घरादारात आपण मित्रमंडळींशी चर्चा करताना एखादा चुकीचा शब्द वापरत असतो. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा समुदायाबद्दल आपली वेगवेगळी मतंही व्यक्त करत असतो. याशिवाय प्रसिद्धीमाध्यमे, वेगवेगळ्या कलावंतांच्या भूमिका, वाद-विवाद होत असतात. मुलं ते सर्व ऐकत असतात. त्याचा मुलांवर काय परिणाम होतो, याविषयी पालकांनी सजग होणं गरजेचं आहे.
माझे मित्र बालरोगतज्ज्ञ डॉ. कवलजितसिंह मुलतानी वायुदलातील लहान मुलांचे डॉक्टर आहेत. एकदा मी सहज त्यांना विचारलं की, तुमच्या किती पिढ्या लष्करात आहेत? ते म्हणाले, माझे आजोबा लष्करात नव्हते; पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा आवाहन केले तेव्हा त्यांनी शेती सोडली आणि पंजाबमधून बर्मा सीमेवर गेले. आझाद हिंद सेनेत सहभागी झाले. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत कितीतरी वर्षं काम केले. हे ऐकून अंगावर काटा आला.
कारण जो माणूस एक शेतकरी आहे, पंजाबमध्ये राहतो, त्याने एका बंगाली माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत, त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत आपले घर सोडून, आपली मुलंबाळं सोडून, गाव सोडून, आपले प्राण त्या सीमेवर देण्याची तयारी दर्शवली. याला देशाप्रति असलेलं वेडच म्हणायला हवं. अशा अनेक कथा आहेत, ज्या आपण कधीही ऐकल्या नाहीत, अशा असंख्य लोकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे. त्यांचे ते देशापोटी असलेले प्रेम होते.
आजच्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याविषयी पुस्तकात वाचून कदाचित नेहरू, गांधी यांच्याविषयी माहिती असेलही; पण ती पूर्ण स्वातंत्र्याची गोष्ट आहे का, हादेखील प्रश्न आहे. त्यामुळे आज एक सुप्रसिद्ध अभिनेत्री सोशल मीडियावर काही विधाने करते आणि ते विधान सगळीकडे पसरत जाते. आपल्या देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, त्या आधी मिळाले ती एक भीक होती, हे ऐकल्यावर धक्का बसतो. हेच जर मुलांनी ऐकलं, तर त्यांच्या मनाला काय वाटेल, याचा विचार समाजातील सर्वांनीच करण्याची गरज आहे.
नेहरू, गांधीच आपल्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते का? कवलजितसिंह मुलतानी यांच्या आजोबांचे काहीच योगदान या लढ्यात नव्हते का? केवळ नेहरू आणि गांधी यांना एका पार्टीसोबत जोडल्यामुळे त्यांच्याबद्दल राग किंवा संताप असल्यामुळे आपण त्यात वाहून जातो आहोत का? एका विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट विचारधारेचा तिरस्कार असेल, संताप असेल किंवा आपल्याला पटत नसेल, तर त्याबद्दल बोलायला आपण मोकळे आहोत, असले पाहिजे. पण, वाटेल तसं बोलून किंवा जे सत्य नाही किंवा जे अर्धसत्य आहे, हे सांगून मुलांसमोर ते तसंच सांगणे हे कितपत योग्य आहे, हा खरा सवाल आहे.
अलीकडे काही प्रसिद्धी माध्यमांमध्येही आकमस्ताळेपणा दिसतो आहे. संतप्त किंवा तिरस्काराची पत्रकारीता दिसून येते. रोज एका क्षुल्लक मुद्यावरून एक ते दोन तास कार्यक्रम केला जातो. त्यात सहभागी होणाऱ्यांनाही एकमेकांशी भांडायला लावले जाते. शब्दांची मारामारी, आरडाओरडा करत टीआरपी वाढवण्याचे जे काम सुरू आहे, यावर आपण लक्ष देणे गरजेचे आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आधी एक ट्रेंड तयार केला जातो. मग, तो सोशल मीडियावर हॅशटॅग स्वरुपात ट्रेंड केला जातो. जसे डब्लूडब्लूएफची जी लढाई असते, ती खोटी असते हे आपल्याला माहित असते. पण, त्याची तिथे जाहिरात केली जात असते.
तसंच, याचंही सोशल मीडियावर हॅशटॅग सुरू केलेलं असतं. तसंच संध्याकाळी जणुकाही आखाड्यात दोन पैलवानांची कुस्ती आहे अशी ती भांडणं सुरु असतात. त्यातून फक्त संतापाचा निष्कर्ष लागतो. त्यामुळे, आता मुलांच्या आजूबाजूचा परिसर किती पटीने तिरस्कार, राग, घृणा याने भरलेला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असू शकते, यात अजिबात दुमत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्याला पटणारी विचारधारा बाळगण्याचा १०० टक्के अधिकार आहे. कारण, आपण लोकशाहीत राहतो. प्रत्येकाला आपल्याला पटणाऱ्या विचारधारेला फॉलो करण्याची मुभा आहे.
जर त्यातून कोणताही राग, तीव्र संताप आणि ती दुसऱ्या कोणाचे नुकसान करत नाही, तोपर्यंत त्या विचारधारेला फॉलो करता येऊ शकते. पण, एखादी विचारधारा समजून, जाणून घेऊन, अभ्यास करून ती फॉलो करणं याला एक विशिष्ट वय, पार्श्वभूमी लागते. दोन भिन्न विचारधारेचा अभ्यास केल्यानंतर आपण एका विचाराच्या प्रभावात जातो आणि ती विचारधारा फॉलो करतो.
आपण राजकीय विचारधारा खूप सहज अंगीकारतो. बऱ्याचदा ही राजकीय खेळी आहे, हे कळतही नसतं. आपल्याला असं जाणवून दिलं जातं की कदाचित ही आपली खरोखरच स्वत:ची ओळख असावी. म्हणजेच वैयक्तिक विचारधारा आणि राजकीय विचारधारा एकत्र करण्याचे काम गेल्या १०० ते २०० वर्षांत झालेले आहे. त्यामुळे जर आपल्या मुलांसोबत एखाद्या राजकीय समस्यांविषयी बोलत असलो किंवा त्यांचे ब्रेनवॉश करत असलो, तर सावध असलो पाहिजे. कारण एखादी विचारधारा फक्त राजकीयदृष्ट्याच आपल्या मनावर राहात नाही, ती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होत असते.
हे आपल्यासारख्या मोठ्या लोकांसाठी खरं असेल, तर जी लहान मुले आता वाढत आहेत, ज्यांना अजून परिपक्वपणे विचार करण्याची क्षमता आलेली नाही, सर्व प्रकारचे युक्तिवाद, सर्व दिशांनी विचार करून त्याचा समतोल राखण्याची क्षमता आलेली नाही, त्याच्यासमोर आपण एक अमुक प्रकारची विचारधारा रुजवत राहिलो, तर ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही उमटू शकते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तिरस्कार, संतप्त प्रकारचे विचार घालत राहिलो, तर फक्त राजकीय सीमा राहत नाही. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनतो. ही प्रतिक्रिया प्रत्येक गोष्टीतून बाहेर येते. उद्या शाळेत इतर मुलांसोबत वागताना, इतर मित्रमंडळींशी वागताना, नंतर कार्यालयात वागताना, एवढंच काय तर आपल्या सख्या भावंडांशी वागताना या प्रकारची जर विचारधारा असेल, तर ती घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांशी किंवा त्यांच्या समोर बोलताना खूप विचार केला पाहिजे. तुमच्या मुलांनी तुमची विचारधारा फॉलो करू नये, असं नाही; पण ती विचारधारा कशी असली पाहिजे, हा खरा मुद्दा आहे.
कोणतीच विचारधारा ही परिपूर्ण असते, असं नाही. कोणताच धर्म परिपूर्ण नाही. प्रत्येकाचे काही चांगले आणि वाईट मुद्दे आहेत. हे आपल्याला एका विशिष्ट वयानंतरच कळू शकतं. म्हणून मुलांसमोर अशा प्रकारची विचारधारा मांडताना किंवा या प्रकारची मतं मांडताना भान ठेवणे गरजेचे आहे. कारण हा एक दुहेरी (बायनरी) युक्तिवाद असतो. म्हणजे एखादा प्रश्न किंवा मुद्दा ज्याला हो किंवा नाही, पांढरं किंवा काळं हे दोन पैलू असतात. यात समस्या अशी असते, की समोरच्या व्यक्तीला तिसरी बाजू किंवा अजून त्यातील काही पैलूंबाबत विचार करण्यासाठी आपण त्यांना संधी देत नाही. म्हणूनच मुलांसमोर कोणतीही चर्चा करत असताना त्या चर्चेत टोकाची किंवा संतप्त अशी बाब आहे का, याचे आपल्याला भान राहिले पाहिजे.
कधी आपण आपल्या मित्राशी फोनवर बोलल्यानंतर त्या मित्राबाबत एखादा चुकीचा शब्द वापरत असतो. आपण काही मत ठरवून वागत असतो आणि एका अमुक व्यक्तीला किंवा त्याच्या ठराविक समुदायासंदर्भात बोलतो, तेव्हा मुलं ते सर्व ऐकत असतात. त्याचा परिणाम मुलांवर होत असतो. पुढे जाऊन फक्त समाजातच नव्हे, तर घरातही तीच प्रतिक्रिया मुलांकडून उमटू शकते. त्यामुळे पालकांनी या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.
samyrdalwai@gmail.com
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.