जपानी भाषेतील अहवालाचा अनुवाद करून घेतल्याचे मागच्या भागात मी सांगितलेच. मंदा मोहिमेसाठी आम्ही सज्ज झालो. १९९१ मध्ये संजय डोईफोडेच्या नेतृत्वाखाली मी, अविनाश फौजदार, जगदीश चाफेकर, प्रदीप केळकर, जितेंद्र हांडे देशमुख असा आम्हा सहा जणांचा संघ पूर्ण तयारीनिशी गढवाल हिमालयात दाखल झाला. जयसिंग व देवीसिंग अशा नेपाळी हाय अल्टीट्युड पोर्टर्सची जोडगोळी आमच्या मदतीसाठी होती. यावेळी कॅम्प एकपर्यंत चढाईचा आम्हाला अनुभव होता. येथे चढाई करताना प्रचंड अशा रॉकफॉलप्रवण भागातून चढाई करावी लागत असे. येथे अजस्त्र कातळभिंती होत्या, ज्याठिकाणी सह्याद्रीत करतो त्याहीपेक्षा अवघड असे रॉक क्लायम्बिंग करावे लागत असे.
या संपूर्ण चढाई मार्गावर एवढ्या मोठ्या भेगा होत्या की येथे नेहमीच्या वापरातील पिटॉन्स (रॉक क्लायम्बिंग करताना दगडात ठोकण्याचे खिळे, ज्यांचा वापर हा चढाई उतराई करताना करावा लागतो) उपयोगाचे नव्हते. नेहमीपेक्षा जरा जास्त लांबीचे, म्हणजे किमान फूटभर लांब अशा पिटॉन्सची गरज होती, हे मला १९८९ च्या असफल प्रयत्नातून समजले होते. म्हणून पुण्यातील जुन्या बाजाराजवळ असलेल्या एका लोहाराकडे जाऊन गाड्यांच्या पाट्यांपासून बनविलेले फूटभर लांबीचे पिटॉन्स बनवून घेतले. सुदैवाने हे पिटॉन्स अतिशय चपखल बसले व त्याचा आधार घेऊनच आम्ही चढाई करू शकलो. अशा प्रकारचे पिटॉन्स बनवून घेणे हा एक प्रकारचा प्रयोगच होता जो अत्यंत यशस्वी ठरला होता.
आम्ही रॉक क्लायंबिंग करत कॅम्प एकला पोहोचलो. कॅम्प एकच्या पुढे एक छोटा आईसफॉल लागतो, त्यातून मार्ग काढत कॅम्प दोन गाठले. पुढे ६५-७० अंश कोनात असलेल्या तीव्र धारेवरून अतिशय सावधपणे आम्ही पुढील रूट खुला केला. या ठिकाणी एक तंबू लावू शकू एवढीच जागा होती आणि दोन्ही बाजूला चार ते पाच हजार फूट खोल दरी. एक छोटी चूक झाली असती तर खोल दरीत कोसळण्याची भीती होती.
आम्हाला खालच्या बाजूला गंगोत्री ते गोमुख मार्गावरील ‘चिडबासा’ स्पष्ट दिसत होते. सोबतीला आसपास उभे असलेले शिवलिंग, सुदर्शन इत्यादी शिखरे देखील दर्शनी पडत होते. दृश्य अतिशय मनमोहक होते, मात्र प्रसंग आमच्यासाठी बाका होता. कारण २३ दिवस अथक प्रयत्न करून सोबत आणलेला २ हजार ७०० मीटर लांबीचा रोप संपला होता. सोबतीला खालच्या भागात लावलेला रोपदेखील आम्ही काढून आणला होता. शिखरमाथा अवघ्या ४०० ते ५०० मीटरवर होता, मात्र आमच्याकडे असलेला सुरक्षा रोप संपला होता.
त्याच्या पुढे विना रोपची चढाई करणे म्हणजे जिवावर बेतण्यासारखे होते. आम्हाला शिखरमाथा स्पष्ट दिसत होता, मात्र आमच्या समोर अतिशय तीव्र व एकावेळी एकच पाऊल ठेवता येईल एवढी निमुळती धार होती. एक चूक आणि काही हजार फूट खोल दरीत कोसळण्याची भीती होती. तरीही संजय मला थोडे पुढे जाऊन येऊ, इथपर्यंत आलो आहोत तर शिखरावर जाऊच, यासाठी आग्रह धरत होता.
विनारोप चढाई करण्याची त्याची तयारी होती. मला मात्र समोर उभ्या असलेल्या शिखरापेक्षा धोक्याची वाट जास्त स्पष्ट दिसत होती. मी भावनांना आवर घालत खाली जाण्याबद्दल बोलू लागलो. मंदा शिखर आपल्या नशिबात नाही, आता नाही तर पुन्हा कधीतरी येऊ.. शिखर चढाईपेक्षा जीव महत्वाचा.. एक चूक जिवावर बेतेल, अशी समजूत काढत मी संजयला खाली घेऊन आलो. संपूर्ण उतराईमध्ये आमच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा काही थांबत नव्हत्या. अगदी तुटपुंज्या संसाधनामध्ये पुण्यापासून बेस कॅम्पपर्यंत सर्वच तयारी आमच्या आम्हीच केली होती. बेस कॅम्पपासून कॅम्प दोनपर्यंत सर्व सामानाची लोड फेरी करताना जितेंद्र व अविनाशने अक्षरशः जिवाचे रान केले होते.
मी आणि संजयने पैसे उभे करण्यापासून चढाईपर्यंत सर्वच गोष्टींसाठी जीव तोडून मेहनत केली होती. आमच्या सोबत कोणतीही सपोर्ट टीम नव्हती. स्वयंपाक, भांडी धुणे, टेन्ट लावणे ही कामे देखील आम्हीच केली होती. त्यावेळी उत्तरकाशीला फार सामान मिळत नसे, त्यामुळे अगदी पुण्यातूनच सर्व गोष्टींची जुळवाजुळव करावी लागत असे. आम्ही सर्व काही केले होते, मंदा शिखर चढाईच्या ध्यासाने. मात्र आम्हाला काही यश मिळाले नव्हते.
सर्व गोष्टी डोळ्यासमोर उभ्या होत्या. मनात खूप रुखरुख होती. मंदा शिखर चढाई जरी अयशस्वी झाली असली तरी जवळच असलेल्या भ्रिगु पर्वतावर चढाई करू, असा प्रस्ताव अविनाशने संघासमोर मांडला. ६०४१ मीटर उंच असलेल्या भ्रिगु पर्वतावर तोपर्यंत कोणीही चढाई केली नव्हती. त्यामुळे येथील आव्हाने ही संपूर्णपणे नवीन होती, तरी देखील भ्रिगु पर्वताचे आव्हान आम्ही पेलू शकू हा आत्मविश्वास आम्हाला होता. ठरल्याप्रमाणे चढाई केली व शिखरमाथा गाठला. भ्रिगु पर्वतावर सर्वांत पहिल्या चढाईचा मान आम्हा सहा जणांना मिळाला होता. अगदी मर्यादित संसाधनांमध्ये हे यश मिळवू शकलो, याचा अभिमान होताच मात्र सोबतीला मंदाचे अपयश मनात अगदी खोलवर रुजले होते. या दुःखाची सल कालपर्यंत बोचत होती. दरम्यानच्या काळात मंदा मोहिमेविषयी अनेकदा गिरिप्रेमीतील गिर्यारोहकांशी चर्चा होत असे, मात्र काही ना काही कारणाने मंदा हा विषय मागे पडत गेला व मंदाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. मात्र, जेव्हा गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी माउंट मंदा मोहीम यशस्वी केली तेव्हा माझेच स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले असे मला वाटून गेले.
मी गिरिप्रेमीच्या मंदा मोहिमेचा संपूर्ण प्रवास बेसकॅम्पवरून अनुभवत होतो. जेव्हा शिखर चढाई करून डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे व पवन हाडोळे बेस कॅम्पला आले तेव्हा मला अगदी भरून आले. ३० वर्षांपूर्वी जगलेले सारे क्षण डोळ्यासमोर तरळले. मी संघाचे अभिनंदन करत असताना डॉ. सुमित म्हणाला की त्याने माझ्यासाठी एक खास भेट आणली आहे. काय भेट असेल हा विचार करत असतानाच त्याने माझ्या हातात ५० मीटर दोर टेकवला. हा तोच दोर होता जो मी व माझ्या संघाने ३० वर्षांपूर्वी कॅम्प २ च्या वर फिक्स केला होता. तो दोर बघून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. ३० वर्षांहून अधिक काळ पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेची निशाणी म्हणजे हा दोरखंड होता.
मी तो तसाच जपून ठेवला व आसपास असलेल्या परिसरावर एक नजर फिरवली. ३०- ३२ वर्षानंतर पुन्हा एकदा तोच बेस कॅम्प, तोच आईसफॉल, तेच केदारगंगा नदीचे खोरे आणि तेच मंदा शिखर पाहून मी सुखावून गेलो. माझ्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला, मात्र यावेळी या आठवणींना सुखाची झालर होती. या आठवणींमध्ये रममाण असतानाच डॉ. सुमितने आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला. आम्ही ३० वर्षांपूर्वी लावलेले पिटॉन्स हे आजही त्या रॉक क्लायम्बिंग मार्गावर तसेच आहेत, हे सांगितले. त्यांनी देखील याच पिटॉन्सचा वापर चढाईसाठी केला. आजही इतक्या वर्षानंतर त्या पिटॉन्सची उपयोगिता तेवढीच आहे, हे कळल्यावर मी तेव्हा घेतलेला निर्णय किती योग्य होता या विचारांनी मनोमन सुखावलो.
गिर्यारोहण मोहिमा या खरंच स्वप्नवत असतात. ती एक फक्त मोहीम नसते, तर तो असतो आपल्या एका वेगळ्या कुटुंबासोबत जगण्याचा अनुभव. आम्ही महिनाभर एकत्र असतो. इथे सर्वांचे स्वभाव कळतात, सवयी कळतात. अगदी एखाद्या कुटुंबाप्रमाणे आम्ही येथे एकमेकांना त्यांच्या गुण दोषांसकट स्वीकारतो. अशा मोहिमांतून आम्हाला काय मिळतं असं कुणी विचारतं, तेव्हा एकच उत्तर असते, प्रेम व आयुष्यभर पुरणाऱ्या आठवणींचा संचय.
-उमेश झिरपे
umzirpe@gmail.com
(सदराचे लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.