टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एक्स (ट्विटर) समाजमाध्यमाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात ‘अॅपल’ आणि ‘ओपनएआय’ या दोन कंपन्यांच्या परस्परसहकार्याविषयी उघड नाराजी व्यक्त केली. केवळ नाराजी व्यक्त करूनच मस्क थांबले नाहीत तर ‘या दोन कंपन्या एकत्रित काम करणार असतील तर माझ्या कंपनीच्या आवारात आयफोन आणि अॅपलच्या सर्व उपकरणांवर बंदी घातली जाईल’, अशी धमकीवजा सूचनाही त्यांनी दिली.
मस्क धक्कादायक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. नव्या शतकातला जगातला आघाडीचा उद्योजक अशी त्यांची ख्याती आहे. या ख्यातीमुळं अनेकदा त्यांची अत्यंत फुटकळ विधानंही बातमी बनतात. मात्र, ‘अॅपल इंटेलिजन्स’ या संभाव्य प्रकल्पाबाबत त्यांनी घेतलेली ठाम भूमिका सर्वसामान्य लोकांशी संबंधित आहे, संवादक्षेत्रात सुरू असलेल्या उत्क्रांतीचा नवा टप्पा कसा असावा यासंबंधानं आहे. संवादाची शैली बदलण्याच्या साऱ्या शक्यता दोन कंपन्यांच्या एकत्रित कामातून समोर येतात.
मानवी संवादाचा विषय
मस्क यांच्या विधानाची दखल जगभरात घेतली गेली. या विधानावर समर्थनार्थ आणि विरोधात चर्चा झडू लागल्या आहेत. दोन टोकाच्या विचारांचा कल्लोळ सुरू झाला आहे. पहिला ‘आयफोन’ २९ जून २००७ रोजी बाजारपेठेत दाखल होईपर्यंतची संवादाची व्यवस्था आणि आजचा संवाद यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. मोबाईल फोन हे केवळ उपकरण न राहता रोजच्या जगण्याचा तो अविभाज्य घटक बनलेला आहे.
तुम्ही आयफोन वापरत असाल-नसाल; मात्र अॅपल कंपनीच्या उत्पादनांची, संशोधनाची छाप साऱ्या मोबाईल फोनक्षेत्रावर जरूर आहे. परस्परांशी मानवी संवादाचा हा विषय आहे. त्यामुळंच, या कंपनीच्या भविष्यकालीन प्रकल्पाबद्दल मस्क यांनी व्यक्त केलेली काळजी महत्त्वाची ठरते आहे.
अॅपल इंटेलिजन्स प्रकल्प
अॅपल इंटेलिजन्स या प्रकल्पाची घोषणा नुकतीच झाली. ओपनएआय संस्थेचा प्रसिद्ध आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ‘चॅटजीपीटी’ आणि अॅपल कंपनीची ‘सिरी’ व्यवस्था यांचं एकत्रीकरण करणारा हा प्रकल्प. प्रकल्पाचा उद्देश आहे आयफोन अधिक कार्यक्षम बनवणं आणि त्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरणं. उदाहरणार्थ : तुम्हाला एखादा संदेश लिहायचा आहे, तर आयफोनमधला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स त्यासाठी मदत करेल...
तो संदेश लिहून देईल...तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं संभाषण मजकुराच्या स्वरूपात उपलब्ध करून देईल...तुमच्या लेखनाची, संदेशाची भाषा सुधारेल इत्यादी इत्यादी. वरकरणी अत्यंत वैयक्तिक गोष्टींसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरलं जाईल. खरी मेख इथंच आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर वैयक्तिक असला तरी त्यासाठी लागणारा डेटा अत्यंत सामूहिक आहे. तो अफाट असणार आहे.
डेटा आणि ॲल्गरिदम
आयफोन वापरणाऱ्या प्रत्येकाचा वैयक्तिक डेटा जमा होत जाईल आणि मशिन लर्निंगद्वारे त्याचे पॅटर्न समजून घेतले जातील. त्यानुसार ॲल्गरिदम बनवले जातील. लाखो लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं कमी-अधिक प्रमाणात एकसारखीच असतील. फरक असेल तो संबंधित व्यक्तीच्या वैयक्तिक डेटाचा. सामूहिक एकसारखी उत्तरं आणि वैयक्तिक डेटा यांच्या तुलनेतून वैयक्तिक पातळीवरचं एक उत्तर तयार होईल.
उदाहरणार्थ : एकाच कुटुंबातल्या चार लोकांनी एकाच वेळी एआय वापरून संदेश लिहिला तरी त्या संदेशात किंचित फरक असेलच. प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक डेटानुसार हा फरक पडत जाईल. अॅपलचा हा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. आर्टिफिशिअल या शब्दाऐवजी ‘अॅपल इंटेलिजन्स’ असं प्रकल्पाला म्हटलं गेलं आहे. त्यासाठी अॅपलनं महिनाभर आधीच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून मोटार बनवण्याचा प्रकल्प रद्द करून टाकला. कंपनीची पुढची दिशा प्रामुख्यानं आयफोनशी संबंधित आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची असल्याचं यातून स्पष्ट झालं.
प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग...
एखाद्या खासगी कंपनीच्या एखाद्या प्रकल्पाचा परिणाम साऱ्या जगावर होऊ शकतो, याचा अनुभव तंत्रज्ञानाधिष्ठित जगात वारंवार येतो आहे. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात उगवलेल्या ईमेलनं संवादाचं स्वरूप बदललं. गुगल कंपनीनं बनवलेलं सर्च इंजिन माहितीच्या मानवी कक्षा ओलांडणारं ठरलं. मोबाईलमुळे संपर्काची व्याख्या बदलली. हे सारे बदल गेल्या काही वर्षांपासून वारंवार अनुभवाला येत आहेत.
आजच्या काळात विकसित होत असलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सकडं आणि विविध क्षेत्रांतल्या त्याच्या वापराकडं त्यामुळंच गांभीर्यानं पाहायला हवं. ‘मस्क यांच्यासारख्या सेलिब्रिटी उद्योजकानं व्यक्त केलेलं मत आपल्या आयुष्याशी काहीच संबंधित नाही,’ असा दृष्टिकोन ठेवून चालणार नाही असा हा काळ आहे. आज आयफोनमध्ये आलेलं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उद्या प्रत्येक उपकरणात असणार आहे.
आपण वापरत असलेला मोबाईल फोन अॅपलचा असो किंवा अँड्रॉईड असो, त्यामध्ये ‘एआय’ असणार आहे. अशा वेळी वैयक्तिक माहिती, मानवी बुद्धिमत्ता, परस्परसंवाद, मानवी सर्जनशीलता यांचं भविष्य काय असेल हा मुद्दा मस्क यांच्यापुरता मर्यादित राहत नाही. तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनतो.
आजचं कुतुहूल उद्या संपेल...
‘एआय’ अधिकाधिक कामं करायला लागल्याबद्दल एक संदेश वाचनात आला. तो असा : ‘एआयनं माझी सगळी कामं करावीत, माझा वेळ वाचवावा आणि त्या वेळेत मी अधिकाधिक सर्जनशील काम करावं.’ या संदेशाचा दुसरा अर्थ असा आहे : ‘सर्जनशीलतेचं, कल्पनाशक्तीचं काम यंत्रांवर सोपवू नये; ते माणसाकडंच राहावं.’
वासुदेव गायतोंडे यांनी चित्रं रेखाटावीत आणि त्या चित्रांमधला मूर्त-अमूर्त अर्थ मानवी कल्पनाशक्तीनं जिवंत होत राहावा. गायतोंडेशैलीतली किंवा पिकासोशैलीतली चित्रं रेखाटणं ही मानवी सर्जनशीलता. तिच्या पूर्ततेसाठीचा वेळ उपलब्ध व्हावा हे यंत्रांचं काम. ‘एआय’चं क्षेत्र प्राथमिक अवस्थेतून उत्क्रांत होत चालल्याच्या आजच्या काळात यंत्रांचं आणि मानवाचं काम यांमध्ये सीमारेषेचा गोंधळ आहे.
तो स्वाभाविकही आहे. कुतूहल आणि उत्साहाच्या भरात ‘सगळं काही यांत्रिक’ करावंसं वाटूही शकतं. तथापि, उत्साहाचा बहर जसजसा ओसरत जाईल, तसतसं उपलब्ध वेळेचा सर्जनशील वापर हा घटक प्रभावी ठरायला सुरुवात होईल. त्यामध्ये माणूस म्हणून आपण यंत्रांसोबत कोणकोणती माहिती वाटून घ्यायची आणि कोणत्या माहितीवर फक्त आपलाच अधिकार असेल, हा विचार अग्रस्थानी असेल.
डेटा-शेअरिंगबद्दलची अनभिज्ञता
आजच्या ‘डेटा-शेअरिंग’बद्दल सर्वसामान्य माणसं अनभिज्ञ आहेत. ‘आपलं काम होतंय नं, मग बाकीचं काय करायचंय’ हा नैसर्गिक विचार अनभिज्ञतेचं कारण आहे.
याच डेटाच्या आधारावर तयार होणारे ॲल्गरिदम आपली कामं आणखी सोपी करतही जाणार आहेत. इथंपर्यंत काहीच अडचण दिसत नाही. प्रश्न त्यानंतरच्या कालखंडाचा आहे. ॲल्गरिदमनं तुमची कामं करण्याचा प्रवास ॲल्गरिदमनुसार तुम्ही कामं करण्यापर्यंत जाण्याचा धोका आहे.
हा ॲल्गरिदम एखाद्या खासगी कंपनीच्या मालकीचा असणार आहे. परिणामी, मानवी जगण्यातले बहुतांश कोपरे खासगी कंपन्यांच्या दावणीला बांधले जाऊ शकतात.
खुद्द मस्क हे खासगी कंपनीचेच मालक असले तरी त्यांना अॅपल-ओपनएआय कंपन्यांच्या भागीदारीचे संभाव्य परिणाम दिसत आहेत, ते याच दिशेनं जाणारे आहेत.
सर्जनशीलता विरुद्ध ॲल्गरिदम
संभाव्य धोक्यांमध्ये ॲल्गरिदमद्वारे निर्माण होणारी कृत्रित सर्जनशीलता दीर्घकालीन परिणामकारक ठरणारी असेल. तिची सुरुवात मोबाईलवर झालीच आहे. गुगलचं प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट आपल्याला, पुढं काय लिहावं, हे सध्या मदतनीस म्हणून दाखवतंच आहे. याचीच पुढची पायरी नव्या चॅटबॉटनं गाठलेली आहे. आपल्याला हवं ते सारंच लिहून दिलं जात आहे. चित्र काढून, लिहून भावना व्यक्त करता येणं ही मानवी उत्क्रांतीतली फार मोठी घटना होती.
या भावनाच यंत्रांच्या हवाली करायच्या झाल्या तर येणारं उत्तर साचेबद्ध असणार आहे. यंत्रं साचेबद्धपणात थोडीफार शब्दरचनेची अदलाबदल करून जरूर देतील, त्यावरच समाधानी राहून मानवी सर्जनशीलता आळसाच्या खाईत लोटली जाणारच नाही, याची खात्री आज देता येत नाही.
मोबाईलमध्ये वरकरणी काहीच बदल दिसत नसला तरी येऊ घातलेल्या रचनेत असा महाकाय अदृश्य बदल दडलेला आहे. फक्त दोन कंपन्यांनी आपापली माहिती एकमेकींना दिली तर गहजब माजतो आहे. अशा पंधरा-वीस कंपन्या एकत्र आल्या तर उद्याचा भविष्यकाळ ॲल्गरिदमच्या दावणीला किती बांधला जाऊ शकतो याची ही झलक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.