आदर खेळाचा हवा!

खेळाचंच नव्हे तर कुठलंही क्षेत्र असो. एखाद्या कलेत, विषयात किंवा प्रांतात प्रावीण्य मिळवलं म्हणजे सर्वज्ञानी किंवा सर्वकालिक श्रेष्ठ होता येत नसतं.
cristiano ronaldo and virat kohli best sports player team has
cristiano ronaldo and virat kohli best sports player team hasSakal
Updated on

खेळाचंच नव्हे तर कुठलंही क्षेत्र असो. एखाद्या कलेत, विषयात किंवा प्रांतात प्रावीण्य मिळवलं म्हणजे सर्वज्ञानी किंवा सर्वकालिक श्रेष्ठ होता येत नसतं. परिस्थिती नेहमीच सारखी नसते. कालचक्राप्रमाणे परिस्थिती बदलली, की आपल्या अंगी असलेल्या प्रावीण्यातही चढउतार होत असतात.

सूर्योदय-सूर्यास्ताच्या या प्रकियेत ज्याचे पाय जमिनीवर असतात, त्याला अंधारातही स्थिर आणि अविचल राहता येतं आणि अपयशातही त्याचं वलय कायम राहतं... ही सर्व परिस्थिती नुकत्याच संपलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीने अनुभवली. आताच्या स्थितीत क्रिकेटमधील तो बादशाह आहे. अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. या विश्वकरंडक स्पर्धेच्या निमित्तानं तो वेस्ट इंडिजमध्ये होता.

ओरिजनल आक्रमक फलंदाज म्हणून लौकिक असलेले व्हिवियन रिचर्डस असो की सर गारफील्ड सोबर्स असोत, एवढंच कशाला वेगवान गोलंदाजीचा तोफखाना वेस्ली हॉल विराटवर फिदा आहेत. त्यांच्यासोबतच्या काही व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून सर्वांनी हे अनुभवलंय. सहजगत्या धावा करणं यामध्ये विराट कुशलच. पण त्याच विराटच्या बॅटचा धावांचा दुष्काळ सुरू होता. अखेर संघाला नितांत गरज असताना अंतिम सामन्यात विराटने निर्णायक धावा केल्या आणि पुढं भारत विश्वविजेता झाला.

हा सर्व घटनाक्रम सर्वांनी पाहिला पण मायदेशी परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमावेत झालेल्या भेटीत विराट एक लाखमोलाची भावना व्यक्त करून गेला. सर्वांसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे...

‘‘मी संघासाठी काहीच करू शकत नव्हतो. खेळाची परिस्थिती अशी निर्माण झाली की मला माझा अहंकार दूर ठेवावा लागला. माझ्यासाठी संघ महत्त्वाचा होता. खेळाचा सन्मान मी ठेवला आणि खेळानं मला पुन्हा यश मिळवून दिले ! ``

महान फलंदाज असलेला विराटही परिस्थितीसमोर शरण गेला आणि विशेष म्हणजे त्याला त्याची जाणीव झाली. कोणताही खेळाडू चौकार, षटकार किंवा विकेट तसेच विजेतेपदाने मोठा होत नसतो... आचार आणि विचार हेच सर्वश्रेष्ठ असतात.

अर्थात त्यानुसार होणारं आचरण पुन्हा यशाच्या मार्गावर नेणारं असतं... मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर किंवा राहुल द्रविडसारखे खेळाडू असोत, त्यांनी कधीही खेळापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी भावना जवळपासही फिरकू दिली नाही म्हणून ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकले.

आता दुसरे उदाहरण पाहू या. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा सुरू असताना जर्मनीमध्ये युरो फुटबॉल स्पर्धा सुरू झाली. युरो स्पर्धा म्हणजे मिनी विश्वकरंडक फुटबॉलच. यात केवळ नावाजलेल्या अर्जेंटिना, ब्राझील आदी अमेरिकन आणि आफ्रिकन तसेच एशियन खंडातील संघांचा सहभाग नाही. पण प्रतिष्ठा मात्र विश्वकरंडक स्पर्धेएवढीच पणाला लागते.

फुटबॉल म्हटले की लगेचच समोर येतात लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, कायलिएन एम्बापे यांच्यासारखे दिग्गज खेळाडू. आताच्या क्षणाचे कदाचित सर्व विक्रम नावावर असलेला आणि त्याचा अभिमान बाळगणारा खेळाडू म्हणजे रोनाल्डो.

पण त्याच्या पोर्तुगाल संघाला उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. या सामन्यात तर जादा डावात पेनल्टी किक रोनाल्डोला सत्कारणी लावता आली नव्हती, त्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये त्याने एका पेनल्टीवर गोल केला मात्र त्याच्या संघाला बाद व्हावं लागलं.

दुःखी... कष्टी रोनाल्डो रडवेल्या चेहऱ्याने मैदान सोडत असताना त्याचंच एक गर्व दाखवणारं महिन्यापूर्वीचे वक्तव्य आठवलं... ``मी विक्रमाच्या मागं लागत नाही ते माझ्या मागं येतात ! इंग्लिश प्रीमियर लीग किंवा ला लीगसारख्या मोठ्या लीगमध्ये सध्या जागा नसलेला रोनाल्डो सौदी अरेबियातील लीगमध्ये खेळतो आणि तिथं तेवढी आव्हानात्मक स्पर्धा नसताना गोल करतो आणि विक्रमांचा अहंकार बाळगतो. पण देशाला गरज असताना अपयशी ठरतो. कारण यामध्ये आलेला असतो तो अहंकार ! किंवा खेळापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्याची वृत्ती.

आजमितीला रोनाल्डो आणि मेस्सी यांची तुलना केली जाते. पण मेस्सीच्या मुखातून कधीही स्वतःला श्रेष्ठ समजणारी अहंकारी वक्तव्य बाहेर पडत नाहीत. मुळात तो कोणाशीही स्पर्धा करत नाही. पण रोनाल्डो मात्र आपण मेस्सीपेक्षा महान आहोत असे दाखवत असतो.

पण आज त्याच मेस्सीकडे युरो प्रमाणेच (युरोपियन देश वगळता) कोपा अमेरिका विजेतेपद आणि विश्वविजेतेपद आहे, पण रोनाल्डोला अजूनही विश्वकरंडक उंचावता आलेला नाही. व्यावसायिक लीगमध्ये कितीही विजेतेपद मिळवा किंवा गोलांचे विक्रम करा पण विश्वविजेतेपद हेच सर्वश्रेष्ठ असते. ते मेस्सीकडे आहे.

विराट कोहलीने मांडलेल्या सिद्धांतामध्ये जर मेस्सी-रोनाल्डोची तुलना करायची म्हटली, तर रोनाल्डो खेळापेक्षा स्वतःला मोठा समजतो हे त्याच्या एकूणच देहबोलीतून, वर्तनातून आणि वक्तव्यातून सिद्ध होते. हाच रोनाल्डो तंदुरुस्तीच्या बाबतीतही तेवढाच महान आहे, पण त्याचे आता वय ३९ वर्ष आहे.

दोन वर्षांनी विश्वकरंडक स्पर्धा होईल, तेव्हा तो ४१ वर्षांचा झालेला असेल. त्यामुळे त्या स्पर्धेत खेळता आले नाही तर विश्वकरंडक जिंकण्याचं त्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. त्याच्या पोर्तगाल संघाने २०१६ मधील युरो स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते,

पण अंतिम सामन्यात सुरुवातीलाच रोनाल्डो जखमी झाला मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर इतर खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर रोनाल्डो शेवटी करंडक उंचावायला आला होता. महत्त्वाच्या अंतिम सामन्यात रोनाल्डो मैदानाबाहेर होता, हे अंतिम सत्य होते.

थोडक्यात काय तर अहंकार ही बाब किती होत्याचं नव्हतं करते, ही जगरहाटी आहे. विराट कोहलीचे ते शब्द फ्रेम करून नव्या पिढीसमोर कायम ठेवायला हवे. कारण रियान परागसारखे खेळाडू भारतीय संघात असतात. आयपीएलमध्ये काय दोन-चार सामन्यात चांगली फलंदाजी केली त्याला विश्वकरंडक संघात स्थान मिळण्याची स्वप्न पडू लागली होती...

रोहित शर्माच्या त्या संघात मी स्वतःला पाहत होतो, माझी निवड झाली नाही त्यामुळे मी विश्वकरंडक स्पर्धा पाहणार नाही, असे तो म्हणाला होता. पुढे आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला संधी मिळाली पण पहिल्याच सामन्यात अवघ्या दोन धावांवर बाद झाला.

त्या वेळी समोर आलेल्या चेंडूने नव्हे तर अहंकाराने त्याची विकेट काढली होती. अशा प्रकारचा फुकाचा अहंकार बाळगणारे खेळाडू आले आणि गेले आहेत पण रोनाल्डो असो वा रियान पराग सारखी उदाहरणे सापडतातच. विराट कोहलीसारखे मोजकेच असतात, जे स्वतःपेक्षा खेळाचा आदर अधिक करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com