आपला इतिहास ‘जयघोषा’त अडकलाय!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास नुकतीच ३५१ वर्षे झाली. राज्याभिषेकाचे महत्त्व आजच्या परिस्थितीत समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
chhatrapati shivaji maharaj rajyabhishek 351 over london history researcher sanket kulkarni
chhatrapati shivaji maharaj rajyabhishek 351 over london history researcher sanket kulkarniSakal
Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास नुकतीच ३५१ वर्षे झाली. राज्याभिषेकाचे महत्त्व आजच्या परिस्थितीत समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक मोहिमेत राजांचा संयम, अचूक निर्णय, अतुलनीय पराक्रम व दृढनिश्चय यांचा प्रत्यय आला. आपला इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. लंडनस्थित इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी त्याबाबत मांडलेली रोखठोक मते...

- संकेत कुलकर्णी

आपल्याकडे गडकिल्ल्यांकडे भावनिक दृष्टीने बघितले जाते. शिवाजी महाराजांना दैवत मानले जात असल्याने ते योग्यच आहे. गडकिल्ले आणि वाडे पहिल्यासारखे उभे राहायला हवे, असे वाटते. मात्र, ते शक्य नाही. कारण त्यांचे मूळ नकाशे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. नकाशाची नोंद आहे; परंतु ते उपलब्ध नाहीत.

राजधानी किल्ले रायगडमधील इमारती दाखवता येतील, असा नकाशा आपल्याकडे उपलब्धच नाही. १८१८ मध्ये इंग्रजांनी किल्ले रायगड जिंकला. त्या वेळी त्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पत्र पाठवले की, मी किल्ल्याचा नकाशा पाठवत आहे. ते पत्र ब्रिटिश लायब्ररीत आहे; परंतु नकाशा नाही. १८१८ ते १८८५ पर्यंत किल्ल्यात जायला बंदी होती.

मात्र, त्यादरम्यान अनेकांनी चिरेबंदी दगड आणि वासे घरी नेले. उलट इंग्लंडमध्ये एकट्या वेल्समध्ये तीनशेपेक्षा जास्त किल्ले आणि गढी आहेत. मात्र, त्यांची सुयोग्य देखभाल केली जाते. त्यांचे संदर्भ आणि नकाशे पाहून काळजी घेतली जाते. आपल्याकडे मात्र किल्ल्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. आपला इतिहास फक्त ‘जयघोषा’त घुटमळतोय. तिथे इतिहासाचा राजकीय वापर होत नाही.

आपल्याकडे आलेली इतिहासाची पुस्तके म्हणजे दुय्यम साधने आहेत. इतिहासाची प्राथमिक साधने वाचली तर वेगळीच मजा आहे. हेन्री ऑक्झेंडन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित होता.

त्याने लिहिल्यानुसार, महाराजांची तेव्हा २० हजार होनांनी सुवर्णतुला झाली होती... ते ऐकणे आणि प्रत्यक्षात त्याच्या डायरीचे पान वाचणे एक वेगळाच अनुभव आहे. राजापूरची बखर शिवाजी महाराजांनी खणत्या लावून तुडवली. हेन्री ऑक्झेंडन याने शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्राच्या मायन्यात त्याने त्यांना ‘हिंदू किंग’ असे संबोधले आहे. १६६६ मध्ये त्याला असे लिहावेसे वाटले.

मुंबई बेटावरून बंड

फॅक्टरी रेकॉर्डमध्ये ‘शिवाजी’ नावाचे पुस्तक आहे. अनेकांनी मेहनत घेऊन महाराजांचा उल्लेख असलेल्या गोष्टी त्यात प्रकाशित केल्या आहेत. त्यात संभाजीराजांचाही उल्लेख आहे. संभाजी महाराजांनी इंग्रजांकडून मुंबई बेट विकत घेण्याचा प्रयत्न केला. १६८४ मध्ये रिचर्ड केग्विनने मुंबई बेट विकत असल्याच्या कारणावरून बंड पुकारले होते.

त्याबद्दल आपल्याकडे माहिती नाही. मुंबईचे बंदर विकत घेण्याचा घाट संभाजीराजांनी घातला होता. केग्विनने त्याविरोधात इंग्लंडच्या राजाच्या नावाने बंड पुकारले. ब्रिटिशांच्या हाती बंदर उरणार नाही, त्यामुळे ते वाचवण्यासाठी मी बंड करतोय, असे त्याने सांगितले.

मग इंग्रजांमध्येच वाटाघाटी झाल्या. केग्विनला शाही फर्मान आले. ‘आम्ही काही बेट विकत नाही. त्यामुळे तू परत ये’ असे सांगण्यात आले. इंग्लंडला परत जाताना केग्विनचे निधन झाले. महाराजांच्या १६७८ मधल्या खांदेरीच्या लढाईच्या वेळी तो उपस्थित होता.

महाराजांच्या बारशाचे पदार्थ

‘शिवभारत’ नावाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या बारशाला काय पदार्थ केले होते, याचा उल्लेख आहे. जिजाऊंनी त्यावेळी कुठल्या रंगाची साडी घातली होती, याचाही उल्लेख त्यात आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रकाशित करण्यापूर्वी ते सारे शिवाजी महाराजांना वाचून दाखवण्यात आले होते. त्यामुळे त्यात त्रुटी असण्याची शक्यता कमी आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्याचा अभ्यास केला होता. म्हणूनच ‘जाणता राजा’ नाट्यात त्याच रंगाची साडी जिजाऊ साकारणाऱ्या व्यक्तिरेखेने नेसली आहे.

वाघनखे राजांसाठीच

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा उल्लेख अनेक साधनांत येतो. महाराजांच्या काळात जो पोवाडा रचला होता त्यातही वाघनखांचा उल्लेख आहे. महाराजांनी वाघनखे वापरली हे खरेच शक्य होते. अफझल खान एक कपटी व्यक्ती म्हणून कुप्रसिद्ध होता.

महाराज डावखुरे नव्हते, तरीही त्यांनी त्या हातात वाघनखे घातली; कारण ती कोणाला दिसणार नव्हती. अफझल खानाने डाव्या बगलेखाली शिवाजी महारांजाना दाबले. महाराजांनी डाव्या हातात वाघनखे घातली होती.

त्या वेळी त्यांनी अफझल खानाच्या पोटावर वाघनखे चालवली असण्याची शक्यता आहे. त्यानंतर बिचवा काढून त्यांनी त्याला मारले. अफझल खानाला अतिआत्मविश्वास होता. त्यामुळे तो चिलखत घालून आला नव्हता. ब्रिटिश लायब्ररीमध्ये ठेवलेली वाघनखे ज्या प्रकारे सुबकतेने बनवली गेली आहेत त्यावरून ती खास राजांसाठीच असल्याचे लक्षात येते. कारण त्या काळात अनेक बटबटीत वस्तूही बनवल्या जात होत्या.

जेम्स ग्रँट डफ यांच्याकडून ती वाघनखे इंग्लंडला आली. त्यांचा मुलगा माऊंटस्टुअर्ट ग्रँट डफदेखील सातारच्या दरबारात गेला होता. त्याने ती वाघनखे बघितल्याचे लिहून ठेवले आहे. वाघनखांवरून अनेक वादही आहेत.

महाराजांच्या समकालीन साहित्यांपैकी ९० टक्के साहित्यांत वाघनखे वापरल्याची नोंद येते. महाराजांनी अफझल खानाला मारले. दुसऱ्या दिवशी ते मोहिमेवर निघून गेले होते. घाईगडबडीत त्यांनी वाघनखे कुणाला तरी सांभाळायला दिली, याचा उल्लेख कुठेच नाही; पण महाराजांनी वाघनखे वापरली याचा उल्लेख आहे.

मराठा इतिहासाचा फोकस

माझा मुख्य फोकस मराठा इतिहासावरच आहे. १६२० पासून सुरतेचे फॅक्टरी रेकॉर्ड उपलब्ध आहे. १६२० ते १८१८ दरम्यानचा काळही माझा अभ्यासाचा विषय आहे. भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हाचा सीआयडी रिपोर्ट आहे.

त्या वेळी नक्की काय झाले, त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली गेली, इत्यादींसंदर्भातील तो अहवाल आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा भारतातून लंडनला गेले तेव्हा इकडच्या सीआयडीने इंग्लंडमध्ये पत्र पाठवून ‘एक फायर ब्रँड नेता आला आहे... त्यावर लक्ष ठेवा’ असा इशारा दिला होता.

ब्रिटिश लायब्ररीमध्ये कॅटलॉग समजून घेणे अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. इतिहास संशोधन करताना कॅटलॉग महत्त्वाचा भाग आहे. ब्रिटिश लायब्ररीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे कागद आणि ब्रिटिश सत्तेचा रेकॉर्ड आहे. स्वातंत्र्याआधी भारत मंत्री होते. इंडिया ऑफीस रेकॉर्ड वेगळे होते. १९४७ नंतर दोन्ही रेकॉर्ड एकत्र आले.

मात्र, अजूनही डिजिटायजेशन प्रक्रिया झालेली नाही. ब्रिटिश लायब्ररीत प्रत्येक विभागात डेस्कवर अधिकारी असतात. ते तुम्हाला लागणारे संदर्भ तातडीने शोधून देण्यात मदत करतात. संदर्भासाठी तुम्ही ई-मेल केले तरी ते त्यावर संदर्भ पाठवतात. मात्र, त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष भेट द्यावी लागते; कारण अजूनपर्यंत तिकडेही डिजिटायजेशन झालेले नाही.

महाराष्ट्रात एखाद्या कागदाची फोटो कॉपी हवी असेल तर ती मिळण्याचा सरासरी वेळ ९० दिवसांचा आहे. बाहेरच्या संशोधकांना एवढे दिवस थांबण्यासाठी वेळ नसतो. मात्र, इंग्लंडमध्ये बऱ्याच गोष्टींचे तुम्ही थेट फोटो काढू शकता. आपल्याकडे अजूनही फोटो काढायला परवानगी नाही. ब्रिटिश लायब्ररीतही काही खासगी कलेक्शन नसेल तर ते फोटोकॉपी देत नाहीत.

मात्र, त्यांच्याकडे स्कॅन कॉपी मागितली तर ते लगेच करून देतात. ८५ टक्के ते फोटो काढायची परवानगी देतात. कारण अजून संग्रहाचे डिजिटायजेशन झालेले नाही. व्यावसायिक प्रकाशनासाठी फोटो लागत असेल तर रॉयल्टी द्यावी लागते.

उदा. रघुनाथ शिंदेंचे एक पत्र आहे. त्यावर खासा शिक्का आहे. ते पत्र तुम्हाला कुठे प्रकाशित करायचे असेल तर सर्व माहिती द्यावी लागते. त्या फोटोची रॉयल्टी मोजावी लागते. मात्र, सार्वजनिक वापरासाठी वा प्रकाशनासाठी फोटो लागत असेल तर रॉयल्टी भरावी लागत नाही.

धर्मप्रसाराचा हेतू

ब्रिटिश भारताचे भले करायला इथे आले नव्हते. दादाभाई नौरोजी यांनाही असेच वाटायचे. स्पॅनिश किंवा पोर्तुगीजांसारखे नाही; पण धर्मप्रचार करणेदेखील ब्रिटिशांचा छुपा हेतू होता. त्यामुळे १८५४ मध्ये इंग्लंडची राणी तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड डलहौसीला पत्र लिहिते की, रेल्वेमार्ग आपल्याकडे ले; परंतु ख्रिस्ती धर्माचा म्हणावा तसा प्रचार होताना दिसत नाही. ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य असताना धर्मप्रसार किती महत्त्वाचा होता यावरून सिद्ध होते.

इंग्लंडमध्ये क्रूर प्रथा

भारतात लॉर्ड विल्यम बेंटिकने सतीप्रथा बंद केल्याचा उल्लेख आहे. मात्र, अनेक ठिकाणी ब्राम्हो समाजाने अशी प्रथा बंद केली होती. भारतात सती प्रथा सरसकट किंवा सक्तीची नव्हती. शहाजीराजे गेल्यानंतर जिजामाता सती गेल्या नाहीत.

महाराजांनी त्यांना थांबविले. आपल्याकडे सतीची चाल नव्हतीच. मात्र, ज्या इंग्रजांनी सतीची चाल बंद केली त्यांच्याकडे अनेक क्रूर प्रथा अस्तित्वात होत्या. त्याचे अनेक दाखले पुस्तकातून येतात. त्या काळात इंग्लंडमध्ये पुरुष आपल्या बायकांना बाजारात विकत असत. त्या वेळी इंग्लंडमध्ये चर्चच्या सक्तीमुळे घटस्फोट घेणे धर्मसंमत नव्हते.

विभक्त होण्यासाठी संसदेकडे अर्ज करावा लागायचा. अशा वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रियेमुळे अनेक जण पत्नीला बाजारात विकायला काढायचे. ‘वाईफ फॉर सेल’ नावाच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. बायकोच्या गळ्यात किमतीचा टॅग लावायचे. त्यावर पैसे कोट केले जायचे. वर्तमानपत्रात जाहिरातीदेखील दिल्या जायच्या. त्या वाचून सदर महिलांचे प्रियकर किंमत मोजून तिला घरी घेऊन जात.

इंग्लंडमध्ये १८६३ मध्ये अंडरग्राऊंड ट्युब अस्तित्वात आली. इंग्लंडमध्ये शेवटची सार्वजनिक फाशी १८६५ मध्ये देण्यात आली. म्हणजे लोक फाशीची शिक्षा बघायला दोन वर्षे ट्युबने जायचे. ‘वन फॉर द रोड’ अशी फाशी देण्याची जागा होती. ज्या कैद्याला फाशी दिली जायची तो जागा राहावा म्हणून त्याला मद्याचा पेग दिला जायचा.

फाशीसाठी त्याला चौकात उभे करायचे. हे एक प्रकारचे सेलिब्रेशन होते. आजूबाजूला लोक पार्ट्या करायचे. साग्रसंगीत खानपान होत असे. पार्टी झोकात आली की, फाशी दिली जायची. मग जाहीर केले जायचे, ‘हँगिंग इज ओव्हर.’ त्यावरून पुढे ‘हँगओव्हर’ हा शब्द प्रचलित झाला.

इतिहासावरून भांडणे

अलीकडे इतिहास उगाळून त्यावर भांडण्याची नवी प्रथा जन्माला आली आहे. मात्र, ती चर्चा संशोधक किंवा अकॅडेमिकस्तरावर असेल तर ठीक आहे; परंतु राजकीय क्षेत्रात इतिहास वा धार्मिक मुद्दे उपस्थित होणे चांगली बाब नाही. यापूर्वी इतिहास संशोधकांमध्ये तात्त्विक मतभेद होते.

इतिहास अभ्यासकाला स्वतःचे मत नसावे. इतिहास या शब्दाचा अर्थ इति अ हास असा आहे... असं असं घडलं... इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मुघलांचा इतिहासही शिकवणे महत्त्वाचे आहे.

मुघलांनी भारतावर राज्य कसे केले ते माहिती असणे आवश्यक आहे. मात्र, केवळ मुघल नको... मणिपूरच्या-आसामच्या माणसाला मुघलांच्या इतिहासाशी काही घेणे-देणे नव्हते. त्या वेळी शिवाजी महाराज किती मोठे होते त्यापेक्षा ते किती छोटे होते हे कळणेही गरजेचे आहे. तेव्हाच त्यांचे भव्य कर्तृत्व जाणवते.

६४ सुभे असलेल्या मुघल साम्राज्याला दोन-अडीच जिल्हे एवढेच स्वराज्य असणारा माणूस टक्कर द्यायची हिंमत करतो यातच सर्व काही आले. शिवाजी महाराजांबद्दल समकालीन परदेशी नेतृत्वांनी बरेच लिहून ठेवले आहे. शत्रू खाफी खान लिहितो की, ‘शिवाजी महाराज कुराणचा किती आदर करतात. महिलांचा सन्मान करतात.’ पोर्तुगीज म्हणायचे, ‘महाराज अलेक्झांडरएवढे ग्रेट आहेत...’ फ्रेंचही त्यांचे कौतुक करतात. असा राजा पुन्हा होणे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.