतील असं नाही, असं वाटायचं मला. मात्र, प्रत्यक्षात ते घडलं. मी विचार केला, ‘चल्, एखादं पुस्तक लिहून पाहू या...किमान एखादा लेख तरी लिहून पाहू या...’ आणि, मी ते करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला आणि त्यानं माझं आयुष्य पूर्णपणे बदललं.

आपण ‘यूजलेस’ आहोत असं आपल्याला आयुष्यात बरेचदा वाटतं. कुणी तरी काही तरी बोलतं आणि आपल्याला तसंच वाटू लागतं.

माझा बॉस मला म्हणाला होता, ‘तू ‘यूजलेस’ आहेस, तुझ्याच्यानं बिझनेस वगैरे काहीही होणार नाही.’

मात्र, आज मी स्वतःचं काम करतो...एका अर्थानं मी उद्योजकच आहे. आपल्यात हा गुण नाही, असं एकेकाळी मला वाटायचं. काही लोक स्वतःला उत्तम उद्योजक मानतात; पण ते कधीही स्वतःचा उद्योग सुरू करू शकत नाहीत. त्यांना नोकरी सोडवतच नाही.

त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की, तुम्ही स्वतःबद्दल घाईनं मत तयार करू नका...स्वतःला ‘यूजलेस’ समजू नका. तुम्हाला फक्त भीती वाटतेय. आणि, तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटणं याचा अर्थ तुम्ही त्या बाबतीत ‘यूजलेस’ आहात असा होत नाही. बस्‌. तुम्हाला आणखी शिकावं लागेल. समजा, तुम्हाला स्वयंपाक करायची भीती वाटतेय, याचा अर्थ तुम्ही ‘यूजलेस’ आहात असा नाही. हळूहळू सुरुवात केलीत, शिकत गेलात तर एक दिवस तुम्हाला स्वयंपाक करता येईल. अगदी तशाच प्रकारे, तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकाल. माझ्या बाबतीत सांगायचं तर ते मी केलं.

तुम्ही स्वतःबद्दल कधीही नकारात्मक धारणा बाळगू नका, सदैव सकारात्मक राहा. सकारात्मक विचार, सकारात्मक मनोवृत्ती तुम्हाला आयुष्यात खूप पुढं नेऊ शकते, हे आता विज्ञानानंही सांगितलं आहे. ही केवळ ‘मोटिव्हेशनल टॉक’मध्ये सांगण्याची गोष्ट नाही, तर ती विज्ञानाच्या कसोटीवर खरी ठरलेली बाब आहे. ज्या लोकांचं स्वतःबद्दल सकारात्मक मत असतं ते लोक, स्वतःबद्दल नकारात्मक मत असणाऱ्या लोकांपेक्षा, अधिक यशस्वी होतात, असं दिसून आलं आहे.

त्यामुळे स्वतःबद्दल नकारात्मक धारणा अजिबात होऊ देऊ नका व बाळगू नका. टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.