‘व्यवहार’आयपीएलचा, ‘खेळ’ टीम इंडियाचा

टीम इंडिया हरत असताना आयपीएल जिंकत होती हे सत्य कोणाही नाकारणार नाही.
IPL Cricket
IPL Cricketsakal
Updated on

सप्ततारांकित

भारतीय क्रिकेटसाठी गेला रविवार आणि सोमवार फार महत्वाचा ठरला. एकीकडं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध तेही प्रतिष्ठेच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत प्रथमच पराभूत होत असताना दुसऱ्या दिवशी सर्वांना बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या ‘आयपीएल’च्या दोन नव्या संघांची सर्वाधिक बोलीची हंडी फुटली. या दोन घटना तशा वेगवेगळ्या पण एकमेकांत गुंतलेल्या. देशप्रेम की पैशाला प्राधान्य अशी ओरड नेहमीच केली जात असते, येथे दोन्ही महत्त्वाचे असले तरी टीम इंडियाची पत घसरली आणि आयपीएलची कमालीची वाढली. टीम इंडिया हरत असताना आयपीएल जिंकत होती हे सत्य कोणाही नाकारणार नाही.

दोन घटना पहा...दुबईच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्टेडियममघ्ये भारतीय संघ ज्या पाकिस्तानकडून विश्‍व करंडक स्पर्धेत कधीही पराभूत झाला नव्हता त्या संघाकडून वाईट पद्धतीने हरला त्याचे राजकीय आणि इतर पातळीवरही पडलेले पडसाद सामन्यांनाही चीड आणणारे होते. टीम इंडियाचा हा खेळ याही देही याची डोळा स्वतः पाहणारे बीसीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्यांची सर्व टीम २४ तासांच्या आत ‘आयपीएल’साठीच्या दोन संघांची लॉटरी काढत होते. ‘बीसीसीआय’ची श्रीमंती अधिक लखलखीत करत होते, दुसऱ्या बाजूने विचार केला तर भारत-पाकिस्तान सामना कधीच निश्चित झाला होता.

तसेच आयपीएल लिलावाचाही हा कार्यक्रम अगोदरच ठरला होता. फरक फक्त विराट कोहलीचा संघ पाकिस्तानकडून पराभूत झाल्यामुळं पडला, पण हा पराभव केवळ एक हार म्हणून नाही तर संपूर्ण स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आणणारा ठरू शकणारा आहे. ज्या ‘ट्वेन्टी-२०’ पद्धतीची ‘आयपीएल’ खेळली जाते आणि आपण सर्वश्रेष्ठ असल्याचे टिमकी वाजवली जाते त्याच प्रकारातील विश्वकरंडक स्पर्धेत इतक्या लवकर गाशा गुंडाळण्याची स्थिती निर्माण होते म्हणजे निश्चितच आपण नेमक्या कोणत्या दिशेने जात आहोत हे विचार करायला लावणारी आहे.

भारतीय संघाने क्रिकेट विश्वात दरारा निर्माण केल्यानंतर कधीही विश्वकरंडक स्पर्धेत साखळीत गारद होण्याची वेळ आली नव्हती. अपवाद २००७ मध्ये वेस्ट इंडीज येथे झालेल्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा. बांगलादेशकडून सलामीला पराभूत झाल्यानंतर राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या त्या संघात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, झहीर खान असे दिग्गज तर होतेच त्याचबरोबर नवोदित महेंद्रसिंग धोनीही होता.

अपयशाचे ते शल्य मागे टाकत, लगेचच ‘आयपीएल’चे बिगुल वाजले होते. आयपीएल स्थिरावली, २००८ मध्ये संघांसाठी झालेल्या लिलावात राजस्तान रॉयल्स या संघासाठी ३२१ कोटींची बोली लागते तर आता संजीव गोयंका यांचा पीआरएसजी ग्रुप लखनौच्या संघासाठी ७०९० कोटी मोजतो, केवढा हा वेग आणि केवढी ही आयपीएलची श्रीमंती. एकीकडे ही आर्थिक सुबत्ता येत असताना मैदानावरचेही तिचे महत्व सर्वांना उमगले, नवनवे खेळाडू तयार होऊ लागले त्यांची ओळख निर्माण होऊ लागली आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रमुख खेळाडूंनाही चांगला सराव होऊ लागला, अशा सर्व जमेच्या गोष्टी झालेल्या असताना, या विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याच रणांगणात खेळण्याचा सरावही झाला. सर्व खेळाडू चांगल्या तयारीत असताना पाकिस्तानकडून पराभव होतो. हाच पाकिस्तान संघ किंवा त्यांचा एकही खेळाडू आयपीएलमघ्ये नसतो

तरीही भारतीय खेळाडू निष्प्रभ ठरतात म्हणजे नक्की काय चुकलेय याचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. आता न्यूझीलंडविरुद्धचा आजचा सामना हरला तर टीम इंडियाचे सर्व मुसळ केरात जाणार आहे. जेथे आयपीएलचा कोटींचा व्यवहार फायद्याचा होत असताना राष्ट्रीय प्रतिष्ठेचा सन्मान मात्र धुळीस मिळणार आहे, त्यामुळे नक्की टीम इंडियाच्या प्रगतीचा मार्ग आयपीएलमधून जातो का, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निश्चितच येणार. पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ गाफील राहिला किंवा आयपीएलचीच मानसिकता कायम ठेवल्याचा हा परिणाम हा प्रश्न उभा राहतो.

आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारतीय खेळाडू विश्वकरंडक स्पर्धेसाठी मैदानात उतरले पण त्यांचा एकूणच खेळ पाहाता त्यांच्या कपड्यांचा केवळ रंग बदलल्या सारखा दिसून आला. आयपीएल पार्ट -३ असे भासत होते उलट पाकिस्तानचा संघ विश्वकरंडक स्पर्धेत खेळतोय असे त्यांच्या पहिल्या दोन्ही सामन्यातून दिसून आले. आयपीएलमध्ये वेस्ट इंडीजचेही खेळाडू अधिक आहेत. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत गतविजेते असतानाही पहिले दोन सामने गमावताना त्यांचाही खेळ तसाच होताना दिसला.

दोष मानसिकतेचा ? क्रिकेटच कशाला

जीवनशैलीच आता बदलली आहे. पैसा, प्रलोभन आणि प्रसिद्धी उंबरठ्यापर्यंत आलेली असली तरी त्यात किती वाहून जायचे, प्रवाहात कसे पोहायचे हे प्रत्येकाने ठरवायचे असते. दोन नव्या संघांमुळे नव्या खेळाडूंची मागणी वाढणार आहे. व्यावसायिक दृष्टीकोन हा केवळ मिळणाऱ्या पैशापुरताच मर्यादित नसतो तर मानसिकताही आणण्याचा असतो. जो खेळाडू हा चेंज ओव्हर पटापट करू शकतो तो विचारानेही व्यावसायिक झालेला असतो.

शारीरिक थकवा

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीने मत प्रदर्शन करत असताना आयपीएलमुळे मानसिक थकवा आल्याचा ओझरता उल्लेख केला. त्याकडे कोणी गांभीर्याने पाहिले नाही, पण हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी झालेल्या आयपीएलमुळे सराव झाला हे ठीक आहे, परंतु आलेला मानसिक थकवा विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मोहिमेवर परिणाम करणारा तर ठरत नाही ना, हा प्रश्न निर्माण होतो.

आता काय...

आता एक समीकरण तर स्पष्ट आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकून आणि पुढच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करून टीम इंडियाला आपली क्षमता सिद्ध करण्याची वेळ आली आहे. तसे झाले नाही तर सर्व खापर ‘आयपीएल’वर फोडले जाणार आहे. याची जाणीव टीम इंडियाचे खेळाडू आणि बीसीसीआय पदाधिकारी या सर्वांना असणार आहे. नाही तर एकीकडे ‘आयपीएल’ ची कोटीच्या कोटी उड्डाणे आणि दुसरीकडे विश्‍व करंडक स्पर्धेत हाती कटोरा असे म्हणण्याचे वेळ येईल.

- शैलेश नागवेकर

saptrang@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.