लढू या, निसर्गासाठी...

लहान मुलांकडेही स्मार्टफोन असतो. दुर्दैवाने आपण रेडिएशन पाहू शकत नाही; पण ते अस्तित्वात आहेत. प्लास्टिकचे प्रदूषणही तितकेच घातक.
Nature
Naturesakal
Updated on

- जुही चावला मेहता

लहान मुलांकडेही स्मार्टफोन असतो. दुर्दैवाने आपण रेडिएशन पाहू शकत नाही; पण ते अस्तित्वात आहेत. प्लास्टिकचे प्रदूषणही तितकेच घातक. त्याचे दुष्परिणाम तर डोळ्यांनाही दिसतात; पण त्याकडे दुर्लक्ष होते. त्यातून बोध घ्यायला हवाच...

प्रत्येक प्रवासाची सुरुवात होते, ती एका ठिकाणी येऊन थांबते आणि पुढे त्यात सहभागी झालेले अनेक प्रवासी तो पुढे घेऊन जात असतात. गेले वर्षभर आपला हा गप्पांचा प्रवास सुरू आहे. त्याला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. वर्षभरात आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ई मेलद्वारे माझ्याशी संपर्क साधला. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी, प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.

या वर्षभरात आपण प्रामुख्याने इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्ड रेडिएशन (ईएमएफ) आणि प्लास्टिक प्रदूषण या दोन विषयांवर सविस्तर चर्चा केली. या दोन्ही विषयांवर काम करताना जी माहिती मला मिळाली, ज्या उपाययोजना केल्या, जे काही छोटे-मोठे बदल करणे शक्य आहे, ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवले. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी खूप चांगल्या टिप्सही दिल्या. काहींनी त्रुटी समोर आणल्या, उपाययोजना काय करता येतील, हेदेखील कळवले.

गेल्या वर्षभरात आपण ईएमएफ रेडिएशनसंदर्भात अनेक बाबींची चर्चा केली. ईएमएफ रेडिएशन म्हणजे काय, त्याचा प्रवास कसा होतो, तो आपल्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचतो, याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो, ईएमएफ रेडिएशनच्या संपर्कात आल्यावर मानवी शरीरावर काय परिणाम होतो, अभ्यासकांनी केलेल्या संशोधनात काय निष्कर्ष काढले इत्यादी मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा केली.

आज आपल्याजवळ मोबाईल असणे ही अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या महत्त्वाच्या मूलभूत गरजांपैकी एक बनली आहे. गेल्या काही वर्षांत मोबाईलधारकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आपल्या जवळपास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन दिसतो.

भरीस भर म्हणजे आजकाल लहान मुलांच्या हातातही मोबाईल सर्रास आढळून येतो. आपण सर्वच जण मोबाईलच्या इतके आहारी गेलो आहोत की याचे आपल्या शरीरावर आणि पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करत आहोत.

दुर्दैवाने आपण रेडिएशन पाहू शकत नाही... ते वाचू शकतो, स्पर्श करू शकत नाही किंवा वास घेऊ शकत नाही, म्हणून आपण ते विसरतो की ते अस्तित्वात आहे... पण ते निश्चितपणे आहे. रेडिएशन हे तुलनेने नवीन आहे. ३० वर्षांपूर्वी रेडिएशनचा आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये वावरसुद्धा नव्हता.

एखादे औषध बाजारात आणण्यापूर्वी त्याचा संपूर्ण परिणाम आणि दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी काही वर्षांचा कालावधी जातो. तशाच काही कठोर चाचण्याही केल्या जातात; पण इथे तर कुठल्याही दुष्परिणामांची चिंता न करता संपूर्ण मानवजातीवर रेडिएशनचे जाळे सोडण्यात येत आहे. आपण तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी खरोखरच आपल्या भावी पिढीचा जीव धोक्यात घालणार आहोत का?

प्लास्टिक प्रदूषण हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला. हे प्रदूषण आपल्याला डोळ्यांनाही दिसते आणि त्याचे परिणाम आपण पाहूदेखील शकतो. प्लास्टिक प्रदूषण हे सध्याच्या काळातील एक मोठे पर्यावरणीय आव्हान आहे. प्लास्टिकच्या अतिरेकी वापरामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर आणि पर्यावरणावर होतो आहे.

२०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या ओशनोग्राफिक रिसर्चने दाखवले, की अंदाजे दोन लाख ४४ हजार टन वजनाचे किमान ५.२५ ट्रिलियन प्लास्टिकचे कण समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत आहेत. त्यापैकी बराचसा कचरा हा प्लास्टिक असतो. त्यामुळे समुद्री जीवांना आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

२०२१ च्या अभ्यासानुसार, नद्या आणि महासागरांमध्ये तसेच किनाऱ्यांवर साधारण ४४ टक्के प्लास्टिक कचरा असतो. त्यामध्ये मुख्यतः प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या आणि कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या अन् रेस्टॉरंट्समध्ये पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक डबे यांचा समावेश आहे.

प्लास्टिक उत्पादनात झपाट्याने झालेली वाढ चिंताजनक आहे. १९५० मध्ये जगभरात फक्त दोन दशलक्ष टन प्लास्टिक उत्पादन होत होते. आता ते ४५० दशलक्ष टनांहून अधिक झाले आहे. प्लास्टिकच्या वाढत्या उत्पादनामुळे आणि त्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा जमा होत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, जर प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर अशाच प्रकारे सुरू राहिला, तर २०५० पर्यंत महासागरांमध्ये माशांपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा असेल. हे एक गंभीर संकट आहे. त्यावर आपल्याला तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

आपले एक वाचक प्रशांत कालकर यांनी ई मेलद्वारे प्लास्टिक प्रदूषणाचे गांभीर्य मांडणारी एक कविता मला पाठवली. ती आवर्जून येथे नमूद करते...

संकल्प - निसर्गासाठी एकच पान

आनंद अन् उत्साहाची व्याख्या करूया आपण आज

‘दसरा-दीपावली’ एक अनोखा मनावर संस्कार मूल्यांचा साज

‘निसर्ग आपला’ मी न निसर्गाचा ‘घटका’ मोजते वनराई

जागवा मंत्र ‘वृक्षारोपण अन् संवर्धन’

फिरुनी कराया वसुंधरेवर हिरवाई

जाणवेल स्वरांचा फक्त गोडवा, कर्कश्शता नकोच विलापी

दारू शोभेची ‘दिसे अस्मानी’, भविष्य प्रदूषणाने ठरते काळोखी

जग आपले, देशही माझा... मीसुद्धा देशाचा

‘शून्य प्रदूषण’ दायित्व ठरावे, प्रयत्न माझा, मी मातृभूमीचा

औचित्य साधता ‘साडेतीन मुहूर्तांपैकी’,

एक उजाडला वृक्ष आपटा

‘एकच पान’ तोडू बाप्पा साधूनी‘

निसर्ग समन्वय’ संकल्प नेटका

निशिकांत मुपीड यांनीदेखील ई मेलद्वारे आपले मत कळवले आहे. ते म्हणतात, ‘एका अतिशय महत्त्वाच्या व ज्वलंत विषयाला आपण वाचा फोडली आहे. मानव जसजसा प्रगत होत जात आहे, तसतसा तो विनाशाकडे वाटचाल करत आहे. जनावरे, मासे यांच्या पोटात प्लास्टिक जात आहे. त्यांना खाणाऱ्यांच्या पोटात प्लास्टिक चालले आहे. शेतजमिनीत प्लास्टिक मुरते आहे. त्यामुळे अन्नधान्यातून आपणा सर्वांच्याच पोटात प्लास्टिक जात आहे.

सर्वांनाच कळतेय; पण वळत नाही. कुठल्याच राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर पर्यावरणाला प्राधान्यक्रम नाही. जगभर चालू असलेल्या लढायांमुळे केवळ विध्वंस (वित्त व जीवितहानी) होत नाही; तर पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे. भावी पिढ्यांचे काही खरे नाही.’

आपला गप्पांचा प्रवास आता इथेच थांबतो आहे; पण तुम्ही हा प्रवास आपापल्या पद्धतीने पुढे नक्की सुरू ठेवा. जागरूकता पसरवत राहा. ई मेलद्वारे संपर्कात राहा. तुमच्या नजरेस एखादी गोष्ट आढळली, समोर आली, एखादे नवीन संशोधन वाचलेत; तर मला नक्की कळवा आणि लक्षात ठेवा ‘We do not inherit this earth from ancestors, we borrow it from our children...’ आणि मला आशा आहे की आपल्या मुलांसाठी, आपल्या भावी पिढीसाठी एक चांगले पर्यावरण निर्माण करायला तुम्ही नक्कीच हातभार लावाल.

(समाप्त)

(शब्दांकन ः नीलिमा बसाळे)

juhichawlaoffice@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.