सह्याद्री पर्वतावर पूर्वेला महादेव डोंगररांगा आहेत. त्यांतील दोन डोंगररांगा खानापूर तालुक्यात आहेत. त्यापैकी ‘रेवागिरी’ नावाची डोंगररांग विटा शहरापासून पूर्वेस सुरू होते.
होय एखादं गाव संपूर्ण शाकाहारी असू शकतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही... पण सांगली जिल्ह्यात असं गाव आहे. खानापूर तालुक्यातील रेणावी गाव संपूर्णपणे शाकाहारी आहे. गावामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. गावामध्ये अठरापगड जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि शाकाहाराचं पालन करतात.
सह्याद्री पर्वतावर पूर्वेला महादेव डोंगररांगा आहेत. त्यांतील दोन डोंगररांगा खानापूर तालुक्यात आहेत. त्यापैकी ‘रेवागिरी’ नावाची डोंगररांग विटा शहरापासून पूर्वेस सुरू होते. त्याची उंची १५००-२००० फूट इतकी आहे. ही डोंगररांग विटा शहरापासून पूर्वेस बाणूरगडपर्यंत पसरलेली आहे. या डोंगररांगेवर विटा शहराच्या पूर्वेस नऊ किलोमीटर अंतरावर कऱ्हाड-विजापूर रस्त्यावर दक्षिणेस रेणावी गाव आहे आणि इथेच श्री रेवणसिद्ध हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. श्री रेवणसिद्ध हे मूळ पंचाचार्य पीठ आहे. विटा नगरपरिषदेच्या हद्दीत रेवणसिद्ध मूळस्थान हे आणखी एक तीर्थक्षेत्र असून, त्या ठिकाणीही मंदिर आहे. येथील भाकणुकीला विशेष महत्त्व आहे.
श्री क्षेत्र रेणावी येथील देवस्थान प्रशस्त असून बांधकाम पूर्णपणे दगडांमध्ये करण्यात आलेलं आहे. डोंगरदऱ्या आणि दाट वनराईने हा परिसर वेढलेला आहे. मन प्रसन्न करणारं अल्हाददायी निसर्गरम्य असं ठिकाण आहे. मंदिराला पूर्व, पश्र्चिम आणि उत्तरेला दरवाजे आहेत. उत्तराभिमुख असलेलं हे मंदिर भव्य आहे. प्रथमदर्शनीच पाहताना येथील वातावरण भारून टाकतं. येथून जवळच असलेल्या डोंगरावर सुळकाईचं देखणं मंदिर बांधलेलं असून तिथेही भाविक गर्दी करताना दिसतात.
रेणावी येथील रेवणसिद्धाची यात्रा महाशिवरात्रीपासून सुरू होते. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठी यात्रा इथे भरते आणि त्या यात्रेमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. याच रेवणसिद्धाच्या भक्तीचा वसा घेतलेलं रेणावी हे गाव संपूर्णपणे शाकाहारी गाव आहे. बहुधा हे राज्यातील एकमेव उदाहरण असावं. विशेष म्हणजे या गावामध्ये लग्न करून येणाऱ्या सुनेलासुद्धा लग्नापूर्वी त्याबाबत विचारलं जातं. गेल्या कित्येक वर्षांपासून गावाने शाकाहाराची ही परंपरा जपली आणि जोपासली आहे. गावात सर्व धर्मांचे लोक राहतात. रेवणसिद्धाचा महिमा सांगणाऱ्या या गावातील अनेकजण गलाई (सोने-चांदी) व्यवसायानिमित्त देशभर विखुरलेले आहेत. रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी एक. नवनाथ हे शाकाहारी होते. त्यांच्या विचारांची कास धरून, त्या विचारांना पुढे नेताना गावाने शाकाहाराचा मार्ग अंगीकारला तो कायमचा.
भव्य आणि प्रशस्त मंदिर
रेवणसिद्धाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक नियमितपणे श्रद्धेने येत असतात. मंदिर परिसरामध्ये किरकोळ विक्रेते नियमितपणे आपला व्यवसाय करतात. जागृत देवस्थान अशी रेवणसिद्ध मंदिराबाबत भाविकांची श्रद्धा आहे. मंदिर परिसरामध्ये चिंचेची झाडं मोठ्या प्रमाणावर आहेत, तसंच मंदिराच्या उत्तरेला फुलबाग असून भाविक तिथे थांबून निसर्गाचा आनंद घेतात. गेल्या दहा वर्षांत या परिसराचा श्री रेवणसिद्ध परिसर विकास मंडळाच्या माध्यमातून कायापालट झालेला आहे. परिसरात स्वच्छता... ठिकठिकाणी भाविकांना बसण्यासाठी कट्टे, पाण्याची व्यवस्था, मंदिरापर्यंत पक्का रस्ता कार्यरत आहे. मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून दुर्बिणीतून पाहिल्यास शिखर शिंगणापूरचं दर्शन होतं, असं सांगितलं जातं. मंदिराच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर गायमुख आहे, तिथे जिवंत पाण्याचा झरा अखंड वाहत असतो. याच ठिकाणी महात्मा गांधीजींच्या अस्थींचं विसर्जन केलं होतं. देवालयाच्या शिखराचं बांधकाम स्वयंभू लिंगाच्यावर आहे. सर्व बांधकाम दगडी आहे. चैत्र महिन्यात खडी प्रदक्षिणा घालण्याची इथे मोठी परंपरा आहे.
रेवणसिद्ध मूर्तीसमोर भव्य असा नंदी आहे, तसंच एक दगडी गुंड आहे, त्याला कौल मागण्याचीही प्रथा आहे.
सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून या परिसराचा विकास केला जात आहे. परिसरात मिठाई विक्रेते, खेळणी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांची वर्दळ असते. विटा आगारातून यात्रेनिमित्त विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. भविकांना दर्शन सुलभ व्हावं यासाठी व्यवस्था आहे. श्रावण महिना, अमावास्या, सोमवार व गुरुवार या दिवशी इथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात.
रेवणसिद्ध मंदिर १४६१ मध्ये बांधलं असल्याचं ग्रामस्थ सांगतात, तसंच त्याचा पुरावा आणि नोंदी तेथील रहिवाशांकडे पाहावयास मिळतात. किल्ल्यासारखी भक्कम तटबंदी असणारं असं हे भव्य मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात रेवणसिद्धाचं स्वयंभू ठिकाण आहे.
श्रद्धा आणि भक्तीतून शाकाहार
श्री रेवणसिद्धनाथांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी अनादी काळापासून शाकाहारी भूमी म्हणून ओळखली जाते. इथे राहणारे विविध जाती-धर्मांतील लोक आपापल्या प्रथा-परंपरा पाळतातच; पण त्याचबरोबर शाकाहाराची परंपराही पाळत आहेत. श्री रेवणसिद्धनाथांवर असणारी प्रचंड श्रद्धा आणि भक्ती हे शाकाहारामागचं प्रमुख कारण आहे.
- बाळाजी गुरव, अध्यक्ष, श्री रेवणसिद्ध देवस्थान समिती, रेणावी
दृष्टिक्षेपात रेणावी
लोकसंख्या - २,३८२
स्त्रिया - १,२२३
पुरुष - १,१५९
एकूण कुटुंबं ६४५
ग्रामदैवत रेवणसिद्ध
शिक्षण - पहिली ते दहावी
पतसंस्था - दोन
ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.