- वैभव वाळुंज
‘माझेही कित्येक भारतीय मित्र आहेत’ असं ब्रिटिश व्यक्ती म्हणत असेल, तर त्याचं अवडंबर येणारच. भारताची लोकसंख्या आणि ट्रॅफिकसारख्या उथळ गोष्टीबाबतही त्यांची काही बाष्कळ मतं असतात.
साम्राज्यवादी इतिहासाच्या मांडणीमुळे इंग्लंडच्या जनसमाजात निराळ्या तऱ्हेची वर्तणूक आणि दृष्टिकोन पाहायला मिळतो. त्यात फक्त तिथे राहणारे वसाहतीमधून आलेले लोक आणि त्यांच्या एत्तदेशीय समाजांची निराळी समज इंग्रजांनी बनवून घेतली आहे, असं दिसतं. साम्राज्याच्या काळापासून ते आजतागायत हा आपपरभाव लपवण्याचे खुजे प्रयत्न होत असले, तरी ते अनेकदा फार उघडपणे समोर येतात. खुनशी वंशद्वेष असण्यापेक्षा वसाहती देशांच्या विषयी इंग्रजांच्या मनात अवास्तव अवडंबर आणि स्तुतिस्तोम असण्याचे प्रसंग प्रामुख्याने येतात.
भारतीयांना अशा घटनांना सामोरे जावे लागते; तसेच आफ्रिकन विद्यार्थ्यांना याचा अकारण जाच होतो. मात्र सहसा त्याविषयी बोलले जात नाही. अनेकदा वसाहतवाद आणि निर्वसाहतीकरण यांचा संवाद सुरू झाल्यानंतर या गोष्टी उघडपणे बोलणं लोकांना अडचणीचं वाटतं.
या गोष्टी लपवून छपवून ‘मी रंगभेद मानतच नाही’ इथपासून ते ‘मी कुणाचाच रंग पाहत नाही’ असं बोलणं हा इथला परवलीचा वाक्प्रचार होऊन बसला आहे. ‘माझेही कित्येक भारतीय आणि आफ्रिकन मित्र-मैत्रिणी आहेत’ असं एखादी ब्रिटिश व्यक्ती म्हणत असेल, तर त्यापासून थोड्याच वेळात भारत आणि आफ्रिकेचं अवडंबर आणि स्तुतिस्तोम येणार, हे ठरलेलं.
याचं उदाहरण द्यायचं झालंच तर मला आठवते ती मॉरिटानियातील किनाऱ्याजवळ काम करणारी एक स्कॉटिश आजीबाई ट्रीश. बस न आल्याने स्कॉटलंडच्या ज्या गावी मी रात्र काढली, त्याच गावची असल्याने तिने माझ्याशी बोलायला सुरुवात केली. तू बिफ खातोस का, हा अगदीच नित्यनेमाने विचारला जाणारा अपेक्षित प्रश्न तिने विचारला.
भारतीय बिफ खात नाहीत, हा समज असणाऱ्या लोकांपासून चार हात दूर राहायचं, हा दंडक मी नेहमी पाळतो. सहसा, ते संभाषण बाष्कळ पठडीचे पर्यटकी प्रश्न विचारण्याकडे जातं, असा माझा अनुभव आहे. भारताला ब्रिटिशांनी सुंदररीत्या जोडून ठेवलं म्हणून आज आपण अशा चमकदार ठिकाणी जाऊ शकतो, या भावनेतून भारत फिरणाऱ्यांचे इथली लोकसंख्या आणि ट्रॅफिकची परिस्थिती अशा उथळ गोष्टींसंबंधित काहीच्या काही बाष्कळ मते असतात.
म्हणूनच या संभाषणाचा पुढचा टप्पा ‘जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा मी भारताची यात्रा केली होती आणि बॅगपॅकिंग करत मी अनेक ठिकाणी फिरले’ याकडे जाणार हे ठरलेलं. एकदा तर मला एका व्यक्तीने फक्त माझा चेहरा बघून दुरूनच ‘आप कैसा हाय’ असं जोरदार आरोळी ठोकत विचारलं होतं.
बरं यात तेथील गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न कमी आणि आपण कसे या सर्वांपासून वाचलो आहोत, अशा पद्धतीने दुसऱ्याच्या घरात वाकून डोकावत पाहण्याचा भाव स्पष्टपणे दिसतो. भारतात चिकन टिक्का ही गोष्ट सर्व जण खातात किंवा पंजाबमधील भांगड्यात वाजवली जाणारी धून ही भारतात प्रत्येकाच्या ओळखीची असणारच, असा त्यांचा कयास असतो; तरीही वृद्धांशी अशा गोष्टी बोलणं काही प्रमाणात सुसह्य असतं, कारण ते आपली वसाहतवादी मानसिकता दडवण्याचा प्रयत्न सहसा करत नाहीत.
आजीबाईशी बोलत असताना मला याचा चांगलाच प्रत्यय आला होता. ‘जास्त काळ उन्हात राहून माझा रंगही तुझ्यासारखा झाला आहे बघ’ असं ती लडिवाळपणे बोलून हसली; तरीही आजीबाईंच्या जुन्या ठेवणीतल्या रंगभेदाचा बोचरा परिचय मला आला. नव्या इंग्रज ब्रिटिश पिढीचा रंगभेदी स्वभाव शालीत लपवत बोलण्याचा चलाख लहेजा तिच्याजवळ नव्हता. कित्येक महिन्यांनी मला शुद्ध तुपातला साजूक भिडस्त प्रामाणिक रंगभेद अनुभवाला आला.
मला तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं. माझा त्यावरचा अजून बोचरा प्रतिसाद गिळून पुन्हा प्रेमाने मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. याउलट नव्या पिढीतील लोकांकडे भारतात आणि भारताविषयी असणाऱ्या अनेक गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी त्यांच्या पूर्वजांकडून आलेली असली तरी त्याला ऑनलाईन सोपस्कारांचा मुलामा असतो.
‘मला भारतातील खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवास करायचा आहे’ किंवा ‘मी देवनागरी लिपीतील टॅटू गोंदवून घेतला आहे’ अशी असाधारण अवडंबरं ऐकू येतात. त्यातील बारकावे किंवा अंतर्गत लहानसहान बाबी समजावून सांगणं शक्यही नसतं आणि बरेचदा त्याची गरजही नसते. सुरुवातीच्या काळात मी अशा संभाषणांमध्ये पूर्ण परिस्थिती उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत असे.
मात्र, लवकरच माझ्या आफ्रिकन मित्रांच्या अनुभवांमधून ते करण्याची आवश्यकता किती हुशार आहे आणि हे करूनही त्याचा परिणाम होत नाही, हे अनुभवलं. विशेषतः वंशभेदाचा सामना करणाऱ्या इंग्लंडमधील स्थानिक कृष्णवर्णीय मित्रांकडून अशा संभाषणासंबंधीचे अनेकविध किस्से मला माहीत झाले.
अर्थातच आफ्रिका आणि भारत या दोघांच्या विषयी इंग्रजांच्या मनात असणाऱ्या भेदामधून फक्त नकारात्मक गोष्टी बाहेर आल्या, असे नाही तर या दोन्ही समाजांतील लोकांनी एकत्र येऊन आपल्यासारख्या दुखण्यासाठी एक कृतीपद्धती निर्माण करायचे प्रयत्नही केले. रेव्हरंड डेव्हिड हसलाम हे दक्षिण आफ्रिकेतल्या वंशभेद करणाऱ्या सरकारविरोधात चाललेल्या चळवळीचे तसेच ‘वॉर ऑन वॉन्ट’ या संस्थेचे माजी सचिव सदस्य होते.
त्यांनी इंग्लंडमध्ये दलित सॉलिडॅरिटी नेटवर्क युके अर्थात डी. एस. एन. युके या संस्थेची स्थापना केली. मजूर पक्षाचे खासदार जेरेमी कोबीन यांच्यासमवेत त्यांनी विविध कार्यकर्ते व संघटनांना एकत्र आणून जागतिक पातळीवर जातिभेद आणि जातीयतेच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली. या संस्थेने डेन्मार्कस्थित दलित सॉलिडेरिटी नेटवर्क या २००० मध्ये स्थापन झालेल्या संस्थेसोबत काम केलं. २००७ पासून मीना वर्मा या डी. एस. एन. संस्थेचं काम पाहत होत्या.
२०२२ मध्ये गजाला शेख यांनी ही जबाबदारी घेतली. या व अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून भारतातील दलित व्यक्ती तसेच आफ्रिकेतील कृष्णवर्णीय आणि मुस्लिम समुदाय यांच्या विरोधात होणारा अन्यायाचा सामूहिक मुकाबला करण्यासाठी एकत्रित येता आलं. यातूनच जगाची राजधानी समजल्या जाणाऱ्या शहरांमधील समासाबाहेरच्या लोकांच्या जीवनाचा वेगळा अध्याय आणि त्यातून समकालीन परिस्थितीचे आकलन करण्याची दृष्टी मला समजून घेता आली.
vaiwalunj@gmail.com
(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.