एका व्हायरल चित्रफितीत दलाई लामा एका किशोरवयीन मुलाच्या ओठांचे चुंबन घेतात. आपली जीभ बाहेर काढून मुलाला ती तोंडाने ओढण्यास सांगतात.
- मालिनी नायर
एका व्हायरल चित्रफितीत दलाई लामा एका किशोरवयीन मुलाच्या ओठांचे चुंबन घेतात. आपली जीभ बाहेर काढून मुलाला ती तोंडाने ओढण्यास सांगतात. हे सर्व लोकांसमोर केलेले लैंगिक शोषण आहे. जगातील कोणत्याही धर्मातील प्रौढ व्यक्ती तुम्हाला हे सांगणार नाही की, अल्पवयीन मुलाने प्रौढ व्यक्तीचे चुंबन घेणे ही आदर्श गोष्ट आहे.
बौद्ध धर्माचे नेते दलाई लामा यांची एक चित्रफीत काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. यात एक किशोरवयीन मुलगा दलाई लामा यांना आलिंगन देण्याची विनंती करत आहे. या बदल्यात दलाई लामा त्या मुलाच्या ओठांचे चुंबन घेतात आणि आपली जीभ बाहेर काढून मुलाला ती तोंडाने ओढण्यास सांगतात.
अनेक लोकांच्या मते ही एक किरकोळ गोष्ट आहे; पण हे सर्व लोकांसमोर केलेले त्या मुलाचे लैंगिक शोषण आहे. या प्रकरणावर लोकांनी रोष व्यक्त केल्यावर या बुवांनी समाजमाध्यमावर मुलाची आणि त्याच्या पालकांची माफी मागितली; पण ही गुन्ह्याची कबुली वाटण्यापेक्षा आपल्या कृत्याचे समर्थनच जास्त वाटत होते.
यात म्हटले आहे की दलाई लामांचे हे कृत्य निरागसपणाचे होते. ते आपल्या अनुयायांशी आणि लोकांशी नेहमीच थट्टामस्करी करत असतात. त्या ट्विटमध्ये असे लिहिले होते, की ‘‘नुकतीच एक चित्रफीत प्रसारित केली जात आहे, ज्यात एक लहान मुलगा परमपूज्य दलाई लामांना आलिंगन देण्यासंबंधी विचारत आहे.
आपल्या शब्दांमुळे तो दुखावला गेला असेल, तर दलाई लामा त्या मुलाची, त्याच्या पालकांची आणि आपल्या जगभरातील स्नेहीजनांची माफी मागू इच्छितात. दलाई लामा लोकांशी नेहमीच हसतखेळत आणि निरागसपणे भेटतात. अगदी सार्वजनिक ठिकाणी आणि कॅमेऱ्यासमोरही. पण, या प्रसंगाबद्दल त्यांना खेद वाटतो.’’
या ट्विटमधील भाषेवरून दलाई लामांनी स्वतः माफी मागितलेली नाही. मुलाच्या ओठांचे चुंबन घेऊन आणि त्याला आपली जीभ तोंडाने ओढण्यास सांगून त्याच्या खासगीपणाचा भंग केला आहे. (या चुंबनानंतर मुलगा दचकून मागे सरकताना आपण चित्रफितीत पाहू शकतो.)
ट्विटमध्ये असे म्हटले आहे, की सर्वोच्च पदावर विराजमान असूनही दलाई लामा लोकांशी सार्वजनिक ठिकाणी आणि कॅमेऱ्यासमोर खेळकरपणे आणि निरागसणे भेटतात. पण, या चित्रफितीत कुठेही गंमत दिसली नाही. निरागसता आणि अज्ञान या शब्दांनी दलाई लामा आणि त्यांचे भक्त आपला बचाव करू शकत नाहीत.
बाल लैंगिक शोषण आणि कुठल्याही बालकांचा कुठल्याही प्रकारचा छळ हा अपराध आहे. अशा प्रकारच्या अनुभवांचे पीडितावर होणारे परिणाम आयुष्यभर टिकतात आणि त्याचे/तिचे सर्वसाधारण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. ज्या मुलांनी लैंगिक किंवा कोणत्याही प्रकारचा छळ अनुभवला आहे त्यांना अनेक प्रकारच्या मानसिक आजारांना सामोरे जावे लागते, हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे.
अनेकांना पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा (पीटीएसडी) त्रास होतो. एडीएचडीचा त्रास होतो आणि आपापल्या कामाचे, जगण्याचे नियोजन करण्यात अडचणी येतात. अशी मुले आत्महत्या करण्याची किंवा तसा विचार करण्याची जास्त शक्यता असते.
नैराश्य, बांधीलकी जपण्याच्या भीतीने ते ग्रासलेले असतात. निरोगी नातेसंबंध निर्माण करण्यात ते असमर्थ ठरतात. इतरांचे भावनिक, शारीरिक शोषण करण्याकडे त्यांचा कल राहतो. सतत दुसऱ्याचे लक्ष वेधण्याचा ते प्रयत्न करतात. अति क्रोध आणि वाढत्या वयात गुन्हेगारीकडे वळण्याचीही त्यांची शक्यता असते.
जगभरात अशा प्रकारची असंख्य मुले असतील जे अशा छळाचे बळी ठरले असतील आणि त्यांना कुठलीही मदत मिळाली नसेल. २०२० मध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने पोक्सो कायद्यांतर्गत अशा ४३ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. म्हणजे दर १२ मिनिटाला अशा प्रकारचे एक प्रकरण घडते. अर्थात बदनामीच्या भीतीने अनेक प्रकरणे नोंदवलीच जात नाहीत.
त्यामुळे प्रत्यक्षात ही संख्या याहून कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तर मुले लाजेपोटी किंवा भीतीपोटी कुणाला काही सांगतच नाहीत किंवा आपल्यासोबत काय झाले आहे, हेच त्यांना समजत नाही.
अनेकदा शोषण करणाऱ्या व्यक्तीच्या अधिकारामुळे ते काही बोलू शकत नाहीत. ही व्यक्ती एकतर कुटुंबातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती असते, शिक्षक, प्रशिक्षक किंवा एखादी अनोळखी व्यक्ती किंवा एखादी अशी व्यक्ती असते जिचा मुले आणि त्यांचे कुटुंबीयही आदर करत असतात.
मुलींच्या तुलनेत मुलांची प्रकरणे फारच कमी प्रमाणात नोंदवली जातात. शक्तिशाली पदावर असलेल्या व्यक्ती अनेकदा अशा प्रकरणात आपल्या पदाचा फायदा घेतात. ‘अमेरिकेचे बाबा’ म्हणून ओळख असणारा प्रसिद्ध कॉमेडियन बिल कॉस्बी मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळला आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली.
जगप्रसिद्ध पॉपगायक मायकेल जॅक्सनवर दोन तरुण मुलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या प्रकरणावर न्यायालयाच्या बाहेरच तडजोड करण्यात आली. भारतीय आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांच्यावर अनेक अल्पवयीन मुलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ब्रिटीश राजघराण्यातील राजकुमार अँड्र्यू,
निवेदक जिमी सेव्हिल, बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री इम्रान अहमद खान या सर्वांवर अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅथलिक धर्मगुरूंकडून मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे २०००चे प्रकरण विसरता येणार नाही.
लहान मुलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी आरोपींनी त्यांच्या पदाचा आणि सत्तेचा वापर केला आहे. हे इतर गुन्हेगारांसारखे दिसत नाहीत. ते सर्वसामान्य चांगल्या माणसांसारखे दिसतात, ज्यांच्यावर लहान मुले चटकन विश्वास ठेवतात.
मी उल्लेख केलेली सर्व नावे ही शक्तिशाली व्यक्तींची आहेत आणि जी बाललैंगिक शोषणाच्या प्रकरणात सामील आहेत. त्यांना त्यांच्या गैरकृत्याची जाणीवच नाही, असे कोणी म्हणू शकत नाही. मग दलाई लामांची कृती ही निरागस चूक होती, असे ते आणि त्यांचे भक्त कसे काय म्हणू शकतात? पोक्सो २०१२ या कायद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की लहान मुलांच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करणे किंवा लैंगिक मागणी करणे हे शोषणच आहे.
मग एखाद्या विकृत काका/मामा किंवा मावशी, आत्याला त्यांच्या पुतण्या-पुतणीला चुंबन घेण्यापासून आपण कसे रोखणार आहोत? एकदा का अशा घटनांना मुभा मिळाली की मग मुलांच्या बाबतीत कोणते वर्तन चूक आणि कोणते बरोबर, हे आपण कसे ठरवणार आहोत.
या प्रकारच्या कृत्यातून बालकांची खरेदी-विक्री आणि पॉर्नला प्रोत्साहन मिळते, हे विसरून चालणार नाही. या चित्रफितीबद्दल अनेक जण, ही दलाई लामांची निष्पाप चूक होती, असे मानतात. जीभ बाहेर काढणे ही सांस्कृतिक परंपरा असल्याचे त्यांचे अनुयायी सांगत आहेत. पण, त्यांनी केवळ जीभ बाहेर काढली नव्हती, तर ती तोंडाने ओढण्यास मुलाला सांगितले होते.
दलाई लामा हे जगभर भ्रमंती करत असतात आणि सर्व प्रकारच्या संस्कृतीच्या संपर्कात असतात. त्यांच्यासोबत असे शिष्य असतात जे त्यांच्याबरोबर प्रवास करत असतात. काय योग्य, काय अयोग्य, काय कायदेशीर आणि काय बेकायदेशीर हे त्यांना चांलगेच माहीत असते. त्यामुळे आम्हाला तर हे माहीतच नव्हते, असे त्यांचे अनुयायी म्हणू शकत नाहीत.
जगातील कोणत्याही धर्मातील, कोणत्याही संस्कृतीतील प्रौढ व्यक्ती तुम्हाला हे सांगणार नाही, की अल्पवयीन मुलाने प्रौढ व्यक्तीचे चुंबन घेणे ही आदर्श गोष्ट आहे. जर लामांनी हे थट्टेत केले असेल, तर त्यांनी याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पण, सुरुवातीच्या गदारोळानंतर ही चित्रफीत अडवण्यात आली आहे. दलाई लामांचा तथाकथित माफीनामा आल्यानंतर यावरील चर्चा थांबवण्यात आली आहे.
भारतातील लोकप्रतिनिधींनी याबाबत कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. दोषी कितीही मोठी व्यक्ती असली, तरी तिची गय केली जाणार नाही, याची त्यांनी खात्री देणे आवश्यक आहे. अशा विकृतीला आपण प्रोत्साहन देऊ नये. आपल्या मुलांचे आपण संरक्षण केले पाहिजे.
आपल्या पाल्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, यातील फरक समजावून सांगण्यासाठी पालकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. तसेच मुलांनी अशा घटनेत निर्भयपणे संवाद साधावा, यासाठी त्यांना तयार करणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा आघातांशी त्यांना एकट्यालाच लढावे लागू नये आणि त्यांचे आयुष्य कायमचे बरबाद होऊ नये. लहान मुले हे जगाचे भविष्य आहेत. त्यांचे संरक्षण करणे म्हणजे जगातील मानवतेच्या भविष्याचे संरक्षण करण्यासारखे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.