‘छोटा मुन्ना’

‘छोटा मुन्ना’ वाघ आपल्या बापाप्रमाणेच बिनधास्त आणि बेधडक होता. कान्हा व्याघ्र प्रकल्पात साधारण सात वर्षांचा काळ त्याने गाजवला.
chotta munna tiger kanha tiger project tourism
chotta munna tiger kanha tiger project tourismSakal
Updated on

‘छोटा मुन्ना’ वाघ आपल्या बापाप्रमाणेच बिनधास्त आणि बेधडक होता. कान्हा व्याघ्र प्रकल्पात साधारण सात वर्षांचा काळ त्याने गाजवला. आपले वर्चस्व टिकवण्यासाठी इतर मोठ्या वाघांशी अनेकदा त्याने दोन हात केले. ‘छोटा मुन्ना’ पर्यटकांनाही न घाबरता दर्शन द्यायचा. त्यांच्या जिप्सीसमोर आरामात चालायचा. पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनलेला ‘छोटा मुन्ना’ अचानक बेपत्ता झाला आणि त्याची हुरहूर मनाला लागून राहिली.

- संजय करकरे

गेल्या आठवड्यात मी मध्य प्रदेशातील कान्हा नावाच्या सुप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पातील ‘मुन्ना’ वाघाची कथा सांगितली होती. त्याच ‘मुन्ना’चा उत्तराधिकारी असलेल्या ‘छोटा मुन्ना’बाबत मी आज सांगणार आहे.

आपल्या बापाप्रमाणेच तोही बिनधास्त व बेधडक होता. आपल्या बापाप्रमाणेच त्याने कान्हा व्याघ्र प्रकल्पात साधारण सात वर्षांचा काळ गाजवला. आपले वर्चस्व टिकवण्यासाठी ‘छोटा मुन्ना’ने इतर मोठ्या वाघांशी दोन हात केले.

त्यांच्यावर विजय मिळवला. या युद्धात जखमीही झाला. मात्र आपली हद्द अखेरपर्यंत टिकवण्यात तो यशस्वीही ठरला. या सर्व कथेची सुरुवात २०१२ पासून झाली. ‘छोटा मुन्ना’चा जन्म कान्हा परिसरातील ‘मुंडी दादर’ नावाच्या एका वाघिणीच्या पोटी झाला.

ही वाघीण ‘T ८’ नावाने ओळखली जात होती. ‘T १७’ म्हणजेच ‘मुन्ना’ हा जबरदस्त ताकदवान वाघ ‘छोटा मुन्ना’चा पिता होता. साधारण दोन-अडीच वर्षांचा झाल्यानंतर ‘छोटा मुन्ना’ २०१५ च्या सुमारास कान्हा व्याघ्र प्रकल्पातील मुक्की या झोनमध्ये दाखल झाला. त्यावेळी व्याघ्र प्रकल्पाचा हा परिसर तसा फार प्रसिद्ध नव्हता.

याचे प्रवेशद्वारही स्वतंत्र आहे. कान्हा व्याघ्र प्रकल्पात भेट देणारे पर्यटक वन्यप्रेमी प्रामुख्याने कान्हा किसली या मुख्य झोनमध्ये जास्तीत जास्त फिरण्याचा प्रयत्न करतात. मुळातच कान्हा व्याघ्र प्रकल्पाचे जंगलच अतिशय रम्य आणि वरील दोन्ही झोन वन्यप्राण्यांनी समृद्ध असल्याने साहजिकच पर्यटकांचा ओढा या दोन झोनमध्ये फिरण्यावर अधिक असतो.

आपल्या पित्याप्रमाणेच बलदंड शरीराच्या, काहीसा उग्र चेहरा असलेल्या ‘छोटा मुन्ना’ने या प्रसिद्ध झोनला टाळून मुक्की झोनमध्ये आपले बस्तान बसवल्याने साहजिकच तिथेही प्रवेश करण्यासाठी

पर्यटकांची मग चढाओढ सुरू झाली. या वेळेस कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘छोटा मुन्ना’ वाघासोबतच ‘भीमा उमरपानी’ आणि ‘किंगफिशर’ या नावाचे तीन नर आपापल्या क्षेत्रात दादा होते. त्यातील प्रत्येक नर आपापली हद्द आणि क्षेत्र राखण्याचा प्रयत्न करीत होते.

वाघांच्या जीवनात हा उमेदीचा काळ क्षेत्र वाढवणे व अधिकाधिक माद्या आपल्या ताब्यात घेणे यावर असतो. साहजिकच आपल्या कथेतील नायक ‘छोटा मुन्ना’ आपले क्षेत्र वाढवण्यासाठी धडपडू लागला.

या व्याघ्र प्रकल्पातील ‘उमरपानी’ या बलदंड वाघाने ‘किंगफिशर’ वाघाचा बंदोबस्त केला. हा बंदोबस्त इतका जबरदस्त होता, की ‘किंगफिशर’चा मृतदेहच व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांना सापडला. असे म्हटले जाते, की ‘उमरपानी’ वाघ या व्याघ्र प्रल्पातीलच नव्हे; तर संपूर्ण मध्य प्रदेशातील सर्वात मोठा नर वाघ असावा.

या दोघांच्या लढाईत ‘उमरपानी’ने ‘किंगफिशर’ वाघाचा कायमचाच निकाल लावून टाकला. या घटनेनंतर अवघ्या महिनाभरातच ‘छोटा मुन्ना’ या वाघाने ‘उमरपानी’चाच कित्ता गिरवला. ४ डिसेंबर २०१६ रोजी साधारण सात वर्षांचा ‘भीमा’ नवगाव क्षेत्रात जखमी अवस्थेत सापडला. व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला मुक्की येथे उपचारासाठी

नेले. मात्र आठवडाभरातच त्याचाही मृत्यू झाला. त्यावेळेस कान्हा व्याघ्र प्रकल्पातील सलग दोन नर वाघांच्या एकापाठोपाठ झालेल्या मृत्यूचे प्रकरण सर्वत्र गाजले. प्रशासनावर वृत्तपत्रांतून जोरदार टीकाही झाली.

या लढाईनंतर ‘छोटा मुन्ना’ जखमी अवस्थेत काही काळ आपल्या परिसरात फिरत होता. त्यानंतर रणांगणात ‘उमरपानी’ आणि ‘छोटा मुन्ना’ हे दोघे उरले. खरे तर हे दोन्ही वाघ एकाच पित्यापासून म्हणजेच ‘मुन्ना’पासूनच झालेले होते. मात्र वाघांच्या दुनियेत ‘जो जीता वही सिकंदर’ ही म्हण असल्याने या दोन वाघांमध्येही लढाई झाली. मात्र ती प्राणघातक झाली नाही. 

पुण्यातील क्षितिज देगांवकर साधारण २०१० पासून कान्हा व्याघ्र प्रकल्पात नियमित जातो. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या क्षितिजला जंगलात फिरण्याची आवड असल्याने आणि वाघांचा मागोवा घेत असल्याने कान्हातील वाघांची जन्मकुंडलीच त्याच्याजवळ आहे. तो सांगतो, मी अनेक

वेळा ‘छोटा मुन्ना’ आणि अन्य वाघांना येथे बघितले. ‘उमरपानी’ हा वाघ स्वभावाने भित्रा होता. पर्यटकांना तोच टाळत असे. याच्या पूर्ण विरुद्ध ‘छोटा मुन्ना’ होता. बिनधास्तपणे जिप्सीच्या समोर चालणे, रस्त्यावर आरामात झोपणे हे तो सहजपणे करत असल्याने साहजिकच मुक्की या क्षेत्रामध्ये पर्यटकांचा ओघ वाढला होता.

२०१८ मधील या वाघाचे एक दर्शन मला चांगले स्मरणात आहे. जंगलात फिरत असताना आम्हाला हा वाघ रस्त्यावर झोपलेला दिसला. तो पूर्णपणे आडवा झाल्याने संपूर्ण रस्ताच त्याच्या शरीराने व्यापला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोपूनच तो डरकाळ्याही फोडत होता. तो ते कशासाठी करत आहे हे काही लक्षात येत नव्हते.

मात्र, एखादा वाघ अशा पद्धतीने झोपून, डरकाळ्या देत असल्याचे आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. मागे-पुढे अनेक गाड्या असूनही या वाघाच्या हावभावात काहीही बदल झालेला नव्हता. ‘भीमा’ वाघाला संपवल्यानंतर ‘छोटा मुन्ना’ आणि ‘उमरपानी’ यांच्यात लढाया झाल्या. सुरुवातीच्या काळात ‘छोटा मुन्ना’ मार खायचा, असे लक्षात आले होते. मात्र कधी कधी त्याच्यापुढे ‘उमरपानी’नेही माघार घेतल्याचे आम्ही बघितले.

क्षितिज पुढे सांगतो, ‘‘खरे तर ‘उमरपानी’ वाघ अतिशय सुंदर आणि भारदस्त होता. मात्र ‘छोटा मुन्ना’ही त्याच्याच आकाराचा वाटत असे. उन्हाळ्याच्या दिवसांत ‘छोटा मुन्ना’ जरा झटकलेला वाटायचा. थंडीत मात्र त्याचे शरीर ‘उमरपानी’ वाघाला टक्कर देणारेच भासायचे.’’

मुक्की क्षेत्रातील पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनलेला हा वाघ अचानक बेपत्ता झाला. २०१९ च्या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस तो शेवटचा दिसल्याचे बोलले जाते. तो कुठे गेला, त्याची शिकार झाली का, यांसारखे अनेक प्रश्न त्यानंतर निर्माण झाले आणि ते हवेत विरूनही गेले. २०१२ ते २०१९ पर्यंत या वाघाने आपल्या दर्शनाने एक मोठा चाहता वर्ग तयार केला होता.

या वाघाचा बाप असलेल्या ‘मुन्ना’ने तर सर्वाधिक छायाचित्रे टिपणारा वाघ म्हणूनच लौकिक मिळवला होता. ‘मुन्ना’ही तशाच पद्धतीने प्रसिद्ध झाला. आज यू-ट्युबवर ‘छोटा मुन्ना’चे अनेक व्हिडीओ आपल्याला बघायला मिळतात. रस्त्यावरून बिनधास्त आपल्या तंद्रीत चालणारा हा वाघ आणि त्याच्यामागे जिप्सींची येणारी वरात बघायला मिळते. आज ‘छोटा मुन्ना’ हयात नसला तरी त्याची बहीण ‘नीलम T ६७’ ही आजही कान्हा व्याघ्र प्रकल्पातील एक प्रसिद्ध वाघीण आहे.

‘छोटा मुन्ना’ला बरीच पिल्ले झाली. मात्र त्यातील बहुतांश कान्हामध्ये फारशी राहिली नाहीत. कान्हा व्याघ्र प्रकल्पाला मी तीन-चार वेळा भेट दिली. एखादा अपवाद वगळता प्रत्येक वेळी मला येथे वाघिणींचे दर्शन झाले आहे.

एक वेळ तर अतिशय सुंदर अशा एका वाघिणीने आपल्या दोन पिल्लांसह येथे दर्शन दिले होते. आमची एकटीच जिप्सी या वाघिणीजवळ असल्याने तिचे आपल्या पिल्लांच्या बरोबरचे वागणे अगदी बिनधास्त होते. नर वाघाचे मात्र एकदाही येथे दर्शन झाले नाही. पर्यटकांना बिनधास्त दर्शन देणारे हे नर वाघ आपल्या नशिबी का आले नाही, याची हुरहूर मनाला लागून राहते.

sanjay.karkare@gmail.com (लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.