फिजिकली फिट... यो बॉडी फिट

आज आपण ‘अनफिट’ लोकांना चार गोष्टी सांगू या. अशा लोकांना मी सांगू इच्छितो, की मित्रांनो तुम्ही अजिबात ‘फिट’ नाही. काही वर्षांपूर्वी माझीही अवस्था होती, तशी तुमची अवस्था आहे...
Physical Fit Health
Physical Fit HealthSakal
Updated on
Summary

आज आपण ‘अनफिट’ लोकांना चार गोष्टी सांगू या. अशा लोकांना मी सांगू इच्छितो, की मित्रांनो तुम्ही अजिबात ‘फिट’ नाही. काही वर्षांपूर्वी माझीही अवस्था होती, तशी तुमची अवस्था आहे...

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

आज मी ‘अनफिट’ लोकांना चार गोष्टी सुनावणार आहे. त्यांत मीसुद्धा आहेच... तीन वर्षांपूर्वीचा मी!

मी काही जॉन अब्राहम वगैरे नाही किंवा कुणी बॉडीबिल्डर नाही; पण मी आधीपेक्षा बराच ‘फिट’ झालो आहे. काही वर्षांपूर्वी मी अजिबात फिट नव्हतो आणि कुणी मला त्याबद्दल अगदी प्रेमाने समजावलं असतं, तरी ते मी ऐकलं नसतं. एवढंच नव्हे, तर मला त्याचा राग आला असता. पण, आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते, ज्या वेळी आपल्याला कुणीतरी खडसावणं गरजेचं असतं. मी अशा प्रकारचा आहे. (कदाचित तुम्हाला त्याची गरज नसेलही) हीसुद्धा एक मोटिव्हेशन ‘स्टाइल’ आहे. लोकांना रागावून, चांगलं खडसावून कार्यप्रवृत्त करणे.

आज आपण ‘अनफिट’ लोकांना चार गोष्टी सांगू या. अशा लोकांना मी सांगू इच्छितो, की मित्रांनो तुम्ही अजिबात ‘फिट’ नाही. काही वर्षांपूर्वी माझीही अवस्था होती, तशी तुमची अवस्था आहे... म्हणजे आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष न देणे, कधीही-कुठंही-काहीही खाणे, आपला आहार काय आहे याची अजिबात फिकीर नसणे... पकोडे तळले जात आहेत... आहाहा मस्त खमंग वास दरवळतोय, त्यात पाऊस पडतोय... म्हणजे जणू ‘पकोडों का मौसम’च!. त्यात ब्रेकफास्टची वेळ झाली आहे म्हणून खायचं... मग भूक असो वा नसो. जेवणाची वेळ झाली म्हणून खात राहायचं... मग हळूहळू वजन वाढत जातं. समजा, तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात. दरवर्षी तुम्हाला बढती मिळो ना मिळो, तुमची वजनाची कमाई मात्र वाढतच जाते. समजा, तुम्ही तरुण विद्यार्थी आहात; पण चांगले जाडजूड आहात. (मी स्वतः जाड होतो) मी कुणाचंही ‘शेमिंग’ करत नाहीये. तुम्ही जाड असलात व तुम्हाला त्याचा अभिमान असला तरी माझं काही म्हणणं नाहीये. पण, जर तुम्ही हा लेख वाचत असाल, तर मात्र तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे.

मी आता अठ्ठेचाळीस वर्षांचा आहे. तुमच्यापैकी बरेचजण माझ्यापेक्षा लहान असतील. पण, बरेचजण तरुण असूनही बटाट्यासारखे दिसतात, त्यांच्यात ऊर्जा कमी असते. मी काही ॲथलिट नाही; पण मी खात्रीने सांगतो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांपेक्षा मी वेगाने धावू शकेन, नक्कीच. तुम्ही ‘फिट’ नसता. तुमचं हृदय ‘फिट’ नसतं. यू डोण्ट लुक युअर बेस्ट. तुम्हाला तुमचं सर्वोत्तम ‘व्हर्जन’ बनावयाचं असतं; पण तुम्ही स्वतःची थोडी काळजी घेण्याएवढासुद्धा तुमच्या शरीराचा मान ठेवत नाही.

तुम्ही लहान असताना गोळ्या- चॉकलेट- टॉफी खात होतात. ठीक आहे, लहान मुलांना कळत नाही. त्यांच्यासमोर येईल ते ती खातात आणि गोळ्या- चॉकलेट- टॉफी तर त्यांच्यासाठीच बनलेली असतात! पण, तुम्ही आजही तसंच वागताय. समोर मिठाई आली की, तुम्हाला ती खायची असते. चॉकलेट, केक समोर आला की तो तुम्हाला खायचा असतो. समोर कुठलाही पदार्थ येवो, मग तो कितीही अनारोग्यकारक असो; पण तो चटकदार असेल, तर तो तुम्हाला तोंडात टाकावासा वाटतोच वाटतो.

या सगळ्या गोष्टी तुमची ‘ सिस्टिम’ खराब करत आहेत... तुमच्या रक्तात गडबड होतेय... ‘फॅटी-लिव्हर’, ‘कोलेस्ट्रॉल’ अशा किती काय काय समस्या निर्माण होत आहेत... मधुमेहाला निमंत्रण मिळतंय. मधुमेहाच्या बाबतीत तर आपला देश जगात ‘नंबर वन’ आहे. तरीही, आपण भारतीय लोक एकमेकांचं तोंड गोड करतच आहोत. काहीही चांगलं घडलं की, ‘लो जी मूँह मीठा करो’ असतंच. हे ‘मूँह मीठा’ करणं म्हणजे दरवेळी मधुमेहाच्या दिशेने एक पायरी सरकणं! पण आपण ‘मूँह मीठा’ करणं ही सर्वांत पॉझिटिव्ह गोष्ट मानतो, त्यामुळे तर मधुमेहाचं प्रमाण जास्त आहे.

तुम्ही कधीच तोंड गोड करू नका असं मी सांगत नाहीये; पण सतत गोड पदार्थ, मिठाया खाणं हे मात्र ‘सेलिब्रेट’ करू नका. तुम्ही आतापर्यंत आयुष्य फुकट घालवलं आहे. तुम्ही यापेक्षा कितीतरी चांगले दिसू शकला असता. तुम्ही आणखी ‘फिट’ असला असतात, तर तुम्ही आणखी ‘फिट’ दिसला असतात, तर तुम्ही आणखी ऊर्जासंपन्न असता; पण तुम्ही त्यासाठी काहीही करत नाही. खरंतर तुम्हाला यासाठी कुणी अडवलंय? ता तुम्ही म्हणाल, ‘‘माझ्याकडे जिम लावायला पैसे नाहीत.’’ ठीक आहे. मग तुम्हाला बाहेर जाऊन धावण्याचा व्यायाम करायला कुणी अडवलंय? ता तुम्ही म्हणाल, ‘‘उकाडा खूप असतो, त्याचा त्रास होतो!’’ ठीक आहे. मग तुम्हाला पहाटे चार वाजता उठून व्यायाम करायला कुणी अडवलंय? आणि भारतात तर बऱ्याच ठिकाणी इतका उकाडा नसतो. तुम्हाला चार वाजता उठण्याचीही गरज नाही. तुम्ही सहा वाजता उठलात तरी चालू शकतं. तुम्ही धावू शकता. पुश अप्स करू शकता. पाकीटबंद पदार्थ, अपायकारक अन्नपदार्थ खाणार नाही; घरी बनवलेलं अन्न खाईन, असा निश्‍चय करू शकता.

या गोष्टींसाठी फार पैसे लागत नाहीत. माझ्याजवळही या गोष्टी नव्हत्या. एके दिवशी मात्र मला सणक आली. मी स्वतःलाच म्हणालो, ‘‘तू हे काय करतो आहेस यार? ही कसली पद्धत आहे जगण्याची? ये जीना भी कोई जीना है! करिअर झालं, सिनेमे झालं, सगळं झालं; पण मी स्वतःकडे का लक्ष देत नाहीये?’’

त्याक्षणी मी निर्धार केला, स्वतःकडे लक्ष द्यायचं... स्वतःची काळजी घ्यायची आणि अजूनही जेव्हा कधी मनाची गाडी रुळावरून घसरू लागते, ‘चल, अमुक खाऊ या, तमूक पिऊ या’ असा मोह होऊ लागतो, तेव्हा मी स्वतःला खडसावून विचारतो, ‘‘काय करतोस तू हे? दोन मिनिटांच्या जिभेच्या चोचल्यांसाठी तू आठवड्याभराच्या मेहनतीवर पाणी पाडतो आहेस?’’

दोन मिनिटांचे जिभेचे चोचले दररोज पुरवले, की वर्षभरात तुमचं वजन आठ-दहा किलोंनी वाढेल. त्यामुळे तुम्हाला काहीही फरक पडणार नाही, काहीही अपाय होणार नाही, अशी तुमची समजूत आहे का? ता तरुणपणीच तुमची ही अवस्था आहे. विचार करा, तुम्ही जेव्हा वयाचा चाळीस-पन्नासचा टप्पा, गाठाल, तेव्हा तुमची अवस्था काय असेल? त्या वेळी तुम्ही आणखी स्थिरावलेले असाल, तुमची कमाई चांगली असेल, तुम्ही आरामात जगत असाल, काहीही खाऊ-पिऊ शकत असाल, त्या वेळी तुम्हाला हे सगळं कंट्रोल करणं किती मुश्‍कील होईल याचा विचार करा.

हे सगळं अशा प्रकारे सुरू असतं आणि तुमची तक्रार असते की, मला गर्लफ्रेंड मिळत नाही. कशी गर्लफ्रेंड मिळेल रे तुला जाड्या?

समजा, तुम्हाला गर्लफ्रेंड मिळाली, पण नंतर तिला अगदी तुमच्यासारखाच प्रोफाइल आणि रेझ्युमे असलेला, पण सडपातळ असा मुलगा मिळाला आणि ती निघून गेली, तर मग काय कराल? तेव्हासुद्धा तुम्ही सच्चा प्यार, विश्‍वासघात, अमुक-तमूक सांगत राहाल; पण उठून धावायला जाणार नाही. सगळीकडे ‘कॉमेंट’ करत सुटाल, पण चुकूनही व्यायाम वगैरे करणार नाही. तेव्हा ही फालतूगिरी बंद करा आणि स्वतःचा आदर करायला, मान ठेवायला शिका, कळेल?

तुम्ही सगळा दिवस फोनवर बोलत बसू नका, उठा... जागचं हला, तुम्ही रोज दोन तास चाललात, तरी तुम्ही फिटनेसच्या बाबतीत काही ना काही साध्य कराल. पण, जर तुम्ही दिवसभर मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसणार असाल, चिप्स व तत्सम पदार्थ फस्त करणार असाल, स्वतःकडे अजिबात लक्ष देणार नसाल, तर तुम्हाला त्याचे परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाहीत. यू हॅव टू स्टॉप धीस, ड्यूड!

तुम्हाला नोकरी मिळाली नाही, मी समजू शकतो. कंपन्या नोकऱ्या देत नाहीयेत, ठीक आहे. तुम्हाला ॲडमिशन मिळाली नाही, मी तुमचं दुःख समजू शकतो. कॉलेजमध्ये ‘सिलेक्शन-रेशो’ खूप कमी आहे. मी तुमचं दुःख समजू शकतो. पण, जर तुम्ही ‘मी’ फिट होणार नाही असं म्हणत बसाल, तर त्याबद्दल काय बोलायचं?

आयुष्यात बाकी काहीच सुरळीत होत नसेल तर तुम्ही फिटनेसकडे लक्ष द्या. करिअरला दिशा मिळत नाहीये, अभ्यासातही काही प्रगती होत नाहीये, तर किमान फिट तरी व्हा. यातही जर तुमच्या सबबी असतील की, मला वेळच नाहीये... मला जमतच नाहीये... बाकीचे लोक स्टिरॉईड घेतात... अमुक-तमूक... तर त्या अजिबात सांगू नका. चांगल्या मार्गाने आरोग्य मिळवणारेही बरेच लोक आहेत. तुम्हीही तशाच प्रकारे फिट होऊ शकता... नव्हे, तुम्हाला फिट व्हावंच लागेल, नाहीतर तुम्ही आयुष्यात मागे राहाल.

फिट माणसाची ऊर्जा कितीतरी जास्त असते. त्याचं असणं प्रभावी असतं. एखादा फिट माणूस व्याख्यान देतो, तेव्हा त्याचा इफेक्ट काही वेगळाच असतो. फिट माणसाचं व्यक्तिमत्त्वसुद्धा अधिक चांगलं असतं. तुम्ही फिट असाल आणि नोकरीसाठी मुलाखतीला गेलात, तर तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असेल, डेटवर गेलात तर गर्लफ्रेंड मिळण्याची शक्यता अधिक असेल.

त्यासाठी तुम्हाला रोज फक्त एक तास व्यायाम करावा लागेल आणि सतत अरबट-चरबट फालतू पदार्थ चरत राहणं बंद करावं लागेल. पण हेच तुम्हाला जमत नाही, तर तुम्हाला आयुष्यात काय जमणार? जर तुम्हाला तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवणं जमत नसेल, तर तुम्ही आयुष्यात मोठमोठ्या गोष्टी कशा करणार? तुम्हाला तुमचं शरीर सांभाळणं जमत नाही. लोक इथं देश सांभाळतात, मोठमोठ्या कंपन्या सांभाळतात, तुम्हाला एक शरीर सांभाळणं जमत नाही? तुम्हाला नीट काही करायचंच नाहीये, हे अपयशाचं पहिलं लक्षण असतं.

तुम्ही यावर मात करा. त्यासाठी तुम्ही फार काही करण्याची गरज नाहीये, तुम्ही फक्त जिमला जाणं सुरू करा किंवा धावायला जा किंवा इतर कुठले व्यायामप्रकार सुरू करा आणि आहाराकडे लक्ष द्या. आपण काय खावं हे तुम्हाला कळतं, ते मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. ‘इट हेल्दी-मूव्ह मोअर’ हे सूत्र काही फार अवघड नाहीये. तुम्ही फिट बना. आयुष्य फुकट घालवू नका. स्वतःकडे लक्ष द्या. आपल्याला किती विलक्षण शरीर लाभलं आहे! कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर आपल्याला हे शरीर मिळालं आहे! ते किती गोष्टी करत असतं आणि तुम्ही किती सहजपणे ते खराब करत आहात!

समजा, तुम्ही कार विकत घेतली आहे. तुम्ही त्या कारवर रोज रोज केर टाकता, माती ओतता, खरकटं टाकता, त्या कारवर लाथा मारता, तिला पोचे आणता आणि ही माझी कार आहे असं म्हणता का? असं कुणी करतं का? मग तुम्ही तुमच्या शरीराच्या बाबतीत असं का करता?

स्वतःला सावरा, सुधारा... किप इम्प्रूव्हिंग युअरसेल्फ... फिट बना, टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत. )

(अनुवाद : सुप्रिया वकील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.