अकेले है, तो क्‍या गम है!

तुम्हाला सक्‍सेसफुल...यशस्वी व्हायचं आहे? तर मग एक गोष्ट सांगतो. यशस्वी होण्यासाठीची एक गोष्ट कधी सांगितली जात नाही; पण मी ती तुम्हाला सांगणार आहे.
success journey life lonely one
success journey life lonely onesakal
Updated on
Summary

तुम्हाला सक्‍सेसफुल...यशस्वी व्हायचं आहे? तर मग एक गोष्ट सांगतो. यशस्वी होण्यासाठीची एक गोष्ट कधी सांगितली जात नाही; पण मी ती तुम्हाला सांगणार आहे.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो !

तुम्हाला सक्‍सेसफुल...यशस्वी व्हायचं आहे? तर मग एक गोष्ट सांगतो. यशस्वी होण्यासाठीची एक गोष्ट कधी सांगितली जात नाही; पण मी ती तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट तुम्हाला आत्मसात करावी लागेल आणि ते अगदी सोपं आहे. ही गोष्ट म्हणजे - बी ओके अलोन...तुम्ही स्वतःला एकटं राहण्याची सवय लावून घ्या आणि ती अशा प्रकारे लावून घ्या की, तुम्हाला एकटं राहणं त्रासदायक होता कामा नये...यू शुड बी ओके टू बी अलोन.

ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे; कारण, अ जर्नी टू अ सक्‍सेस इज अ लोनली वन...

कोणत्याही बाबतीत यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी तयारी करावी लागते. म्हणजे बराच काळ एकाग्रचित्तानं काम करावं लागतं, सराव करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते. एखादा माणूस मॅरेथॉनची तयारी करत असेल तर तो त्यासाठी महिनोन्‌महिने प्रशिक्षण घेतो. एखादा मुलगा ‘एन्ट्रन्स एक्‍झॅम’ची तयारी करत असेल तर तो महिनोन्‌महिनेच काय तर, वर्षानुवर्षं अभ्यास करत असतो. कुणी पुस्तक लिहीत असेल, कुणी बिझनेसमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करत असेल, कुणी आणखी काही करत असेल...या साऱ्यासाठी दीर्घ काळ खूप कष्ट घ्यावे लागतात.

सामान्यतः या गोष्टी एकट्यानंच केल्या जातात. काही नशीबवान लोकांना मित्र असतात, ते त्यांच्याबरोबर भागीदारीत बिझनेस वगैरे करतात. ठीक आहे. अशा लोकांना एकटेपणा कमी असतो; पण बाकी मात्र सगळे एकट्यानंच वाटचाल करत असतात...आपण परीक्षेची तयारी एकट्यानं करतो, डाएट एकट्यानं करतो, जिमला एकट्यानं जातो आणि तुमच्या यशाचं लक्ष्य ज्या शिखरावर असतं, तिथवर जाण्याचा खडतर मार्गही तुम्हाला एकट्यानंच पार करायचा असतो. या गोष्टीची मला भीती वाटायची. मी लेखन-संपादन एकट्यानं करतो, प्रवास एकट्यानं करतो, काही वेळा मी एकटा राहतो. पूर्वी मी या गोष्टीमुळे खूप ‘नर्व्हस’ व्हायचो. मला वाटायचं, ‘अरे बापरे! आपल्या आजूबाजूला कुणीच नाहीये!’

आता मात्र (वयाचा परिणाम असेल किंवा आणखी काही) माझ्या लक्षात आलंय की, हा काहीतरी मिळवण्याचा किंवा साध्य करण्याचा भागच आहे. हे लक्षात आल्यावर मी ते ‘एन्जॉय’ करू लागलो. आता मी एकटा असणं ‘एन्जॉय’ करतो. माझ्या सगळ्या वेळाचं काय करायचं हे मी आता मजेत ठरवू शकतो. तुम्हाला जितकं उंच जायचं असेल तितकं तुम्हाला एकटं राहण्याशी जुळवून घ्यावं लागेल.

एकटं असणं आणि एकाकीपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकटं असणं म्हणजे जस्ट मी बाय मायसेल्फ...बट आय ॲम ओके. एकांत आणि एकाकीपणा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकांतात एक ‘सुकून’ असतो...प्रशांतता असते आणि एकाकीपणात उदासवाणेपणा असतो.

तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा तो वेळ ‘सुकूनवाला’ असेल हे तुम्हाला पाहावं लागेल. मित्रांनो, ‘अचिव्हमेंट’ खरोखर कधी घडते? ज्या वेळी तुम्ही तासन्‌तास... महिनोन्‌महिने...वर्षानुवर्षं जराही विचलित न होता, अगदी ‘फोकस’नं काम करता तेव्हा तुम्ही काहीतरी साध्य करता, काहीतरी मिळवता...‘अचिव्हमेंट’ घडवता.

आज जग असं आहे की, तुम्ही कधी एकटे नसताच. म्हणजे, तुमच्याबरोबर कुणी व्यक्ती असते असं नाही; पण जर तुम्ही फोनवर चॅट करत असाल तर, तुम्ही एकटे आहात, असं म्हणता येणार नाही. सदैव एखादं उपकरण तुमची सोबत करत असतं, कुणीतरी तुमचं मनोरंजन करत असतं. तुम्ही व्हिडिओ बघता, चॅट करता, तुमचा संवाद घडत असतो. तुम्ही एक सेकंदसुद्धा पूर्णतः एकटे नसता.

मला एकदा एकानं विचारलं होतं : ‘जेव्हा फोन नव्हते तेव्हा लोक बाथरूमला कसे जायचे?’

खरंच सांगतो, जगाची अवस्था ही अशी झाली आहे!

आपण जेव्हा काहीही करत नसतो...डोकं एकदम रिकामं असतं तेव्हा आपल्याला खूप भीती वाटते. आपण एकट्यानं कसं राहायचं असा प्रश्‍न पडतो. रात्री दोन वाजता उठून पुस्तकांचा गठ्ठा घेऊन अभ्यासाला बसायचं म्हणजे भीती वाटणारच ना! आता आपल्याला संपर्कात राहणं इतकं सहजसोपं झालं आहे की आपल्याला एकटं राहण्याची भीती वाटते; पण जर आपल्याला काही साध्य करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर एकटं राहणं, एकांत, अलगीकरण या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात.

आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा आपल्याला थोडं कंटाळवाणंसुद्धा होतं. हे कंटाळवाणेपण - म्हणजेच ‘बोअरडम’ - म्हणजे काय? तर ती एक भावना असते...एक लहानशी, अस्वस्थ करणारी भावना. एक किंचितशी वेदनाच म्हणू या; पण जेव्हा तुम्हाला मनोरंजन करणारं एखादं साधन मिळतं किंवा तुम्हाला कुणीतरी भेटतं तुम्ही त्याच्याशी बोलता तेव्हा ही भावना...हे कंटाळवाणेपण दूर होतं.

तुम्ही जर व्यायाम करत असाल, अभ्यास करत असाल, डाएट पाळण्यासाठी एकटे उपाशी बसला असाल तर तुम्हाला कंटाळा येणारच. हा तुमच्या वाटचालीतला एक भागच असतो. तुम्हाला एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं असेल, तर तुम्हाला ट्रेनचा प्रवास करावा लागेल. तिथं ‘मी ट्रेनमध्ये बसणार नाही’ असं म्हणून चालणार नाही; कारण, मग तुम्हाला जिथं जायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही पोहोचूच शकणार नाही. तसंच तुम्हाला एकटं असण्याशी आणि त्याबरोबर येणाऱ्या ‘बोअरडम’शी जुळवून घ्यावंच लागेल.

तुम्ही ‘बिइंग बाय युअरसेल्फ’चा प्रयत्न करून बघा. तुम्ही दिवसभरात काही वेळ पूर्ण एकटे राहण्याचा प्रयत्न करा, अगदी सगळी उपकरणं -‘डिव्हाईस’ - सगळं दूर ठेवा आणि बघा, तुमचं मन कुठं कुठं जातं ते. तुमचं चित्त जेव्हा अजिबात भरकटलेलं नसतं तेव्हा तुमच्या मेंदूचं वर्तन कशा प्रकारे असतं ते अनुभवा, तुम्हाला कुठल्या टप्प्यावर कंटाळा येतो ते ‘फील’ करा...घाबरू नका. ‘मला बोअर होतंय... बोअर होतंय,’ असे कासावीस होऊ नका. ‘काहीतरी करा; पण माझं कंटाळवाणेपण दूर करा,’ असे अगतिक होऊ नका.

‘बोअरडम’ ही एक दुखरी भावना असते; पण तुम्ही स्वतःला त्याची सवय लावून घ्या; कारण, ही सवय कामी येते. ‘मी अर्धा तास बोअर होऊ शकतो’ याचा अर्थ ‘मी अर्धा तास अभ्यास करू शकतो...अर्धा तास व्यायाम करू शकतो.’ याचाच अर्थ, तुम्ही तुमच्या मेंदूला अशा दिशेला-ठिकाणी नेऊ शकता, जिथं जायची त्याची इच्छा नसते. त्यामुळे बरेचदा ‘सक्‍सेस इज जस्ट द ॲबिलिटी टू सस्टेन बोअरडम’ असा अर्थ असतो.

पुस्तक लिहिणं ही सोपी गोष्ट असते असं तुम्हाला वाटतं का? रोज एक...दोन...तीन पानं लिहायची...असं काम वर्षभर चालतं. कधी कधी ते कंटाळवाणं होऊ शकतं. मला त्याचा अनुभव आहे आणि ती भावना कशी हाताळायची तेही मला माहीत आहे. मी माझ्या मेंदूला अशा प्रकारे बळकट केलं आहे की त्या भावनेमुळे मला खूप त्रास होत नाही आणि त्या त्रासामुळे मी माझं काम एकदम थांबवत नाही.

तुम्हाला कंपनी द्यायला कुणीही व काहीही नसलं तरी शांतपणे, व्यवस्थित तरून जाण्याची क्षमता ही तुमची खूप मोठी ताकद असते; आणि, ही ताकद तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करू शकता. मी स्वतः ‘संपूर्ण’, ‘परिपूर्ण’ होण्यासाठी मला ‘बाहेरून’ कशाचीही आवश्‍यकता नाहीये, मी स्वतःबरोबर खूश आहे. मला कुणी माणूस भेटला तर ठीक आहे. मनोरंजनासाठी काही साधन मिळालं तर ठीक आहे; नाही मिळालं तरी हरकत नाही. कुणी माझी तारीफ करत नाही, मला ‘लाईक्स’ मिळत नाहीत, मी एकटा आहे...इट्स‌ फाईन, ओके, अशी धारणा तुम्ही ठेवू शकता.

याचा अर्थ तुम्ही ‘ॲन्टिसोशल’ आहात असा नाही, तर याचा अर्थ आहे की मी माझ्यासाठी ‘संपूर्ण’ आहे, खूश आहे - स्वतःसमवेतही व लोकांसमवेतही...माझी लोकांना भेटायची इच्छा असते आणि मला एकटंही राहायचं असतं.

जेव्हा तुम्ही एकटं राहायला तयार असता तेव्हा तुमच्यात खूप मोठ्या ध्येयांपर्यंत जाण्याची ताकद येते आणि हे तुमचं फार मोठं सामर्थ्य असतं. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर एकटं राहण्याची आणि त्या अवस्थेत खूश राहण्याची सवय लावून घ्या.

टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.