फिक्सिंगचा वाढतोय धोका...

क्रिकेट सामन्यांकडं वेगळ्या नजरेनं पाहणारे आणखी एक जग आहे. कितीही तटबंदी उभी केली, तरी या जगाचा विळखा सोडवता आलेला नाही.
cricket match fixing
cricket match fixingsakal
Updated on

आपणं सामान्य क्रिकेटप्रेमी... चौकार-षटकार आणि विकेटचा हिशेब ठेवतो. विजय-पराजयावर कधी आनंदानं तर कधी तावातावानं चर्चा करतो आणि आपल्या आवडत्या खेळाडूंनी कसं खेळायला हवं, कोणत्या चुका केल्या याचं विश्लेषणही करत असतो, त्यावरच समाधान मानतो. आपल्यासाठी हेच जणू काही क्रिकेटचं विश्व ! पण काहींसाठी क्रिकेटच्या मैदानाची सीमा फार वेगळी आहे.

क्रिकेट सामन्यांकडं वेगळ्या नजरेनं पाहणारे आणखी एक जग आहे. कितीही तटबंदी उभी केली, तरी या जगाचा विळखा सोडवता आलेला नाही. अर्थात जगाच्या कानाकोपऱ्यात कोण काय करतो हे समजण्याअगोदर त्यांनी आपली डाव टाकलेला असतो...

मोहमायेचं हे जग म्हणजे सट्टेबाजी आणि पर्यायाने फिक्सिंगचं विश्व ! १९९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर असताना त्यांचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि आफ्रिकन तसेच काही भारतीय खेळाडूंनी केलेल्या फिक्सिंगनं क्रिकेट विश्व हादरलं होतं. त्यातूनच २०१३ मध्ये तर तीन खेळाडूंना अटक झाली होती.

बलाढ्य आणि दरारा असलेल्या ‘चेन्नई सुपर किंग्ज’चे सीईओ गुरुनाथ मय्यप्पन यांनाही अटक झाली पुढं पर्यायानं चेन्नई आणि राजस्थान हे दोन संघ दोन वर्षांसाठी निलंबित झाले. एका इंग्लंड दौऱ्यात केलेल्या स्पॉटफिक्सिंगमुळे पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना तिथं लंडनमध्ये तुरुंगात जावं लागलं होतं.

वेस्ट इंडीजच्या दोन ट्वेन्टी-२० विश्वकरंडक विजेत्या संघातील खेळाडू मार्लन सॅम्युअल्स याच्यावर नंतर एका दुबईतील लीगमध्ये गैरव्यवहार केल्यामुळं आयसीसीनं (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) बंदी घातली आहे. अशी प्रत्येक उदाहरण द्यायची म्हटली तर प्रबंध तयार होईल.

‘आयसीसी’ पदोपदी सजग होऊन उपाययोजना करत आहेत पण फिक्सिंग तसेच गैरव्यवहाराची कीड पूर्णपणानं काढली जाऊ शकत नाही. कारण गैरकृत्याच्या विचाराचा किडा आणि अशाच गैरमार्गानं धनाढ्य होण्याची लालसा जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत आपण आपल्या दृष्टीनं संरक्षणासाठी तटबंदी करू शकतो. पण त्यासाठी ‘रात्र वैऱ्याची आहे, जागा राहा’ असं सतत मनात ठेवून आणि डोळ्यात तेल घालून ‘आयसीसी’ला दक्ष राहावंच लागत आहे.

वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत संयुक्तपणे होत असलेली ट्वेन्टी-२० स्पर्धा त्यास अपवाद कशी असेल ? कारण अशा बहुराष्ट्रीय स्पर्धा आणि देशभरात होत अललेल्या लीग म्हणजे सट्टेबाज आणि फिक्सर्स यांच्यासाठी पर्वणीच.

या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळी सामने संपून सुपर-आठ फेरी सुरू होण्याच्या अगोदर एक महत्त्वाची घटना घडल्याचं समोर आलं आहे.

या स्पर्धेत प्रथमच खेळत असलेल्या युगांडा या देशाच्या खेळाडूशी केनियाचा एक माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू सतत संपर्क करत होता. युगांडाच्या या खेळाडूनं त्याला दाद दिली नाही म्हणून केनियाच्या या खेळाडूनं वेगवेगळ्या क्रमांकावरून त्याला फोन केले. युगांडाचा हा खेळाडू लगेचच सावध झाला आणि त्यानं आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक समितीच्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास ही घटना आणली आणि पुढचा अनर्थ टळला.

पण या निमित्तानं पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यावरून हा विळखा किती घट्ट होत आहे याचा अंदाज येतो. पूर्वी सट्टेबाज किंवा फिक्सर्स असे प्रयत्न करायचे. आताही करत असतीलच पण या वेळी केनियाच्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूचा त्यात समावेश आहे. ही चिंतेची बाब आहे.

कधी काळी केनिया हा मान्यताप्राप्त संघांना टक्कर देऊ शकेल अशा क्षमतेचा होता. आपले माजी कसोटी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात केनियाच्या संघानं २००३ च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.

केनियाचा संघ आता काय करतो हे शोधावं लागेल पण त्याचवेळी आता युगांडा, पापूआ न्यू गिनी असे नवे संघ आले आहेत आणि एरवी आठ ते दहा संघांत होणारी विश्वकरंडक स्पर्धा आता तब्बल वीस संघांची झाली आहे. अमेरिका खंडातही आता क्रिकेटची व्याप्ती आणि प्रसार करण्यासाठी प्रामुख्याने टी-२० विश्वकरंडक स्पर्धांमध्ये यापुढेही एवढेच संघ असणार, पुढं जाऊन चीन-जपानसारखेही संघ तयार होतील. पण संघांची संख्या जेवढी वाढत जाईल, तेवढा धोका वाढतच जाणार आहे.

कारण केनियाच्या त्या माजी खेळाडूनं यंदा प्रथमच खेळणाऱ्या युगांडाच्या खेळाडूला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. यातून नवखे संघ आणि त्यांचे खेळाडू हे सॉफ्ट टार्गेट असू शकतील.

असे आहेत नियम

मुळात आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी नियम अगदी स्पष्ट आहेत. संलग्न असलेला प्रत्येक देश आणि त्यांचा प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक, ट्रेनर, व्यवस्थापक, निवड समितीचा सदस्य, व्यावसायिक लीगमधील संघांचे मालक किंवा अधिकारी, डॉक्टर, ट्रेनिस, फिजिओथेरपिस्ट, सामनाधिकारी, क्युरेटर, खेळाडूंचे एजंट, पंच तसेच आयसीसीचेही अधिकारी या नियमाशी बांधील आहेत.

एखादी स्पर्धा संपल्यानंतर पुढे दोन वर्षे हे सर्व जण नियमाशी बांधील असतात. या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर श्रीलंकेत होणाऱ्या लीगमधील एका संघाचा भारतीय वंशाचा मालक भ्रष्ट्राचाराच्या विळख्यात सापडला परिणामी त्याची फ्रँचाईजीच रद्द करण्यात आली.

बनावट स्पर्धांचं पेव

आपण सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना भारतातील आयपीएल ही मोठी स्पर्धा माहीत असलेली. पण अशा प्रकारच्या बनावट स्पर्धा देशात होतात यावर विश्वास बसणार नाही. पोलिसांना जेव्हा जेव्हा टीप मिळाली, तेव्हा तेव्हा त्यांनी कारवाई केली तरी त्यांचं पेव काही कमी झालेलं नाही. २०२२ मध्ये गुजरातमध्ये अशा एका स्पर्धेचा घाट पोलिसांना उधळला. त्यानंतर पंजाबमध्ये हापूर येथे बिग बॅश पंजाब टी-२० स्पर्धेचे रॅकेट उद्ध्वस्त केले.

यात आंतरराष्ट्रीय बेटिंग रॅकेट असल्याचं स्पष्ट झालं. युट्यूब चॅनेल तयार करून त्यावर सट्टेबाजी केली जाते. हा संदर्भ देण्याचा हेतू एवढाच, की क्रिकेट आणि प्रामुख्याने टी-२० हा प्रकार सट्टेबाज आणि फिक्सर्ससाठी सोन्याचं अंडे देणारी कोंबडी झाला आहे. ती अधिकृत असो वा अनधिकृत, सट्टेबाजी करता आली पाहिजे इतकंच या लोकांच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व.

आता आयसीसी अशा अनधिकृत स्पर्धांवर कारवाई करू शकत नाही पण ही कीड वाळवीपेक्षा भयानक आहे. वेळीच ती नेस्तनाबूत केली नाही, तर क्रिकेटचं फोफावलेलं झाड कधी पोखरेल याचा नेम नाही, म्हणूनच मोठ्या स्पर्धांसाठी संघांची संख्या वाढवत असताना फिक्सिंगचा धोका अधिक प्रमाणात वाढू शकतो याकडंही लक्ष द्यावं लागणार आहे. ती आजच्या काळाची नितांत गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.